Thursday, February 5, 2015

मराठी भाषा ..."अभिजात" भाषा

मराठी भाषा आता कोणत्याही क्षणी "अभिजात" भाषा म्हणून घोषित होईल. सर्व मराठी बांधवांना आनंद आणि अभिमानाचा हा क्षण असेल. ज्या दिवशी घोषित होईल त्या दिवशी आनंदोत्सवच साजरा व्हायला हवा. माझे मित्र प्रा. हरी नरके यांचे यासाठीचे योगदान खूप मोठे आहे. त्यांनी या समितीचे अध्यक्ष प्रा.रंगनाथ पठारे, प्रा.मैत्रेयी देशपांडे,प्रा.सुहास बहुलकर,प्रा. कल्याण काळे आणि प्रा.आनंद उबाळे यांच्या समवेत मराठी अभिजात कशी हे सिद्ध करण्यासाठी समन्वयक व संशोधक म्हणून मोलाचे कार्य तर बजावलेच पण मराठी जनमानसात याविषयी जागरणही  केले.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मराठी ही अभिजात ठरणारी एकमेव भाषा असेल जिच्या अभिजातपणाला विरोध करणारे अगणित मराठी बांधवच होते. या विरोधाचे कारण म्हणजे "मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे." असा ’लाडका’ सिद्धांत जपुन बसलेल्यांना संस्कृतची महत्ता घटलेले चालणार नव्हते.

पण मराठी ही स्वतंत्र भाषा आहे. तिचे पुरावे (लिखित) २२०० वर्ष एवढे जुने आहेत. त्याहीपुर्वी ती शेकडो वर्ष बोलली जात असणार आहे. संस्कृतचे लिखित पुरावे मात्र सन १६० च्या पलीकडे जात नाहीत. किंबहुना ती प्राकृतांतुनच ग्रांथिक कारणांसाठी विकसीत केलेली भाषा आहे. संस्कृतचे सौष्ठव आणि सौंदर्य निर्विवाद आहे. पण तीच मुळची भाषा असे वाटणा-या भाषा-विज्ञान अडाण्यांनी मराठीच्या अभिजाततेचा मार्ग रोखावा हे फारच खेदकारक आहे.

असो. आपली मायमराठी अभिजात घोषित होणार आहे. याचे काय फायदे हा प्रश्नच निरर्थक आहे. आपण बोलतो ती भाषा स्वतंत्र आहे, कोणाची बटीक नव्हती, दुय्यम नव्हती, हे सिद्ध होणे, समजणे याचे समाजशास्त्रीय अनंत फायदे अहेत. पहिला म्हणजे प्राकृताबद्दल निर्माण केला गेलेला न्यूनगंड दूर व्हायला मोलाची मदत होणार आहे. भाषिक न्यूनगंड निर्माण करणे हा वर्चस्ववाद्यांचा लाडका प्रयत्न असतो. आता मराठी आपले "अभिजात स्वातंत्र्य" अभिमानाने मिरवेल आणि भाषेला ज्ञानबा-तुकोबाकालीन वैभव पुन्हा मिळवेल ही अपेक्षा.

प्रा. नरके व त्यांच्या सर्व सहका-यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन!


‘अभिजात मराठी’ उंबरठ्यावर

Feb 6, 2015, 03.24AM IST
म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठीच्या महाराष्ट्राचा अहवाल साहित्य अकादमीने जसाच्या तसा स्वीकारून मंजूर केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले, की लगेचच मराठीला अभिजात दर्जा मिळू शकणार आहे.

साहित्य अकादमीच्या मान्यतेमुळे 'अभिजात'तेच्या दिशेने मराठीने पुढचे पाऊल टाकल्याचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने गुरुवारच्या (१२ फेब्रुवारी) अंकात प्रसिद्ध केले होते. साहित्य अकादमीने काही स्पष्टीकरणे मागविल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला होता. 'अभिजात दर्जा मिळण्यासाठीच्या सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता महाराष्ट्राने केली आहे. त्यामुळे आता हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आल्याचे साहित्य अकादमीने कळविले आहे,' अशी माहिती प्रा. हरी नरके यांनी दिली.

मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव आणि अहवाल तयार करण्यासाठीच्या समितीचे नरके सदस्य आहेत. प्रा. रंगनाथ पठारे या समितीचे अध्यक्ष होते. 'मराठी ही केवळ प्राचीन भाषा नाही, तर तिच्यात अत्युच्च दर्जाच्या साहित्याची निर्मितीही झाली आहे.

यासाठीचे आवश्यक पुरावे पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतून मिळाले आहेत. त्याचा मोठा उपयोग झाला,' असे नरके यांनी नमूद केले. मराठीबाबतचा हा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांच्याकडे गेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब करणेच आता बाकी आहे, असेही नरके यांनी नमूद केले.

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...