भारतातील तीर्थस्थानं ही भावी पिढ्यांसाठी दैवी ज्ञानाची केंद्रं बनवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असं ते एका लेखात लिहितात. ‘दैवी ज्ञान’ हे कोणत्या विज्ञानाच्या नियमात बसतं हे या नवीन हभपंना कोणी विचारलं नसावं. याहीपेक्षा ते पुढे जातात आणि प्लँचेट या अवैज्ञानिक, अंधश्रद्धाळू लोकांनी, विशेषतः युरोपात, जोपासलेल्या गेलेल्या खुळचट खेळाचं समर्थन करतात. तेही डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारख्या अंधश्रद्धांचं निर्मुलन करण्यासाठी आयुष्य घालवत प्राणार्पणही करणार्या माणसाच्या खुनाच्या तपासाच्या संदर्भात… हे मात्र नुसतं धक्कादायक नाही, तर निंदनीयदेखील आहे.
येत्या २० ऑगस्ट रोजी दाभोलकरांची हत्या होऊन एक वर्ष पूर्ण होईल. या प्रदीर्घ काळात खुनी तर सोडाच, पण खुन्यांचे साधे धागेदोरेही पुणे पोलिसांना मिळालेले नाहीत. यामुळे पुणे पोलिसांवर सातत्याने टीका होत आहे. या नैराश्यातून पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना काय मार्ग दिसावा तर प्लँचेटचा? एका पत्रकाराने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि सर्वत्र खळबळ माजली. गुलाबराव पोळ यांनी आधी हा प्रकार केला असल्याचं फेटाळून लावलं असलं तरी त्यांनीच या स्टिंगध्ये या प्रकाराची कबुली दिली असल्याने ते अजूनच टीकेचे धनी झाले. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने पोळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यात दस्तुरखुद्द नामवंत शास्त्रज्ञ म्हणवणार्या भटकरांनी प्लँचेटच्या वापरात काहीही गैर नसून विदेशांतही पोलीस प्लँचेटचा वापर गुन्हेगार शोधण्यासाठी करतात असं सांगून विवेकवादाची पुरती हेटाळणी केली. यामुळे मराठी माणसाच्या विस्मृतीत जाऊ पाहत असलेला प्लँचेट हा प्रकारही चर्चेत आला.
काय आहे प्लँचेट?
प्लँचेट, बोलके बोर्ड, औजा आणि डायल प्लेटस हा भुताळ प्रकार सरासरी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर पुढे आणण्यात आला. यामागे खुद्द चर्चचा हात असावा असं अनेक विद्वानांचं मत आहे. विविध शास्त्रीय शोधांनी परंपरागत धर्मश्रद्धा कमी होत आहेत, यामुळे लोकांना पुन्हा गुढवादी विचारांकडे खेचणं चर्चला भाग पडलं असणं स्वाभाविक आहे. धर्म आणि विज्ञान या संघर्षात धर्मसत्ता कायम रहावी यासाठी लोकांना मृत्योत्तर जीवनावर श्रद्धा स्थापित करायला लावणं हाही हेतू यामागे होता. म्यगी आणि केट फोक्स या भगिनींनी १८४८ मध्ये आपण मृतात्म्यांशी संवाद साधू शकतो असा दावा केला. तत्कालीन माध्यमांनी या प्रकाराला प्रचंड प्रसिद्धी दिली आणि काही वर्षांत अमेरिकेत लोकांचा प्लँचेट करणं हा फावल्या वेळाचा छंद बनला. मृतात्म्यांशी खरोखर संवाद साधला असे दावेही हिरिरीने होऊ लागले. शेकडो लोक आपण मृतात्म्यांचं माध्यम असण्याचेही दावे करू लागले. एकट्या फिलाडेल्फियामध्ये ४०-५० प्लँचेट मंडळं निघाली. तबकडीसारख्या आकाराच्या वस्तुचा उपयोग यात केला जात असल्याने या प्रकाराला प्लँचेट असं नाव पडलं.
प्रेतात्मे विशिष्ट माध्यमांमार्फत आपल्याशी संवाद साधतात, आपल्या प्रश्नांना उत्तरं देतात हे पाहून प्लँचेटमध्येही अनेक सुधारणा (?) होत राहिल्या. प्रथम टिचक्या वाजवून हो किंवा नाही अशी उत्तरं देणारे साधे प्लँचेट अक्षरमालेवरून हलक्या वस्तू-नाणी-वाट्या इ. फिरवून उत्तरं देऊ लागली. आपोआप उत्तरं लिहून देणारे प्लँचेट मात्र अलन कार्डेक या फ्रेंच माणसाने १८५३ मध्ये शोधलं. अशा रितीने पुढेही प्लँचेटचे अनेक प्रकार शोधले गेले. युरोप-अमेरिकेत या प्रकाराने अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली. या विषयावर शेकडो पुस्तकंही लिहिली गेली. प्लँचेटची साधनं विकणारे गब्बर होऊ लागले एवढा हा ‘प्लँचेट रोग’ साथीसारखा पसरला होता. ‘औजा बोर्ड’चं (हो किंवा नाही असं सांगणारा) १८९१ मध्ये अमेरिकेत चक्क पेटंट घेतलं गेलं होतं.
