Sunday, February 1, 2015

"अस्मितांचे" गुलाम

सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक परिप्रेक्षात हरलेल्या जनसमुहांना पुन्हा आपले हरपलेले स्थान प्राप्त करण्यासाठी आपण का हरलो होतो या कारणांचा विचार करीत, नेमकेपणाने ती शोधत त्या त्रुटी दुर करत, आत्माभिमान न हरपता पुन्हा जोमाने प्रयत्न करावे लागतात. हरण्याची कारणे अनेकदा आक्रमक वा वर्चस्ववादी समाजाच्या बौद्धिक/शारीरिक/सामरिक शक्तीत नसून अनेकदा ती पराजिताच्या वा दबले गेलेल्यांच्या अक्षम्य मुर्खपणातही छ्पलेली असतात. परंतू आपण या आपल्या सामाजिक मुर्खपणाचे विश्लेषन, परिक्षण टाळतो आणि वर्चस्ववाद्यांच्या अथवा आक्रमकांच्या "दुष्टपणाबद्दल" त्यांचा द्वेष करत राहतो. संधी मिळाली कि कोणीही आक्रमक आणि वर्चस्ववादी बनू शकतो याचे मात्र आपल्याला अनेकदा भान नसते. त्यांचा द्वेष केल्याने आपण उलट मानसिक विकलांग आहोत हे सिद्ध करत असतो याचेही भान नसते. यामुळे आपण आक्रमक/वर्चस्वतावाद्यांना आपली सत्ता गाजवायची पुरेपूर सुट देत असतो याचेही भान नसते.

या मानसिक विकलांगांना "अस्मितां’चा फारच शौक असतो. मुसलमानांनी आमच्यावर सातशे वर्ष राज्य केले, हिंदुंना बाटवले, मंदिरे तोडली म्हणून त्यांचा द्वेष करणारे आपल्या अस्मिता त्या तोडलेल्या मंदिरांत शोधत "फिर बनायेंगे...वही बनायेंगे" च्या घोषणा देतात. "मुसलमानांना गोळ्या घालून ठार केले पाहिजे..." असे खाजगीत तर हजारवेळा बोलतात. याचे कारण मुस्लिमांच्या सत्तेच्या प्रभावात आपण सातशे वर्ष काढली याचा सल असतो. पण एवढी सातशे वर्ष जर गुलामीच केली असेल तर तुमचे दोष नव्हते काय, असल्यास काय होते आणि ते दूर करायला तुम्ही काय प्रयत्न केले इत्यादि प्रश्नांवर कोणाला चर्चा नको असते. बरे , एक गुलामी गेली तर लगेच दुस-यांची कशी आली आणि ती का सहन केली हा प्रश्न तर फिजुलच. खरे म्हणजे आपण गुलामीलाच लायक होतो म्हणून गुलामी आली हे मान्य करायची आपली तयारी नसते. पण द्वेष म्हणजे द्वेष पसरवायचा, करत रहायचा धंदा मात्र या पराभुतांना जमतो...कारण ते मानसिक विकलांग आहेत.

आपल्या समाजाची समस्या येथेच संपत नाही. "हजारो वर्ष आम्हाला जातींच्या बंधनांत टाकून गुलाम केले." अशी दुसरी बोंब आपल्या समाजात आहेच. गुलाम केले गेले कि गुलामीच हवी होती म्हणून स्व-निर्मित गुलाम झालो यावर विचार मात्र कोणी करत नाही. कोणालातरी शत्रू ठरवत, दास्य लादणारा समाज समजत त्याचा द्वेष करणे हे मात्र अव्याहत चालू राहते. मानसिक विकलांगतेचे दर्शन घडत राहते. पण ती गुलामी समजा गुलामीच असेल तर ती का आली आणि ती नष्ट करायला आमच्याकडे काय योजना आहे यावर मात्र आम्ही मूग गिळून बसतो. थातूर-मातूर सोयीची उत्तरे फेकतो. पण द्वेषाचा केंद्रबिंदू काही केल्या बदलत मात्र नाही. यांनाही अस्मिता हव्या असतात. अस्मितांचे विचार, जयंत्या, पुण्यतिथ्या वगैरे निमित्ताने घोंगावतात, लगेच विझतातही. अस्मितांचे बौद्धिक भांडवल करत त्यात भर घालत मानसिक क्रांती घडवण्याचा विचार करण्यापेक्षा "अस्मितांचे" गुलाम होण्यात जास्तच धन्यता जर वाटत असेल तर आपण मुळात गुलामीप्रिय समाज आहोत हे आपल्याला मान्य केले पाहिजे.

