भारतात अलीकडे बुवा, बापू, स्वयंघोषित जगद्गुरु यांचे आणि त्यांच्या भक्तांचे एवढे पेव फुटले आहे कि हा पुरता देशच आध्यात्मिक झाला आहे कि काय असे वाटावे. बरे तसे समजावे तर देशातील भ्रष्टाचार, वंचितांवरील अत्याचार, बलात्कार यात मात्र कमी न होता वाढच होत असल्याचे दिसते. म्हणजे हा अध्यात्माचा पुर वस्तुत: निरुपयोगी, व्यर्थ आणि पोकळ बुडबुडा असल्याचे दिसून येईल. त्यातच हे स्वयंघोषित गुरु-जगद्गुरू ज्या गतीने एकामागोमाग तुरुंगात जावू लागले आहेत ते पाहता आणि त्यांच्यावरील गंभीर आरोप पाहता या सद्गुरुंच्या आश्रमांतुन अध्यात्म वाहते कि पाप, अन्याय, स्त्रीयांचे शोषण याच्या "मैल्या गंगा" वाहताहेत हा संभ्रम पडावा. आणि असे असुनही या महान सद्गुरुंचे चेले ज्या हिरीरीने आपल्या तुरुंगवासी बाबांची भलामन करतात ते पाहता भारतीय लोकांमधील विवेक केवढा सडलेला आहे याची जाणीव होते.
बरे हे शिष्य अडाणी, अशिक्षित असते तर एक वेळ त्यांच्या अंधभावनांना समजावून घेत प्रबोधन करता आले असते. प्रत्यक्षात हे चेले उच्च शिक्षित, प्रस्थापित आणी अनेकदा धनाढ्यही असल्याचे पहायला मिळते. अध्यात्माबद्दलची ओढ, ते पुरेपूर अवैज्ञानिक असले तरी, आपण समजावून घेऊ शकतो. जीवनातील असुरक्षितता, ताण-तणाव व संभाव्य संकटाचे भय यातून माणूस असल्या निरर्थकतेत आपले समाधान व सुरक्षितता शोधू इच्छितो हे आपण समजावून घेतले तरी ज्यांच्या "बुवागिरीच्या" माध्यमातून ते हे सारे मिळवू पाहतात, अंधभक्तीने पिसाट होत जातात त्या बुवांची लायकी पाहिली तर थक्क व्हायला होते. आजवर आसारामबापू ते रामपाल यांच्या आश्रमांतून जे काही साहित्य जप्त झाले आहे त्यात लैंगिकतेशी संबंधीत साधनेच अधिक आहेत. गर्भनिरोधकांपासून ते कामासक्ती वाढवणारे औषधे त्यात आहेत. म्हणजे आश्रमांत भक्तीनी स्त्रीयाही कोणत्या लीला करत असतील याचा तर्क बांधता येतो. सर्वच वेळीस जबरदस्ती केली जात असेल याची शक्यता नाही. अध्यात्माची पिपासा स्त्री-पुरुषांना एवढे अंध बनवते कि कामपिपासा हाही प्रश्न यातुन निर्माण झाला नाही तरच नवल!
रामपालबाबा
आसारामबापूनंतर सरवाधिक गाजत असलेले रामपालबाबाचे प्रकरण तर विलक्षण आहे. स्वत:चे सैन्य भारतीय भुमीवर बाळगणारा, शस्त्रास्त्रांचे साठे करणारा या बाबांच्या अनुयायांनी चक्क पोलिसांशीही युद्ध पुकारले. त्याला शेवटी अटक झाली असली तरी भारतीय कायद्यांना, न्यायालयांच्या आदेशांना न जुमानणा-या या बाबाचे आपण आधे कर्तुत्व आणि तत्वज्ञान पाहुयात.
रामपालचा जन्म झाला १९५१ साली सोनिपत (हरियाना) जिल्यातील एका गांवात. सिव्हिल इंजिनियरिंगमधील डिप्लोमा घेऊन हे महोदय पाटबंधारे खात्यात कनिष्ठ इंजिनियर म्हणुन कामाला लागले. असे असले तरी त्याला लहाणपणापासून अध्यात्माची आवड होती असे म्हणतात. प्रथम रामपाल कृष्णभक्त होता. हनुमान चालिसाचेही पाठ करायचा. पण पुढे त्याची भेट स्वामी रामदेवानंद या कबीरपंथी बाबाशी भेट झाली. यानंतर कबीरपंथाकडॆ रामपालचा ओढा वाढला. १९९४ पासून कबीरच सर्वोच्च दैवत आहे आणि कबीर व गरीबदासाच्या वाणीला वेद, गीता व पुराणांचेही समर्थन आहे असे तो सांगु लागला. उपदेश करु लागला. खरे म्हणजे सर्वच बुवा, बापू आणि प्रवचनकार/किर्तनकार जशी मुलभूत तत्वज्ञानाची मोडतोड करतात तशीच रामपालही करत होता. लोकांना नवनवीन दैवतांची हौस असते. मध्यंतरी एक अशीच उपटसुंभ देवता "संतोषीमाता" पडद्यावर अवतरली आणि तिची व्रते-उद्यापने कशी सुरु झाली हे आपल्याला माहितच आहे.
