("Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation" या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मी केलेल्या भाषणाचा सारांश.)
प्रबोधनकाळाने जगाला अद्वितीय गोष्टी दिल्या. ज्ञान, विज्ञान व अभिव्यक्तीची क्षितीजे अमर्याद विस्तारली पण याच काळाला एक काळीकुट्त किनार आहे व ती म्हणजे आधेचा आर्य श्रेष्ठत्वता वाद आणि नंतरचा नव्या नांवाने आणला गेलेला पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणा-यंचा गट व त्यांची विस्थापने. युरोपियनांना सेमेटिक संस्कृती मुळे तोडायची होती. जर्मनांना जर्मनांच्य सांस्कृतीक एकीकरणासाठी "जर्मननेस" शोधायची गरज होती. उल्रीच हटनसारख्या विद्वानाने सोळाव्या शतकात रोमन चर्चला नाकारण्यासाठी "जर्मन मर्द तर रोमन बायकी" असे म्हणायला सुरुवात केली. अडाम-इव्हापासुन सारी मानवजात निर्माण झाली हे नाकारत प्रत्यक वंशाची स्वतंत्र उत्पत्ती असुन सेमेटिक व निग्रो हे कमास्सल आहेत हे मांडायला सुरुवात झाली. ज्यु द्वेषाची कारणे सेमिटिक द्वेषात आहेत.
डॆव्हीड ह्युमसारख्या अठराव्या शतकातील श्रेष्ठ तत्वज्ञाने गोरेतर सारेच हीण आहेत असे स्पष्ट प्रतिपादित केले. काहींची मजल तर काळे हे युरोपियन व एप्सच्या मिश्रणातुन निर्मण झालेले निर्बुद्ध आहेत अशी मांडणी करण्यापर्यंत मजल गाठली. यात सेमिटिक नाळ तोडण्याचे प्रयत्न सुरु होतेच. भारत हीच मुळभुमी मानण्याकडे या काळात कल होता. त्यासाठी व्होल्तेयरसारख्या तत्ववेत्त्याने तर भारतीय ब्रह्म आणि अब्राहमात साधर्म्य शोधले तर रेनान या फ्रेंच विद्वानाने येशु ख्रिस्त हा सेमिटिक नव्हे तर "आर्य" होता असे प्रतिपादित केले. थोडक्यात एनकेनप्रकारेन युरोपातील धर्म-संस्कृतीचे मुळ मुळात सेमिटिक नाही हे त्यांना सिद्ध करायचे होते व आर्य सिद्धांत त्यासाठी आणला गेला.
पण पुढे भारत ही मुळभुमी हे अमान्य करण्याची लाट आली. कारण ठरला आर्य संकल्पनेला सिद्धांताची जोड देणा-या म्यक्समुल्लर. त्याने कलकत्त्यातील रिक्षा ओढणरे आणि बंडातील शिपाई हे आर्य असुच शकत नाहीत असे म्हटले. युरोपियन विद्वानांनी लगेच आर्यांचे मुळस्थान युरेशियात शोधायची मोहिम सुरु केली. हिटलरनंतर आर्य हाच शब्द धोकेदायक वाटु लागल्याने आर्यभाषा गट किंवा पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणारे, त्यांचे मुलस्थान आणि त्यांची विस्थापने याकडे मांडणीची दिशा वळाली. भारतात टिळकांसारख्या विद्वानांनीही आर्यांना उत्तर ध्रुवाच्या निकट शोधले. आर्य सिद्धांतामुळे भारतातही मोठी उलथापालथ झाली. उत्तरेतील आर्य व दक्षीणेतील द्रविड अशी सरळ विभागणी होत त्याचे सांस्कृतीक व राजकीय पडसाद उमटले. प्रसंगी हिंसा तर विभाजनवादाचा डोंबही उसळला. आजही त्याचे निराकरण झाले नाही. याच सिद्धांतातुन मुलनिवासीवादही जन्माला आला.
