Friday, July 11, 2014

सावित्रीमाईचा मनमोकळेपणे उद्घोष करा...

पुणे विद्यापीठाला अखेर सावित्रीमाईंचे नांव दिले गेले. गेले काही दिवस मी सर्व थरांतील प्रतिक्रिया पाहत आलो. (खाजगीतीलही). हे नामांतर अथवा नामविस्तार अत्यंत अहिंसक मार्गाने झाले याबद्दल एका हिंसक आंदोलनानंतर नामांतर झालेल्या काही समाजघटकांना रोष वाटलेला दिसला तर पुण्यातील शैक्षणिक क्रांती घडवणारे अन्य महापुरुष शासनाला/समाजाला कसे दिसले नाहीत असा प्रश्न काही समाजघटकांना पडलेला दिसला. त्याच वेळीस इतर समाजघटकांनाही इतर विद्यापीठांना आपापल्या समाजातील महनियांचे नांव आता लवकर दिले गेले पाहिजे असे प्रकर्षाने वाटू लागले तर आता या देशात आमचे स्थान पुसण्याचे प्रयत्न सुरु आहेत असेही काहीजनांना वाटले.

सावित्रीमाईंचे नांव पुणे विद्यापीठाला दिले जाणे यात जो खरा सांस्कृतिक अन्वयार्थ होता व आहे याचे भान मात्र अवैदिक बहुजन समाजाला आले आहे याचे पुसटसेही चिन्ह मला दिसले नाही.

महात्मा फुले हे वैदिक संस्कृती/धर्म या विरोधात बळीराजाची (म्हणजे पुरातन असूर शिव-संस्कृतीची) कड घेणारे पहिले महात्मा होत. सावित्रीमाईंचा कवितासंग्रह मुखपृष्ठावर शिव ते पहिले नमन शिव येथून सुरु होते. उभयतांनी बहुजनांत वैचारिक क्रांतीची मुहुर्तमेढ रोवली. वैदिकांचे अत्याचार अन्याय बहुजन सहन करत आहेत असे असुनही वैदिकांबाबात द्वेषभावना न ठेवता योग्य तेथे सख्यच ठेवले, आदर व सहकार्यही केले. ख-या अर्थाची बळीराजाची उदार हृदयी संस्कृती पुन्हा जीवित केली.

या देशातील सर्वच महिलांना ज्ञानाचे, जागृतीचे आणि आत्मनिष्ठेचे बळ सावित्रीमाईंनी पुरवले. त्यासाठी अगणित अवमान आणी शेवटी एका निष्पाप प्लेगग्रस्त मुलाला वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला...आणि प्राणही त्यागले.

पण समजा हेही महत्वाचे नाही. संस्कृती कोणाची आणि कशी याचे दर्शन कितीही छपवले गेले तरी छपत नाही. इतर कोणी महान नव्हते असे नाही. पण स्वत: महात्मा फुले म्हणत कि सावित्री त्यांच्याही उद्वेलित स्थितीत आदर्श गुरुचे कार्य करायची. त्यांना महाधीर व्हायची.

या देशात कोणाची संस्कृती अजेय आहे? ती आहे बळीराजाची संस्कृती. आधुनिक काळात एखाद्या महान तत्ववेत्याप्रमाने म. फुलेंनी त्या संस्कृतीचा उद्घोष केला. स्त्रीयांना समता देणारी बळीराजाची संस्कृती कशी असते हे सावित्रीमाईंच्या रुपात दाखवले. आता पुणे विद्यापीठाला सावित्रीमाईंचे नांव दिले गेले तेथेच कोणाची संस्कृती खरी मानवीय, सहृदय आणि ज्ञानवादी आहे हे सिद्ध झाले. मध्यंतरीच्या काळात पुसट झाली असली तरी ही बळीराजाच्या संस्कृतीच्या स्थापनेची उद्घोषना आहे...आणि म्हणुन त्याचे सांस्कृतिक माहात्म्य अपार आहे.

जे कोणी बळीराजाची पूजा बांधतात....त्या सा-यांनी म. फुले आणि सावित्रीमाईंना वारंवार वंदना करायला हवी कारण त्या संस्कृतीचा आधुनिक उद्गार ते दांपत्य आहे. ते माळी होते, मग इतरांचे काय काम असा जे विचार करत असतील ते बळीराजाच्या संस्कृतीचे कसे वारसदार असू शकतात?

ते महात्मा फुलेंच्या एकमय समाजाच्या भावनेचे कसे पाईक असू शकतात?

ते माळी असणे ही त्यांच्या अस्तित्वाची खुण नव्हे तर ते कोणत्या संस्कृतीचे पाईक होते हेच खरे त्यांच्या अस्तित्वाचे महनीय उर्जाकेंद्र आहे.

पुरुषसुक्ताचा उद्घोष एकीकडे काही लोक करत असतांनाच बळीराजाच्या संस्कृतीची उद्घोषना करणा-या, शिवमय विश्वाची स्वप्ने पाहणा-या सावित्रीमाईंचे नांव पुणे विद्यापीठाला मिळावे हा बहुजनीय बळीराजाच्या संस्कृतीचा विजय आहे. त्यात जातीय कोतेपणा करू नका.

सावित्रीमाईचा मनमोकळेपणे उद्घोष करा...!

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...