Sunday, May 4, 2014

शोध बुद्धअस्थी-धातुंचा…

By on May 4, 2014
feature size
भगवान बुद्धांच्या महानिर्वाणानंतर ते आजतागायतपर्यंत त्यांच्या रक्षा-अस्थी पूजनीय राहिल्या असल्या तरी जवळपास २६०० वर्षं या रक्षा-अस्थींचा प्रवास अत्यंत रोचक आणि अनेकदा गहन असा राहिलेला आहे. तथागतांच्या रक्षा, अस्थी ते त्यांच्या नित्य वापरातील वस्तुंनी जवळपास अर्ध जग पादाक्रांत केलेलं आहे. तथागतांच्या रक्षा-अस्थींचं चौर्य ते त्यातील काही अवशेषांचा विनाश करण्याचे प्रयत्नही अनेकदा झालेले आहेत. कंबोडियातही अलीकडेच बुद्ध अस्थींची चोरी झाली होती. अर्थात चोरांना शिताफीने पकडण्यात आलं. बुद्धाच्या म्हणून बनावट अस्थी-रक्षाही पुरातत्व वस्तुसंग्राहकांत सतत चर्चेत राहिल्या आहेत. सुरक्षित असं भव्य स्तूप बांधण्याची सुरुवात सम्राट अशोकाने सुरू केली असली आणि नंतर ती पद्धत श्रीलंका, ब्रह्मदेश, तिबेट, चीन ते पार कंबोडियापर्यंत पसरली असली तरी अशोकपूर्व काळातील स्तूप नेमके कोठे आणि कसे होते याबाबत विद्वानांत चर्चा आणि वाद आहेत.

भारतातील पुरातन श्रमण परंपरेत श्रमणाच्या मृत्युनंतर श्रमणाला बठ्या ध्यानस्थ अवस्थेत पुरण्याची आणि त्यावर मातीचा गोलाकार ढिग उभारण्याची प्रथा बुद्धपूर्व काळातही होती. या उंच ढिगाला प्राकृत भाषेत ‘थूप’ असं म्हटलं जाई. याचंच नंतरचं संस्कृतीकरण म्हणजे ‘स्तूप’. या स्तुपांत कलात्मकता नसे. बौद्ध वाङमयावरून पूर्वबुद्धांचेही स्तूप होते असे उल्लेख मिळतात. या काळातील स्तुपांचे स्वतंत्र अवशेष सापडले नसले तरी पिपरावा (जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) इथे १८९८ मध्ये सापडलेल्या स्तुपाखाली अजून एक स्तुपाचे जे अवशेष मिळाले आहेत त्यावरून किमान बुद्धकाळातील स्तुपांची कल्पना येते.

आज स्तूप या शब्दाचा एकमेव अर्थ आहे तो म्हणजे भगवान बुद्धाची रक्षा आणि अस्थी यांचं जतन करण्यासाठी, त्यामार्फत बुद्धाचं अस्तित्व वर्तमानातही जाणवण्यासाठी बांधलेली गोलाकार घुमटाकार वास्तू. पहिला स्तूप भगवान बुद्धाच्या जीवितकाळातच झाल्याचे संकेत मिळतात. मगधाचा राजा बिंबीसार हा भगवान बुद्धाचा शिष्य होता हे सर्वांना माहीतच आहे. त्याची राजधानी राजगृह इथे तथागत आले असता बिंबीसाराच्या पत्न्या कोसलादेवी, क्षेमा आणि छेल्लना त्यांचं दर्शन घ्यायला गेल्या होत्या. त्यावेळीस भगवान इथे नसले तरी त्यांचं दर्शन सतत मिळावं म्हणून तिघींनीही तथागतांचे केस आणि नखं मागितली आणि त्यावर आपण स्तूप उभारू असं सांगितलं. तथागतांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. हा स्तूप राजगृहात बांधला गेला असावा.

