सोनईतील हत्याकांड ते नितीन आगे, उमेश आगळे यांची निघृण हत्या. सत्र वाढत आहे. याबद्दल निषेध, कडकडीत बंद, जलदगती न्यायालयांच्या घोषणांचा आवाज एवढा दुमदुमत आहे कि जणू या पुरोगामी महाराष्ट्रात जातीव्यवस्थेमुळे होणा-या अन्याय-अत्याचाराविरोधात खरेच चीड उसळली आहे. एकीकडे शोषित-वंचितांनी स्वतंत्र वसाहती कराव्यात यापासून ते भीमा कोरेगांवचा पराक्रम आठवत शस्त्रे परजा अशी आवाहने सोशल मिडियातून होतांना दिसताहेत तर दुसरीकडे या घटनांतील अपराध्यांची जात पाहून त्या जातीच्या सर्व समाजाला दोषी ठरवू नये अशी आवाहने दुसरीकडून होत आहेत.
एकुणातच तात्पुरते का होईना सारे समाजघटक जागे होतांना दिसत आहेत. या अशा घटनांचा निषेध करत असतांना असे पुन्हा घडूच नये यासाठी आम्ही सर्वांनीच नेमके काय करायला हवे, असे का घडते आहे याबद्दल विश्लेशन करायला आमचे बोटचेपे पुरोगामी विचारवंत मात्र कमी पडत आहेत. शोषक विरुद्ध शोषित हा संघर्ष पुरातन आहे हे खरे आहे. बळी जाणारा हा बव्हंशी शोषित-वंचित समाजघटकांतीलच असतो हेही वास्तव आहे. परंतू शोषणाचे मार्ग बदललेले आहेत आणि जुन्या भुमिकांतून शोषक-शोषित संघर्षाकडे पाहून चालणार नाही याचे आमचे भान हरपलेले आहे. शोषितांचा शोषितांविरुद्ध वर्गीय/जातीय लढा असे वेगळेच स्वरूप आपल्या समाजव्यवस्थेत आकारू लागले आहे, आणि म्हणून त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करावा लागेल.
गेल्या काही महिन्यांतील घटना पाहिल्या तर काही प्रेमप्रकरणांतून तर काही राजकीय कारणांतून घडल्या आहेत असे वरकरणी म्हणता येईल. प्रेमप्रकरणातून निर्माण होणारे संघर्ष आणि त्यातून उद्भवनारी हत्याकांडेही भारताला नवीन नाहीत. सर्वत्रच त्यांना जातीय परिमाने असतातच असेही नाही. पण बव्हंशी घटनांत "जात" हा घटक महत्वाचा ठरला आहे हेही वास्तव आहे. जे जातीविरहित धर्मात प्रवेशते झाले आहेत त्यांच्याबाबतही जातीचा अभिशाप सुटला आहे असे नाही. इतरांच्या दृष्टीने "ते" अजुनही विशिष्ट जातीचेच आहेत. जातीनिहाय उच्च-नीचतेची उतरंड वैदिक धर्मातून झिरपली आणि ती वैदिकांपेक्षा कठोरपणे अवैदिकच जास्त पाळत आहेत असे भिषण चित्र सध्या तरी दिसते आहे.
शिक्षण आणि आधुनिकीकरण यातून जातीनिहाय उच्च-नीचतेच्या भावनांना तिलांजली मिळेल हे जात्युच्छेदनाचे स्वप्न पाहणा-या महनियांना आम्हीच रसातळाला पोहोचवले आहे. जातींचे भान मुलांना विद्यार्थीदशेपासुनच कसे असते हे समीर मोहिते या तरुणाने केलेल्या सर्वेक्षणात सामोरे आलेले आहे. जातीव्यवस्थेला कठोर करत नेणारी आज जी नवीन आर्थिक आणि राजकीय परिमाने लाभलेली आहेत त्यावर मात्र व्हावे तसे संशोधन होत नाही हेही एक वास्तव आहे.