खरे तर कबीर हे समतेचे उद्गाते, रुढी-परंपरांचे कट्टर विरोधक. हिंदू-मुस्लिमांतील अनिष्ट परंपरांवरही त्यांनी अनवरत आघात केले. ते एकेश्वरी होते आणि कोणताही धर्मग्रंथ त्यांना मान्य नव्हता. "पाहन पूजे हरि मिलैं, तो मैं पूजौं पहार। वा ते तो चाकी भली, पीसी खाय संसार।।" असे कबीर रोखठोक बोलतात. काशीला मृत्यु आल्यास मोक्ष मिळतो असे त्यांना त्यांच्या अंतकाळी कोणी म्हणाले तर त्यांनी त्यालाही विरोध केला. असे कबीर त्यांना सर्वोच्च देवतेच्या ठिकाणी ठेवत व तत्वज्ञानांची मोडतोड करत, प्रसंगी मुळ श्लोकांचे हवे तसे अर्थ काढत प्रवचने देत रामपालने आपले "आध्यात्मिक" बस्तान बसवायला सुरुवात केली. एवढेच करून स्वारी थांबली नाही तर स्वत:ला कबीरांचे अवतार घोषित केले.
नवीन बाबा यायला लागले कि जुन्यांना स्पर्धेचा धोका वाटू लागतो. आर्य समाजाचे प्रस्थ भारतात आजचे नाही. दयानंद सरस्वतींनी सुरु केलेला हा समाज आणि वेदमान्यता हाच त्यांच्या तत्वज्ञानाचा आधार. हरियाणात हा समाज अजून ब-यापैकी प्रबळ आहे. संघवाद्यांना हवा असलेला आर्य-अनार्य व वेद आर्यांचेच हा सिद्धांत आर्य समाजींना मान्य आहे. त्यामुळे साम्स्कृतिक वर्चस्वतावादाची आयती संधी मिळते. कबीरपंथी बुवाचे उत्थान त्यांनाही सहन होणे शक्य नव्हते. आणी रामपालबाबाला प्रसिद्धीसाठी कोणालातरी टार्गेट करणे भाग होते. त्यामुळे या दोन संप्रदायांत खटके उडणे स्वाभाविक होते. त्यात २००६ साली रामपालने दयानंद सरस्वतींविरुद्ध वादग्रस्त विधाने केली. त्यामुळे संतप्त आर्य समाजींनी कोरोन्था (रोहटक) येथील रामपालच्या आश्रमावर अक्षरश: चाल केली. रामपालचे शिष्य आणी आर्य समाजींत धमासान हाणामारी झाली. त्यात आश्रमातून झाडल्या गेलेल्या बंदुकीची गोळी लागून एक तरुण आर्य समाजी ठार झाला. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत रामपाल व काही अनुयायांना अटक केली. आश्रमही जप्त केला गेला.
या घटनेने रामपालला अभुतपुर्व प्रसिद्धी मिळाली. त्याच्या अनुयायांत घट होण्याऐवजी वाढच होत गेली. जप्त झालेल्या आश्रमाचा ताबा मिळावा म्हणुन रामपालने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मार्च २०१३ मद्ध्ये न्यायालयाने ताबा देण्याचा निर्णय घेतला असता त्याची प्रक्रिया सुरु असतांना आर्य समाजींनी त्यात अडथळा आणण्याचा हिंसक प्रयत्न केला. यावेळीस पोलिसांनी केलेल्या फायरिंगमद्ध्ये दोन ठार तर शंभराहून अधिक जखमी झाले.
२००६ मद्ध्ये रामपालवर खुन व खुनाचे प्रयत्न हे आरोप दाखल झाले होते. दोन वर्ष जेलमद्ध्ये राहून जामीनावर सुटल्यानंतर न्यायालयाला तोंड दाखवणे बहुदा रामपालला अवमानास्पद वाटले असावे. त्याने आपल्या करोंथा येथील आश्रमालाच एक सुसज्ज किल्ल्यात बनवायचा घाट घातला. स्वता:ची सेनाही उभी केली. न्यायालयीन समन्सला कच-याची टोपली दाखवण्यात येवू लागली.थोडक्यात भारतीय संविधानालाच हे आव्हान होते. हा गृहस्थ समन्सला दाद देत नाही म्हणून अटक वारंट काढावे लागले.
सतलोक आश्रमात वारंटची अंमलबजावणी करायला आलेल्या पोलिसांना रामपालच्या सेनेने अटकाव केला. पोलिस आत शिरायचा प्रयत्न करु लागताच त्यांनी चक्क पोलिसांवर हल्ला चढवला. पोलिसांनी स्थिती पाहून माघार घेतली खरी पण हा संघर्ष तब्बल दोन आठवडे चालला. या संघर्षात (खरे म्हणजे युद्धात) पाच स्त्रीया आणि एका लहानग्याचा मृत्यू झाला. ७० पत्रकारांसह व १०५ पोलिसांसह दोनेकशे लोक जखमी झाले.यानंतर कोठे रामपाल शरण आला व पोलिस कोठडीत न पडता पंचकुला येथील इस्पितळात दाखल झाला. या कारवाईच्या वेळीस जवळपास १४ हजार अनुयायांना आश्रमातून जबरीने काढावे लागले.
