Sunday, May 4, 2014

शोध बुद्धअस्थी-धातुंचा…

By on May 4, 2014
feature size
भगवान बुद्धांच्या महानिर्वाणानंतर ते आजतागायतपर्यंत त्यांच्या रक्षा-अस्थी पूजनीय राहिल्या असल्या तरी जवळपास २६०० वर्षं या रक्षा-अस्थींचा प्रवास अत्यंत रोचक आणि अनेकदा गहन असा राहिलेला आहे. तथागतांच्या रक्षा, अस्थी ते त्यांच्या नित्य वापरातील वस्तुंनी जवळपास अर्ध जग पादाक्रांत केलेलं आहे. तथागतांच्या रक्षा-अस्थींचं चौर्य ते त्यातील काही अवशेषांचा विनाश करण्याचे प्रयत्नही अनेकदा झालेले आहेत. कंबोडियातही अलीकडेच बुद्ध अस्थींची चोरी झाली होती. अर्थात चोरांना शिताफीने पकडण्यात आलं. बुद्धाच्या म्हणून बनावट अस्थी-रक्षाही पुरातत्व वस्तुसंग्राहकांत सतत चर्चेत राहिल्या आहेत. सुरक्षित असं भव्य स्तूप बांधण्याची सुरुवात सम्राट अशोकाने सुरू केली असली आणि नंतर ती पद्धत श्रीलंका, ब्रह्मदेश, तिबेट, चीन ते पार कंबोडियापर्यंत पसरली असली तरी अशोकपूर्व काळातील स्तूप नेमके कोठे आणि कसे होते याबाबत विद्वानांत चर्चा आणि वाद आहेत.

भारतातील पुरातन श्रमण परंपरेत श्रमणाच्या मृत्युनंतर श्रमणाला बठ्या ध्यानस्थ अवस्थेत पुरण्याची आणि त्यावर मातीचा गोलाकार ढिग उभारण्याची प्रथा बुद्धपूर्व काळातही होती. या उंच ढिगाला प्राकृत भाषेत ‘थूप’ असं म्हटलं जाई. याचंच नंतरचं संस्कृतीकरण म्हणजे ‘स्तूप’. या स्तुपांत कलात्मकता नसे. बौद्ध वाङमयावरून पूर्वबुद्धांचेही स्तूप होते असे उल्लेख मिळतात. या काळातील स्तुपांचे स्वतंत्र अवशेष सापडले नसले तरी पिपरावा (जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) इथे १८९८ मध्ये सापडलेल्या स्तुपाखाली अजून एक स्तुपाचे जे अवशेष मिळाले आहेत त्यावरून किमान बुद्धकाळातील स्तुपांची कल्पना येते.

आज स्तूप या शब्दाचा एकमेव अर्थ आहे तो म्हणजे भगवान बुद्धाची रक्षा आणि अस्थी यांचं जतन करण्यासाठी, त्यामार्फत बुद्धाचं अस्तित्व वर्तमानातही जाणवण्यासाठी बांधलेली गोलाकार घुमटाकार वास्तू. पहिला स्तूप भगवान बुद्धाच्या जीवितकाळातच झाल्याचे संकेत मिळतात. मगधाचा राजा बिंबीसार हा भगवान बुद्धाचा शिष्य होता हे सर्वांना माहीतच आहे. त्याची राजधानी राजगृह इथे तथागत आले असता बिंबीसाराच्या पत्न्या कोसलादेवी, क्षेमा आणि छेल्लना त्यांचं दर्शन घ्यायला गेल्या होत्या. त्यावेळीस भगवान इथे नसले तरी त्यांचं दर्शन सतत मिळावं म्हणून तिघींनीही तथागतांचे केस आणि नखं मागितली आणि त्यावर आपण स्तूप उभारू असं सांगितलं. तथागतांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. हा स्तूप राजगृहात बांधला गेला असावा.

भगवान बुद्धांचं परिनिर्वाण कुशीनारा इथे वैशाखी पौर्णिमेला इसवी सनपूर्व ४८३ मध्ये झालं. परिनिर्वाणानंतर तथागतांचा देह सुशोभित करून सातव्या दिवशी कुशीनाराच्या पूर्वेला असलेल्या मुकूटबंधन या ठिकाणी तथागतांचे अग्नीसंस्कार केले गेले. त्यांची रक्षा आणि अस्थी गोळा करण्यात आल्या आणि त्या एका सभागारात ठेवून त्यांच्या रक्षनासाठी कुशीनाराचे स्वतः सशस्त्र मल्ल कोट करून राहिले. बुद्धाच्या परिनिर्वाणाची वार्ता तोवर सर्वत्र पसरली होती. स्तुपांसाठी त्यांच्या अस्थी आणि रक्षेसाठी सर्वप्रथम अजातशत्रूने मागणी केली. तोवर शाक्य, लिच्छवी, कोलीय, पावा इत्यादी गणराज्यांतूनही मागण्या यायला लागल्या. यावर संघर्ष नको म्हणून द्रोण नावाच्या एका ब्राह्मणाने रक्षा आणि अस्थींचे आठ भाग करून सर्वांना द्यावे असा सल्ला दिला. त्याप्रमाणे रक्षा-अस्थींचं वाटप झालं. कलह टळला. वेगवेगळ्या नगरांत आठ ठिकाणी स्तूप बनवले गेले.