भारताचा पंतप्रधानपदाचा उमेदवारच जेंव्हा स्वत:ला "निचली जाती का" असे म्हणतो तेंव्हा त्यालाही कोणत्यातरी उच्च जाती अभिप्रेत आहेत, म्हणजेच जातीव्यवस्थेची उतरंड मान्य आहे असा अर्थ होतो. जर समाजाला ही उतरंडच मनोमन का होईना मान्य असेल तर समतेचा प्रश्न येतोच कोठे? महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. ब्राह्मण, मराठे, ओबीसी हे घटक कथित "उच्च जातीय" अथवा "सवर्ण" आहेत हे गृहित धरुनच जेंव्हा कोणत्याही घटनेची चिकित्सा केली जाते तेंव्हा ती कितपत तथ्यापर्यंत पोहोचू शकेल याबाबत मला शंका आहे. आणि समजा, कथित मराठे अथवा ओबीसी स्वत:ला ते जे मुळात नाहीत ते मानत असतील तर त्यांचा दृष्टीकोन हा इतिहासातील पिचलेल्या समाजघटकांबद्दल आकसाचा, घृणेचा असनार हेही उघड आहे. येथेही आपण समतेबद्दल बोलायचा अधिकार गमावून बसलेलो असतो याचे भान दोन्ही समाजांना असणे आवश्यक आहे.
मुळात एखाद्याला हाल हाल करून मारुन टाकावे अशी मानसिकता येते तरी कोठून? ही विकृती आहे हे तर उघड आहे. नितीन आगे या कोवळ्या मुलाला निर्दयपणे मारले जात असतांना मारणारे सोडा, हजारो बघ्यांचे अंत:करण थोडेही का द्रवले नाही? कोणीही हस्तक्षेपही का केला नाही? कि पोलिस म्हणतात त्याप्रमाणे हत्या सोडता असे काही घडलेच नाही? पुन्हा या प्रकरणाला दोन पक्ष आहेत आणि नेमका खरा पक्ष कोणाचा हे कसे ठरवायचे? डा. प्रकाश आंबेडकर एका वाहिनीवर मुलाखत देतांना म्हणाले, आगे प्रकरण हे जातीय नसून प्रेमप्रकरणातून घडले आहे. पण येथे हा प्रश्न निर्माण होतो, प्रेमप्रकरणात हत्या कोणत्या तत्वात बसते? आमचे काही आजचे विचारवंत उठाठेव करत म्हणतात, हे काय प्रेम करायचे वय असते काय? आता प्रेम करायचे वय नेमके कोणते याचा कसलाही शास्त्रीय डाटा उपलब्ध नाही. ते कधीही, कोणत्याही वयात होऊ शकते. प्रेमात लैंगिक भावना अनुस्युतच असतात. केवळ गप्पा मारण्यासाठी कोणी विभिन्नलिंगीच्या प्रेमात पडत नाही. दुसरे असे कि आगे प्रकरणात सांगितले जाते कि मुलगीच त्याच्या मागे लागली होती. पण याने फरक काय पडतो? हत्या झाली आहे हे अत्यंत निघृण असे वास्तव आहे, त्याच्याकडे डोळेझाक करत सारवासारवीचे उद्योग का केले जातात?
वास्तव हे आहे कि उभय घटकांत द्वेषाचे मळे फुलत आहेत. कथित विचारवंत आणि पुरोगामी म्हणवणा-या संघटना या द्वेषाला खतपाणी घालत आहेत. एकीकडे स्पृष्य म्हणून गणला गेलेला समाज पुर्वास्पृष्यांचा द्वेष करत आहे, आणि दोन्ही गटांना मैत्रीचे हात पुढे करायला त्यांचे नवे अहंकार आड येत आहेत. ब्राह्मण-मराठे जेवढा खोटा इतिहास उभारत आपल्या कथित अस्मिता चेतवताहेत तेवढेच पुर्वास्पृश्य समाजघटकही नव्या आत्मशोधात का होईना त्याची री ओढत आहेत. खरा इतिहास आणि खरे आत्मभान कोणालाच नको आहे असे वाटावे अशी भिषण समाजस्थिती आपणच निर्माण केली आहे.