भगवान बुद्धांचं परिनिर्वाण कुशीनारा इथे वैशाखी पौर्णिमेला इसवी सनपूर्व ४८३ मध्ये झालं. परिनिर्वाणानंतर तथागतांचा देह सुशोभित करून सातव्या दिवशी कुशीनाराच्या पूर्वेला असलेल्या मुकूटबंधन या ठिकाणी तथागतांचे अग्नीसंस्कार केले गेले. त्यांची रक्षा आणि अस्थी गोळा करण्यात आल्या आणि त्या एका सभागारात ठेवून त्यांच्या रक्षनासाठी कुशीनाराचे स्वतः सशस्त्र मल्ल कोट करून राहिले. बुद्धाच्या परिनिर्वाणाची वार्ता तोवर सर्वत्र पसरली होती. स्तुपांसाठी त्यांच्या अस्थी आणि रक्षेसाठी सर्वप्रथम अजातशत्रूने मागणी केली. तोवर शाक्य, लिच्छवी, कोलीय, पावा इत्यादी गणराज्यांतूनही मागण्या यायला लागल्या. यावर संघर्ष नको म्हणून द्रोण नावाच्या एका ब्राह्मणाने रक्षा आणि अस्थींचे आठ भाग करून सर्वांना द्यावे असा सल्ला दिला. त्याप्रमाणे रक्षा-अस्थींचं वाटप झालं. कलह टळला. वेगवेगळ्या नगरांत आठ ठिकाणी स्तूप बनवले गेले.

पण महास्तूपवंशानुसार पुढे ‘महाकश्यपाने अजातशत्रूला सांगितलं की या सर्व अस्थी परत आण आणि त्या एका ठिकाणी गुप्तपणे ठेवून दे. अजातशत्रूने सर्वांकडून रक्षा-अस्थी पुन्हा एकत्रित करून एकात दुसरी बसतील अशा आठ चंदनाच्या पेट्यातील सर्वात आतल्या पेटीत अस्थी ठेवल्या आणि त्याने त्या राजगिरच्या बाहेर एका स्तुपात ठेवल्या. चंदनी पेटीवर त्याने सुवर्णाचं पान बसवलं आणि त्यात भविष्य लिहिलं की पुढे राजपुत्र प्रियदर्शी अशोक म्हणून हे उघडेल आणि सर्वांमध्ये वाटेल.’ या कथेतील ऐतिहासिकता किती (विशेषतः भविष्यवाणीमुळे) हा जरी विवादास्पद मुद्दा असला तरी मुळचे स्तूप कोणते हे आज आपल्याला माहीत नाही हे वास्तव आहे. पिपरावा येथील स्तूप मात्र मुळच्याच एका स्तुपावर उभारला गेलेला नवीन स्तूप असावा असं अनुमान करता येईल एवढे पुरावे सुदैवाने मिळाले आहेत.

बुद्धाचं महापरिनिर्वाण ते सम्राट अशोकाचा बौद्ध धर्माचा अनुयायी म्हणून उदय यात किमान अडिचशे ते पावणेतीनशे वर्षांचं अंतर आहे. या प्रदीर्घ काळात सुरुवातीला बुद्ध अस्थी-रक्षेचं आणि त्यावरील स्तुपांचं संरक्षण बौद्ध भिक्खुंनी केलं असलं तरी पुढे त्यावर अवकळा आली असावी आणि ते स्तूप विस्मृतीत गेले असावेत असं महास्तूपवंशातील वृत्तांतातील अतिशयोक्ती बाजूला काढली तर स्पष्ट होतं. त्यानुसार सम्राट अशोक हा बुद्धानुयायी झाल्यानंतर त्याने ८४००० स्तूप उभारायचं ठरवलं. पण त्यासाठी बुद्ध अस्थी-रक्षा मिळवण्यासाठी त्याला बरेच प्रयत्न करावे लागले, स्तुपांच्या मुळच्या जागा शोधण्यासाठी जुन्या-जाणत्यांची मदत घ्यावी लागली. सम्राट अशोकाने सांची, सारनाथसारखे असंख्य स्तूप त्याच्या साम्राज्यात, सुदूर अफगाणिस्तानपर्यंत उभारले. धम्मप्रचारकांमार्फत काही अस्थी-धातू श्रीलंका, ब्रह्मदेश ते चीनपर्यंत पाठवण्यात आले. बृहद्भारतातील स्तूप (आणि अस्थी-धातू) जोवर बौद्ध धर्म जोमात होता तोवर सुरक्षित राहिले. अनेक चीनी प्रवाशांनी आपल्या प्रवासवर्णनांत भारतात हजारो स्तूप असल्याचं नोंदवून ठेवलं आहे. परंतु नंतर मात्र अवकळा आली. स्तुप, विहार, लेणी जवळपास हजार वर्षं पार विस्मरणात गेले. इतकंच काय अनेक मूळ गांवं-नगरंही नष्ट झाली अथवा त्यांची कालौघात नांवंही बदलली गेली. १८१८ नंतर मात्र ब्रिटिश, जर्मन पुरातत्वविदांनी एकामागून एक उत्खननं करत अनेक स्तूप प्रकाशात आणले. अवशेषग्रस्त स्तुपांत ठेवण्यात आलेले अस्थीधातू दिल्ली, कोलकता आणि पटनासारख्या शहरांतील पुरातत्व संग्रहालयांत हलवण्यात आलं. या प्रकारात अनेक गफलतीही झाल्या. सारनाथ येथील उत्खनन तेथील राजा चैतसिंग बेनारस यांचे दिवान जगत सिंग यांनी केलं होतं. त्यांना हिरव्या रंगाच्या संगमरवराच्या पेटीत अस्थी-धातू आढळून आले. पण इतिहासाचं ज्ञान नसलेल्या जगत सिंगाने ते अस्थीधातू गंगेत विसर्जित केले. ती संगमरवरी पेटी मात्र कोलकात्याच्या संग्रहालयात पोहोचली.