पण महास्तूपवंशानुसार पुढे ‘महाकश्यपाने अजातशत्रूला सांगितलं की या सर्व अस्थी परत आण आणि त्या एका ठिकाणी गुप्तपणे ठेवून दे. अजातशत्रूने सर्वांकडून रक्षा-अस्थी पुन्हा एकत्रित करून एकात दुसरी बसतील अशा आठ चंदनाच्या पेट्यातील सर्वात आतल्या पेटीत अस्थी ठेवल्या आणि त्याने त्या राजगिरच्या बाहेर एका स्तुपात ठेवल्या. चंदनी पेटीवर त्याने सुवर्णाचं पान बसवलं आणि त्यात भविष्य लिहिलं की पुढे राजपुत्र प्रियदर्शी अशोक म्हणून हे उघडेल आणि सर्वांमध्ये वाटेल.’ या कथेतील ऐतिहासिकता किती (विशेषतः भविष्यवाणीमुळे) हा जरी विवादास्पद मुद्दा असला तरी मुळचे स्तूप कोणते हे आज आपल्याला माहीत नाही हे वास्तव आहे. पिपरावा येथील स्तूप मात्र मुळच्याच एका स्तुपावर उभारला गेलेला नवीन स्तूप असावा असं अनुमान करता येईल एवढे पुरावे सुदैवाने मिळाले आहेत.

बुद्धाचं महापरिनिर्वाण ते सम्राट अशोकाचा बौद्ध धर्माचा अनुयायी म्हणून उदय यात किमान अडिचशे ते पावणेतीनशे वर्षांचं अंतर आहे. या प्रदीर्घ काळात सुरुवातीला बुद्ध अस्थी-रक्षेचं आणि त्यावरील स्तुपांचं संरक्षण बौद्ध भिक्खुंनी केलं असलं तरी पुढे त्यावर अवकळा आली असावी आणि ते स्तूप विस्मृतीत गेले असावेत असं महास्तूपवंशातील वृत्तांतातील अतिशयोक्ती बाजूला काढली तर स्पष्ट होतं. त्यानुसार सम्राट अशोक हा बुद्धानुयायी झाल्यानंतर त्याने ८४००० स्तूप उभारायचं ठरवलं. पण त्यासाठी बुद्ध अस्थी-रक्षा मिळवण्यासाठी त्याला बरेच प्रयत्न करावे लागले, स्तुपांच्या मुळच्या जागा शोधण्यासाठी जुन्या-जाणत्यांची मदत घ्यावी लागली. सम्राट अशोकाने सांची, सारनाथसारखे असंख्य स्तूप त्याच्या साम्राज्यात, सुदूर अफगाणिस्तानपर्यंत उभारले. धम्मप्रचारकांमार्फत काही अस्थी-धातू श्रीलंका, ब्रह्मदेश ते चीनपर्यंत पाठवण्यात आले. बृहद्भारतातील स्तूप (आणि अस्थी-धातू) जोवर बौद्ध धर्म जोमात होता तोवर सुरक्षित राहिले. अनेक चीनी प्रवाशांनी आपल्या प्रवासवर्णनांत भारतात हजारो स्तूप असल्याचं नोंदवून ठेवलं आहे. परंतु नंतर मात्र अवकळा आली. स्तुप, विहार, लेणी जवळपास हजार वर्षं पार विस्मरणात गेले. इतकंच काय अनेक मूळ गांवं-नगरंही नष्ट झाली अथवा त्यांची कालौघात नांवंही बदलली गेली. १८१८ नंतर मात्र ब्रिटिश, जर्मन पुरातत्वविदांनी एकामागून एक उत्खननं करत अनेक स्तूप प्रकाशात आणले. अवशेषग्रस्त स्तुपांत ठेवण्यात आलेले अस्थीधातू दिल्ली, कोलकता आणि पटनासारख्या शहरांतील पुरातत्व संग्रहालयांत हलवण्यात आलं. या प्रकारात अनेक गफलतीही झाल्या. सारनाथ येथील उत्खनन तेथील राजा चैतसिंग बेनारस यांचे दिवान जगत सिंग यांनी केलं होतं. त्यांना हिरव्या रंगाच्या संगमरवराच्या पेटीत अस्थी-धातू आढळून आले. पण इतिहासाचं ज्ञान नसलेल्या जगत सिंगाने ते अस्थीधातू गंगेत विसर्जित केले. ती संगमरवरी पेटी मात्र कोलकात्याच्या संग्रहालयात पोहोचली.

