Tuesday, August 18, 2015

माझ्या दृष्टीने तरी बाद!

मी एकदा मागेच एका लेखात म्हटले होते कि, "इतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्वाचा घटक असतो. इतिहास हा कसा सांगितला गेला आहे यावर समाजाचे त्याबाबतचे आकलन अवलंबुन असते. असे असले तरी सामान्य माणसांवर वदंतांचा प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा अधिक प्रभाव असतो असे आपल्याला सामान्यतया दिसून येईल. इतिहास हा जेत्यांचा वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणा-यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. दुसरे असे कि इतिहासकार हासुद्धा एक मनुष्यच असल्याने त्याच्या लेखनावर त्याच्या समजुती, पुर्वग्रह आणि त्यानुरुप असलेल्या त्याच्या व्यक्तिगत आकलनाचा प्रभाव पडत असतो. अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषन इतिहासकारपरत्वे बदलते असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्य संशोधनामुळे सामाजिक पुर्वग्रहांना, रुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते आणि त्यातुन जी वादळे निर्माण होतात तशी पुर्वग्रहविरहित, संपुर्ण द्न्यान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खिळ बसते."

बाबासाहेब पुरंदरे यांना दिल्या जाणा-या पुरस्काराबद्दल राळ उठलेली आहे.  मी वेळॊवेळी अनेक परिप्रेक्ष्यात लेख लिहुन तसेच मिडियातील चर्चांत भाग घेऊन माझी मते व्यक्त केलेली आहेत. माध्यमांतील चर्चेत विचारले गेलेले प्रश्न या संदर्भातच आणी किमान वेळेत बोलावे लागते. आपलेही समाधान नाही आणि दर्शकांचेही. असो. मी येथे या वादामुळे निर्माण झालेले माझ्या मनातील प्रश्न व्यक्त करु इच्छितो. हे प्रश्न मला विचारले गेले नाहीत आणि मीही सविस्तर लिहिले नाही.

माझ्या दृष्टीने पुरंदरे हा विषय महत्वाचा कधीच नव्हता. माझी त्यांची ओळख नाही आणी मी त्यांचा वाचकही नाही. "राजा शिवछत्रपती"हे पुस्तक मला कोणत्या स्थितीत वाचावे लागले हे मी पुर्वेच लेखात स्पष्ट केले आहे. या पुस्तकातील काही विधानांवर घेतले जाणारे आक्षेप आणि ते सत्य आहेत कि नाही हा माझा उद्देश्य होता. मी आजही हेच ठामपणे सांगेल कि सर्व आक्षेप हे हेतुपुर्वक निर्माण केले गेलेले असून त्यात तिळमात्र तथ्य नाही. ते आक्षेप घेत पुरंदरेंना विरोध करणे अत्यंत चुकीचे आहे. किंबहुना लेनने केलेल्या बदनामीपेक्षा हे सोयीने अर्थ घेत केले गेलेले आरोप घातक आहेत व मी ते जाहीरपणे बोललोही आहे.

"राजाशिवछत्रपती" हा इतिहास ग्रंथ नाही. त्यामुळे इतिहासकाराला लावाव्या तशा काटेकोरपणाच्या कसोट्या त्याला लावता येत नाहीत. राजा शिवछत्रपती ही रुढ अर्थाने कादंबरीसदृश असली तरी कादंबरीच्याही शैलीपेक्षा वेगळी शैली यात आहे. मला ती शाहिरी शैलीही वाटत नसून आपल्या इष्ट दैवताबद्दल रसाळपणे सांगत वाचकांना त्यात दंगवू पाहणा-या आख्यानाची आहे. कादंबरीत किंवा आख्यानात इतिहासाची काही सुसंगती लागते तशी यातही आहे. पण ती अपरिहार्यपणे अशा वाड्मयप्रकारात आलंकारिक होत जाते. तशी आलंकारिकता या पुस्तकात आहेच. किंबहुना १९६० नंतरचा नववाचकवर्ग या भारतीय शैलीमुळे मोहित झाला नसला तरच नवल. पण आजच्या (काही) प्रगल्भ वाचकाला ही शैली न रुचण्याची तेवढीच शक्यता कारण वाड्मय शैल्यांत खूप क्रांती झाली आहे. पण हे २०१५ साली या आख्यानमय कादंबरीवरील टीकेची कारणे होऊ शकत नाहीत. मग शेक्सपियरवरही टीकेची झोड उठवावी लागेल.