जसे राममंदिर खरेच व्हावे असे काही नाही, पण उद्घोष तर हवा असा जो संघवाद्यांचा (आणि वैदिक शंकराचार्यांचाही) होरा आहे तसाच या अस्मितावाद्यांचा नाही कि काय? हे सोयीचे उद्घोष कोणत्या समाजाची प्रगती करत आलेयत?

द्वेष करणारे हे मानसिकदृष्ट्या नेहमीच दुभंगलेले राहतात हे वास्तव कधी लक्षात घेतले जात नाही. अस्मितांवरच्या टीकेने आम्ही फार म्हणजे फारच हळवे होवून जातो. भावना लगोलग दुखावल्या जातात. हमरीतुमरीवर येतो. हल्ले करायला निघतो. दुस-यांच्या अस्मिता कशा बदमाश आहेत हे सिद्ध करण्याचा चंग बांधला जातो. त्यासाठी हव्या तेवढ्या असत्याचा, हलकटपणाचा वापर करायलाही आमची हरकत नसते.

पण मानसिक गुलामांच्या भावना या प्रत्ययकारी असू शकत नाहीत कारण त्या शेवटी गुलामी मानसिकतेतून आलेल्या असतात. गुलामीतून बाहेर ज्यांना पडायचेय ते द्वेष करत नाहीत. ते त्यातून बाहेर पडायचे मार्ग शोधतात. गुलामी त्यागतात. स्वतंत्र मार्ग चोखाळत आभाळावर आपल्या विचारवैभवाच्या पताका फडकवतात. त्यांना द्वेष करायची गरजच पडत नाही. किंबहुना त्यासाठी त्यांच्याकडे वेळही नसतो. ते इतिहासाचे परिशिलन करतात. खरे काय आहे हे शोधतात. त्यातून त्यांना आपल्या चुका अधिक स्पष्टपणे कळाव्यात हे अभिप्रेत असते.

पण वर्चस्ववादी जसे इतिहासाची मोडतोड करत स्व-सोयीचा इतिहास मांडण्यात धन्यता मानतात तेवढेच गुलामही आपल्या गुलामीचा तेवढाच खोटा इतिहास मांडतात. यातून तुम्ही वर्चस्वतावाद्यांचा वैचारिक बिमोड करू शकत नाही. फार फार तर गुलामांच्या वर्चस्वतावादाचा याच संघर्षातून दुसरा धोका उभा राहील.

आणि आज स्थिती ही आहे कि आपल्याकडील उभय पक्षात गुलामी मनोवृत्तीचेच लोक आहेत आणि त्या सर्वांचा प्रयत्न "गुलामांच्या वर्चस्वतावादा" साठी आहे. या गुलामांच्या गुलामीचेही अनेक पदर असल्याने हा संघर्ष बहुरंगी होत एका विकृत विनोदी पातळीवर येवून पोहोचला आहे. यात सर्वच समाज वैचारिक निर्बुद्ध होत हिंसावादी बनत जाण्याचा धोका आपल्यासमोर उभा आहे.

द्वेष केल्याने ज्याचा द्वेष केला जातो त्याचे माहात्म्य व वर्चस्व आपण मनोमन मान्य करतो हेच सिद्ध होते. आपण द्वेष करतो म्हणजे आपल्या मानसिकतेत काहीतरी लोचा आहे हे समजले पाहिजे.

गुलामी नको आणि गुलाम करणेही नको. दोन्हीही माणसाच्या माणूसपणाला कलंक आहेत. आपापली बौद्धिक उंची, आपल्या दोषांवर प्रयत्नपुर्वक मात करत, कशी वाढवता येईल हेच सर्वांचे ध्येय असले पाहिजे.

11 comments:

  1. What about your mindset about shaiv religion? is that not part of Your Asmita? Is that not loser Asmita? Especially as you keep on talking about how shaiv were better than vedik people? You try to overcome your loser Asmita by that way, right?

