परंपरांचा अभिमान बाळगत असतांना आपण किती परंपरा कालौघात सोडून दिल्या
आहेत हेही पहावे लागते. तरुणांना स्वातंत्र्य देणारा वसंतोत्सव आपण सोडला.
वैदिकांचा इंद्रमह म्हणून एक उत्सव असे...तो दोन हजार वर्षांपुर्वीच सोडला.
स्वयंवराची संकल्पना सोडली. कौमुदीमहोत्सव एके काळी खूप लोकप्रिय होता, पण
तो आता स्मृतीशेष झाला आहे. जैन-बौद्धांचेही असे अनेक उत्सव असत, उदा
स्तूपमह, गिरीमह. तेही आज राहिलेले नाहीत. नदीमह हा नद्यांतील स्नानासाठी
यात्रा करण्याचा उत्सव होता. बहुदा तो कुंभमेळ्याच्या स्वरुपात आज अवशिष्ट असू शकतो. अर्थात त्यात विशिष्ट नद्यांतील स्नान अभिप्रेत नव्हते. पण ती परंपरा खंडित झाली आहे.
थोडक्यात आपण अनेक परंपरा कालौघात सोडून दिलेल्या आहेत. ज्या संकल्पना
काळाशी सुसंगत राहत नाहीत त्या सोडून देणे व नवीन कालसुसंगत परंपरा निर्माण
करणे हे कोणत्याही सुबुद्ध समाजाचे लक्षण असते. पण आम्ही कर्मठ झालो आहोत.
सतीप्रथेसारखी निघृण परंपरा नष्ट करायला इंग्रजांनाच कायदे करावे लागले
तेंव्हा कोठे ती परंपरा सुटली. कर्मठ समाज कधीही अक्षय्य प्रगती करत नाहीत.
आज आम्ही परंपरांनाही मुळचा उदात्त हेतु कायम ठेवत कालसुसंगत करण्याचा
प्रयत्न न करता उलट त्यंना विकृत करत चाललो आहोत. हे धर्म व संस्कृतीच्या
अभिमान्याचे लक्षण नव्हे. यातून समाज पुढे जाणे सोडा, आहे तिथेच ठप्प होईल
आणि ठप्प झालेले समाज कोणतीही ऐहिक अथवा पारमार्थिक प्रगती करु शकत नाहीत.
आणि ठप्प झालेले समाज कोणतीही ऐहिक अथवा पारमार्थिक प्रगती करु शकत नाहीत.