श्रीलंकेत भगवान बुद्धाचा दात कसा पोहोचला याच्या अनेक थरारक दंतकथा असल्या तरी तो बहुदा अशोकाने पाठवलेल्या धम्मप्रचारकांनी तिथे नेला असावा. पोर्तुगिजांनी (१५६१) आधी अनुराधपूर येथील स्तुपात ठेवलेला दात पन्नास हजार पौंडांच्या बदल्यात मागितला. तो न मिळाल्याने बराच संघर्ष झाला. हा दात आता क्यंडी येथील स्तुपात संरक्षित ठेवला असला तरी ‘रेलिक्स ऑफ बुद्धा’ या ग्रंथात सुरुवातीलाच पुस्तकाचे लेखक जॉन एस. स्ट्राँग  पुराव्यानिशी सांगतात की पोर्तुगिजांनी हा दात श्रीलंकेवरील चढाईत ताब्यात घेतला आणि गोवा इथे तेथील आर्च बिशप डॉन ग्यास्पर  याच्या हट्टामुळे नष्ट करण्यात आला. यामागे अर्थात परधर्म विद्वेशाची भावना होती.

बुद्धांच्या अस्थीधातुच्या इतिहासात एक रोमांचक रहस्यमय प्रकरणही घडलं आहे. पिपरावा (जि. सिद्धार्थपूर, उ.प्र.) इथे १८९८ साली खोदकाम करताना तेथील इस्टेट मॅनेजर विल्यम पेपे याला भूमिगत एक दगडी पेटी सापडली. त्यात त्याला कुंभांत ठेवलेले अस्थी अवशेष आणि १६०० रत्नं आणि चांदी-सोन्याची फुलं सापडली. एका भांड्यावर अज्ञात लिपीत लिहिलेला मजकूरही त्याला दिसला. त्याने तो डॉ. अँटोन फ्युहर या जर्मन पुरातत्वविदाकडून वाचून घेतला… त्यावर ब्राह्मी लिपीत ‘या शाक्यमुनी बुद्धाच्या अस्थी आहेत…’ असा मजकूर लिहिल्याचं आढळलं. इतिहासातील ही एक रोमांचक घटना… पण अन्य पुरातत्वविदांनी या अवशेषांवर आणि मजकूरावरही ते संशयास्पद आणि बनावट असल्याचे आक्षेप घेतले. वादात न पडण्यासाठी इंग्रज सरकारने सापडलेले अस्थी-धातू सयामचा राजा राम (पाचवा) यास एक राजनैतिक चाल म्हणून बहाल करून टाकले आणि रत्नं आणि भांडी कोलकता संग्रहालयात पाठवून दिली. पुढे जवळपास शंभर वर्षांनी यावर पुन्हा संशोधन झालं आणि ते अवशेष आणि लेखन बनावट नसून अस्सलच असल्याचं सिद्ध करण्यात आलं. तिथे उत्खननात स्तुपच सापडला आणि त्याखालीही जुना स्तूप असल्याचंही उघडकीला आलं.

