Thursday, February 5, 2015

मराठी भाषा ..."अभिजात" भाषा

मराठी भाषा आता कोणत्याही क्षणी "अभिजात" भाषा म्हणून घोषित होईल. सर्व मराठी बांधवांना आनंद आणि अभिमानाचा हा क्षण असेल. ज्या दिवशी घोषित होईल त्या दिवशी आनंदोत्सवच साजरा व्हायला हवा. माझे मित्र प्रा. हरी नरके यांचे यासाठीचे योगदान खूप मोठे आहे. त्यांनी या समितीचे अध्यक्ष प्रा.रंगनाथ पठारे, प्रा.मैत्रेयी देशपांडे,प्रा.सुहास बहुलकर,प्रा. कल्याण काळे आणि प्रा.आनंद उबाळे यांच्या समवेत मराठी अभिजात कशी हे सिद्ध करण्यासाठी समन्वयक व संशोधक म्हणून मोलाचे कार्य तर बजावलेच पण मराठी जनमानसात याविषयी जागरणही  केले.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मराठी ही अभिजात ठरणारी एकमेव भाषा असेल जिच्या अभिजातपणाला विरोध करणारे अगणित मराठी बांधवच होते. या विरोधाचे कारण म्हणजे "मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे." असा ’लाडका’ सिद्धांत जपुन बसलेल्यांना संस्कृतची महत्ता घटलेले चालणार नव्हते.

पण मराठी ही स्वतंत्र भाषा आहे. तिचे पुरावे (लिखित) २२०० वर्ष एवढे जुने आहेत. त्याहीपुर्वी ती शेकडो वर्ष बोलली जात असणार आहे. संस्कृतचे लिखित पुरावे मात्र सन १६० च्या पलीकडे जात नाहीत. किंबहुना ती प्राकृतांतुनच ग्रांथिक कारणांसाठी विकसीत केलेली भाषा आहे. संस्कृतचे सौष्ठव आणि सौंदर्य निर्विवाद आहे. पण तीच मुळची भाषा असे वाटणा-या भाषा-विज्ञान अडाण्यांनी मराठीच्या अभिजाततेचा मार्ग रोखावा हे फारच खेदकारक आहे.

असो. आपली मायमराठी अभिजात घोषित होणार आहे. याचे काय फायदे हा प्रश्नच निरर्थक आहे. आपण बोलतो ती भाषा स्वतंत्र आहे, कोणाची बटीक नव्हती, दुय्यम नव्हती, हे सिद्ध होणे, समजणे याचे समाजशास्त्रीय अनंत फायदे अहेत. पहिला म्हणजे प्राकृताबद्दल निर्माण केला गेलेला न्यूनगंड दूर व्हायला मोलाची मदत होणार आहे. भाषिक न्यूनगंड निर्माण करणे हा वर्चस्ववाद्यांचा लाडका प्रयत्न असतो. आता मराठी आपले "अभिजात स्वातंत्र्य" अभिमानाने मिरवेल आणि भाषेला ज्ञानबा-तुकोबाकालीन वैभव पुन्हा मिळवेल ही अपेक्षा.

प्रा. नरके व त्यांच्या सर्व सहका-यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन!


‘अभिजात मराठी’ उंबरठ्यावर

Feb 6, 2015, 03.24AM IST
म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठीच्या महाराष्ट्राचा अहवाल साहित्य अकादमीने जसाच्या तसा स्वीकारून मंजूर केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले, की लगेचच मराठीला अभिजात दर्जा मिळू शकणार आहे.

साहित्य अकादमीच्या मान्यतेमुळे 'अभिजात'तेच्या दिशेने मराठीने पुढचे पाऊल टाकल्याचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने गुरुवारच्या (१२ फेब्रुवारी) अंकात प्रसिद्ध केले होते. साहित्य अकादमीने काही स्पष्टीकरणे मागविल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला होता. 'अभिजात दर्जा मिळण्यासाठीच्या सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता महाराष्ट्राने केली आहे. त्यामुळे आता हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आल्याचे साहित्य अकादमीने कळविले आहे,' अशी माहिती प्रा. हरी नरके यांनी दिली.

मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव आणि अहवाल तयार करण्यासाठीच्या समितीचे नरके सदस्य आहेत. प्रा. रंगनाथ पठारे या समितीचे अध्यक्ष होते. 'मराठी ही केवळ प्राचीन भाषा नाही, तर तिच्यात अत्युच्च दर्जाच्या साहित्याची निर्मितीही झाली आहे.

यासाठीचे आवश्यक पुरावे पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतून मिळाले आहेत. त्याचा मोठा उपयोग झाला,' असे नरके यांनी नमूद केले. मराठीबाबतचा हा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांच्याकडे गेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब करणेच आता बाकी आहे, असेही नरके यांनी नमूद केले.

9 comments:

  1. Very very good news, thanks Prof. Hari Narake. Congratulations to all Marathi people!

    ReplyDelete
  2. बाप्पा - संजय सर , आपण जी म. टा. ची बातमी दिली आहे त्यात " गुरुवारच्या १२ फेब्रुवारी च्या अंकात "असा उल्लेख आहे तो नजरचुकीने आहे का ? कारण १२ फेब्रुवारी अजून आलेली नाही ,
    आप्पा - अरे अति आनंदाने होते असे कधी कधी संजयचे , समजून घे ना जरा
    बाप्पा - आता कालच बघ ना आपले मंत्री महाशय तावडे सांगत होते की मराठी कशी अभिजात आहे ते , ते ऐकण्यासारखे आहे , अगदी संजय सोनावणी यांच्या सिद्धांताच्या उलट बोलत होते , पण मंत्री असल्यामुळे कुणीच ते मनावर घेतले नाही आणि कडकडून टाळ्या वाजवल्या
    आप्पा - पण संजय म्हणतो मराठी २२०० वर्षे जुनी आहे म्हणजे इ स पू १८५ धरूया आणि संजय म्हणतात संस्कृतचे लिखित पुरावे इ स १६० पेक्षा नाहीत , म्हणजे गणिता प्रमाणे ३४५ वर्षे मराठी संस्कृत पेक्षा आधी वापरात होती
    बाप्पा - ग्रेट ,ग्रेट , त्यातूनही ते लिखाण बिगर ब्राह्मणाने केलेले सिद्ध झाले तर सोन्याहून पिवळे
    कारण वाल्या कोळी सारखे जर एखाद्या कोळ्याने मराठीला जन्म दिला असेल तर ?
    आप्पा - आहे तसा पुरावा आहे माझ्याकडे , फक्त आपल्या दोघात हे गुप्त ठेवूया ,आपले मंत्री माननीय तावडे किती भोंगळ बोलतात ते बघायचे असेल तर कालची त्यांची घोषणा बघा , मी मराठी च्यानल वरची
    खरेतर आपली मराठी मुळची आनि पानि अशीच आहे , पण या शेंडीवाल्यांनी तिला संस्कृतसदृश व्याकरण दिले आणि शेंडीवाल्यांची दादागिरी सुरु झाली
    आपले मूळ शब्द खरेतर , लई, मोप , बेगिन , म्हनला , इहीर , शानपना , वरल्या अंगाला -असले शब्द ! पण संस्कृत हाच बेस धरून मराठीचा ओरिजिनल मुखडाच हरवला
    बाप्पा - आता प्रा हरी नाराकेना पद्मश्री मिळायलाच पाहिजे ,
    आप्पा - आणि आधीच मिळाली असेल तर ?
    बाप्पा - मग पद्मभूषण द्या , आणि संजयला पद्मश्री द्या , कोणाच्या खिशातले काहीच जात नाही ,राज्य्पालाला एक दोनदा उठून उभे रहावे लागते , हाच काय तो त्रास , पण संजय सुद्धा खूप धावपळ करत होता ,
    आप्पा + बाप्पा _ अभिजात मराठीचा विजय असो

    ReplyDelete
  3. भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ.........

