आपण ज्ञानाची चर्चा करतांना माहितीचे "संहितीकरण" हा शब्द वापरला होता हे आपल्या लक्षात असेल. या संहितीकरणावर जरा विचार करुयात...समजावून घेऊयात.
आपल्याकडे माहिती येते ती सलग क्रमाने व सातत्याने येत नसते. माहिती ही नेहमीच खंडित व क्रमविरहित असते. म्हणजे माहिती कोणत्या क्रमाने हाती येईल याचा अंदाज अभ्यासकांनाही नसतो. जी हवी ती माहिती कोठेतरी उपलब्ध असली तरी ती अभ्यासकाला मिळेलच याची ग्वाही देता येत नाही. अनेक प्रकारच्या जुन्या माहित्या या त्रुटित स्वरुपात उपलब्ध असल्याने मुळात संपुर्ण काय होते हे समजायचाही मार्ग नसतो. प्रत्येक अभ्यासक जगातील यच्चयावत भाषा व लिप्यांचा तज्ञ असू शकत नाही हे अद्याहृत असल्याने भाषांतरे हेच एक साधन बनून जाते. भाषांतरांतही एकवाक्यता असेल असे सांगता येत नाही.
माहाराष्ट्री प्राकृतातील शिलालेखांच्या वाचनांतच अनेक विवाद आहेत. मग पुरातन भाषांबाबत बोलायलाच नको. त्यात सिंधू लिपीसहित अशा काही लिप्या आहेत ज्यांचे वाचन अद्याप झालेलेच नाही. शिवाय अनेक साधनांची कालनिश्चिती ही अक्षरश: अंदाजाने केलेली असते व त्यातही वाद असतात. उदा. वेदांचा आणि अवेस्ताचा काळ नेमका कोनता याबाबत हजारो वर्षांचा फरक पडेल एवढे विद्वानांचेच अंदाज आहेत. ही उदाहरणे अशासाठी दिली कि माहिती क्रमाने तर कधी खंडित तर कधी त्रुटित अशा स्वरुपात आपल्याकडे येत असते, याकडे आपले लक्ष वेधण्यासाठी. आणि शिवाय माहितीत निर्विवाद परिपुर्णता असेल याची ग्वाहीही देता येत नाही.
उदाहरणार्थ आर्यभटाने पृथ्वी स्थिर नसून स्वत:भोवती फिरते असे निर्विवाद पहिले सिद्धांतन केले हे सिद्धांतनही निर्विवाद नाही. अलीकडे मी आणि डा. आनंद दाबक यांनी मिळून याबाबत जरी स्पष्टीकरणात्मक लिहिले असले तरी ते सर्वमान्य नाही. म्हनजे माहितीत त्रुटी आहे की आकलनात त्रुटी आहे? आर्यभटाने पृथ्वीच्या स्वांगपरिभ्रमणाचा सिद्धांत प्रथम मांडला हे आकलन पुर्वग्रहदोषांमुळे दुर्लक्षिले जाते काय? परमादीश्वर ते नंतरच्या सर्वच भौतिकविदांनी त्याकडे पुर्वग्रहरहित आकलनाच्या अभावात दुर्लक्ष केले कि स्थिर पृथ्वी सिद्धांतच सोयीचा वाटत असल्याने आर्यभटाच्याच माहितीचे स्वत:च्या सिद्धांताला सोयिस्कर होतील असेच अर्थ घेतले?
म्हणजे माहितीच्या संहितीकरणातील ही त्रुटी नव्हे काय?
आपल्याला यावर गांभिर्याने विचार करावा लागणार आहे. हाती येणारी प्रत्येक माहिती निरपेक्षपणे, कोणताही पुर्वग्रह मनात न ठेवता त्या माहितीचे आकलन करणे ही ज्ञानाची पहिली पायरी असेल आणि अनेक विद्वान या पहिल्या पायरीवरच स्वहस्ते गारद होत असतील तर त्यांच्या माहितीच्या संहितीकरनाला आणि नंतरच्या सिद्धांतनाला काय अर्थ राहतो? ते सिद्धांतन कसल्याही स्थितीत विशिष्टज्ञान या अवस्थेलाही आलेले नसणार हे उघड आहे. ज्ञानाची तर गोष्टच वेगळी!
माहितीचे संहितीकरण निरपेक्ष आकलनाच्या अभावात प्रामाणिकपणे होणे शक्य नाही हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. स्वत: आदी शंकराचार्यांवर आरोप आहे कि त्यांनी आपल्या ईश्वर आणि ब्रह्म या दोहोंत भेद आहे या त्यांच्या सिद्धांतनाला त्यांनी जरी उपनिषदांचाच वापर केला असला तरी मुळात खुद्द उपनिषदांतच त्याला काही आधार नाही. पण आपले सिद्धांतन निर्विवाद आहे असे भासवण्यासाठी अनेक विद्वान आपल्या कथित माहितीचे संहितीकरण करतांना इतरांच्या अज्ञानाचा उपयोग करून घेतात, हेही एक वास्तव आहे. त्यापेक्षा आपले सिद्धांतन स्वत:चेच आहे, नव्य आहे हे सांगण्यात ते आपली बुद्धी खर्च का करत नाहीत? ही लबाडी नव्हे काय?
त्यामुळे आपण दोन प्रश्नांशी येऊन भिडतो. माहितीचा प्रामाणिकपणा म्हणजे काय आणि माहितीचे पुर्वग्रहदोषामुळे करुन घेतले जाणारे आकलन उपयुक्त ठरु शकते काय हे ते दोन मुलभूत प्रश्न होत!
आणि या प्रश्नांची उत्तरे आपण जोवर शोधत नाही तोवर आपण ज्याला आजवरचे उपलब्ध ज्ञान आहे असे म्हणतो ते तरी कितपत खरे आहे हे समजणार नाही.
पुर्वग्रहदुषित माहितीचे पुर्वग्रहदुषित मनांचे आकलन हे सर्वच क्षेत्रांत असल्याचे आपल्याला दिसून येईल. मग ते कायदेशास्त्र अथवा विज्ञान का असेना. त्यामुळे होणारी अभिव्यक्ती ही अज्ञानपुर्ण असून अगदी विशिष्ट-ज्ञानाचीही पायरी ते गाठू शकत नाही हे आपल्या लक्षात येईल. एखाद्या सिद्धांतनाच्या अनिवार प्रेमात पडून सारी घटिते त्याच सिद्धांतनाच्या चौकटीतून पाहिल्याने काय अनर्थ होऊ शकतात हे आपण भौतिकी शास्त्राच्याच क्षेत्रात पाहत आहोत.
हा मानवी गूण आहे कि दुर्गूण?
कि त्याचेही सिद्धांतन करणे आवश्यक आहे?
यावरही आपल्याला विचार करने आवश्यक आहे. आपण माहितीकडे जोवर निरपेक्षपणे पाहत नाही, जोवर आपण सोयीची माहिती घेत गैरसोयीची माहिती अकारण टाळतो आणि सोयीच्या माहितीच्या आधारे तिचे संहीतीकरण करत कोणतेही सिद्धांतन करतो ते "विशिष्ट-ज्ञान" या पातळीलाही कधीही येवू शकनार नाही.
मग ज्ञान काय हे समजणे तर लांबची गोष्ट राहिली.
(क्रमश:)