वरील घटनाक्रम पाहता कबीराच्या तत्वज्ञानाची ऐशी कि तैशी करणारा हा रामपाल लाखोंच्या संख्येत अनुयायी बनवू शकला कसा या प्रश्नाचे उत्तर समाजाच्या खोट्या आध्यात्मिक हावरेपणात आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आर्य समाजीही सुरुवातीपासून आक्रमक राहिले कारण वेद मान्यता सोडून हा प्राणी वेदांचेच नव्हे तर गीता-पुराणांचे विसंगत अर्थ काढत कबीराला एकमात्र श्रेष्ट सर्वोच्च परमेश्वर मानत तसा प्रसार करत अनुयायी बनवत राहिला हे त्यांना सहन होण्यासारखे नव्हते. संघ विचारसरणीला मुस्लिम असलेला, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला बंडखोर संत साक्षात परमेश्वराच्या स्थानी ठेवला गेलेला कसा सहन होइल?
बरे रामपालला खरेच कबीराच्या तत्वज्ञानाशी काही घेणेदेणे नाही हे त्याच्या वेबसाईटवरील तत्वज्ञानावरुनच सिद्ध होते. कबीरवचनार्थांचीही त्याने मोडतोड केलेली आहे. आश्रमाचे रुपांतर गढीत करणे, विरोधकांशी हिंसक व अश्लाघ्य वर्तन करणे, शासनाशी युद्ध पुकारणे हे कोठल्या कबीरपंथी तत्वज्ञानात बसते? खरे तर आपले बस्तान बसवण्यासाठी व अस्तित्वात असलेल्या प्रभावी आर्यसमाजींशी मुद्दाम विरोध पत्करत, स्वतंच कारणे देत प्रसिद्धीच्या झोतात राहत अनुयायी वाढवण्याची ही चाल होती हे कोण नाकारेल?
म्हणजे हा संघर्ष आध्यात्मिक नसून केवळ धर्मसत्ता गाजवण्याच्या पिपासेतुन उद्भवलेला आहे. आणि ही गंभीर परिस्थिती आहे. खुनी, बलात्कारी म्हनून गाजणा-या स्वयंघोषित जगद्गुरुंच्या-संतांच्या रांगेत आता देशाविरुद्ध युद्ध पुकारणा-या एका जगद्गुरुची भर पडली आहे. आर्य समाजीसुद्धा खरे तर तेवढेच अपराधी आहेत. अवैदिक मुर्तीपुजेला दयानंद सरस्वतींनी विरोध करत वैदिक धर्माची पाठराखन करतांना त्यांनीही वैदिक धर्माची सोयिस्कर मांडणी केली. रा. स्व. संघालाही ती सोयिस्कर असल्याने ते आर्य समाजींचे पाठिराखे राहिलेले आहेत. रामपालने त्यांना आव्हान दिल्याने काही विचारवंतांना बरेच वाटते आहे. केवळ संघाला विरोध केला म्हणून भाजपाच्या राज्यात रामपालला अटक झाली असा आरोप करणे म्हणजे वस्तुस्थितीला बगल देण्यासारखे आहे.
त्यामुळे या प्रकाराकडे एवढ्या उथळपणे पाहून चालणार नाही. आर्य समाज वेदांची तोडमोड करत वैदिक माहात्म्य वाढवतो म्हनून कबीरवचनांची मोडतोड करत स्वमहत्ता वाढवण्यासाठी युद्धखोरपणा, हिंसकता आणि संविधानाविरुद्ध युद्धायमानता दाखवणे हे अधिक गंभीर आहे. सर्वच प्रकारच्या आध्यात्मिक (?) संस्थानांकडॆ आपण अधिक गांभिर्याने पाहिले पाहिजे. कायद्यानेही आता सर्वच आश्रमांच्या नियमित तपासण्या करण्याची गरज आहे. आता पोलिस/न्यायाधिशही कोणाना कोणा बाबाचे अनुयायी असतील तर मात्र अवघड आहे.
आपण देश म्हणून सुजाण नागरिक नव्हे हे आपण वारंवार सिद्ध करत आहोत. कोट्यावधी लोकांना अजुनही असले भोंदू आध्यात्मिक गुरु लागत असतील तर हा देश कालत्रयी महासत्ता बनु शकणार नाही याचे भान आपल्याला आले पाहिजे. अध्यात्म हा धंदा आहे. योग हा त्याहुनही मोठा उद्योग आहे. असे फोफावते उद्योग देशाची मानसिकता दुर्बळ करत नेतात, अर्थव्यवस्था पोखरत नेतात याचे भान असले पाहिजे!