    नेमाडे यांना ज्ञानपीठ मिळणे ही बाब मराठी साहित्यविश्वाला दिलासा आणि चेतना देणारी आहेच. परंतु केवळ या सन्मानामुळे नेमाडे नायक ठरतात, असे नव्हे.. त्यांचे स्थान त्यांच्या लिखाणातून, त्यामागच्या दृष्टीतून आणि चिंतनातून स्पष्ट झालेले होतेच!
    पटोत किंवा न पटोत. भालचंद्र नेमाडे हे टाळता येण्याजोगे लेखक कधीच नव्हते आणि नाहीत. नेमाडे यांना अगदी नेमाने धुत्कारणारे लोक अनेक आहेत त्यांनाही नेमाडे काय म्हणताहेत हे ऐकावेसे वाटतेच. एवढे मोठेपण नेमाडे यांच्या कादंबऱ्यांनी आणि जाहीर वक्तव्यांनी त्यांना दिलेले आहे. या सर्वामागे आहे नेमाडे यांची समज आणि ती वाढवणारा अभ्यास. तो अभ्यास ज्यांना झेपत नाही, ते एकतर नेमाडपंथी होतात किंवा मग दुसरे टोक गाठून नेमाडेविरोधक. नेमाडे या दोहोंची - म्हणजे स्वपंथीयांची सुद्धा- फार फिकीर करीत नसावेत. एकांडेपणाचे वलय हे काही माध्यमांनी नेमाडे यांच्याभोवती आखलेले नाही. त्या वलयात नेमाडे यांनीही अनेक रंग भरलेले आहेतच. उदाहरणार्थ, साहित्य संमेलनांना न जाण्याचा रंग, वर्तमानपत्रे वाचत नाही असा दुसरा रंग आणि पुरस्कारांनी फार दिपून जाण्याचे कारण नाही असा तिसरा. यापैकी तिसरा रंग शुक्रवारी जरा विटलाच. ज्ञानपीठ सन्मान त्यांना मिळाला. ही बातमी आनंदाची आहे. नेमाडे यांना ज्ञानपीठ मिळणे ही बाब मराठी साहित्यविश्वाला दिलासा आणि चेतना देणारी आहे. तेव्हा भारतीय साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा हा पुरस्कार मिळण्याच्या आधीपासूनच नेमाडे यांची साहित्यिक उंची कशी वाढत गेली होती, हे येथे सांगणे इष्ट ठरेल. नेमाडे हे सहसा प्रतिनायक मानले जातात आणि ज्ञानपीठने जणू त्यांना नायकत्व मिळवून दिले असाही एक सूर निघेल. परंतु नेमाडे यांची - किंवा कुणाचीही- प्रवृत्ती यापैकी एकाच साच्यात चपखल बसेल अशी असू शकत नाही.

    ReplyDelete
  4. कोसला ही आजदेखील तरुणांना वाचावीशी वाटणारी कादंबरी नेमाडे यांनी लिहिली, त्याआधी- म्हणजे महाराष्ट्र राज्यनिर्मिती नुकती झालेली असताना नेमाडे लघु अनियतकालिकांच्या चळवळीत जोमदारपणे उतरले होते. पु. ल. देशपांडे यांनी कोसलाबद्दल, या कादंबरीने मराठी वाङ्मयाला पेंगताना पकडले असे म्हटल्याचे प्रसिद्धच आहे. पेंगताना पकडणाऱ्याकडे जी जाग आणि चपळाई असावी लागते, ती साठच्या दशकातील लघू अनियतकालिकांच्या चळवळीत होती. आपण चळवळीत आहोत हे भान ठेवूनच नेमाडे आदींची अनियतकालिके सुरू होती. याच चळवळीतील अन्य सहकाऱ्यांनी पुढे औरंगाबादेत आपापले बंगले बांधले आणि नेमाडे मात्र मुंबई, गोवा अशा ठिकाणी शिकवीत राहिले. या फिरस्तीनेच लंडनच्या पौर्वात्य अभ्यासशाळेत मास्तरकीचा मान त्यांना मिळाला. पण बिढार जे पाठीवरच राहिले, ते मुले मोठी होईपर्यंत. यापैकी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनुभवांचा भाग बिढार, जरीला, झूल, हूल या कादंबऱ्यांत आला आहे आणि कोसलामध्ये पुण्याचे अनुभव आहेत. परंतु या आत्मपर कादंबऱ्या म्हणाव्यात, तर तसेही नाही. या कादंबऱ्या सामाजिक स्थितीचे आणि शैक्षणिक- सांस्कृतिक क्षेत्रांतील व्यंगांचे दर्शन घडवतात. तरुण हे जग पुढे नेणाऱ्या बदलांचे केवळ 'अँटेनी' असतात का? मुसलमानांत एकीची भावना आजही मध्ययुगीन कशी? आदी प्रश्न नुसतेच उपस्थित करून सोडूनही देतात. अशा प्रश्नांची उत्तरे वगैरे मिळवायची नसतात, पण लेखकाच्या 'स्थिती'त समाज असतोच असतो. यापुढील हिंदू, हे आणखी निराळे प्रकरण आहे.

