Thursday, July 17, 2014

पुरोगामी...?

मानवी धारणा या खरेच प्रागतिक असतात काय? अनेकदा स्वत:ला प्रागतिक समजणारे आपल्याच धारणांचे नीट विश्लेषन करू न शकल्याने स्वत:ला प्रागतिक समजत, पुरोगामी समजत प्रतिगामी होत जातात. याचे मूळ कारण म्हणजे प्रतिगामीपणा काय आणि पुरोगामीपणा काय याच्याच व्याख्या त्यांना स्पष्ट नसतात.

शेकडो-हजारो वर्षांपुर्वी अमूक होते तसेच वर्तन, तशीच संस्कृती, तेच ग्रंथ आणि त्यातील तशाच्या तशा मान्यता वर्तमानातही पुजनीय/भजनीय व अंतिम सत्य मानतो व तसे वर्तन वर्तमानातही करायचा प्रयत्न करतो वा तशा भावना/विचार तरी जपत इतरांनीही तसेच वागावे व तसाच विचार करावा असा प्रयत्न करतो तो प्रतिगामी असतो असे आपण मानतो. प्रतिगामीपणाला काळ व समाजाचे वा व्यक्तीचे बंधन नसते. पाच-पन्नास वर्षांपुर्वीचे विचारही जो वरीलप्रमाणेच मानतो तोही तेवढाच प्रतिगामी असतो.

पुरोगामीपणाची व्याख्या जरा व्यापक आहे. ती जीवनाची सारी अंगे स्पर्शते. मग ती भौतिक असोत, ज्ञानात्मक असोत वा निखळ वैचारिक असोत. जोही कोणी काल होता त्या स्थितीपेक्षा आज वैचारिक/ज्ञानिक/आर्थिक उत्थान करीत उद्या याहीपेक्षा मोठा पल्ला गाठायचा प्रयत्न करत असतो आणि अधिकाधिक मानवतावादी जो होत जातो त्याला आणि त्यालाच फक्त पुरोगामी म्हणता येते.

वैदिकांना मी विरोध करतो कारण ते प्रतिगामी आहेत. ते कालबाह्य वर्णव्यवस्था, वैदिक स्तोम, परंपरा-संस्कृत्यांच्या इतिहासातील खोटारडेपणा करत आपले वर्चस्व आजही कसेबसे टिकवायच्या प्रयत्नांत मशगूल असतात. पण वैदिक विचारव्यवस्थेला विरोध करणारे स्वत: विरुद्धार्थाने तेवढेच प्रतिगामी असतात त्याचे काय? वैदिक विषम व्यवस्थेला जे सर्वोपरी मानतात ते त्रैवर्णिक, मग ते आज कोणत्याही जातीचे असोत, ते माझ्या दृष्टीने वैदिक आहेत. जे वैदिक नाहेत तरीही स्वत:ला क्षत्रीय/वैश्य मानतात तेही वैदिकच होत. भले वैदिक धर्मात त्यांचे स्थान धर्मबाह्य का असेना. जे या उच्च-नीचतेच्या अमानवी व अवैज्ञानिक संकल्पनांतून बाहेर पडले आहेत व जन्माधारीत कोणत्याही प्रकारचा जन्मसिद्ध वर्णीक वर्चस्वतावाद आपापल्या आत्म्याला साक्षी ठेवून जे नाकारतात, ते त्यांच्या धर्मातील कोणत्याही वर्णात जन्माला येवोत, त्यांना वैदिक मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी मानुही नये.

पण म्हणून अमुक वर्णात अथवा जातीत जन्माला आला म्हणून त्यांचा निरंतर द्वेष करत स्वत:चा नव-वर्चस्वतावाद आणु पाहतात ते कोण आहेत? त्यांना कोण पुरोगामी म्हणेल? ते तर तेवढेच, किंबहुना महा-प्रतिगामी म्हणावे लागतील! मग तेही वैदिक बनायचा प्रयत्न करत आहेत असे नाही कि काय? द्वेष करणा-यांची संस्कृती नेहमीच रसातळाला गेलेली आहे. वैचारिकतेचे खून हे द्वेष्टे नेहमीच पाडत आलेले आहेत. माणसाचाचा खुन परवडला...विचारांचीच हत्या करणारे, विचारांचे गर्भ खुडनारे द्वेष्टे हे कोनत्याही समाजाला विघातकच असतात! पण विचार तर पुढे न्यायचा नाही, त्याच द्वेषाच्या चौकटीत अडकुन रहायचे...

पुरोगामी या संकल्पनेची याहून मोठी कुचेष्टा व विटंबना अजून काय असू शकेल?

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...