Sunday, April 20, 2014

रिसडी....

कंदिलाला वात नसायची आणि चिमणीत रोकेल नसायचे...अशा भुताळ अंधारात आई रिसडीची गोष्ट सांगायची. रिसडी म्हणजे अस्वलीन. तर काय असते, ही रिसडी डोंगरवाटेवरुन चुकला-माकला प्रवासी आला तर त्याला ठार मारुन त्याची दौलत लुटायची आणि आपली डोंगरकपारीतील गुहा सजवायची.

अशाच वाटेवरुन एक साम्राज्य हरपलेला दुर्दैवी राजकुमार जात असतो. रिसडी त्याला लुटायचा प्रयत्न करते...पण काय? त्याच्याकडे काहीच नाही..फक्त रूप...

रिसडी त्याच्या रुपावर मोहित होते...त्याला आपल्या गुहेत नेते...त्याच्यावरील अभंग प्रीत व्यक्त करते...राजकुमार पळून जायचे जेवढेही प्रयत्न करतो ते ती हाणूनही पाडते...

हतबल राजकुमार शेवटी तिच्या इच्छेचा बळी होतो.

पण तो खूश नाही...

वर्षामागून वर्ष जातात...रिसडीला बाळेही होतात...पण राजकुमार खूश नाही...

ती त्याला विचारते...

"का रे? मी तुझ्यावर अनंत प्रेम करतेय...पण तू का उदास आहेस?"

खूपदा प्रश्नाचे उत्तर टाळलेला राजकुमार एकदाचा म्हणतो..."माझे त्या डोंगरापारच्या आदिवासी राजकन्येवर प्रेम होते...मी तिलाच भेटायला चाललो होतो...पण तू मला बळकावलेस...आता मला माहित नाही...कशी असेल माझी प्रिया...मला तिला भेटावेसे वाटतेय..."

रिसडी दयाद्र होते. कळवळते...पण म्हणते, "तुला खरेच जायचे आहे लाडक्या?"

त्याचा होकार त्याच्या निश्वासातून मिळाला.

"ठीक आहे...जा तू!"

रिसडी त्याला सोडायला रस्त्यावर आली. राजकुमार मागे न पाहता झपाझप त्याच्या इप्सिताकडे चालू लागला. तो शेवटपर्यंत दिसावा यासाठी रिसडी झाडावर चढू लागली. तो जसजसा दूर जात होता तसतशी रिसडी झाडावर उंच चढत होती....

तो वळतच होता त्या वळनावर...

रिसडी झाडाच्या टोकावर...

तो अदृष्य झाला...

ती झाडावरून कोसळली....

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...