    ReplyDelete
  5. हिंदू समजून घेण्यासाठी आधी नेमाडे यांचा देशीवाद समजून घेतलेला बरा. देशीवादाविषयी मराठीत नेमाडे मुलाखती आणि भाषणांतून बोलले आहेत, इंग्रजीतील द क्वेस्ट या निस्सीम ईझिकेल संपादित द्वैमासिकात दोन लेख लिहून नेमाडे यांनी ४० वर्षांपूर्वी देशीवाद मांडला आहे. या देशीवादी चिंतनातून भारतातील बहुसंख्य समाजाकडे त्याच्या जाति-वास्तवासकट स्वच्छपणे पाहण्याची नेमाडे यांची दृष्टी वाचकाला मिळू शकते. ती मिळाली तर मग, जात हे मानववंशशास्त्रीय वास्तव आहे हे- सामाजिक वास्तवाच्या पुढले- विधान किंवा प्रादेशिक अस्मितांबद्दलचे नेमाडे यांचे विचार पटण्या न पटण्याचा प्रश्न येतो. प्रादेशिक अस्मिता असणे गैर नाही, पण तिचा वापर करणे मात्र अयोग्य, अशा रेषा नेमाडे यांनी आखल्या आहेत. आपली ती अस्मिता आणि इतरांचा तो अतिरेक असे कधी नसते, हे त्यांना माहीत आहे. हिंदू असा उल्लेख होणारा जो समाज येथे आहे, त्याने बौद्धांचे सुधारकी वळण कसे पचवले, फटकून असणाऱ्या महानुभावांनाही कसे आपलेसे केले आणि बंडखोर संतांपासूनच संप्रदाय कसे सुरू केले, हे नेमाडे जाणतात. त्यामुळे 'हिंदू'मध्ये अशा अनेक अस्मिता अंगभूतपणे असणारी अनेक माणसे वाचकाला भेटतात. हिंदू या कादंबरीत एका शिवराळ वृद्धेचे जे पात्र नेमाडे यांनी अवघ्या दीड पानांत उभे केले आहे.. ते आजच्या 'एआयबी' वगैरे वादांबाबत भूमिका घेताना आपणही अस्मितेचा वापर करतो आहोत की काय याचा पडताळा घेण्यासाठी उपयुक्त ठरावे असे आहे. इथे नेमाडे कादंबरीच लिहितात. पात्रेच उभी करतात. परंतु सांगतात मात्र समाजाच्या असण्याबद्दल. त्या असण्यामध्येच ऐतिहासिक वास्तवाची वीण नेमाडे यांना दिसू लागते. जावळ काढण्यासारख्या लहानशा प्रसंगातून या विणीचे धागेदोरे काढून ते वाचकापर्यंत भिडवणे नेमाडे यांना जमते. यातून होते असे की, सखोल संदर्भानिशी सारेच असणे पाहिल्यावर काहीही परके वाटत नाही. काहीही विपरीत भासत नाही किंवा कशात उणेपण दिसत नाही. हिंदूमधला खंडेराव हा नायक त्याच्या घरात वा गावात लहानपणी पाहिलेल्या काही स्त्रियांबद्दल ओघाने सांगतो, तेव्हा नेमाडे यांच्याच आधीच्या कादंबऱ्यांतील चांगदेव पाटील या- स्त्रीच्या अंत:स्थ ओलाव्याने स्तिमित झालेल्या- नायकापेक्षा तो नक्कीच पुढले सांगत असतो. स्त्रिया म्हणजे नुसत्याच 'तारुण्यसुलभ लैंगिकदृष्टय़ा आकर्षक अशा' नसतात, उलट भारतीय समाजातील आणि म्हणून साहित्याच्याही नजरेने स्त्रियांकडे पाहिले की नातेसंबंधांनी स्त्रियांना दिलेले व्यक्तित्वही दिसू लागते, याची जाणीव नेमाडे यांना आधीपासून असलेली दिसते. आधीपासून म्हणजे, ते कविता लिहीत होते तेव्हा. मात्र इतिहास आजही आपल्या असण्यामध्येच अंतर्भूत आहे हे दाखवून, म्हणजे जगण्याची समृद्ध अडगळ केवळ मांडून हिंदू ही कादंबरी थांबते. ती इतिहासाला प्रश्न विचारत नाही.

