पहिला प्रश्न असा आहे की कोणालाही देव मानावं काय? सुबुद्ध नागरिक या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असंच देतील. मग ते राम-कृष्ण का असेनात! पण साई हिंदू की मुसलमान हा खरा कळीचा मुद्दा बनल्याने आणि बहुदा ते मुस्लिमच असल्याचा ठाम समज असल्याने एका फकिराला हिंदुंनी देवत्व द्यावं हे मानवी शंकराचार्यांना कसं सहन होणार? त्यात शिर्डी देवस्थानाकडे आणि साईबाबांच्याच नावे निघालेल्या अनेक संस्थानांकडे पैशांचा जो प्रचंड ओघ आहे ती तर मोठीच पोटदुखी ठरली असणंही स्वाभाविक आहे.
पण खरा प्रश्न हा आहे की शंकराचार्य हिंदू आहेत हे कोणी ठरवलं? ते हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करतात ते कोणत्या अधिकाराने? खरं तर आदि शंकराचार्यांनंतरची पीठं ही वैदिक धर्माचं प्रतिनिधित्व करत आली आहेत. या पीठांचं नियंत्रण हिंदू नव्हे तर काशीची विद्वत परिषद आणि भारत धर्म महासंघ करत असतात. या दोन्ही संस्था वैदिक धर्माश्रयी आहेत. त्यामुळे वैदिक धर्मियांच्या धर्मभावनांचं तुष्टीकरण करणं हाच शंकराचार्य पीठांचा ध्यास राहिलेला आहे. सर्वसामान्य मूर्तिपूजक हिंदुंना या पीठांशी सामान्यतः काहीही घेणंदेणं नसतं ही बाब इतिहासानेच सिद्ध करून दाखवली आहे. कारण त्यांच्या धर्माचा शंकराचार्यांच्या धर्माशी काहीही संबंध नाही.
आदि शंकराचार्य हे शैव आणि तंत्रमार्गी होते. त्यांनी जे चार मठ स्थापन केले ती सारी शैवस्थानं आहेत. भारतात सर्वव्यापक असलेला धर्म हा शैवांचा आहे हे देशभर खेडोपाडी पसरलेली लक्षावधी शिव आणि देवीमंदिरं पाहिली तरी सहज लक्षात येईल. उलट वैदिक धर्माचे अनुयायी अत्यल्प असून धर्मस्थानं बळकावत वैदिक झेंडे फडकावण्यापलीकडे कसलंही धर्मकार्य त्यांच्या नावावर जमा नाही. आज किमान पीठं आणि उपपीठं मिळून चारचे वाढत वाढत सोळा शंकराचार्य मिरवत आहेत. या पीठांचा इतिहास कटकारस्थानं आणि कधी खुनांनीही भरलेला आहे. जोवर नेपाळ हिंदू राष्ट्र म्हणून मिरवत होता तोवर हे शंकराचार्य नेपाळनरेशांना अभिवादन करायला नेपाळ वार्या करत असत. मालेगावच्या दहशतवादी हल्ल्यातील एक आरोपी दयानंद पांडे हाही एक स्वयंघोषित शंकराचार्य. कांचीचे जयेंद्र सरस्वती तर खुनाच्या आरोपात जेलयात्रा करून आलेले. शंकराचार्य पीठांचे वाद इस्लामकाळात मोगल दरबारात तर ब्रिटिशकाळात कोर्टकचेर्यात अडकलेले.
बद्रिकेदार येथील ज्योतिर्मठाला अठराव्या शतकापासून ते थेट १९४१पर्यंत, तब्बल १६५ वर्षं कोणी शंकराचार्यच नव्हते. कारण दावेदारांची संख्या मोठी. हा वाद ब्रिटिश न्यायालयात पिढ्यान्पिढ्या सुरू राहिला. दरम्यान दोन दावेदार शंकराचार्य बद्रिकेदारला मठाला कुंपणं घालून शेजारी शेजारी ठाण मांडून बसले. शेवटी १९४१ साली स्वामी ब्रह्मानंद सरस्वती आपला दावा पुढे रेटण्यात यशस्वी झाले. या स्वामींचं १९५३मध्ये निधन झालं. त्या काळात अफवा पसरली होती की त्यांचा मृत्यू विषप्रयोगाने झाला. याबाबत फौजदारी गुन्हे दाखल झाले नाहीत. पण मालमत्तेसाठी मात्र अनेक दिवाणी दावे दाखल केले गेले. त्यामुळे जरी ब्रह्मानंद सरस्वतींनी संतानंद सरस्वतींची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली असली तरी त्यांना शंकराचार्य बनता आलं नाही. त्याजागी आलं करपात्रीस्वामींचं नाव… पण त्यांना शंकराचार्य होण्यात रस नव्हता. त्यापेक्षा त्यांनी अखिल भारतीय धर्मसंघाचं प्रमुखपद स्वीकारलं.
खरं तर शंकराचार्यांच्या नियुक्त्या या बाह्य प्रभावांमुळेच होतात. त्यात विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय धर्मसंघ, काशी विद्वत परिषद इत्यादी यांचाच मोठा हात असतो.