बदलत्या अर्थव्यवस्थेने त्यात अजून तेल ओतले आहे. एकीकडे तळागाळातील, गांव-पाटलासमोर, धनदांडग्यांसमोर नित्य झुकलेला असलेला एके काळचा समाज झपाट्याने शिकून प्रगती साधत आहे. जुनी गुलामी नाकारत आहे. दुसरीकडे शेतीच्या तुकडीकरणाने, नवे शेती-तंत्रज्ञान अथवा आधुनिक शिक्षनाकडे पाठ वळवलेला पुर्व-सरंजामी समाज मात्र रसातळाला जात आहे. कथित खानदानी अहंकार तर जात नाही, पण आर्थिक बोजे असह्य झालेले, अशा परिस्थितीत आत्महत्या करण्यात हाच समाज अग्रेसर आहे हेही एक वास्तव आहे. नैराश्याने या बव्हंशी समाजाला ग्रासलेले आहे आणि त्यांच्या सामाजिक संघटना या नैराश्यात भर घालत आहेत. मराठा आरक्षण ही त्याच नैराश्यावर मात करण्यासाठी व राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी केली गेलेली एक चाल आहे. त्यामुळे जातीय संघर्षाला आर्थिक व म्हणूनच एक नवे राजकीय परिमाण लाभलेले आहे. एके काळचा व्यवस्थेचा शोषकच शोषितांच्या हक्कांवर घात घालतो आहे हा उद्वेग एकीकडे तर नव्या अर्थव्यवस्थेत हतबल ठरत असनारे कालचे सरंजामदार एकीकडे असा हा समाज-मानसशास्त्रीय तिढा आहे. मनोविकृत्या हिंसकतेकडे झुकतात हा जागतिक इतिहास आहे. आणि गुलामगिरी नाकारतांना जुन्या व्यवस्थेचा निरंतर द्वेष करत राहण्यात कोणते शहानपण आहे?
आर्थिक हतबल नातेवाईक व आपापला समाज स्वार्थासाठी धरून रहायचा प्रयत्न करतो. धर्मवेड, जातवेड हे आर्थिक दुर्बलांना विकृत करत नेते हा समाजशास्त्रीय इतिहास आहे. राजकीय स्वार्थसाधकांना जात हेच भांडवल वाटते त्यामुळे ते जात-सापेक्ष तत्वज्ञानाचेच समर्थक असतात. अशा परिस्थितीत परस्परांकडे पाहण्याचा दृष्टीकोण हा अत्यंत टोकाच्या द्वेषाचा असणार हे उघड आहे आणि ते तसे आहेही. सोशल मिडिया हे सध्याचे एक दिग्दर्शक माध्यम मानले तर त्यावरून आपली समाज-मानसिकता केवढी विकृत व द्वेषांधळी झाली आहे याचे दर्शन होते. प्रश्न एवढाच उरतो कि कोण कोणावर कुरघोडी करतो. आजवरच्या जातीय हत्याकांडांनी त्याचे उत्तर दिले आहे.
तथागत बुद्ध म्हणाले होते कि द्वेष हे तीन विषांपैकी एक विष आहे. सोनईचे प्रकरण असो कि नितीन आगेचे, ही आत्यंतिक द्वेषाची परिणती आहे. त्याला जेवढीही परिमाने आहेत त्यावर जोवर आम्ही सर्वच प्रामाणिकपणे विचार करत सामाजिक मानसिकतेत बदल घडवून आणु शकत नाही तोवर आम्हाला वीट येईपर्यंत फक्त निषेध मोर्चे वा बंदच पाळावे लागतील.
सामाजिक द्वेषापार जाण्यासाठी आमच्याकडे नेमकी काय व्युहरचना आहे हा खरा प्रश्न आहे. सामाजिक आत्र-हितसंबंध सामंजस्याचे होतील यासाठी कोणती रचना अभिप्रेत आहे हाही प्रश्न आहे. त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे सामाजिक द्वेष उठवत, नामानिराळे राहणा-या समाजकंटकांबद्दल आमची भुमिका काय आहे हे आम्हालाच ठरवावे लागेल.
अन्यथा आज नितीन आगेबद्दल शोक करत असतांना आम्हाला उद्याच्या अन्य कोणाच्या हत्येचा/अन्यायाचा/अत्याचाराचा निषेध वारंवार करत बसण्याची वेळ येईल. उत्तर मात्र सापडनार नाही ते नाहीच!