Sunday, June 15, 2014

कोण आहे ही हिंदू राष्ट्र सेना?


 
feature size
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांचं विकृतीकरण करणारे फोटो फेसबुकवर फिरू लागले आणि उभ्या महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. बसगाड्यांची तोडफोड, दुकानं बंद करण्यासाठीच्या धमक्या याचा गदारोळ उडाला. आपला समाज अनेकदा विक्षिप्ततेचे इरसाल नमुने दाखवत असतो. मनोविकृतांना जे हवं असतं नेमकं तेच आपले लोक करतात, तणाव वाढतात. ज्याने कोणी असलं कृत्य केलं ते दूर बसून तमाशा पाहतात. पण यात सर्वात मोठा विकृतीचा कळस गाठला तो हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी… नमाज पढून मित्रासोबत घरी परतत असलेल्या शेख मोहसिन मोहम्मद सादिक या २४ वर्षीय तरुणाची २ जून २०१४ रोजी निर्घृण हत्या केली. अनेकांवर हल्ले करून त्यांनाही जखमी केलं. या प्रकरणी पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळल्यामुळे संभाव्य दंगलीचा धोका टळला. खून प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या १७ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय. सर्व आरोपी महाविद्यालयीन विद्यार्थी असून यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. हिंदू राष्ट्र सेनेचा संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यालाही या प्रकरणात अटक झाली होती. आता तो अन्य गुन्ह्यांत इतर पोलीस स्टेशन्सच्या ताब्यात आहे.
यात विकृतीची अजून पडलेली भर म्हणजे हिंदुत्ववाद्यांनी ‘पहिली विकेट घेतली’ अशा स्वरूपाचे संदेश सर्वत्र पसरवायला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर हडपसरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली म्हणून शेख मोहसिनला ठार मारलं गेलं असं धादांत वृत्तही पसरवलं जाऊ लागलं. हिंदुत्ववाद्यांचा उन्माद हा अलीकडे बदललेल्या राजकीय समीकरणांनी कसा उच्छाद मांडू लागला आहे हे या निमित्ताने लक्षात यावं.
हिंदू राष्ट्र सेनेचा संस्थापक धनंजय देसाई नावाचा युवक ३४ वर्षीय आहे. हा मुळचा मुंबईचा. पुण्यात आल्यावर त्याने या कडव्या हिंदुत्ववादी संघटनेची स्थापना केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये त्याने बर्यापैकी आपलं जाळं पसरवलं. महाराष्ट्रभर या संघटनेच्या अनेक शाखा आहेत. कडवा हिंदुत्ववाद आणि मुस्लीम द्वेष हा संघाचाच अजेंडा आक्रमकपणे राबवणं हे त्याचं इति कार्य राहिलं आहे. आजवर भडकाऊभाषणं देणं, धार्मिक तेढ वाढवणारं आक्षेपार्ह साहित्य प्रसारित करणं याबद्दल त्याच्यावर जवळपास २३ गुन्हे दाखल आहेत. या व्यतिरिक्त पोलीस त्याला वेळोवेळी नोटिस पाठवत राहिले आहेत… त्यांना आपण केराच्या टोपलीत फेकून देतो असं तो जाहीरपणे सांगत असतो.
श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक, अभिनव भारतच्या हिमानी सावरकर, सनातन प्रभातचे विक्रम भावे हे त्याचे निकटवर्ती असून अनेक कार्यक्रमांत ते एकत्र आलेले आहेत. मालेगाव स्फोटाच्या संदर्भातील साध्वी प्रज्ञा सिंग आणि ले. कर्नल प्रसाद पुरोहितच्या समर्थनार्थही या सेनेने आक्रमक आंदोलनं केलेली आहेत. याव्यतिरिक्त अनेक उपद्व्याप हिंदू राष्ट्र सेनेच्या नावावर जमा आहेत.
‘हिंदू राष्ट्र’ हे या संघटनेचं ध्येय आणि सर्वोच्च स्वप्न. म्हणजे हे कोणाच्या आयडिऑलॉजीवर चालतात हे वेगळं सांगायची गरज नाही. सध्या याच आयडिऑलॉजीवर अंतिम विश्वास ठेवणारं सरकार केंद्रात असल्याने विकासाचे मुद्दे भ्रामक ठरत धार्मिक विद्वेषाला वाढवण्याचं कार्य होईल की काय अशी सार्थ भीती वाटणं स्वाभाविक आहे. महापुरुषांचं विडंबनही तेढ वाढवण्यासाठीच अशाच काही संघटनांनी केलं की काय अशी शंकाही येणं स्वाभाविक आहे. ‘पहिली विकेट पडली’ असा उन्माद करणारे पुढच्या विकेटी घेण्यासाठी अजून काय करतील हे सांगता येत नाही.
हेतू काय?