या धर्मपीठांना जोडून सात आखाड्यांचीही निर्मिती कालौघात झाली. हे दसनामी म्हणवणारे जुना आखाडा, निरंजनी, महानिर्वाणी, आनंद, अटल आव्हान, अग्नी आणि ब्रह्मचारी आखाडे शंकराचार्यांची मसल पॉवर आहेत की काय असं वाटायची स्थिती आहे. १९९८च्या कुंभमेळ्यात जुना आखाडा आणि निरंजनी आखाड्याच्या साधुंनी दंगल केली, मध्वाश्रमांच्या खोल्यांवर हल्ला करून त्यांना मारहाणही केली. त्यासाठी भाडोत्री गुंडही वापरले गेले अशा शक्यता त्यावेळी वर्तवल्या गेल्या होत्या. यामागे कारण हे होतं की मध्वाश्रमांनी १९९७ मध्ये नेपाळच्या राजांची भेट घेऊन जोतिर्मठाचे शंकराचार्यपद आपल्याला मिळावं यासाठी त्यांचा पाठिंबा मागितला होता आणि त्यांच्या दुर्दैवाने त्याचवेळीस कांचीचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वतीही तिथे पोहोचले होते. तिथे नेमकं काय झालं याचं वृत्त ‘रायझिंग नेपाळ’ने दिलं नसलं तरी मध्वाश्रमांवरील हल्ल्यांमागे अन्य दोन शंकराचार्य असल्याची चर्चा होती.
थोडक्यात शंकराचार्य पीठांचा इतिहास हा प्रेरणादायी नाही. नवव्या शतकापासून ते आजतागायत या पीठांनी भारतीय सामाजिक स्थितीत बदल घडवून आणण्यासाठी कसलाही प्रयत्न केल्याचं उदाहरण नाही. धार्मिक विवादातही त्यांनी कसलीही भूमिका घेतलेली नाही. असं असताना, पूर्वपरंपरा नसताना शंकराचार्यांनी धर्मसंसद भरवावी आणि चक्क धर्मादेश जारी करावेत यामागील अन्वयार्थ लक्षात घ्यायला पाहिजे.
मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मुळात सर्वच शंकराचार्य वैदिक धर्माचं प्रतिनिधित्व करतात. या धर्मात खरं तर शिव-पार्वती-गणपती ते सर्व छोटे-मोठे देव बसत नाहीत. कारण त्यांचा साधा उल्लेखही वैदिक साहित्यात येत नाही. यज्ञ हे वैदिकांचं खरं कर्मकांड तर इंद्र-वरुणादी देवता, ज्या कोणीही सामान्य हिंदू भजत-पूजत नाहीत त्या त्यांच्या देवता. या धर्माचं सामाजिक तत्त्वज्ञान मनु ते देवलस्मृत्यांत ठासून भरलं आहे. त्या स्मृत्यांना वा त्यांच्या वेदांना अवैदिक शैवप्रधान धर्मियांनी किमान दहाव्या शतकापर्यंत तरी भीक घातल्याचं उदाहरण नाही. खरं तर भारतीय वैदिक संस्कृतीचं आचारधर्मावर कसलंही सावट नाही. पण खुद्द आदि शंकराचार्यांचे मठ बळकावणारे, आदि शंकराचार्यांनाही वैदिक शिक्का मारणारे अन्य केवढी सांस्कृतिक उचलेगिरी करू शकले असतील याची कल्पना येते. वैदिकांनी बुद्धाला विष्णुचा दहावा अवतार घोषित करत त्या धर्मालाही ओहोटी लावली. शेकडो शैवस्थानांचा ताबा घेण्यासाठी ऋग्वेदातील रुद्र आणि शिव एकच असं सांगत तीही लुबाडणूक करण्याचा चंग बांधला. हे कार्य अत्यंत पद्धतशीरपणे केलं गेलं. साईबाबा देव नाही असं म्हणताना त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की साईप्रमाणेच शिवादी अगणित पुरातन देवताही वैदिक देव नाहीत. तरीही वैदिक माहात्म्य जोपासणं हा त्यांचा उद्योग असल्याने त्यांना हिंदू धर्माचे प्रतिनिधी मानता येत नाही आणि तसं प्रतिनिधित्व हिंदुंनी त्यांना दिलेलं नाही. काशी विद्वत परिषद ही वैदिकांची सर्वोपरी संस्था असून त्याच्या कारभाराची माहिती सामान्य हिंदुंनाही नसते हेही उल्लेखनीय आहे.