    ReplyDelete
  2. भाऊ, यात भगवा, निळा, हिरवा गुलामीरंग आहे. सोबतीला मानसिक गुलामी नावाचा बिन रंगाचा पण भाग आहे. परंतु, पांढऱ्या रंगाने तुमचे काय घोडे मारले आहे कि त्याचा तुम्ही अजिबात उल्लेख केला नाही ते ? हा देशातील एका अत्यल्प समाजघटकावरचा ढळढळीत अन्याय आहे ! याचा मी त्रिवार आणि त्रिकाळ निषेध करतो !!!
    लेख चिंतनीय, मननीय, वाचनीय आणि असाच आणखी काही ‘ ..नीय ‘ आहे. पण एका लेखाने भागेल असे वाटत नाही. अर्थात तुम्हाला याची जाणीव आहेच. अशी हप्त्याने एखादी मालिका बनवावी लागेल तेव्हा कुठे निद्रिस्त लोकांची झोप जाईल.

    ReplyDelete
  3. आप्पा बाप्पा यांची प्रतिक्रिया काहीशी तिखट आणि डोळ्यात अंजन घालणारी आहे हे नक्की
    मुसलमान आक्रमणाच्या पूर्वीची स्थिती काय होती ते बघणे महत्वाचे ठरेल कारण गुलामी कुठून सुरु झाली असे संजय सोनावनी यांचे मत आहे ?कदाचित त्या आधी ब्राह्मणांचे राज्य होते असाही त्यांचा लकडा असेल , त्यामुळे ही गुलामी ते पार वैदिक काळा पर्यंत खेचू शकतात आणि तिथपासून बहुजन आणि ब्राह्मण हा वाद मांडू शकतात . पण मला एक समाजात नाही सर्व सत्ता तर क्षत्रियांच्या हातात होती , राम काय किंवा कौरव पांडव काय , सर्व क्षत्रियाच ना ?हि गुलामी मुळासकट उचकटून फेकून देण्याचे कार्य आणि दायित्व हे राजांचे आहे , भटा ब्राह्मणांचे नाही. असो .
    त्यानंतर आपण चंद्रगुप्त मौर्य किंवा गुप्त काळ तपासला तरी असे दिसते की ग्राम राज्ये मागे पडून सर्वंकष सत्ता आणि साम्राज्ये निर्माण होत होती हा काल ग्रीक कालाच्या जवळचा आहे त्यापूर्वी श्रीकृष्णाने कंसाचा विरोध करत ग्राम्राज्ये टिकवण्याचा अतोनात प्रयत्न केला असे म्हणता येईल. असो .
    पण दुरान्वयानेही गुलामीचा दोष ब्राह्मण वर्गावर लादता येणार नाही .
    कारण संजय सोनावणी यांचा शेवटी प्रयत्न हाच असतो की वैदिकांनी बहुजन समाजाला गुलामीचा नाद लावला , पण तसे नाही .
    आपले राज्यकर्ते मुसलमान आक्रमणापुर्वी काय करत होते ते परत तपासले पाहिजे . आपल्याला इतकी कसली झोप आली होती आणि कशामुळे ते अभ्यासले पाहिजे
    टोळ्या , त्यातून ग्रामराज्ये , आणि नंतर साम्राज्ये , या चढत्या श्रेणीत शस्त्र सर्वार्थाने महत्वाचे ठरते शस्त्रांची आधुनिकता आणि आपली संस्कृती आणि राज्याच्या सीमा वाढवण्याची तीव्र इच्छा हीच साम्राज्यांचा विस्तार करण्याची गुरुकिल्ली आहे . पण नेमका ह्याच मानसिकतेचा अभाव हा भारतीय पराभवाच्या मालिकेचा गाभा आहे आणि आजही परिस्थिती फारशी बदललेली आही
    आज आपण स्वातंत्र्याची साठी ओलांडली परंतु प्रत्येक वर्गाचे तोंड भलत्याच दिशेला आहे , प्रत्येक प्रांताचे म्हणणे हळूहळू फुटीरतेकडे मार्गक्रमण करत आहे,काश्मीरमध्ये आज सामान्य भारतीयाला घर बांधता येत नाही ,हि खंत आपल्याला सतावत नाही ,कारण सर्व स्वातंत्र्यच तडजोडीतून मिळाले हे तर कारण नसेल ?गुलामी ही लादता येत नाही ,
    तडजोडीतून ती समाज मनात आत पाझरते , तसे तर झाले नाही ना ?त्यातून आपल्या तथाकथित देशाचे लचके तोडले गेले तर आपण असेच मारवाडी पद्धतीने लाचार होऊन युद्ध नको हीच भाषा करत राहणार का ?नेहरू म्हणाले तसेच आपण म्हणणार का की इतके काय झाले , तिथेतर गवताचे पानही उगवत नाही ,
    "- अरेरे त्या देशाची स्थिती दयनीय असते " असे काहीतरी खलील जिब्रानचे काव्य आहे , त्याची आठवण होते आहे .

