Sunday, February 1, 2015

"अस्मितांचे" गुलाम

सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक परिप्रेक्षात हरलेल्या जनसमुहांना पुन्हा आपले हरपलेले स्थान प्राप्त करण्यासाठी आपण का हरलो होतो या कारणांचा विचार करीत, नेमकेपणाने ती शोधत त्या त्रुटी दुर करत, आत्माभिमान न हरपता पुन्हा जोमाने प्रयत्न करावे लागतात. हरण्याची कारणे अनेकदा आक्रमक वा वर्चस्ववादी समाजाच्या बौद्धिक/शारीरिक/सामरिक शक्तीत नसून अनेकदा ती पराजिताच्या वा दबले गेलेल्यांच्या अक्षम्य मुर्खपणातही छ्पलेली असतात. परंतू आपण या आपल्या सामाजिक मुर्खपणाचे विश्लेषन, परिक्षण टाळतो आणि वर्चस्ववाद्यांच्या अथवा आक्रमकांच्या "दुष्टपणाबद्दल" त्यांचा द्वेष करत राहतो. संधी मिळाली कि कोणीही आक्रमक आणि वर्चस्ववादी बनू शकतो याचे मात्र आपल्याला अनेकदा भान नसते. त्यांचा द्वेष केल्याने आपण उलट मानसिक विकलांग आहोत हे सिद्ध करत असतो याचेही भान नसते. यामुळे आपण आक्रमक/वर्चस्वतावाद्यांना आपली सत्ता गाजवायची पुरेपूर सुट देत असतो याचेही भान नसते.

या मानसिक विकलांगांना "अस्मितां’चा फारच शौक असतो. मुसलमानांनी आमच्यावर सातशे वर्ष राज्य केले, हिंदुंना बाटवले, मंदिरे तोडली म्हणून त्यांचा द्वेष करणारे आपल्या अस्मिता त्या तोडलेल्या मंदिरांत शोधत "फिर बनायेंगे...वही बनायेंगे" च्या घोषणा देतात. "मुसलमानांना गोळ्या घालून ठार केले पाहिजे..." असे खाजगीत तर हजारवेळा बोलतात. याचे कारण मुस्लिमांच्या सत्तेच्या प्रभावात आपण सातशे वर्ष काढली याचा सल असतो. पण एवढी सातशे वर्ष जर गुलामीच केली असेल तर तुमचे दोष नव्हते काय, असल्यास काय होते आणि ते दूर करायला तुम्ही काय प्रयत्न केले इत्यादि प्रश्नांवर कोणाला चर्चा नको असते. बरे , एक गुलामी गेली तर लगेच दुस-यांची कशी आली आणि ती का सहन केली हा प्रश्न तर फिजुलच. खरे म्हणजे आपण गुलामीलाच लायक होतो म्हणून गुलामी आली हे मान्य करायची आपली तयारी नसते. पण द्वेष म्हणजे द्वेष पसरवायचा, करत रहायचा धंदा मात्र या पराभुतांना जमतो...कारण ते मानसिक विकलांग आहेत.

आपल्या समाजाची समस्या येथेच संपत नाही. "हजारो वर्ष आम्हाला जातींच्या बंधनांत टाकून गुलाम केले." अशी दुसरी बोंब आपल्या समाजात आहेच. गुलाम केले गेले कि गुलामीच हवी होती म्हणून स्व-निर्मित गुलाम झालो यावर विचार मात्र कोणी करत नाही. कोणालातरी शत्रू ठरवत, दास्य लादणारा समाज समजत त्याचा द्वेष करणे हे मात्र अव्याहत चालू राहते. मानसिक विकलांगतेचे दर्शन घडत राहते. पण ती गुलामी समजा गुलामीच असेल तर ती का आली आणि ती नष्ट करायला आमच्याकडे काय योजना आहे यावर मात्र आम्ही मूग गिळून बसतो. थातूर-मातूर सोयीची उत्तरे फेकतो. पण द्वेषाचा केंद्रबिंदू काही केल्या बदलत मात्र नाही. यांनाही अस्मिता हव्या असतात. अस्मितांचे विचार, जयंत्या, पुण्यतिथ्या वगैरे निमित्ताने घोंगावतात, लगेच विझतातही. अस्मितांचे बौद्धिक भांडवल करत त्यात भर घालत मानसिक क्रांती घडवण्याचा विचार करण्यापेक्षा "अस्मितांचे" गुलाम होण्यात जास्तच धन्यता जर वाटत असेल तर आपण मुळात गुलामीप्रिय समाज आहोत हे आपल्याला मान्य केले पाहिजे.