मुळात आर्य नावाचा वंश पृथ्वीवर कधीही अस्तित्वात नव्हता. इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांत हा विसाव्या शतकातील सर्वात मोठा फ़्राड आहे. पण हे लक्षात न घेता भारतीय सांस्कृतीक/सामाजिक/राजकीय इतिहासाची मांडणीही त्याच आधारे झाली. थोडक्यात ती खोटी व दिशाभुल करणारी मांडणी झाली. आधी आक्रमक आर्य म्हणवत गौरवाने स्वत:कडे पाहणारे वैदिक लोक युरोपियनांच्या पुढे पाऊल टाकत वैदिक आर्य भारतातुनच पश्चिमेकडे गेले व जगात संस्कृती पसरवली असे सिद्धांत मांडु लागले. आधीचा धार्मिक श्रेष्ठत्ववाद होताच...त्याला युरोपियन सिद्धांतनाने त्यांना बळ दिले. बहुजनीय अवैदिक समाजघटकांना हीण लेखले जात होते, आता या सिद्धांतामुळे सांस्कृतिक अर्थाने श्रेष्टत्व माजवण्याचा हा प्रयत्न होता. थोडक्यात अन्यांचे काहीही सांस्कृतिक अस्त्तित्व नाही हेच या वैदिक धर्मियांना सांगायचे होते. घग्गर नदीचे सरस्वती नामकरण करत सिंधु-घग्गर संस्कृतीचे निर्माते वैदिकच असेही सांगितले जाऊ लागले. युरोपियनांचा वर्चस्वतावाद वैदिकांनीही त्यांच्याच पद्धतीने खोट्याचा आधार घेत जपला आहे. गेल्या वर्षीपर्यंत घग्गरला घग्गरच म्हणनारे पुरातत्व खाते आता आपल्या डिसेंबर १४ मधील अहवालात घग्गर नांव वगळत सरस्वती हे नांव देवु लागले आहेत. ही सांस्कृतीक अपहरणांची पुनरावृत्ती होते आहे.
मुळात वैदिक धर्म येथला नाही. तो येथे आला धर्मप्रचाराने. मुळ वेद रचनाकारांशी येथील वैदिकांचा कसलाही आनुवांशिकी संबंध नाही. ते धर्मांतरील लोक आहेत. घग्गर नदी ही पुरातत्वीय, भुशास्त्रीय आणि खुद्द ऋग्वेदातील वर्ण्णने व नंतरच्या मिथ्सच्या आधाराने सरस्वती नाही हे सिद्ध होत असले तरी त्यासाठी पुरावे वाकवण्याचे, तुडवण्याचे व खोटे सांगायची स्पर्धा सुरु आहे.
युरोपियनांचा वर्चस्वतावाद आजही संपलेला नाही. आजही आखाती राष्ट्रांत जे चालु आहे त्यामागे सेमिटिकविरोध हे मुळ आहे. भारतातील वैदिक मुस्लिमांचा द्वेष करतात यामागील कारणेही युरोपियनांच्या सेमिटिक द्वेषात शोधावी लागतील. वर्चस्वतावाद हा गैर आहे. कोणतीही संस्कृती व भाषा पृथक व पुर्ण स्वतंत्र नसते. आजच्या सरेव संस्कृत्या या पुरातन मानवी समाजांचे एकत्रीत सुकृत आहे जे प्रदेशनिहाय वैशिष्ट्यंसह अभिव्यक्त झालेले आहे. पाळेमुळे शोधावी वाटणे हा एक मानसिक भाग झाला पण खोट्या गोष्टींत पाळेमुळे सापडणार नाहीत. भारतात आज जेही काही सांस्कृतीक संघर्ष आहेत तिचे मुळे श्रेष्ठतावाद व वर्चस्वतावादात आहेत. एखाद्या समाजघटकात जाणीवपुर्वक सांस्कृतीक वारसे नाकारत हीणगंड निर्माण करणे यासारखे नैतीक अध:पतन कोणतेही असु शकणार नाही. एकमय समाजाची स्वप्ने पुर्ण होऊ शकणार नाहीत. त्या एकमयतेच्या दिशेने कसे जायचे हे या वर्चस्वतावादी वैदिक भुमिकेच्या सहास्तित्वात अवघड दिसत आहे. तरीही आपण प्रयत्न् केले पाहिजेत!
माझे हे पुस्तक म्हणजे सिंधु-घग्गर संस्कृती, वैरिक व अवेस्तन धर्म, इंडो-युरोपियनंची विस्थापनांचे मिथक आणि एकुणातील जागतीक संस्कृत्यांचे मला सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यांवर आधारीत वास्तव मांडते. हे अंतिम नाही याची मला जाणीव आहे. पण वर्चस्वतावादाविरुद्धचा लढा आजची प्राथमिकता आहे!