    ReplyDelete
  4. लेख नीट न वाचताच अनेकदा त्यावर वायफळ प्रतिक्रिया दिल्या जातात. लेख हा वर्तमानाशी संबंधीत आहे आणि द्वेष करण्याच्या प्रव्रूत्तीबद्दल बोलतो. साडेआठशे वर्ष आपण गुलाम राहिलो. तत्पुर्वी ५०० वर्ष भारतियांनी मुस्लिमांना भारतात पाय रोवू दिले नाही हाही इतिहास आहे. पण नंतर गुलामीत जात क्रमश: गुलामी मानसिकता बनली, प्रागतिक विचारसरणी हरपली आणि त्यातुनच आजचे सामाजिक संघर्ष उद्भवलेले आहेत. याचा ब्राह्मण-क्षत्रीय याच्याशी काय संबंध? कोणालाही हवे तेंव्हा क्षत्रीय आणि हवे तेंव्ह शूद्र ठरवणे हा पुराणिकांचा धंदा झाला. त्याला आजही लोक बळी पडतात हे नवलच आहे. दुसरे म्हणजे पुरातन काळातील काही भव्य-दिव्य बाबींचा गवगवा करण्याची आजकाल एक लाटच आलेली आहे. पण त्या बाबी निर्माणकर्त्यांनी केल्या, ब्राह्मणांनी नव्हे हे सर्वांना माहितच आहे. मुळात ही वैभवशाली परंपरा लयाला का गेली आणि आज आपला देश स्वबळ का गमावून बसला यावर विचार अभिप्रेत आहेत. ब्राह्मणांना माझ्या प्रत्येक पोस्टमद्ध्ये त्यांच्यावरच टीका दिसत असतील तर त्यांची तथाकथित "बुद्धीमत्ता" लयाला गेलेली आहे असे नाईलाजाने म्हणावे लागेल. असो. तसाही मी प्रतिक्रियांना उत्तरे द्यायच्या फंदात पडत नाही याची कारणे हीच आहेत. काय लिहायचे ते लिहा. यातून मला लोक कसा विचार करु शकतात हे समजते, अनेकदा मनोरंजन होते....त्यासाठी तरी मी अनेकांचा आभारी आहे आणि राहील.

    ReplyDelete
  5. अस्मितांचे स्वरुप ही एक किचकट बाब आहे. माणसाला अस्मिता का असते? अगदी अनस्मित लोकही जगात असतात का? अस्मिता कशा उत्पन्न होतात? त्या तशाच राहतात कि जीवनप्रवाहात कमी अधिक सौम्य होत राहतात? कशाने? एखाद्याच्या अस्मितेचा त्याच्या प्रत्यक्ष जीवनावर काय परिणाम होतो? माणूस अस्मितेवर घाला घातल्याने का चिडतो? अस्मिता जपण्यासाठी माणसे कोणत्या पातळीला जाऊ शकतात? केवळ माणसांना अस्मिता आहेत म्हणून जगात काय काय चांगले आहे? काय काय वाईट आहे? कोणालाच कोणतीच अस्मिता नसती तर? अस्मिता या (देवाधर्मासारख्या) लोकप्रसिद्ध संकल्पनांच्याच असतात का? म्हणजे पिवळ्या रंगाला मूळ रंग न म्हटल्याने कोणाची अस्मिता आहत होत असेल काय? काय अस्मिता नि काय सामान्य प्रेम, आत्मियता, आदर असा भेद कसा करायचा? हे सारे प्रश्न क्लिष्ट आहेत. उत्तर वाटलं तर द्या.
    पण तुम्हाला काय वाटते ते तुम्ही सांगू शकताच. तुम्हाला जनास्मिता संकुचित वाटतात का? नाहीतर का नाही? तुमच्या कोणकोणत्या अस्मिता आहेत नि का आहेत? त्या देखिल संकुचित आहेत असे प्रामाणिकपणे मान्य कराल का?
    माझ्या अस्मिता खालिल प्रमाणे -
    माझे छोटेखानी जग (हे लिहायची गरज नसावी), भारतीय ग्रामीण जीवनपद्धती (सर्वोच्च), माझा प्रांत (मराठवाडा), पारंपारिक ईश्वरप्रणित व धर्मप्रणित कौटुंबिक व सामाजिक जीवनाची संकल्पना, मानवी तंत्रज्ञानाची प्रगती.
    जशा माझ्या काही अस्मिता आहेत, तसाच काही अस्मितांबद्दल माझ्या मनात बर्यापैकी हिनभावना आहे. हिन नाही म्हटले तरी राग तरी आहेच आहे. त्या अशा -
    नागरभाव, जगातल्या सरासरी माणसाची आधुनिक जीवनशैली (सर्वोच्च), मानवी व्यवहारांच्या पूर्ततेसाठी स्थापलेली अपयशी अर्थव्यवस्था, नैतिकतेशी नि मूल्यांशी फारकत असलेली न्यायव्यवस्था, मूर्खपणाचा कहर असलेली राज्यव्यवस्था, बेसूत्र, अपूर्ण नि संभ्रम माजवणारे विज्ञान, आधुनिक सरासरी जीवनविषयक दृष्टीकोन.
    कोणत्या अस्मितांना आपला दृढ विरोध, हिनभाव, द्वेष, इ. इ. आहे?

