Sunday, April 13, 2014

शैव धर्म

भारतात सिंधुकालापासून अव्याहत वाहत राहिलेली धर्मधारा म्हणजे शैवप्रधान धर्मधारा. ही प्रतिमापूजक, तांत्रिक, यातुमय आणि विशेष कर्मकांडे नसलेली धर्मधारा. पूजा हेच काय ते महत्वाचे कर्मकांड. सिंधू संस्कृतीतील उत्खननांत अगदी आपण आज पुजतो तशीच शिवलिंगे सापडलेली आहेत. अनेक शक्तीप्रतिमा स्वतंत्रपणे मिळालेल्या असून त्यांना लागलेल्या काजळीच्या अवशेषांमुळे दीप-धूप त्यांना दाखवला जात असला पाहिजे असा पुरातत्ववेत्त्यांचा कयास आहे. मृद्भांड्यांवरील अनेक प्रतिमांमुळे तांत्रिक प्रथांचाही निर्देश होतो. सनपूर्व ७०० पसून पहिल्या शतकापर्यंत मिळालेल्या बव्हंशी नाण्यांवरील तांत्रिक प्रतिमांची चर्चा आपण एका स्वतंत्र लेखात केलेलीच आहे.

इसपू १००० च्या आसपास भारतात वैदिक धर्माचा उदय झाला. ही भारतीय धर्मेतिहासातील मध्यकालीन घटना होय. या धर्माचे कर्मकांड हे यज्ञविधींशी निगडित होते. या धर्माचा भूगोल सुरुवातीला सरस्वती नदीच्या खो-यापुरता सिमित होता...पुढे तो गंगेच्या खो-यापर्यंत विस्तारल्याचे ऋग्वेदावरुनच दिसते. शैवप्रधान धर्माचा भुगोल मात्र भारतव्यापी होता हे या धर्माच्या व्यापक आणि सर्वकश स्वरुपावरुन दिसून येते. म्हणजे वैदिक धर्माच्या उदयानंतर वैदिक धर्मधारा शैव तन्त्रधारेला समांतर झाली असली तरी ती छोटी होती. त्यामुळेच कि काय तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, "वैदिक धर्माचा उदय ही मध्योद्गत घटना असून आजच्या हिंदू धर्मावर तिचा विशेष प्रभाव नाही." (वैदिक संस्कृतीचा इतिहास.)

शैवप्रधान धर्मात. म्हनजेच मुर्तीपुजकांच्या धर्मात विशेष कर्मकांडेच नसल्याने तो नेहमीच साधा सोपा आणि  आचरण्यास सुलभ होता हेही त्याच्या आजतागायत टिकून राहण्यामागचे रहस्य आहे. पण याच वैशिष्ट्यांमुळे त्यात विविध तत्वज्ञानात्मक वैचारिक धाराही निर्माण झाल्या. सांख्य, वैशेषिक ई. तत्वज्ञाने एकीकडे तर आगमिक तंत्रशास्त्रे, योग दुसरीकडे असा बहुमुख विकास शैव धर्मात होत राहिला. पारमार्थिक सत्तेपेक्षा विधिविधानाला तंत्रशास्त्रांनी बळ पुरवले व त्यातुनच शेतीशास्त्र, धातुशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञानशास्त्र, गर्भशास्त्र आणि औषधशास्त्राचा उदय आणि विकासही झाला. (मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास: तंत्र, योग आणि भक्ती- डा. सुधाकर देशमुख) तंत्राचा उगम शिवापासून झाला असे आगमिक शास्त्र मानते तर योगाचा आरंभ आदिनाथ शिवापासून झाला असे योगशास्त्र मानते. पुढे पांचरात्र संप्रदायही तंत्र आणि योगातून निर्माण झाला.

ज्ञात इतिहासात भारतावर वैदिक धर्माचा प्रभाव इसपू सहाव्या शतकात प्रबळ झालेला दिसतो. परंतू त्याला प्रतिक्रिया म्हणून जैन व बौद्ध धर्म उदयाला आले आणि वैदिक धर्म मागे फेकला गेला. शैवप्रधान धर्म हा व्यक्तिगत आचरणधर्म असल्याने त्याचा प्रवाह अव्याहत वाहत राहिला. हजारोंनी तंत्रशास्त्रे लिहिली जात राहिली. तंत्रांतही कौलाचार, वामाचार ई. अनेक भेद पडून शाखा निर्माण होत राहिल्या. बृहद्रथाच्या खुनानंतर सत्तेवर आलेल्या श्रुंगांनी त्यांच्या राज्यात वैदिक धर्माचे पुनरुत्थान करण्याचा अल्पजीवी प्रयत्न केला असला तरी जशा परकीय सत्ता भारतात आल्या त्यांनी मात्र शैव धर्मालाच आपल्या नाण्यांवर व शिलालेखांतही स्थान दिले. इसपू ३०० ते सन २०० पर्यंतच्या पाचशे वर्षांच्या कालात नाण्यांवर शिव, शक्ती, तंत्रोक्त प्रतिमा व प्राणी यांचे व ग्रीक/झोरोस्तरीयन देवतांचेच संपुर्ण वर्चस्व दिसते. सातवाहनांचा नाणेघाट शिलालेख सोडला तर इंद्र-वरुणादी देवतांचे साधे उल्लेखही कोठे सापडत नाहीत.