    ReplyDelete
  6. नेमाडे यांच्या कविता तिशीनंतर जवळपास थांबल्याच. टीका मात्र थांबली नाही. इंग्रजी, भाषाविज्ञान यांचे विद्यार्थी असलेले नेमाडे टीकात्म निबंध लिहू लागले. ही केवळ समीक्षा नव्हती. टीका मराठीत फारशी होतच नाही आणि आपण करतो आहोत ती काही सैद्धान्तिक बैठक असलेली 'टीका'च असायला हवी, असा नेमाडे यांचा आग्रह कायम राहिला आहे. मराठीमधील साहित्य व्यवहाराबद्दल नापसंतीचा त्यांचा सूर या टीकानिबंधांतून अत्यंत स्पष्टपणे दिसू लागला. या निबंधांच्या टीकास्वयंवराला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, त्याला २५ वर्षे होतील. त्या संग्रहातील 'लेखकाचा लेखकराव होतो तो का?' या निबंधाचे केवळ शीर्षकच लक्षात ठेवून, नेमाडेच आता लेखकराव कसे झाले वगैरे शेरेबाजी अधूनमधून होत असते. पण नेमाडे साहित्य अकादमीसाठीच ईशान्य भारतातील गारो वा खासी किंवा तत्सम भाषांतील मौखिक वाङ्मयाचे दस्तावेजीकरण करण्यात.. किंवा सिमल्यातील प्रगत अध्ययन संस्थेसाठी सैद्धान्तिक अभ्यास करण्यात स्वतला व्यग्र ठेवतात. बरेच लिहिले आहे, संपादन करून पक्का खर्डा करायचा आहे.. असे काही तरी हिंदूच्या दुसऱ्या भागाबद्दल सांगत राहतात.
    नेमाडे यांचे एके काळचे मित्र आणि मराठीतील महत्त्वाचे कवी-कादंबरीकार रा. विलास सारंग यांचा शब्दप्रयोग उसना घ्यायचा तर, नेमाडे हे 'लिहिते लेखक' आहेत. तेव्हा उदाहरणार्थ ज्ञानपीठ वगैरे पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांच्यात फार मोठा फरक पडणार आणि नेमाडे यांना लोक अचानक ऋ षितुल्य वगैरे मानू लागणार, असे होणार नाही व होऊही नये. ज्ञानपीठाची प्रतिष्ठा मोठी आहे आणि हा पुरस्कार मिळाल्याने जागतिक तसेच भारतीय संदर्भात लेखक अधिक महत्त्वाचा मानला जातो, हे खरे आहे. परंतु अखेर संदर्भच हे सारे.. त्यांमध्ये लेखकाने स्वतला बांधून घ्यायचे नसते, हे एकदा ठरले की मग महत्त्वाची संदर्भवृद्धी करणारे सन्मानही समृद्ध अडगळीसारखे नुसत्या असण्यावर थांबतात.

    ReplyDelete
  7. आदिलेखकाचा गौरव.......

    'कोसला'पासून 'हिंदू'पर्यंत आपल्या प्रत्येक साहित्यकृतीने आणि लेखकाच्या नैतिकतेपासून देशीवादाच्या आग्रहापर्यंत प्रत्येक उक्तीने मराठी साहित्यविश्वात वादाचे मोहोळ उठविणारे रा. रा. भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळणे मात्र केवळ वादातीत होते. त्यामुळे भारतीय साहित्यातील सर्वोच्च मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार यंदा एकीकडे मराठी भाषेच्या अभिजाततेवर अधिकृत मोहोर उमटविण्याची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच मराठीच्या वाट्याला यावा आणि तोही भालचंद्र नेमाडे यांनाच मिळावा, ही मराठी भाषेसाठी अभिमानाची आणि मराठी माणसांसाठी परम आनंदाचीच गोष्ट आहे.