    ReplyDelete
    Replies

    1. लिहा वाचा, व्यक्तीचा आत्माभिमान आणि न्यूनगंडरहित समाजाभिमान आणि रास्त प्रमाणातील कोणा महनियाचा आदर/अभिमान या बाबींपेक्षा त्यांनाच अस्मिता बनवत आपले वैचारिक व्यूह त्याभोवती रचत अस्मितांनाच आपल्या अस्तित्वाचा प्रश्न मानत जेंव्हा संघर्ष उभारले जातात त्या अस्मिता कशा स्विकारार्ह राहतील? त्या ख-या अस्मिता कि भयगंडातून समाजैक्य साधण्याचा प्रयत्नासाठी लागणारे भांडवल? आत्माभिमान/समाजाभिमानापेक्षा "अस्मिता" या टोकदार आणि म्हणुणच अनेकदा उपद्रवी ठरतात. सध्या तरी भारतात प्रत्येक समाज आपल्या स्वतंत्र अस्मिता शोधतोय आणि त्या अस्मितांना केंद्रीभूत मानत संघर्ष उभारतोय असेच चित्र आहे. बाकी तुमचे विवेचन नेहमीप्रमाणेच छान. धन्यवाद.

      Delete
  6. संजय दादा , अहो भडकू नका , ब्लोग हा संवाद असतो . पतीपत्नी , शिक्षक विद्यार्थी असे द्वैत असल्याशिवाय संवाद कसा होणार ? वादा नंतर संवाद येतो , नंतर परत विसंवाद , नाही का ?
    आपला स्वभाव नक्कीच अभ्यासाने बनला असणार , पण त्यात नाहक वैदिकाना आपण कायमच बदनाम करत असता , मुसलमान आले त्यावेळेस शैवानीच राजपुतान्यात त्यांना तोंड दिले , त्यांच्यात प्रचंड दुही होती , ती सिकंदर अंभी पासून होती हे आपण नाकारता का ?,
    The very first Muslim attack on India in Sindh in the year 715 A.D was by Arabs led by Mohammad Bin Qasim. They displaced Raja Dahir who ruled Sindh from his capital Deval (near modern Karachi). Arabs even unsuccessfully tried to attack Malwa. After this invasion, which was limited to Sindh, for a period of 300 years, kings like Raja Bhoja and other Gurjara Kings thwarted further Muslim attacks. The next invasion was by Turk Sabuktagin. He had established himself in Khorasan and extended his kingdom to Kabul and Ghazni. In 986 AD he came into conflict with Raja Jaipal of Bathinda. In 991 A.D. Raja Jaipal allied with other Hindu king including Rajyapala the Prathira king of Kannauj and Dhanga the ruler of the distant Chandela kingdom but they too were defeated.
    म्हणजेच मधली ३०० वर्षे आपले हिंदू राजे गाफील राहिले का हा माझा प्रश्न आहे आणि तसे जर असेल तर तो दोष कोणाकडे जातो ?सरळसरळ त्याकाळातल्या राजांकडे , म्हणजेच क्षत्रीयांकडे हा दोष जातो
    आपण म्हणता तसे अजिबात नाही ५०० वर्षे आपण त्याना यशस्वी तोंड दिले हे खोटे आहे ,कारण त्यांनीच हल्ला केला नाही , आणि गझनीचा महम्मद आला तो लाटेसारखा आला .
    एखादी गोष्ट मान्य करताना आपण इतके लाजता का तेच समाजात नाही ,ब्राह्मणाना मात्र दोष देण्यासाठी आपण विदुषकी संशोधन करत काहीही सिद्धांत मांडत कुतुन्तारी वैदिकाना बदनाम करण्यात धन्य मानत असता हे आपले केविलवाणे सिद्धांत विनोदाचा विषय होत आहेत .