याचा अर्थ हाच कि वैदिक धर्म खूप मागे पडला व शैव धर्म अन्य बौध-जनांदींबरोबर प्रबळपणे वाहत राहिला. वैदिक धर्माला बरे दिवस पहायला मिळाले ते गुप्त काळात. या काळात वैदिक धर्माने सोयीने आपल्यातही बदल करुन घेतले. शैव आणि बौद्ध धर्माला तोंड देण्यासाठी विष्णू या देवतेला पुढे आनले गेले व वैदिक धर्मात जरी पुजेला स्थान नसले तरी विष्णूपूजा सुरु केली. असे असले तरी देशभर जो सांस्कृतिक संघर्ष निर्माण झाला त्यामुळे वैष्णव पंथ जरी स्थिरावला तरी त्यांना "हरी-हर" ऐक्याची महती गात शिवाचे स्थान बदलवता आले नाही.

उलट तोवर तंत्रांनी भारतातील सर्वच धर्मात प्रवेश केला. बौद्ध धर्मही त्याला अपवाद राहिला नाही. प्रत्येक धर्माने आपापल्या पद्धतीने तंत्रे निर्माण करत तंत्र देवता बदलल्या असल्या तरी शैव-शाक्त मुळगाभा मात्र कायमच राहिला. वैदिकांनी गुप्त काळात वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेचे जे गारुड निर्माण केले होते ते तंत्रमार्गामुळे पुन्हा मागे पडले. त्यात नाथ-सिद्ध ई. शैव विचारधारांनी समतेची मुळ नांव पुन्हा मार्गावर आणली.

पण मी "जातीसंस्थेचा इतिहास" या लेखमालिकेत स्पष्ट केल्याप्रमाने दहाव्या शतकानंतर भारतातील सर्वच परिस्थिती अत्यंत विपरित झाली. लागोपाठ पडनारे भिषण दु:ष्काळ आणि सातत्याने होणारी परकीय इस्लामी आक्रमणे यामुळे समाजजीवन, एकुणातील अर्थव्यवस्था ढासळून पडायला सुरुवात झाली. मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास: तंत्र, योग आणि भक्ती या ग्रंथात डा. सुधाकर देशमुख पृष्ठ-२८२ वर म्हणतात कि,

"समाज जेव्हा जेव्हा स्वत:ला असुरक्षित असल्याचे अनुभवतो, तेव्हा तेव्हा तो मूलतत्ववादाकडे वळतो. दहाव्या शतकानंतर जवळजवळ १४ व्या, १५ व्या शतकापर्यंत भारतात वैदिक धर्मीयांनी पुन्हा एकदा आपला धर्म शुद्ध रहावा म्हणून वर्णाश्रमधर्म, यज्ञविधी आणि कर्मकांड यांचे तसेच वैदिक श्रुती आणि स्मृती यांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. ...... वैदिक स्मृतींवर अनेकांनी टीका लिहिल्या, त्यांना निबंध म्हणतात आणि या काळाला निबंधकाळ म्हणतात.....या निबंधकारांनी मूलतत्ववादाकडे प्रवास केल्याने तंत्र आणि नाथपंथ यांच्यामुळे जी स्वातंत्र्य आणि समतेची झुळूक जाणवत होती, तीही लुप्त झाली."

वरील विधान पुरेसे बोलके आहे. शैव धर्म हा मुळात समतेचा धर्म. या काळात शैवधर्माला लोकाश्रय आणि स्थानिक सत्तांचा आश्रय असला तरी अपरार्क, विज्ञानेश्वर, हेमाद्री हे त्या काळातील दक्षीणेतील प्रमूख वैदिकवादी सिद्धांतक. एकुणातील सामाजिक परिस्थितीमुळे व सामाजिक नैराश्यजनक स्थितीमुळे वैदिक वर्णव्यवस्थेतील उतरंड, व्रत-वैकल्ये लोक स्विकारत गेले. त्यातून जातीभेदाचा पुर्वी नसलेला भस्मासूर जन्माला आला आणि शैवोक्त समतेच्या मुलतत्वांना हरताळ फासला गेला. नंतरची भक्ती चळवळही जनमानस बदलू शकली नाहे कारण मुळात जे वैदिक वर्णीय तत्वच मुळात नाकारायला पाहिजे होते ते नाकारले गेले नाही. ते नाकारण्यासाठी वैदिक धर्माचे पृथक आस्तित्व लक्षात घेत वैदिक धर्मतत्वांनाच नाकारण्याची बंडखोरी बसवेश्वरांचा अपवाद वगळता कोणीही केली नाही.

आजही लोकाचरणातील धर्म हा शैवप्रधान आहे. तंत्रोक्तच आहे. योगप्रधानच आहे. समतेचा आद्य आक्रोश आहे. परंतू वैदिक वर्णीय व वेदमाहात्म्याच्या मानसिक प्राबल्यकारी ठिगळांमुळे समतेचे मुलतत्व मात्र अवैदिकांच्या मनातून हद्दपार झाले आहे.

स्वत:चा धर्म त्यासाठीच समजावून घेणे आवश्यक आहे.



Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...