या शतकात पाटण्यातील के. पी. जयस्वाल इन्स्टिट्यूटकडून १९५८ आणि १९८१ मध्ये वैशाली येथील स्तूप भागात उत्खनन करण्यात आलं होतं. त्यावेळी आणखी एक मंजुषा (हिरव्या रंगाची संगमरवरी पेटी) सापडली. त्यातदेखील भगवान बुद्ध यांच्या अस्थी आढळून आल्या. त्या सध्या पाटणा येथील संग्रहालयात आहेत. हे उत्खनन ए. एस. अल्तेकर यांच्या देखरेखीखाली झालं होतं. ब्रिटिश कालखंडात नागार्जुनकोंडा येथील कुली काम करणार्या एका व्यक्तिला भांडं सापडलं होतं. त्यामध्येही अस्थींचा काही भाग होता. त्याचं परीक्षण करण्यात आल्यानंतर त्या भगवान बुद्ध यांच्या अस्थी असल्याचं स्पष्ट झालं होतं.

बुद्धाच्या अस्थीधातूचा इतिहास पाहता बव्हंशी अस्थीधातू भारतातीलच ज्ञात-अज्ञात विहारांत असल्याचं दिसतं. पुरातत्वीयदृष्ट्या हा मोलाचा ठेवा असल्याने त्याचं जतन करण्याची जबाबदारी सर्वस्वी पुरातत्व विभागाची आहे. भारतात सापडलेल्या अस्थीधातू सध्या दिल्ली येथील पुरातत्वखात्याच्या ताब्यात आहेत. त्या बुद्ध स्तुपांमध्ये ठेवल्या जाव्यात यासाठी ३०-३५ वर्षं बौद्ध धर्मनेत्यांचे प्रयत्न असले तरी त्यात अजून यश मिळालं नाही. पण आपल्या अस्थी स्तुपामध्ये ठेवाव्यात, अशी खुद्द भगवान बुद्धांचीच इच्छा होती आणि सुखी आयुष्याचा मंत्र देणार्या बुद्धांच्या अस्थी प्रदर्शनासाठी नसून त्या पूजनासाठी आहेत, असं विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका यांचं म्हणणं होतं.

अशा परिस्थितीत कोणीही व्यक्ती त्या अस्थी आपल्या ताब्यात असून प्रदर्शन भरवत असेल तर तो भावना दुखावण्याचा आणि फसवणुकीचा गंभीर गुन्हा आहे.
- संजय सोनवणी

8 comments:

  1. गौतम बुध्दांच्या अस्थिकलशाच्या वादातून भारिप बहुजन महासंघाच्या तीन कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणप्रकरणी मंगळवारी विक्रोळी पार्कसाइट पोलिसांनी तिघांना अटक केली. मनसेचे आमदार राम कदम यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्याची मागणी होत आहे. कदम यांना मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अटक झालेली नव्हती.

    गौतम बुध्दांचा अस्थिकलश आणून राम कदम यांनी दर्शनासाठी ठेवला होता. परंतु या अस्थींच्या सत्यतेबाबत शंका व्यक्त करून भारिप बहुजन महासंघाच्या तीन कार्यकर्त्यांनी राम कदम यांना जाब विचारला. यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी त्यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी कदम यांच्यासह ३० जणांविरुद्ध विक्रोळी पार्कसाइट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. कदम यांच्यावरही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी पोलिसांनी तिघांना अटक करून कोर्टापुढे सादर केल्यानंतर त्यांना ६ मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त विजय चव्हाण यांनी दिली.

    ...अन्यथा राज्यभर आंदोलन

    कदम यांना अटक न झाल्यास भारिप बहुजन महासंघ व महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फ्रंटने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अस्थिकलशाचे दर्शन घेतल्यानंतर बुद्ध प्रसन्न होईल, असे फलक लावून धर्मभावना दुखावल्याचेही या संघटनांचे म्हणणे आहे. अंधश्रद्धा विरोधी कायद्याखाली कारवाईची मागणीही दोन्ही संघटनांनी केली आहे.