    ReplyDelete
    Replies
    1. पृथ्वीराज, वैदिक धर्म स्वतंत्र आहे आणि वैदिक धर्मीय हिंदू नाहीत हे वास्तव सांगण्याला आपण खुशाल द्वेष समजू शकता. असे समजून घेणे अत्यंत सोयीचे असते. कसलीही जबाबदारी राहत नाही. त्यामुळे ते ठीक आहे. शैवांत दुही होती कि वैदिकांत हा चर्चेचा मुद्दा नसून (त्यावर वेगळी चर्चा करता येईल) दुही नव्हती असे कोणते जागतिक समाज आहेत हेही पहायला हवे. राष्ट्र हे भावनाच मुळात येथे अस्तित्वात नव्हती. कोठेच नव्हती. जो तो राजा आपल्याच राज्याच्या (म्हणजेच त्याच्या राष्ट्राच्या) हितासाठी त्याला हवा तसा निर्णय घेत असेल तर त्याला कोणी दोष देण्याचे कारण नाही. तुम्ही मात्र क्षत्रीयांकडे दोष जातो म्हणता म्हणजे सरळ वैदिकांकडे दोष जातो असे म्हणत आहात हे आपल्या लक्षात आलेले दिसत नाही. वैदिक म्हणजे ब्राह्मण असा आपला समज दिसतो. तो खरा नाही. आणि राजे हे क्षत्रीयच होते हाही तुमचा समज खरा नाही. इस्लामला येथे पहिल्या आक्रमणापासून ते सत्ता स्थापन करेपर्यंत किती कालावधी गेला हे तपासून पहा. जगात जेथे जेथे त्या काळात मुस्लिम आक्रमक गेले तेथे त्यांना सत्ता स्थापन करत स्र्व धर्मांतरे घडवायला किती काळ लागला हे तपासून पहा.

      Delete
    2. संजयजी
      धन्यवाद
      आपला खुलासा आणि मार्गदर्शन मननीय आहे
      तसे वाग्मय मिळवून वाचण्याचा मी प्रयत्न करून माझा व्यासंग वाढवीन
      इतर देशात किंवा इतर प्रदेशात मुस्लिमांनी झटपट धर्मांतरे करत आपली सद्दी प्रस्थापित केली
      देश ही कल्पना आपण म्हणता तितकी अधोरेखित झाली नव्हती हे आपण म्हणता ते सत्य आहे
      काही मानवी वंश आपले अस्तित्व ठळक करू इच्छित असताना हिंसा टळच ठरत असते हे ऐतिहासिक सत्य ठरते का ?खरा मुस्लिम धर्म आणि त्याचे प्रत्यक्ष आचरणात झालेले बदल हे अभ्यासण्यासारखे आहेत . सर्वच धर्मात हेच दिसते , भारतीय मातीत विकसित झालेले धर्म आणि त्यांची विकसित झालेली रूपे हेही अभ्यासंया सारखे आहे
      आभार