श्रीलंकेत भगवान बुद्धाचा दात कसा पोहोचला याच्या अनेक थरारक दंतकथा असल्या तरी तो बहुदा अशोकाने पाठवलेल्या धम्मप्रचारकांनी तिथे नेला असावा. पोर्तुगिजांनी (१५६१) आधी अनुराधपूर येथील स्तुपात ठेवलेला दात पन्नास हजार पौंडांच्या बदल्यात मागितला. तो न मिळाल्याने बराच संघर्ष झाला. हा दात आता क्यंडी येथील स्तुपात संरक्षित ठेवला असला तरी ‘रेलिक्स ऑफ बुद्धा’ या ग्रंथात सुरुवातीलाच पुस्तकाचे लेखक जॉन एस. स्ट्राँग  पुराव्यानिशी सांगतात की पोर्तुगिजांनी हा दात श्रीलंकेवरील चढाईत ताब्यात घेतला आणि गोवा इथे तेथील आर्च बिशप डॉन ग्यास्पर  याच्या हट्टामुळे नष्ट करण्यात आला. यामागे अर्थात परधर्म विद्वेशाची भावना होती.

बुद्धांच्या अस्थीधातुच्या इतिहासात एक रोमांचक रहस्यमय प्रकरणही घडलं आहे. पिपरावा (जि. सिद्धार्थपूर, उ.प्र.) इथे १८९८ साली खोदकाम करताना तेथील इस्टेट मॅनेजर विल्यम पेपे याला भूमिगत एक दगडी पेटी सापडली. त्यात त्याला कुंभांत ठेवलेले अस्थी अवशेष आणि १६०० रत्नं आणि चांदी-सोन्याची फुलं सापडली. एका भांड्यावर अज्ञात लिपीत लिहिलेला मजकूरही त्याला दिसला. त्याने तो डॉ. अँटोन फ्युहर या जर्मन पुरातत्वविदाकडून वाचून घेतला… त्यावर ब्राह्मी लिपीत ‘या शाक्यमुनी बुद्धाच्या अस्थी आहेत…’ असा मजकूर लिहिल्याचं आढळलं. इतिहासातील ही एक रोमांचक घटना… पण अन्य पुरातत्वविदांनी या अवशेषांवर आणि मजकूरावरही ते संशयास्पद आणि बनावट असल्याचे आक्षेप घेतले. वादात न पडण्यासाठी इंग्रज सरकारने सापडलेले अस्थी-धातू सयामचा राजा राम (पाचवा) यास एक राजनैतिक चाल म्हणून बहाल करून टाकले आणि रत्नं आणि भांडी कोलकता संग्रहालयात पाठवून दिली. पुढे जवळपास शंभर वर्षांनी यावर पुन्हा संशोधन झालं आणि ते अवशेष आणि लेखन बनावट नसून अस्सलच असल्याचं सिद्ध करण्यात आलं. तिथे उत्खननात स्तुपच सापडला आणि त्याखालीही जुना स्तूप असल्याचंही उघडकीला आलं.

या शतकात पाटण्यातील के. पी. जयस्वाल इन्स्टिट्यूटकडून १९५८ आणि १९८१ मध्ये वैशाली येथील स्तूप भागात उत्खनन करण्यात आलं होतं. त्यावेळी आणखी एक मंजुषा (हिरव्या रंगाची संगमरवरी पेटी) सापडली. त्यातदेखील भगवान बुद्ध यांच्या अस्थी आढळून आल्या. त्या सध्या पाटणा येथील संग्रहालयात आहेत. हे उत्खनन ए. एस. अल्तेकर यांच्या देखरेखीखाली झालं होतं. ब्रिटिश कालखंडात नागार्जुनकोंडा येथील कुली काम करणार्या एका व्यक्तिला भांडं सापडलं होतं. त्यामध्येही अस्थींचा काही भाग होता. त्याचं परीक्षण करण्यात आल्यानंतर त्या भगवान बुद्ध यांच्या अस्थी असल्याचं स्पष्ट झालं होतं.

बुद्धाच्या अस्थीधातूचा इतिहास पाहता बव्हंशी अस्थीधातू भारतातीलच ज्ञात-अज्ञात विहारांत असल्याचं दिसतं. पुरातत्वीयदृष्ट्या हा मोलाचा ठेवा असल्याने त्याचं जतन करण्याची जबाबदारी सर्वस्वी पुरातत्व विभागाची आहे. भारतात सापडलेल्या अस्थीधातू सध्या दिल्ली येथील पुरातत्वखात्याच्या ताब्यात आहेत. त्या बुद्ध स्तुपांमध्ये ठेवल्या जाव्यात यासाठी ३०-३५ वर्षं बौद्ध धर्मनेत्यांचे प्रयत्न असले तरी त्यात अजून यश मिळालं नाही. पण आपल्या अस्थी स्तुपामध्ये ठेवाव्यात, अशी खुद्द भगवान बुद्धांचीच इच्छा होती आणि सुखी आयुष्याचा मंत्र देणार्या बुद्धांच्या अस्थी प्रदर्शनासाठी नसून त्या पूजनासाठी आहेत, असं विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका यांचं म्हणणं होतं.

अशा परिस्थितीत कोणीही व्यक्ती त्या अस्थी आपल्या ताब्यात असून प्रदर्शन भरवत असेल तर तो भावना दुखावण्याचा आणि फसवणुकीचा गंभीर गुन्हा आहे.
- संजय सोनवणी

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...