भारतीय परंपरेत सामुहिक स्नानांनाही धार्मिक/सांस्कृतिक महत्व आहे हे आपल्याला सिंधू संस्कृतीत सापडलेल्या सार्वजनिक अवाढव्य स्नानगृहांवरुन दिसते. तेथे खाजगी घरांतील स्नानगृहे घराघरातही सापडलेली आहेत. घरात स्नानगृहे असतांनाही सार्वजनिक स्नानगृहेही असावीत याचा अर्थ त्यांचा संबंध धार्मिक कृत्यांशी असावा असे अनुमान करता येवू शकते. सिंधुपुजनाचा उत्सवही त्या प्रदेशातील नदीबाबतच्या कृतज्ञतेशी जोडता येतो. ब्रह्मपुत्रेचीही अशीच पुजा करण्याची पद्धत आहे. नद्यांचा आणि मानवी संस्कृतीचा निकटचा संबंध असल्याने कृतज्ञतेपोटी नदीतील स्थान आणि तिची पुजा याला महत्व आले असल्यास नवल नाही.
कुंभ मेळाही नद्यांशीच संबंधीत असल्याने त्याचा येथे थोडक्यात विचार करुयात. कुंभ मेळा धार्मिक उत्सव असल्याचे जुने पुरावे मिळत नाहीत. रामायण-महाभारत या उत्सवाचा उल्लेख करत नाहीत. ह्यु-एन-त्संग याने सातव्या शतकात झालेल्या नाशिक येथील कुंभ मेळ्याचे वर्णन करुन ठेवले आहे. पुराणांतरी येणारी कुंभमेळा माहात्म्ये ही गुप्तकाळानंतरची आहेत. अमृतमंथनानंतर झालेल्या अमृतकुंभाच्या मालकीवरुन झालेल्या देवासूर युद्धात विष्णुने मोहिनीरुप घेऊन कुंभ पळवला तेंव्हा त्यातुन चार थेंब चार ठिकाणी नद्यांत पडले म्हणून त्या नद्या व स्थळे अतिपवित्र मानली जातात. त्या नद्या म्हणजे नाशिकची गोदावरी, प्रयाग येथील त्रिवेणी संगम, उज्जैनी येथील क्षिप्रा आणी हरिद्वार येथील गंगा. या प्रत्येक ठिकाणी कुंभमेळा दर तीन वर्षांनी क्रमाने भरतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणाची पाळी दर बारा वर्षांनी येते. यातही अर्धकुंभमेळा, महाकुंभमेळा व पुर्ण कुंभमेळा हे फरक आहेतच. महाकुंभमेळा दर १४४ वर्षांनंतर येतो तर दर बारा वर्षांनी येणारा पुर्ण कुंभमेळा फक्त प्रयाग येथेच भरतो.
कुंभमेळ्याचा संबंध ग्रह-सुर्य व राशींशी निगडित आहे. उदाहरणार्थ नाशिक येथील कुंभमेळा सुर्य आणि गुरु सिंह राशीत असतील तेंव्हा भरतो. ही खगोलीय घटना आहे व ती नियमित येते. पण मुळात भारतियांना राशी ग्रीकांकडून मिळाल्या असे मानले जात असल्याने कुंभ मेळ्याची सुरुवात भारतियांचा संबंध ग्रीकांशी आल्यानंतर झाली असण्याची शक्यता आहे. किंवा पुरातन नदीमाहात्म्याला ग्रह-राशींशी जोडत त्याची उदात्तता वाढवली गेली असल्याचीही शक्यता आहे. असे असले तरी कुंभमेळ्याची परंपरा फार पुरातन नाही.
कुंभमेळ्यात देशभरातुन नागा साधुंसह विविध पंथोपपंथांचे साधु-साध्व्या, योगी येत असल्याने याचे धार्मिक महत्व वाढले आहे हे सहज लक्षात येईल. अन्य कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात एवढ्या संख्येने साधु-साध्व्या येत नाहीत. त्यामुळेच कुंभमेळ्याला दर्शन पर्वणी असेही मानले जाते. हा कोणत्या धर्म परंपरेचा भाग असे शोधले तर पदरी निराशाच येते. कुंभमेळ्याची सुरुवात वैष्णव परंपरेतुन सुरु झाली असावी असे अमृतमंथनाच्ग्या पुराकथेतुन दिसत असले तरी कुंभमेळ्यात शैव व वैष्नव आखाडेही बरोबरीने सहभाग घेतात असे दिसते. यात शैव आखाड्यांची संख्या अधिक आहे. नाशिकबाबत म्हणायचे झाले तर शैव आखाडे त्र्यंबकेश्वर येथे तर वैष्णव आखाडे रामकुंडाला महत्व देतात व स्वतंत्र धार्मिक परंपरांचे भान दाखवुन देतात. एका अर्थाने हा उत्सव धार्मिक नसून सांस्कृतिक आहे हे उघड आहे. असो.