जसे राममंदिर खरेच व्हावे असे काही नाही, पण उद्घोष तर हवा असा जो संघवाद्यांचा (आणि वैदिक शंकराचार्यांचाही) होरा आहे तसाच या अस्मितावाद्यांचा नाही कि काय? हे सोयीचे उद्घोष कोणत्या समाजाची प्रगती करत आलेयत?

द्वेष करणारे हे मानसिकदृष्ट्या नेहमीच दुभंगलेले राहतात हे वास्तव कधी लक्षात घेतले जात नाही. अस्मितांवरच्या टीकेने आम्ही फार म्हणजे फारच हळवे होवून जातो. भावना लगोलग दुखावल्या जातात. हमरीतुमरीवर येतो. हल्ले करायला निघतो. दुस-यांच्या अस्मिता कशा बदमाश आहेत हे सिद्ध करण्याचा चंग बांधला जातो. त्यासाठी हव्या तेवढ्या असत्याचा, हलकटपणाचा वापर करायलाही आमची हरकत नसते.

पण मानसिक गुलामांच्या भावना या प्रत्ययकारी असू शकत नाहीत कारण त्या शेवटी गुलामी मानसिकतेतून आलेल्या असतात. गुलामीतून बाहेर ज्यांना पडायचेय ते द्वेष करत नाहीत. ते त्यातून बाहेर पडायचे मार्ग शोधतात. गुलामी त्यागतात. स्वतंत्र मार्ग चोखाळत आभाळावर आपल्या विचारवैभवाच्या पताका फडकवतात. त्यांना द्वेष करायची गरजच पडत नाही. किंबहुना त्यासाठी त्यांच्याकडे वेळही नसतो. ते इतिहासाचे परिशिलन करतात. खरे काय आहे हे शोधतात. त्यातून त्यांना आपल्या चुका अधिक स्पष्टपणे कळाव्यात हे अभिप्रेत असते.

पण वर्चस्ववादी जसे इतिहासाची मोडतोड करत स्व-सोयीचा इतिहास मांडण्यात धन्यता मानतात तेवढेच गुलामही आपल्या गुलामीचा तेवढाच खोटा इतिहास मांडतात. यातून तुम्ही वर्चस्वतावाद्यांचा वैचारिक बिमोड करू शकत नाही. फार फार तर गुलामांच्या वर्चस्वतावादाचा याच संघर्षातून दुसरा धोका उभा राहील.

आणि आज स्थिती ही आहे कि आपल्याकडील उभय पक्षात गुलामी मनोवृत्तीचेच लोक आहेत आणि त्या सर्वांचा प्रयत्न "गुलामांच्या वर्चस्वतावादा" साठी आहे. या गुलामांच्या गुलामीचेही अनेक पदर असल्याने हा संघर्ष बहुरंगी होत एका विकृत विनोदी पातळीवर येवून पोहोचला आहे. यात सर्वच समाज वैचारिक निर्बुद्ध होत हिंसावादी बनत जाण्याचा धोका आपल्यासमोर उभा आहे.

द्वेष केल्याने ज्याचा द्वेष केला जातो त्याचे माहात्म्य व वर्चस्व आपण मनोमन मान्य करतो हेच सिद्ध होते. आपण द्वेष करतो म्हणजे आपल्या मानसिकतेत काहीतरी लोचा आहे हे समजले पाहिजे.

गुलामी नको आणि गुलाम करणेही नको. दोन्हीही माणसाच्या माणूसपणाला कलंक आहेत. आपापली बौद्धिक उंची, आपल्या दोषांवर प्रयत्नपुर्वक मात करत, कशी वाढवता येईल हेच सर्वांचे ध्येय असले पाहिजे.

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...