Friday, October 24, 2014

महात्मा बळीचा खून ?

ब्राह्मण वामनाने बळीराजाचा खून केला असा बहुजनांचा सर्वसाधारण समज आहे. पहिली बाब म्हणजे मुळात वामनावताराची पुराणकथाच बनावट आहे, असत्य आहे. ऋग्वेदात अवतार घेण्याचे कार्य प्रजापतीकडे आहे, विष्णुकडे नव्हे. मुळात कुर्मावतार व वराहावतार हे प्रजापतीचे अवतार आहेत. (तै. आरण्यक आणि तैत्तिरीय ब्राह्मण) अवतार घेण्याचे कार्य पुढे पुरांणांनी वैष्णव पंथ वर आला तेंव्हा विष्णुकडे सोपवले. ऋग्वेदात विष्णु तीन पावलांत त्रिभुवन व्यापतो (ऋ. १.२२.१७) असे म्हटले आहे. तेथे विष्णु हा सुर्याचे रुपक म्हणून येतो. सकाळ-दुपार-सायंकाळ ही त्याची रुपकात्मक तीन पावले. याच कथेचा आधार घेऊन वामन आणि त्याला बळीराजाचे तीन पाऊल दान ही पुरणांत आलेली कथा बनवली गेली आहे. ही कथा ओरिजिनल नाही हे उघड आहे. बळी असूर होता त्यामुळे तो यज्ञ करत होता हे अधिक मुर्खपणाचे विवेचन आहे. असूर हे यज्ञविध्वंसक/यज्ञ विरोधक होते, यज्ञकर्ते नव्हेत. शुक्राचार्य हे असुरांचे गुरु होते व ते यज्ञाचे पुरोहित नसत असेही पुराणकथा सांगतात. विष्णुला मोठे ठरवण्यासाठी बळीचे माहात्म्य कमी न होईल अशा बेताने वैदिक इंद्र महत्ता वाढवण्यासाठी ही कथा रचली गेली आहे. अनेक बहुजनीय विद्वान त्यातून ब्राह्मण वामनाने बळीचा खून केला असा अर्थ काढतात...त्यात तथ्य नाही.

गंमत म्हणजे ऋग्वेदानंतर ज्या साहित्याचा नंबर लागतो त्या शतपथ ब्राह्मणात वामनावताराची येणारी कथा तर वेगळीच आहे, तिचा बळीशी काडीइतकाही संबंध नाही. शतपथ ब्राह्मण सांगते कि देवासूर युद्धात देवांचा पराभव झाला. सारे देव पळून गेले. मग समस्त असूर पृथ्वीची वाटणी करायला बसले असता वामनाला पुढे घालून देव पुन्हा असुरांकडे गेले आणि पृथ्वीचा किमान छोटा तरी हिस्सा आम्हास मिळावा अशी विनवणी केली. तेंव्हा असुरांनी वामनाच्या तीन पावलांएवढी भुमी देवांना द्यायची तयारी दर्शवली. मग वामनरुपधारी विष्णुने तीन पावलात त्रिभुवन व्यापले व असुरांना भुमीपासून वंचित केले. (शतपथ ब्राह्मण १.२.२.१-५). आता ही कथा पुराणांपेक्षाही जुनी आहे. काय संबंध आहे बळीराजाशी या कथेचा? या कथा बनावट आहेत अथवा देवासूर युद्धांची ती काल्पनिक मित्थके आहेत एवढेच काय ते खरे आहे. एकाच अवताराच्या अन्वयार्थ एकच असलेल्या दोन कथा कशा बनतील याचा तरी विचार करावा कि नाही?

पण, खरे म्हणजे आमच्या बहुजनीय विद्वानांना बहुजन हे नेहमीच ब्राह्मणांचे वा आक्रमक आर्यांचे गुलाम होते, मुर्ख होते म्हणुन कपटी ब्राह्मण त्यांच्यावर मात करु शकले असे अन्वयार्थ काढत आपल्या सुमार बुद्धीचे डंके पिटवत आपली पराभुत मनोवृत्ती प्रकट करत असतात. वैदिक लोक कथा रचून रंगवुन सांगत बुद्धीभेद करण्यातही फार वस्तादही नव्हते हे सरळ या बळीकथेचे व देवासूर युद्धकथेचे अन्वेषन केले तरी लक्षात येईल. नाहीतर त्यांनी बेमालूम पचेल अशी तरी कथा रचली असती. उलट वैदिक हे सुमार बुद्धीचे होते हेच त्यांना आपल्या महत्तेसाठी अवैदिक दैवते ते महापुरुष यांचे अपहरण करावे लागले, खोट्या कथा रचाव्या लागल्या यावरुनच सिद्ध होते.

