Saturday, August 2, 2014

माणसाचा अहंकार.....

माणसाचा अहंकार एवढा तीव्र आहे की जणू हे सारे विश्व आपल्यासाठीच बनले आहे असा त्याचा दृढ समज आहे. त्याच्या अहंकाराची झेप एवढी मोठी कि त्याच्या देवदेवताही मानवासारख्याच तो चितारतो, त्याच्यासारख्याच भावभावना देवतांत आहे असे तो मानतो. पुरातन मिथके पाहिली तर त्यात माणसाचे हे अहंकार प्रदर्शन अधिकच तीव्र असलेले दिसेल.

माणूस आजही बदललेला नाही. ज्या वेगाने त्याने निसर्गाचा "उद्धार" सुरू केला आहे त्या वेगाने कही दशकांतच तो नैसर्गिक, जैविक संपदा संपुर्ण संपवुनच टाकेल. असंख्य जीव त्याने भुतलावरून नाहीसे केले आहेत तर अगणित नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गाशी जुळवून नव्हे तर त्याच्याशी अजरामर स्वार्थापोटी वैर घेऊनच तो वागतो आहे.

हेच वैर मग जेंव्हा निसर्ग प्रकोपातून व्यक्त करतो तेंव्हाची माणसाची उथळ हवालदिलता शरम आणते. निसर्गाशी संघर्ष एक दिवस माणसालाच या भुतलावरून नष्ट करेल याचे भान स्वत:ला बुद्धीमान व परमेश्वराचे लाडके अपत्य समजणा-या माणसाने कधीच बाळगलेले नाही.

आणि मनुष्य येथील निसर्गाचा भाग आहे ही कल्पनाच चुकीची असावी...खरेच तो डोनिकेन म्हणतो त्याप्रमाणे परग्रहावरून येथे आला असावा म्हणूनच त्याला स्वार्थापलीकडे येथील निसर्ग-जीवसृष्टीबाबत आत्मीयता वाटत नसावी हेच कधीकधी खरे वाटू लागते!

माणसाने अन्य सृष्टीला नष्ट करण्याचा नादात स्वत:लाही नष्ट करण्याचा चंग बांधला आहे हे मात्र निश्चित!

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...