    ReplyDelete
  2. बाप्पा -संजय सर ,आता तुम्हीच बघा !
    आप्पा - अरे काय चाललय आपल्या राज्यात ?
    बाप्पा - डॉ दाभोळकर यांचा खुनी सापडत नाही आणि इकडे असे प्रकार वाढत आहेत !
    आप्पा - पैगम्बरांचा केस , बुद्धाचा दात ,गणपतीचे दूध पिणे , सप्त चिरंजीव आहेत आणि ते भेटतात , मारुती,अश्वत्थामा आजही भेटतातहा भ्रम , अशा प्रकारांवर विश्वास ठेवणारे वाढत आहेत
    बाप्पा - आपल्या भौतिक सुखाची चावी या सर्व देवदेवतांच्या हातात आहे हा भ्रम हि समाजाला लागलेली कीड आहे !कुणीतरी या सर्व गोष्टींचा समन्वय घातला पाहिजे !कार्य चालू दिसते पण ते तुकड्या तुकड्यातून दिसते !
    आप्पा-आधुनिक विचार मांडणे आणि ते पचवणे आणि त्यातून अहिंसक निरोगी जागृती करणे हा फार सविस्तर विचार आणि आचार आहे
    बाप्पा - पैगम्बराचा दात आणि बुद्धाचा केस असा प्रकार का बरे झाला नाही ?
    आप्पा - आपण आपल्याला जितके आधुनिक समजतो त्यापेक्षा आपण फार म्हणजे अनंत योजने मागासलेले आहोत हे आपण मान्य करत नाही !अजूनही काही ठिकाणी बऱ्हाणपूर जवळ रात्री अश्वत्थामा फिरताना दिसतो !मारुती ठराविक दिवशी ठराविक स्थळी भक्ताना भेटतो !असे विचार समाजात पक्के होत आहेत - अशावेळी त्याच्या जोरावर कुणी जर आपली पोळी भाजून घेत असेल तर तो आधुनिक काळाला कलंक आहे !
    बाप्पा - आज अनेक तऱ्हेने अगतिक असलेल्या समाजाची अनेक स्तरावर फसवणूक होत आहे - मानसिक , भावनिक आणि आर्थिक - - - - - - - -
    आप्पा -समाजाची सर्व पातळीवर वैचारिक फसवणूक होऊ लागल्यावर अशा प्रकाराने त्यात भर पडून पराभूत मनोवृत्ती होत जाउन जीवनाकडे बघण्याची पांगळी वृत्ती तयार होईल आणि संपूर्ण ऱ्हास होईल
    बाप्पा - आज आपली पराभूत मनोवृत्ती कशी होईल ते बघण्याचा जणू सर्व पातळीवर एक कलमी कार्यक्रमच चालू असावा अशी शंका येते - त्याला राजकीय वातावरण अपवाद नाही !उलट तिथूनच सुरवात होते आहे की काय या सर्वाची - असा संशय येतो !