या प्रकाराकडून अमेरिकन लोकांचं लक्ष वळालं आणि ते जीवनाबाबत अधिक गंभीर झाले ते अमेरिकन यादवी युद्धाच्या घटनेमुळे… अमेरिकन समाजशास्त्रज्ञ म्हणतात, ‘‘यादवीमुळे अमेरिकन लोक आत्मिक थोतांडाकडून दूर होत वास्तव जगाबाबत अधिक डोळस झाले…’’
थोडक्यात अमेरिकेतून प्लँचेट हा प्रकार जेवढ्या झपाट्याने पसरला तेवढ्याच झपाट्याने दूरही झाला. हा प्रकार संपला असं मात्र म्हणता येणार नाही. कारण युरो-अमेरिकन जगातही अंधश्रद्धा आहेतच. आजही प्लँचेटची उपकरणं बनवणारे आणि त्यांचा वापर करणारे समूह आहेतच. ही उपकरणं शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवली असल्याने ती वापरणार्यांना खरंच मृतात्म्यांशी संवाद साधल्याचा आनंद होतो.
म्हणजेच मृतात्म्यांशी संवाद साधण्याचं लोकांच्या मानगुटीला बसलेलं भूत अजून पुरतं उतरलेलं नाही!
पण पोलीस अंध नव्हते!
या पार्श्वभूमीवर पाश्चात्य पोलिसही गुन्हेगार शोधण्यासाठी प्लँचेटचा वापर करतात, असं डॉ. भटकर कोणत्या आधारावर म्हणाले हे समजत नाही. याचं कारण असं की, पोलिसांनी कुठेही प्लँचेटची मदत घेतल्याचं एकही उदाहरण मिळत नाही. पाश्चात्य जगात प्लँचेटकडे आधिभौतिकवादी सोडलं तर कोणीही गांभीर्याने पाहत नाही. प्लँचेटच्या वस्तू उत्पादकांच्या दृष्टीने ही एक बाजारपेठ आहे. चित्रपट, गूढ कादंबर्या यात मात्र प्लँचेटला स्थान मिळतं ते त्यातील गूढ वाढवण्यासाठी. पाश्चात्य पोलीस गुन्हेगार पकडण्यासाठी अक्कलेचा उपयोग करतात, गुलाबराव पोळ यांच्याप्रमाणे ते अक्कलशून्यतेचा प्रयोग करत नाहीत!
आणि त्याचं समर्थन करू धजावणारे स्वतःला वैज्ञानिक समजणारे मूर्ख तर तिकडे मुळातच नाहीत…
एक बाब आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे ती ही की, प्लँचेटचा जन्मच मुळात लोकांना धार्मिक श्रद्धांकडे खेचण्याचा होता. मृतात्मे असतात आणि ते माणसांशी संवाद साधतात हे दाखवलं की लोक धर्मग्रंथात बाकी जे काही सांगितलंय त्यावरही विश्वास ठेवणार हे ओघाने आलंच. त्यात विज्ञानाचा बळी देणं त्यांना भागच होतं आणि त्यात ते काही प्रमाणात यशस्वी झाले हेही खरं आहे.
भटकरांनी किमान हा इतिहास पहायला हवा होता. पण ते स्वतः वैदिक तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणारे असल्याने त्यांनाही विज्ञानापेक्षा धर्मच महत्त्वाचा वाटत असला तर त्यात काहीच नवल नाही. तथाकथित शास्त्रज्ञ, विचारवंतांना आपल्या गोटात खेचत त्यांच्याच तोंडून असल्या बाबींचा गवगवा करून घेतला तर धर्मवाद्यांचं फावतं. तिथे मग प्लँचेट ही ख्रिस्ती धर्मियांची आयडिया आहे याच्याशीही त्यांना देणंघेणं नसतं.
पण यामुळे सामान्य लोक गोंधळतात याचं काय करायचं? त्यांनाही हे प्रकार खरे वाटू लागले आणि महाराष्ट्रातही पुन्हा प्लँचेटचे ‘खेळ’ रंगू लागले तर काय करायचं? विवेकवादाची हत्या होत असेल तर काय करायचं?
डॉ. दाभोलकर आजन्म अंधश्रद्धांविरुद्ध लढत होते. आत्मा, मोक्ष, कयामत का दिन, प्रेतात्मे या सर्व खुळचट अंधश्रद्धा आहेत हे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ उच्चरवाने सांगत असताना एक भारतीय महासंगणकतज्ज्ञ मात्र अशा प्रकारांचं समर्थन करतो हे निंदनीय आणि अत्यंत आक्षेपार्ह आहे.
- संजय सोनवणी
(Saptahik Kalamnama)