पण नाशिक येथेच २००३ मद्ध्ये झालेल्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ लोक ठार झाले होते हा मागचाच अनुभव आहे. मेळ्यात सरासरी आठ ते दहा कोटी लोक हजेरी लावतात असे अंदाज आहेत. जगातील हा असा एकमेव उत्सव आहे असेही मानले जाते. येथे कोणत्याही मुर्तीचे दर्शन हे धेय नसून साधुंचे दर्शन व नदीत स्नान हेच उपचार आहेत व पंथोपपंथांच्या पद्धतीने ते होतात. धार्मिक आखाड्यांतील मानपान हा मुद्दा कुंभमेळ्यांतही शिरलेला आहेच. आजच एका साध्वीचे लैंगिक शोषण एका साधुने केल्याच्या बातम्या आहेत. सरकारने या उत्सवाला हजारो कोटींची मदत केल्याने सरकारही बुद्धीवाद्यांच्या टीकेचे शिकार झालेले आहे. त्याहीपेक्षा वाईट बाब म्हणजे कुंभमेळा हा मुळच्या नदीपावित्र्याच्या कल्पनेपासून पार भरकटला आहे.
भारतियांनाना नद्यांचे, जलाशयांचे पावित्र्र्य खरेच होते. अन्यथा असे पुजनोत्सव/स्नानोत्सव सुरु झाले नसते. परंतू आम्हीच जलाशये/नद्या यांचे केवळ विनयभंगच नव्हे तर त्यांच्यावर एवढे पाशवी बलात्कार केले आहेत कि ते शरमुन, भयभीत होऊन संकोचले आहेत. साधुंचे म्हणावे तर त्यांच्यातिल मुळच्या आध्यात्मिक प्रेरणा नुसत्या आटलेल्याच दिसून येत नाहीत तर त्यातील अनेक पळपुटे अथवा समाजातुनच हाकलले गेलेले गांजेकस असल्याचे आपल्याला दिसून येईल. नागा साधुंबद्दल बोलावे तर ज्यांनी संसाराशी नातेच तोडले आहे अशांना अमुकच नदी पवित्र बाकीच्या नाहीत असे वाटावे यातच त्यांचा तात्विक फोलपणा दिसुन येतो. आखाड्यांचे म्हणावे तर ते एवढे मुजोर आणि राजकारणातही हस्तक्षेप करणारे आहेत कि खंदे राजकारणीही त्यांना शरण जातात. यापासून कोणत्याही पक्षाचा नेता अपवाद नाही हेही एक विशेष. शंकराचार्यांच्या निवडीतही आखाड्यांचा मुजोर अधिकार गाजवला जातो. त्यांची गुंडगिरीही सर्वशृत असली तरी एक उदाहरण देतो. १९९८ साली कुंभमेळ्यात जुना आखाडा आणि निरंजनी आखाड्याने दंगल केली आणि ज्योतिर्मठाचे शंकराचार्य पदाचे दावेदार मध्वाश्रमांना मारहाणही केली होती. कारण सरळ होते, मध्वाश्रमांना शंकराच्गार्य पद मिळु नये. अशी अनेक उदाहरणे आहेत. कुंभमेळा म्हणजे आपला स्वामित्वहक्क आहे असे या आखाड्यांना वाटते.
त्यामुळे मुळात धार्मिक संदर्भ नसलेल्या कुंभमेळ्याला धार्मिक संदर्भ दिले गेले आहेत. खरे तर हा लोकसंस्कृतीचा उत्सव. त्याला पुराणकथा जोडल्या गेल्या असल्या व जनसामान्यांना जितेंद्रिय साधु-महात्म्यांचेही दर्शन या निमित्ताने व्हावे हा निर्मळ उद्देश्य असला तरी जेथे साधुत्वच संपलेले आहे आणि नद्यांचे पावित्र्यही हरपवले गेले आहे ....
तर मग हे कुंभमेळे कशासाठी?
का शासनाने त्यासाठी हजारो कोटी खर्च करावेत?
आणि महत्वाचे म्हणजे....का लोकांनी तरी आपली खोटी दांभिकता दाखवण्यासाठी तिकडे फिरकावे?
संस्कृती सांगते कि नद्या आणि जलाशय जपा. त्यांचे पावित्र्य राखा. त्यात घाण करु नका. धर्मही तेथेच आहे.
पण या अधार्मिकांना धर्म कोणी सांगायचा?