अवतारांचेच पहाल तर महाभारतातील नारायणीय उपाख्यानात फक्त सहा अवतारांचा निर्देश आहे. पुढे ती दहा, नंतर बुद्ध आणि हंस अवतार धरुन बारा तर भागवत पुराणात हीच संख्या २४ एवढी आहे. पुढच्या पुराणांत मात्र दहा ही संख्या नक्क्की केली गेली. का, याचे उत्तर नाही. बरेचसे अवतार काल्पनिकही आहेत. इसपुचा पहिल्या शतकापर्यंत कृष्ण हा पांचरात्र (नारायणीय)या अवैदिक संप्रदायातील एक मुख्य व्यूह (दैवत नव्हे) होता. त्याचे अपहरण तिस-या चवथ्या शतकाच्या आसपास झाले. वासूदेव आणि कृष्ण एक नव्हेत, देवकीपुत्र कृष्ण हा महाभारतपुर्ब साहित्यात ज्ञानी यती मानला गेला आहे व त्याच्या आईचे नांव (देवकी) असले तरी त्याच्या पित्याचे नांव उल्लेखलेले नाही. रामाचे म्हणाल तर अवतार या स्वरुपात रामोपासनेचा प्रचार बाराव्या शतकानंतर झालेला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नारायण व विष्णू या देवताही वेगळ्या आहेत, एक नव्हेत. (महाभारतातील नारायणीय उपाख्यान पहा).

वैदिक ब्राह्मणांनी शुद्रांना (असुरांना) गुलाम केले असे म्हणणा-यांनी शिशुनाग वंशापासून ज्ञात इतिहासातच शेकडो-हजारो अवैदिक शूद्र राजे/सम्राट झाले आहेत हे लक्षात घ्यायला हवे. त्यांना वैदिक लोक राजे होण्यापासून थांबवू शकलेले नाहीत, स्मृत्या असूनही. उलट वैदिक राजे किती याचा विचार केला तर हाताच्या बोटावर जेमतेम मोजता येतील.

असे असुनही आमचेच बहुजनीय विचारवंत गेल्या साताठशे वर्षांतील राजकीय गुलामगिरीने एवढे काजळी फासून बसलेत कि त्यांना प्रत्येक बाबतीत, अन्वेषण न करताच, वैदिकांचे वर्चस्व आणि कपट दिसते. आज त्यांचे वर्चस्व असेल तर त्याला कारण आपलीच पराभूत आणि रोगट मनोवृत्ती आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आम्हाला तटस्थपणे अवलोकनाची सवयच नाही. हीपण वैदिकांनी सवय लावली का?

बळीचा खून झाला नाही...अथवा वामन अवतारच झालेला नसल्याने बळीराजाला पाताळात गाडल्याचीही कथा खरी नाही. वामन खरेच अवतार पद दिलेली (राम-कृष्णाप्रमाणे) व्यक्ती असती तर त्याची अनेक मंदिरे असती, एखादे पुराणही त्याच्यावर लिहिले गेले असते. तसे वास्तव नाही.

हे लक्षात घेत बहुजनांनी या जाणीवपुर्वक जोपासलेल्या पराभुत मनोवृत्तीतून बाहेर यायला हवे व प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीचे खापर वैदिकांवर फोडणे बंद केले पाहिजे, नाहीतर ही गुलामी कालत्रयी संपणार नाही. मानसिक न्यूनगंड स्वत:हुन जोपासायचा आणि आम्हाला ब्राह्मण मानसिक गुलाम करतात हे म्हणायचे हे मुर्खपणाचे लक्षण आहे.

 या भाकडकथांवर विश्वास ठेवणे म्हणजे महात्मा सम्राट बळीला भोळसट ठरवण्यासारखे आहे हे लक्षात घेतले पाहिजे.


(Note-इतिहासात दोन इडा आहेत. ऋग्वेदातील इडा म्हणजे अन्यधान्याची देवता आहे. ऐल वंश जीपासून स्थापन झाला त्या इलेला इडाही असेही म्हटले जाते. ती द्वैलिंगी आहे असेही म्हटले जाते. ती बुधाची पत्नी आहे. महिला "इडा-पिडा टळो" म्हणतात ते -हिदममद्धे बसवण्यासाठी कि वैदिक लोकांसाठी हे सांगणे अवघड आहे. बळीराजा महान असणारच यात शंकाच नाही कारण हजारो वर्ष त्याचे एवढ्या प्रेमाने स्मरण कोणी ठेवले नसते. बळीची हत्या झाली असती तर त्याच्या नांवाने "बलीप्रतिपदा" हा वर्षारंभाचा आनंदाचा दिवसही जनतेने ठवला नसता. त्याचे स्वरुप वेगळे झाले असते हे लक्षात घ्यायला हवे.)

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...