    ReplyDelete
  3. स्तूप

    केंद्रस्थानी स्तूप असणारे प्रार्थनामंदिर. चैत्याचे आरंभीचे स्वरूप म्हणजे स्तूप व त्याभोवतालचा प्रदक्षिणामार्ग ह्यांना आच्छादून घेणारी गोल वास्तू. त्याच्या प्रवेशद्वारासमोर छोटीशी वीथिका असे. राजस्थानात जयपूरनजीक वैराट येथे अशा मौर्यकालीन चैत्याचे अवशेष मिळाले आहेत. जुन्नरचे तुळजा लेणे व गुंटुपल्ली येथील लेणे ही याच प्रकारची उदाहरणे आहेत. या वर्तुळाकार चैत्यासमोर आयताकार, गजपृष्ठाकार छपराची शाला वा मंडप उभारणे, ही दुसरी पायरी होय. अखेरच्या अवस्थेत ह्या दोन भागांना वेगळे करणारी भिंत काढून टाकून एक प्रचंड व सलग चापाकार चैत्यगृह निर्माण करण्यात आले. सांची, सारनाथ, नागार्जुनकोंडा अशा ठिकाणी शुंगसातवाहन काळातील चैत्यगृहांचे अवशेष उत्खनित करण्यात आले आहेत. भारहूत आणि सांची येथील मूर्तिकामात चैत्यगृहांच्या अनेक प्रतिकृती दिसतात; परंतु चैत्यगृहांची उत्कृष्ट कल्पना येते, ती शैलोत्कीर्ण चैत्यगृहांवरून. भाजे, अजिंठा, कार्ले येथे या वास्तूच्या विधानांच्या व रूपांच्या विविध अवस्था पहावयास सापडतात. सर्वांत प्रगत अशा चैत्यगृहात प्रवेशद्वार व त्यावर वीथिका, त्याच्या आत ओवरी आणि ओवरीतून आत गेल्यावर मुख्य मंडप, मंडपात जाण्यास एक आणि दोन्ही बाजूंच्या दोन नासिकांमध्ये (देवडी किंवा ओटी) जाण्यास एकेक असे तीन दरवाजे असतात. आयताच्या छोट्या बाजूमध्ये प्रवेशद्वारे व त्याच्या समोरच्या बाजूमध्ये स्तूप बसविलेला असतो. ही बाजू गोलाकार वा चापाकार केलेली असते. मंडपाच्या दोन्ही बाजूंच्या ओसऱ्या व नासिका स्तूपाभोवतीच्या प्रदक्षिणापथास मिळतात. छप्पर गजपृष्ठाकृती असून, समोरच्या बाजूला अर्धवर्तुळाकृती गवाक्ष असते. चित्र व शिल्प यांच्या सजावटीने चैत्यगृहास सुशोभित केलेले असते.

    ReplyDelete
  4. बौद्धांच्या मठातील जीवनपद्धतीत प्रारंभी तीर्थयात्रा विहित मानली जात नव्हती. स्वतः गौतम बुद्धाने तीर्थयात्रेला बंदीही घातली नव्हती अथवा यात्रा करण्याची आज्ञाही दिली नव्हती. परंतु त्याच्या परिनिर्वाणानंतर त्याच्या शरीराच्या अवशेषांवर स्तूप बांधले गेले आणि त्याचे अनुयायी व मित्र तेथे भेटी देऊ लागले. शिवाय बौद्ध भिक्षूंनी एका ठिकाणी राहू नये असा त्यांना आदेश होता. त्यामुळे त्यांनी पवित्र बौद्ध स्थानांना भेटी देण्यास सुरुवात केली असावी. पवित्र स्थानांना भेटी देण्याच्या हिंदू प्रथेचे हे अनुकरण असावे. गौतम बुद्धाच्या जीवनाशी संबंधित अशा स्थानांना आधी मान्यता मिळाली असावी. अशी स्थाने चार असून ती पुढीलप्रमाणे : कपिलवस्तू–कपिलवस्तूमधील लुंबिनी हे बुद्धाचे जन्मस्थान. कुशिनगर–कपिलवस्तूच्या पूर्वेला कुशिनगर येथे बुद्धाचे परिनिर्वाण झाले. बुद्धगया–गयेच्या दक्षिणेला नऊ-दहा किमी. वर असलेल्या या स्थानी एका पिंपळवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या गौतम बुद्धाला बोधी प्राप्त झाली. म्हणूनच त्या वृक्षाला बोधिवृक्ष म्हटले जाते. सध्या त्याच वृक्षापासून परंपरेने बनलेले अनेक वृक्ष येथे आहेत. येथे अशोकाने एक विशाल बुद्धमंदिर आणि अनेक स्तूप बांधले. सारनाथ–बुद्धाने प्रथम बनारसच्या उत्तरेला पाच-सहा किमी. वर सारनाथ येथे धर्माचा उपदेश करून धर्मचक्र प्रवर्तित केले. येथे अनेक स्तूप, मंदिरे, शिल्पबद्ध शिला, अशोकस्तंभ आणि बुद्धमूर्ती आहेत.