पुणे हे पेशवाईपासून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रितीने हिंदुतवाद्यांचं केंद्र राहिलं आहे. इतिहास पाहिला तर नथुराम गोडसेची ‘वैचारिक’ वाढ पुण्यातच झाली आहे. दलितांवर कठोर बंधनं लादणारं हे पुणेच होतं. त्याची री नंतर अन्य भागांनी ओढली. खरं तर महापुरुषांची बदनामी झाल्यानंतर शोकसंतप्त तणाव सर्वत्रच होता. पण पुण्यात ज्या पद्धतीने या तणावाची अभिव्यक्ती झाली ती पाहता यातून नेमका कोणता संदेश सर्वत्र देण्याचा उद्देश होता यावरही विचार करणं गरजेचं आहे.
तसं पाहता पुणे हे हिंदुत्ववाद्यांचं माहेरघर आहे. दंगली, शारीरिक हिंसा यापासून पुणे सहसा अलिप्त राहिलं असलं तरी हिंदुत्ववादी मंडळींना तत्त्वज्ञान पुरवणार्या विद्वान आणि कार्यकर्त्यांची इथे नेहमीच रेलचेल राहिलेली आहे. वैदिक धर्माची फेरमांडणी बनारस येथील चौखंबा प्रकाशनाकडून सातत्याने मांडली जाते. त्याखालोखाल पुण्याचा नंबर लागतो हे एक कटू वास्तव आहे. भाजपा सरकार येण्याआधी आणि नंतर तर अधिकच ज्या पद्धतीने पुणेरी हिंदुत्ववाद्यांत चेव चढलेला प्रत्यक्ष पहायला मिळतो आहे ते पाहता सर्व छुपे आणि उघड अजेंडे राबवण्यासाठी ही मंडळी मोदींपेक्षा अथवा त्यांच्या इच्छेविरुद्धही अधिक सज्ज झाली आहेत कीकाय असं वाटावं असं चित्र आहे.
हिंदू राष्ट्र सेनेचं हे अमानुष कृत्य या नजरेतून पहावं लागेल. महाराष्ट्रात सध्या तरी अस्तित्वहीन असं आघाडीचं सरकार आहे. त्यांना स्वतःच्याच अस्तित्वाचा प्रश्न भेडसावत असल्याने त्यांना भविष्यातील या संभाव्य संकटाचा प्रतिकार कसा करावा यावर विचार करण्यासाठी कितपत वेळ आहे वा इच्छा आहे हा प्रश्नच आहे.
मात्र या घटनेने समाजमानस ढवळलं आहे हे निश्चित. असहिष्णुतेचे, द्वेषाचे आगडोंब पेटवण्याचे प्रयत्न होत असताना सहिष्णू प्रवृत्तीही जाग्या होत आहेत हे जरी स्वागतार्ह चित्र असलं, मोहसिन शेखच्या दुर्दैवी हत्येबद्दल खेदाचे स्वर उमटत असले तरी पुढचं चित्र आशादायक आहे असं म्हणता येत नाही. काही मुस्लीम बांधवांशी चर्चा करताना या अंतरातील खदखदीची जाणीव जशी होते तशीच हिंदुत्ववाद्यांचा उन्मादी आनंद पाहता भविष्यातील गुजरातही दिसू लागतं.
वैदिकवादी हे वेगवेगळ्या प्रयोगशाळा राबवण्यात वस्ताद आहेत. हिंदू राष्ट्र सेनेच्या माध्यमातून पुणे ही एक छोटी का होईना प्रयोगशाळा करण्याचा प्रयत्न झाला. पुणे पोलिसांचे संभाव्य संकट टाळण्यासाठीचे प्रयत्न नक्कीच अभिनंदनीय असेच आहेत. पण पोलीस यंत्रणा अनेकदा सरकारांनी आपलं हत्यार म्हणून वापरल्याची उदाहरणं कमी नाहीत. नजिकच्या निवडणुकीत सत्तापालट होण्याचा धोका सध्याच्या निष्क्रिय सरकारने ओढवून ठेवला आहे. भविष्यात पोलीस यंत्रणा अशा घटनांत निःपक्षपाती राहिल काय असा प्रश्न भयभीत जनतेच्या मनात उभा ठाकला तर त्यात नवल वाटायचं काहीएक कारण नाही.
अशा परिस्थितीत जनतेचीच जबाबदारी मोठी आहे. मुळात द्वेष पसरवणारं वृत्त आलं की ते विशिष्ट समाजानेच केलं असेल या मूर्खपणाच्या भावनिकतेतून बाहेर पडत पोलीस यंत्रणा खरे आरोपी पकडेल आणि त्यांच्यावर कारवाई करेल याची वाट पाहिली पाहिजे. हे प्रकरण घडून आठवडा उलटला असला तरी अद्याप पोलिसांना महापुरुषांची बदनामी करण्यामागे नेमकं कोण होतं हे शोधता आलेलं नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं रहस्यही अद्याप गुलदस्त्यातच आहे. तपासी यंत्रणांचं हे अपयश म्हणावं की त्यांना सत्यशोधनात रसच नाही? मग सामान्य नागरिक या स्थितीत काय करू शकतात?
आपण सद्भावनेचा त्याग न करता सौहार्द जपण्याचाच अधिकाधिक प्रयत्न करत राहिलं पाहिजे, एवढंच म्हणता येईल. आम्ही नवं सरकार विकासाच्या मुद्यावर निवडून दिलं आहे, तथाकथित हिंदुत्वाच्या नाही हे सर्वांनाच उच्च स्वरात सांगावं लागेल. या घटनांचं राजकारण करण्याचा अद्याप तरी कोणी प्रयत्न केला नसला तरी पुण्याच्या नवनिर्वाचित खासदारांनी आधी जी प्रतिक्रिया दिली होती ती गुजरातचीच आठवण करून देणारी होती. कोणीही असो, हे लक्षात घेतलं पाहिजे की निरपराधांचे बळी घेण्यासाठी तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं नाही!
- संजय सोनवणी

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...