    प्रखर भाषिक आत्मभान आणि सृष्टीभान असलेल्या नेमाडे यांची साहित्यविश्वातील प्रतिमा आदिलेखकाची आहे, असे ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी म्हटले होते. कादंबरीकार, कवी, समीक्षक, अध्यापक, लघुअनियतकालिक चळवळीतील अग्रणी, देशीवादी साहित्याचा खंदा पुरस्कर्ता अशी बहुमुखी ओळख असलेल्या नेमाडे यांचे मराठी लेखक-वाचकांच्या तीन पिढ्यांवर असलेले गारुड आजही ओसरलेले नाही. त्यांच्या 'कोसला' या पहिल्याच कादंबरीने मराठी कादंबरीलेखनाची परिमाणेच बदलून टाकली आणि भाषा, आशयसूत्रे व संरचना यांमध्ये असे प्रयोग केले की, ही कादंबरीच नव्हे असे प्रारंभी म्हणणारे कधीच बाजूला पडून, ती मराठीतील आजवरची सर्वश्रेष्ठ कादंबरी बनली. पन्नास वर्षांपूर्वी या कादंबरीद्वारे पांडुरंग सांगवीकर वाचकांच्या मनात वस्तीला आला, त्याचा मुक्काम आजही हललेला नाही. त्यानंतर काही वर्षांच्या अंतराने लिहिलेल्या 'बिढार', 'हुल', 'जरीला', 'झूल' या कादंबरी चतुष्ट्याचा नायक चांगदेव पाटील आणि तदनंतर एकवीस वर्षांनी 'हिंदू' कादंबरीतून अवतरलेला खंडेराव विठ्ठल हे नायकही असेच विक्राळपण घेऊन आले. 'हिंदू' कादंबरी चतुष्ट्याचा चार वर्षांपूर्वी केवळ पहिला भाग प्रसिद्ध झाला. त्याने उडवलेल्या वादाचा अमाप धुरळा अजूनही खाली बसलेला नाही, तरीही त्याआडून दिसणारे खंडेरावाचे व्यक्तिमत्व आणि त्याने गवसणी घातलेला प्रचंड पैस या कादंबरीच्या विरोधकांनाही अचंबित करून गेला आहे. हिंदू या शब्दाला गेल्या काही वर्षांत नवनवे आयाम येऊ लागले असताना नेमाडे यांनी हिंदू संस्कृतीचे केवळ भारत देशाच्या संदर्भातच नव्हे तर संपूर्ण भारतीय उपखंडाच्या नकाशावर आपल्या देशी अस्तित्वानिशी मांडलेले आख्यान केवळ अपूर्व आहे. आज उग्र होऊ पाहणाऱ्या हिंदुत्वाच्या विचारधारेला आव्हान देणारा आणि हिंदू या संकल्पनेचाच मूळापासून विचार करायला लावणारा हा व्यापक पट जसजसा पुढे जाईल तसतशी नेमाडेंची आदिलेखकाची प्रतिमा गडद होत जाईल. नेमाडेंची 'देखणी' कविता हे मराठी साहित्याला मिळालेले आणखी एक लेणे आहे. 'दुःखाचा अंकुश असो सदा माथ्यावर/ हलाहल पचवल्याबद्दल माथ्यावर चंद्र असो/ चांगली माणसं मोजायला हाताला हजार बोटं असोत/ सापडत नाही बिचारी' अशा ओळी लिहिणाऱ्या नेमाडेंनी कविता कमी लिहिल्या तरी, 'दिवसाकाठी रोजच्या जगण्याचे उर्ध्वपातन होऊन त्याची निदान एक ओळ व्हावी', असा ध्यास घेत आपले गद्यलेखन कवितेच्या पातळीवर नेले. मराठीतील साठोत्तरी साहित्याने तोवरच्या विशिष्ट अभिरुचीच्या साहित्याविरुद्ध पुकारलेल्या बंडाचे निशाण खांद्यावर घेऊन लघु अनियतकालिक चळवळीत अग्रभागी राहण्याचे काम त्यांनी बजावले. सर्व मराठी सारस्वत पाश्चात्य साहित्य समीक्षेच्या चर्चेत गुंगले असताना देशीवादाचा किल्ला एकहाती लढवत आणि साने गुरुजी, भाऊ पाध्ये हेच मराठीतले थोर कादंबरीकार आहेत, असे ठणकावून सांगितले. नेमाडेंच्या भरघोस मिशांइतकाच त्यांच्या महामूर शब्दांनी आपला दरारा निर्माण केला. तो निर्माण होण्यासाठी लागणारी लेखकीय नैतिकता त्यांनी आयुष्यभर जपली. या सगळ्यावर आज ज्ञानपीठाने शिक्कामोर्तब झाले.