      Delete
  7. लिहा वाचा , याना नमस्कार ,
    आपण छान लिहिले आहे ,
    परंतु मी जरा वेगळ्या मुद्द्यावर आपणाकडून ऐकू इच्छितो , आपण विश्लेषण मोहक आणि स्पष्ट करता म्हणून हि विनंती .
    विषय गुलामी वृत्तीचा आहे , म्हणून मी संजय सराना सांगत होतो की , जसे इंग्रजांचे राज्य येणे हे अपरिहार्य होते तसेच मुस्लिम आक्रमण हे पण अपरिहार्य होते , फक्त त्यांचा धर्मद्वेष हा कोणत्याही संस्कृतीत न शोभणारा होता . व्यापारी मार्गांचा ताबा आणि व्यापारी सत्ता यांचा निर्वेध उपयोग हि त्याकाळातील गरज होती , आजही आहे . असतेच ,अरब दर्यावर्दींची जहाजे हिंदू सत्तेकडून लुटली जात होती , तसेच इ स १८०० च्या इंग्रजांप्रमाणे इ स ७०० च्या अरबांची विस्तार वादाची ती एक भूमिका होती , त्यासाठी त्यांची नैतिक मुल्ये आपल्या नैतिकतेशी जुळणारी नव्हती . दहशत हा त्यांचा स्थायीभाव होता , त्यात आपली गुलामी वृत्ती असणे , नसणे याचा काहीही संबंध नाही , ही सरळसरळ एका सबळ सैन्यापुढे निर्दयते पुढे दुर्बलांची हार होती ,आपली नैतिक मुल्ये कितीही श्रेष्ठ असली तरी जगाच्या बाजारात त्याला किमत शून्य होती .
    संजय सर आपल्यालाच गुलामी वृत्ती बद्दल दोष देत आहेत ते पटत नाही .
    मूळ कारण हे आहे की आपली माती आणि सुपीकता यांचा फायदा घेत जे मूलभूत सर्वंकष प्रगतीसाठी संशोधन होणे अपेक्षित होते ते त्या त्या काळात झाले नाही , रेनासन्स घडलेच नाही , आपण अंतिम सत्याच्या फासात अडकलो आणि आपणावर आक्रमण झाल्यावर फडबडून शरण गेलो किंवा तुटपुंज्या बलामुळे आत्म समर्पण करत बसलो ,
    गुलामी वृत्ती हा आपल्या संस्कृतीचा गाभा मात्र नक्कीच नाही . संजय सर हवे तेंव्हा ट्रान्स मध्ये गेल्यासारखे पार मोहोन्जोदारो पर्यंत जात आधार शोधतात म्हणून मीपण जरा इतिहासात जाण्याची मुभा घेतली इतकेच ,

    आता प्रश्न अस्मितेचा ,
    भारताचे राजकारण कसे चालले आहे ? समाजकारण कसे चालले आहे ?सर्व सत्तेभोवती फिरते आहे , त्यात काही दूरदृष्टी दिसताच नाही , आक्रमण हि ज्यांची गरज आहे त्यांचा वेध घेत , मग ते आर्थिक आक्रमण असो नाहीतर सांस्कृतिक , नाहीतर राजकीय असो , त्याच्याबद्दल सावध असणे हीच काळाची गरज आहे , पण आज भारतातील मुस्लिम ओवेसी यांच्या भोवती जमा होत दुसरे पाकिस्तान मागणार का असा भयगंड निर्माण होत आहे , आणि त्याला समर्पक उत्तर आपल्याकडे नाही .
    संजय सरांची वृत्ती सतत जुन्या जाणिवांच्या आठवणी उकरून काढत वैदिकाना बदनाम करायची असते
    आज तरुण पिढीत हजारोनी आंतरजातीय विवाह होत आहेत , हेच खरेतर समर्पक उत्तर आहे , समाज होईल ते बघणे महत्वाचे आहे आणि त्यात आरक्षण हा फार मोठ्ठा अडथळा होत आहे समाज दुभांगाण्याचे हे मूळ कारण आहे त्याना आहे मग मला का नाही या व्रुत्तॆनुले समाज एकजीव कसा होणार ?
    तीच गोष्ट काश्मीरची आहे . मुख्य प्रवाहात आल्याशिवाय एकजीव कसे होणार ?

    ReplyDelete
  8. अस्मितांचा राजकीय सामाजिक वापर भरपूर होतोय. hammering तर आहेच. पण संजय सरांचा मला अतिशय आवडलेला लेख्‍ा आहे. यात सर्वांनाच विचारात घेऊन मार्मिकपणे भाष्य दिसून येते. समतावाद्यांचेही तेच चालले आहे. जे इतरांचे. त्यामुळे तटस्थपणे विचार करुन टिप्पणी करण्याचे भान वरील लेखनाने येते. मुददे बिनतोड आहेत. मनाला तातडीने भिडणारे आहेत. पाखंडात अडकलेल्यांना शक्यतो लवकर जाणीव होईल अशी अपेक्षा संजय सर व आपण करु या. त्यासाठी काळ हे एक उत्तम मानसिक उपचार ठरावा.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...