    बुद्धाच्या निर्वाणानंतर त्याच्या शरीराचे अवशेष आठ ठिकाणी विभागले गेले आणि त्यांच्यावर आठ ठिकाणी स्तूप उभारण्यात आले. याखेरीज ज्या घटात अस्थी ठेवलेल्या होत्या त्या घटावर एक आणि बुद्धाच्या चितेतील अंगारांवर एक असे एकूण दहा स्तूप उभारले गेले, कुशिनगर, पावागड, वैशाली, कपिलवस्तू, रामग्राम, अल्लकल्प, राजगृह आणि बेटद्वीप या ठिकाणी आठ स्तूप उभारले गेले. पिप्पलीयवनात अंगारस्तूप व बहुधा कुशिनगरच्या जवळच घटस्तूप उभारला. याशिवाय कौशांबी येथील स्तूपात बुद्धाचे केस व नखे आहेत असे मानले जाते. सांची येथेही एक स्तूप आहे. पेशावर येथे सम्राट कनिष्काने उभारलेला एक स्तूप सापडला असून त्यात बुद्धाच्या अस्थी सापडल्या असे म्हणतात. श्रावस्ती येथे बुद्धाच्या पहिल्या चंदनमूर्तीची स्थापना केली होती. अयोध्येत बुद्धाने अनेक वर्षे उपदेश केला होता. नालंदा हे बौद्ध विद्यापीठाचे स्थान म्हणून विख्यात होते.

    इ. स. पू. तिसऱ्या शतकात अशोकाने बौद्धांच्या अनेक तीर्थांची यात्रा केली, इ.स. पाचव्या शतकात फाहियान या चिनी यात्रेकरूने भारत व श्रीलंका येथील अनेक बौद्ध तीर्थांची यात्रा केली. ६२९–६४५ या काळात ह्युएनत्संग या चिनी यात्रेकरूने भारतातील बौद्ध तीर्थांची केलेली यात्रा इतिहासप्रसिद्ध आहे.

    ReplyDelete
  5. सर्वात थोर राहिलेली व्यक्ती.....

    सर्वोच्च बुद्ध

    १. बुद्ध देव नव्हते. ते एक महान मानव होते.
    २. सर्वोच्च बुद्ध - ते सर्वात थोर शिक्षक होते.
    ३. बुद्ध हे अहिंसेचे सर्वात महान समर्थक होते.
    ४. बुद्ध हे सर्वाधिक त्रास सहन केलेली व्यक्ती होते.
    ५. बुद्ध हे मानवजाती साठी सर्वोच्च त्याग करणारे धार्मिक नेते होते.
    ६. बुद्ध हे सर्व मानवजाती मध्ये सर्वात धाडशी व्यक्ती होते.
    ७. बुद्ध हे खऱ्या-खुऱ्या इतिहासातील एक धार्मिक शिक्षक होते.
    ८. बुद्ध हे सर्वाधिक दोषारोप झालेले सामाजिक कार्यकर्ता होते.
    ९. बुद्ध हे सर्वोच्च तत्त्वे प्रदर्शित करणारे महान नेते होते
    १० बुद्ध हे संघ आदेश नावाची युवक संघटना स्थापन करणारे धार्मिक युवा नेते होते.
    ११. बौद्ध हा असा धर्म आहे की ज्यामध्ये धर्माचे केवळ पुस्तकी ज्ञान आणि केवळ संस्कार आणि केवळ विधी करण्यास प्रतिबंधित केले होते?
    १२. सर्वोच्च बुद्ध - मार्गदर्शकांचे महान नायक होते.
    १३. बुद्ध एक विचार आणि सामाजिक क्रांती आणणारे पहिले धार्मिक नेता होते.
    १४. बुद्ध हे सत्य जाणिवेचे पहिले थोर नेता होते.
    १५. बुद्ध हे धम्माचे प्रभावी प्रवक्ता होते.
    १६. बुद्ध हे सर्व धार्मिक नेत्यांमध्ये सर्वाधिक प्रगतीशील होते.
    १७. बुद्ध हे एक अफलातून कहाण्या सांगणारे आणि शाब्दिक प्रतिमांचे सृजन करणारे निर्माता होते.
    १८. बुद्ध हे सर्वोच्च मानसोपचार तज्ञ होते.
    १९. बुद्ध - अतुलनीय सौंदर्यवान व्यक्ती होते.
    २०. बुद्ध हे सर्वोच्च मानसशास्त्रज्ञ होते.
    २१. बुद्ध हे एक नीतिमान राजे होते, ज्यांनी धम्माचे नीतिमान राज्य स्थापन केले होते.
    २२. बुद्ध हे एक धार्मिक शिक्षक होते, ज्यांनी पुढचे जग दाखविले आणि या जगाला प्रगती पथावर नेले.
    २३. सर्वोच्च बुद्ध - पृथ्वीवरील सर्वात महाकारुनिक व्यक्ती होते.
    २४. बुद्ध - सर्वात मोठे समाजसुधारक होते.
    २५. सर्वोच्च बुद्ध - समाजवाद आणि लोकशाहीचे ते आद्य प्रवर्तक होते.