    ReplyDelete
  8. लेखकाचा प्रवास…

    जन्म - २७ मे १९३८, सांगवी (जि. जळगाव)

    शालेय शिक्षण - भालोद (जि. जळगाव)

    पुणे विद्यापीठातून बी. ए. (१९६१)

    मुंबई विद्यापीठातून एम. ए. (१९६४)

    १९६५ ते १९७१ या काळात नगर, धुळे, औरंगाबादमध्ये इंग्रजीचे अध्यापन

    गोवा विद्यापीठात इंग्रजीचे विभागप्रमुख

    तौलनिक साहित्याभ्यास विषयाच्या प्रमुखपदावरून मुंबई विद्यापीठातून निवृत्त

    उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून त्यांना डी.लिट. आणि पीएचडी हे सन्मान लाभले.

    साहित्यसंपदा

    छंद, रहस्यरंजन, प्रतिष्ठान, अथर्व या नियतकालिकांमधून कविता प्रसिद्ध.

    १९६३ मध्ये, उमेदवारीच्या काळात 'कोसला' कादंबरी प्रकाशित... या कादंबरीनं कादंबरीच्या रचनेचे संकेत मोडले.

    १९६०मध्ये त्यांनी 'वाचा' या अनियतकालिकाचे संपादन केले. 'हल्ली लेखकाचा लेखकराव होतो, तो का?' हा 'वाचा'तील त्यांचा लेख खळबळजनक ठरला होता.

    'कोसला'नंतर तब्बल एका तपाने, समकालीन मराठी समाजावर भाष्य करणाऱ्या 'बिढार' (१९७५), 'जरीला' (१९७७), 'झूल' (१९७९) या कादंबऱ्यांनी मराठी रसिक वाचकांना वेगळी अनुभूती दिली.

    'मेलडी' (१९७०) आणि 'देखणी' (१९९१) हे काव्यसंग्रह... विंदा करंदीकरांच्या शैलीशी साधर्म्य साधणाऱ्या कविता...व्यवहारी, अमानुष जगातल्या वास्तवावर उपरोधिक भाष्य...

    'साहित्याची भाषा' (१९८७) हे भाषाविज्ञानपर पुस्तक.

    'टीकास्वयंवर' (१९९०) हा समीक्षा लेखसंग्रह. या संग्रहाला १९९०मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार लाभला.

    साहित्य अकादमीसाठी 'तुकाराम' हा दीर्घ लेख.

    'मराठीवरील इंग्रजीचा प्रभाव : शैलीशास्त्रीय दृष्टीने अभ्यास' हा इंग्रजी आलेख.

    'हिंदू' या महाकादंबरीचे प्रकाशन (२०१०)

    सौजन्य : लोकवाङ्मय गृह.

    ReplyDelete
  9. भालचंद्र नेमाडे यांची कोसला फारच सुंदर होती त्याची मांडणी ओरिजनल होती , आणि शैली फारच नवीन होती , अगदी पहिल्या वाक्यापासून पुस्तक खाली ठेवताच येत नाही
    ज्ञानपीठ मिळाल्याने मराठीचा सन्मान झाला आहेच , तसेच नव्या शैलीचा सन्मान झाला आहे
    खांडेकरआणि फडके यांच्यानंतर एक अगदी ताजी सुरवात नेमाडे यांनी केली
    आजही ते हिंदूच्या पुढच्या भागाची जुळवाजुळव करत आहे ही बाब आनंद देणारी आहे
    त्यांच्या लेखनात अनेक पुर्वासुरी लेखकांच्या शैलीची किंचित थोडी थोडी झलक दिसते हे कुणाच्या नजरेत आलेले दिसत नाही ,फारच अप्रतिम !

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...