Friday, April 4, 2014

संतश्रेष्ठ तुकारामांचा खून झाला का?


तुकाराम बीजेच्या दिवशी संत तुकारामांचा खून काही ब्राह्मणांनी केला, प्रेताची विल्हेवाट लावली आणि ते सदेह वैकूंठाला गेले अशी अफवा पसरवली असे काही लोक गेल्या आठवड्यात फेसबूकवर पसरवत आहेत हे पाहिले. तसा हा आरोप नवा नाही. या आरोपावर लिहावे असेही काही नव्हते परंतू गुढीपाडव्याचा संबंध शंभूराजांच्या हत्येशी जोडणे चुकीचे आहे असे मी लिहिल्यानंतर मला तुकाराम महाराजांच्या खुनाच्या बाबतीत सत्य काय हे विचारणारे बरेच खाजगी संदेश व फोनही आले.

या बाबतीत उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर सहज लक्षात येणा-या बाबी अशा-

१) तुकाराम महाराजांच्या जन्मतिथी व वर्षाबद्दल एकमत नसल्याने ते मृत्युसमयी किती वयाचे होते हे सांगता येत नाही. काही तज्ञ तुकारामांचे जन्मवर्ष १५७७, १६०२ वगैरे देतात तर देहुकर परंपरेने १६०९ हे वर्ष देतात. म्हणजे जवळपास ३२ वर्षांची तफावत येते. ही थोडकी तफावत नव्हे हे सहज लक्षात येईल.

२) तुकारामांचा देहांत सन १६५० मद्ध्ये झाला याबाबत मात्र दुमत नाही. जर जुन्यातील जुने जन्मसाल १५७७ मानले तर तुकाराम महाराज मृत्युसमयी ८३ वर्षांचे होते व १६०९ मानले तर ४१ वर्षांचे होते असे मानावे लागते.

३) देहू व लोहगांव ही स्थाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपर्यंत आळीपाळीने कधी आदिलशाही तर कधी निजामशाहीत होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेचा प्रयत्न १६४५ पासून सुरु केला. देहू-आळंदी ही गांवे तत्पुर्वी शहाजी महाराजांच्या (नंतर शिवाजी महाराजांच्या) जहागिरीत येत होती कि नाही याबाबत ठामपणे सांगता येईल असे पुरावे मला उपलब्ध नाहीत. परंतू ही गांवे पुण्याच्या निकट असल्याने ती जहागिरीतच असावीत असा तर्क करायला वाव आहे.

४) तुकाराम महाराज हे आपल्या हयातीतच अत्यंत प्रसिद्ध संत बनले होते हे त्यांच्या जीवनचरित्रावरून लक्षात येते. मंबाजीशी त्यांचा झालेला संघर्ष विख्यात आहेच. एक शूद्र गुरु बनतो, उच्च प्रतीची काव्यरचना करतो, समतेची भाषा करतो-पसरवतो हे तत्कालीन कर्मठ ब्राह्मणांना सहन होणे शक्य नव्हते, त्यामुळे संघर्ष होणे स्वाभाविक होते.

५) असे असले तरी ब्राह्मण असलेली बहिणाबाई त्यांची शिष्या होती. त्यांचे चवदा टाळकरी प्रसिद्ध असून महिपतीनेही त्यांची नोंद केली आहे. त्यात महादजीपंत कुलकर्णी, रामेश्वरभट्ट बहुळकर, आबाजीपंत लोहगांवकर, मल्हारपंत कुलकर्णी ई. सामील होते. हे चवदापैकी चारही ब्राह्मण होते.

६)  १६४५ नंतर स्वत: शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन व्हायला सुरुवात झाली. १६४८ नंतर शहाजी महाराजांच्या आदिलशहाद्वारे अटकेमुळे जरी शिवाजी महाराज स्वराज्याच्या उभारणीत थंडावले असले तरी त्यांचे प्रयत्न पुन्हा १६४९ पासून सुरु झाले.

७) तुकाराम सदेह वैकुंठाला गेले, आणि प्रत्यक्षात तसे घडणे कालत्रयी शक्य नाही, तुकारामांचे प्रेतही मिळाल्याचे कोठे उल्लेख नाहीत म्हणजे तुकारामांचा खुनच झाला असला पाहिजे असा तर्क आहे. पण समजा तसे घडले असते तर-

अ) तुकाराम सामान्य व्यक्ती नव्हते कि सहज त्यांचा खून करावा आणि कोणालाही न समजता प्रेताची विल्हेवाट लावून सदेह वैकुंठाची अफवा पसरवून द्यावी आणि ती पचेल.

ब) तुकारामांचे शिष्य खून झाला असता तर गप्प बसतील, कोठेही फिर्याद गुदरणार नाहीत हे अगदी मोगलाई असती तरी शक्य नव्हते.

क) शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांचे शिष्यत्व पत्करले होते असे देहुकर आणि तथाकथित पुरोगामी चळवळीतील लेखक हिरिरीने सांगत असतात. त्या दाव्यांकडे दुर्लक्ष केले तरी शिवाजी महाराज हे प्रजाहितदक्ष राजे होते व तुकोबांची किर्ती त्यांच्या कानावर असनार हे उघड आहे. तुकोबारायांचा संशयास्पद मृत्यू अथवा अदृष्य होणे या प्रकाराची त्यांनी दखल घेतली नसती असे म्हणने शिवरायांवरच अन्याय करणारे आहे.

८) याचा अर्थ एवढाच होतो कि तुकोबारायांसारख्या किर्तीसंपन्न संताचा खून करता येणे आणि तो पचवने आणि लोकांनीही वैकुंठगमनाच्या भाकडकथेवर न पाहताच त्यावर सहज विश्वास ठेवणे असंभाव्य आहे.

९) संताजी तेली जगनाडे तुकोबांच्या मृत्युसमयी हजर होते असे त्यांचे चिरंजीव बाळोजीने लिहिलेले आहे. यातील सत्यासत्यता दूर ठेवली तरी "तुकोबा कोणासही न दिसता अकल्पितपणे नाहीशे झाले." असा एकही उल्लेख त्यांच्या समकालीनांनी, त्यांच्या सोबत्यांनी करून ठेवलेला नाही. जे काही घडले ते सर्वांसमक्ष असाच आविर्भाव तत्कालीन अभंगात आलेला आहे. मंबाजी व अन्य हत्यारे ब्राह्मण खोटे बोलत होते हे गृहित धरले तरी तुकोबारायांचे शिष्य असत्य बोलतील हे संभवत नाही. त्यामुळे ब्राह्मणांनी आवई पसरवली आणि शिष्यांनी ती बिनतक्रार स्विकारली असे मानता येत नाही.

१०) याचाच अर्थ असा कि तुकोबारायांचा खून झालेला नाही. सदेह वैकुंठवास हे लाक्षणिक अर्थाने घेतले पाहिजे. भक्ती संप्रदायात संतांच्या भोवती चमत्कार गुंफले जाने हे आपल्या समग्र संतसाहित्यात नवीन नाही. तुकोबांचे सदेह वैकुंठगमन हा त्यातीलच एक भाग आहे.

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...