    ReplyDelete
  6. A Great Battle

    The whole universe is a vast field of battle.

    Everywhere there is fighting.

    Existence is nothing but a vain struggle against germs of dreadful diseases, molecules against molecules, atoms against atoms, and electrons against electrons.

    Mind is still more a scene of battle.

    Forms, sounds, tastes etc. are resultants of counteracting and belligerent forces.

    The very existence of war proves that there is a state of Perfect Peace.

    It is what we call Nibbana.

    ReplyDelete
  7. तुमच्या स्वप्नात कोण येते काय माहित ?
    माझ्या स्वप्नात बुद्ध आला आणि सांगू लागला ,
    झक मारली आणि मी हा धर्म काढला ,
    वैताग आला आहे !
    मला वाटलं होत की हुशार ब्राह्मण लोक माझ्या धर्मात येतील , पण हे सगळे पारोसे अडाणी माझ्या धर्मात येउन बसले आणि पार वाट लागली !
    बुद्ध धर्म हा बुद्दू लोकांचा धर्म झाला आहे !
    बुद्ध वरूनच बुढ्ढा शब्द आला , कारण बुद्ध मुळातच जरा सगळीच आवड कमी असलेला होता , त्यामुळे राजवाडा सोडून तोंड लपवून रानात रहायचा !
    मी बुद्धाला म्हटलं की अरे बाबा , काय सांगू तुला , भारतातले बौद्ध आणि जपान मलेशियातले बौद्ध , चीन आणि सिंगापुरचे बौद्ध यात जमीन अस्मानाचा फरक आहे !
    तिकडच्या बुद्धाना जेंव्हा कलाल की इकडे भारतात , बुद्धाना आरक्षण असते , तेंव्हा ते फिदीफिदी हसू लागले , आणि म्हणाले ,

    सर्व जगात कुठेही बुद्धाना आरक्षण नाही , मग भारतातच कसे काय ?
    बुद्धाला पण हेच कोडे पडले आहे , कि माझ्या धर्मात आरक्षण कशाला ?

    या ब्राह्मणाना समोरासमोर वादात पराभूत करून हा नवा धर्म निर्माण झाला आणि फोफावला ,
    पण म्हणून नेक हिंदू आणि इतर राजांच्या राजवटीत माझा धर्म फोफावला , पण ही आरक्षणाची फालतुगिरी मी तरी नसती स्वीकारली !
    मी बुद्धाला म्हणालो , अरे यार , यदा आहेस तू , तुला हि गेम कधीच कळणार नाही ,
    पूर्वी फुकटची पोपटपंची करून ब्राह्मणांनी स्वतःला हुशार हुशार म्हणून मिरवले आणि आता आम्हाला गेम करून आरक्षण देवून ते यडे करत आहेत !

    खरेतर आम्हाला नुसते आरक्षण नको ,
    आमची परीक्षा पण सोपी हवी , मार्क आपोआप ३० टक्के जास्त हवेत ! नोकरी राखीव हवी !
    अहो पण इतर जगात लोक हसतात तुम्हाला असा हट्टीपणा करता म्हणून !
    त्याचं नका सांगू आम्हाला , त्याना कुठे आमच्या सारखे हाल भोगावे लागले का ?
    बर मग हे किती वर्ष चालू ठेवायचं ?
    जगबुडी पर्यंत ?

    ReplyDelete
  8. समीरची (घाटगे ???) बेताल, खुळचट आणि धांदरट टिप्पणी ! ! !

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...