यातून हिंदू धर्माचं अपार नुकसान झालं हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. सहिष्णू असलेल्या हिंदुंना कट्टर बनवण्याचं कार्य रा. स्व. संघाच्या स्थापनेपसून जसं सुरू झालं तसतसं शंकराचार्यही आपलं अस्तित्व दाखवून देण्यासाठी पुढे सरसावलेले दिसतात. आता हिंदुत्ववादी सरकार आल्याने वैदिक अजेंडा पुढे सरकवणं सोपं जाईल असं त्यांना वाटलं असल्यास नवल नाही आणि अवैदिक हिंदुंना स्वतंत्रपणे एकत्र बांधेल असं धर्मपीठही दुर्दैवाने अस्तित्वात नाही. त्यामुळे आचरणातील व्यवहार धर्म अवैदिक असला तरी वैदिक वर्चस्ववादामुळे समाज-धार्मिक समस्या सुटण्याऐवजी जटिल बनल्या आहेत हे आपल्या लक्षात येईल. उदाहरणार्थ, जातिंतील वैदिकांच्या अनुकरणातून आलेली वर्णव्यवस्थेतील उतरंडीची कल्पना, अस्पृश्यता, स्त्रियांना मंदिर प्रवेश इत्यादी याबाबत वैदिक कधीही निर्णय घेणार नाहीत. कारण हे लोक आपल्या धर्माचे नाहीत याबाबतचं असलेलं त्यांचं स्पष्ट भान. सामान्य हिंदू त्यांना वैदिकांचे तारणहार वाटतात. त्यांचं धर्मज्ञान वाढावं हा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांना वैदिक-भ्रमी बनवणं त्यांना सोयीचं आहे. त्यामुळे त्यांचा वर्चस्ववाद कायम राहतो हे सर्व अवैदिक हिंदुंनी लक्षात घेतलं पाहिजे.
धर्मसंसदेची ही नवीन संकल्पना पुढे घातक बनण्याची शक्यताच अधिक आहे. साईबाबांना अथवा कोणाला काय मानावं याचं व्यक्तिस्वातंत्र्य या देशाच्या घटनेने दिलं आहे. जोवर हे स्वातंत्र्य लोकोद्रपवी बनत नाही तोवर त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. ऊठसूट फतवे काढणार्या मुल्ला-मौलवींवर सातत्याने ताशेरे ओढणार्यांनी तोच कित्ता गिरवावा याचा अर्थ एकाच घटनेपुरता घेऊन चालणार नाही. व्यक्तिगत जीवनावरही हे फतवे कट्टरतावाद्यांमार्फत आघात करू शकतात याचं भान आपल्याला असायला हवं.
भाजप सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कार्यकाळाची ही एक फलश्रुती आहे. धर्ममार्तंडांचं वाढणारं स्तोम आणि त्यावर होणार्या जहालवादी चर्चा या देश कोणत्या दिशेने पुढे जाणार आहे याची चिन्हं दर्शवत आहे. शालेय अभ्यासक्रमापासून त्यात बदलांचे संकेतही आहेत. शिक्षक दिनाला देशभरातील सर्वच शिक्षक आणि विद्यार्थी यांनी पंतप्रधानांचं भाषण ऐकलं/पाहिलंच पाहिजे हा केंद्र सरकारचा अध्यादेश तर अधिकच भयावह आहे. हुकूमशाही देशातच असले आदेश निघू शकतात. पंतप्रधानांना भाषण करायला कोणी अडवलेलं नाही. पण त्यातून जो ‘सक्ति’चा संदेश जातो आहे तो घटनेला धरून आहे काय यावरही आपल्याला चर्चा करावी लागणार आहे, जमेल तसा निषेध करावा लागणार आहे. यामुळे याच दिवसाचं स्वप्न पाहणार्या कट्टरतावाद्यांचं फावणार आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. शंकराचार्य हे हिंदू धर्माचे प्रतिनिधी नसले तरी स्वयंघोषित आचार्यांप्रमाणे तसं मानत हिंदुंच्या धर्मजीवनात हस्तक्षेप करण्याचा वैदिक धर्ममार्तंडांना कसलाही अधिकार नाही हेच सर्व हिंदुंनी त्यांनाही बजावून सांगण्याची वेळ आली आहे.
खरं तर देवदेवतांच्या जंजाळातून सुटत जात मोकळा श्वास घ्यायची शक्यता निर्मण करण्याऐवजी असे वैदिक फतवे निघत गेले तर सर्वसामान्य अजूनच जिद्दीने देवदेवतांना कवटाळत जातील याचंही भान असलं पाहिजे. देवाला सार्या सृष्टीचा निर्माता, शक्ती मानतात, त्यालाच भिक्षेकरी मानत दान देणारे कोणत्या मनोवृत्तीचे म्हणावेत? याला देवधर्म म्हणत नाहीत. साईबाबा आजीवन फकिरीत जगले आणि प्रेमाचा संदेश देत राहिले. त्यांनाच सोनेरी मुकुट, सिंहासन देणारे धर्मविकृत नाहीत तर काय आहेत? सर्वांनी यावर चिंतन केलं पाहिजे. धर्म हा मानवी जीवन श्रद्धेचं मनोबळ घेत सर्वच उपेक्षित-वंचितांचं जीवन सुकर करण्यासाठी असतो… देवतांना श्रीमंत करत जाण्यासाठी नव्हे हे आपल्याला समजायला हवं!
- संजय सोनवणी
(कलमनामात नुकताच प्रकाशित झालेला माझा लेख.)