तर मुद्दा लोकांचा हा नाहीच कि हा इतिहास आहे कि कादंबरी कि आख्यान. जर तो तुम्ही शब्दश: इतिहास मानत असाल तर तुम्ही मध्ययुगात जगत आहात. विश्वास पाटील,रणजित देसाई, मदन पाटील अशांच्याच कादंब-या इतिहासाची पुस्तके म्हणून अभ्यासक्रमात ठेवायला हवीत. इतिहासकारांनी  उगाचच इतिहासाची साधने, रियासती वगैरे लिहायच्या फंदात पडू नये. खरे म्हणजे इतिहासालाच हात लावू नये. हे कोणाला मान्य असेल तर असो. पण इतिहासाचे जग वेगळे आणि कादंबरीकाराचे वेगळे हे समजायची आमची सामाजिक लायकी उरली आहे काय हा माझ्या समोरील प्रश्न आहे.

इतिहास रुक्ष असतो. परस्परविरोधी माहित्या, मते, पुराव्यंनी गजबजलेला असतो. याचा अन्वयार्थ अनेक पद्धतींनी काढला गेला तरी तोही रुक्ष असतो. त्यात बौद्धिक/तार्किक कसरती असतात.  कोणते साधन कोणत्या प्रसंगाबाबत प्रमाण मानावे याचा गोंधळ होत असतो. इतिहास संशोधकाचा जसा वकूब तसा तो आपापले प्रमाण ठरवतो. भारतासरख्या देशात तर इतिहासलेखनाची परंपराच नव्हती. होती ती पुराणकारांची अनैतिहासिक परंपरा. ती आपण शिकतोय ती पाश्चात्य पद्धतीतून. अजून आपण त्यात बाल्यावस्थेत आहोत हे अमान्य करण्याचे कारण नाही.

म्हणजे इतिहासकारच अजून प्रगल्भ नाहीत, असंख्य पुरावे महत्वच समजत नसल्याने कालौघात नष्ट झालेले. ब्राह्मी/खरोष्टीतील उरले-सुरले शिलालेख जतन करायला नि वाचायला येथे ब्रिटिशांनाच यावे लागलेले. असंख्य ताम्रपट तर कधीच  मोडीत गेलेले. लिखित पत्रांचे/साधनांचे मग काय होणार? जेथे समाजाचीच अशी अनास्था असते तेथे इतिहासाचे वाटोळे होणार हे स्वाभाविकच आहे.

बरे, आपला अजुन एक प्रोब्लेम आहे. जातीय वर्चस्वतावाद.

तो कोणात आहे?

एके काळी, पुराणे सांगतात, वैदिक ब्राह्मण श्रेष्ठ कि वैदिक क्षत्रीय श्रेष्ठ असा वाद होता. हा वाद हिरिरीने लढला जायचा. पुढे क्षत्रियांची वैदिकता संपली. (ते का संपली यामागचे कारणमिमांसा वेगळी आहे.) पण तेही वैदिक धर्मानुसार शूद्र बनले.  पण त्यांच्यातील क्षत्रीय समज गेले नाही. हे कथित क्षत्रीय सरंजामदारच होते. आणि त्यांचा ब्राह्मणांशीचा वादही सनातनच होता. ब्राह्मणांनी पौराणीक साहित्यतून वैदिक धर्म व ब्राह्मणत्वचे अतोनात स्तोम माजवले. कथित क्षत्रिय साहित्यातुन का होईना बाद झाले. ब्राहमणांनी प्रत्यक्षात नसला तरी असा सुड घेतला असे म्हणावे लागेल.

आता वेळ कथित काही क्षत्रियांची आहे. ब्राह्मणांचे सारे काही नाकारायचे, ते बहुजनांचे द्वेष्टे आहेत असा प्रचार करायचा आणि समाजव्यवस्थेतून त्यांना हद्दपार करायचे अशी ही व्युहनीति असावी असे चित्र दिसतेय. शिवाजी महाराज हे सर्वांचे अभिमानस्थल. त्यांचीच बदनामी ब्राह्मणांनी केली असे ओरडायला सुरुवात केली तर  मोठा समुदाय आपल्या मागे येईल आणि ब्राह्मणद्वेषाला अधिक धार देता येईल असे त्यांना वाट्ते. हे वाटण्यातही चूक नाही.

पण ते विसरत आहेत कि हा काळ व्यक्तिगत अथवा एखाद्या जातीसमुहाच्या द्वेषांचे द्वेष करुन निराकरण करण्याचा नाही. माणूस जरा का होईना पुढे गेला आहे. छत्रपती शाहुंना वैदिक मंत्राभिप्रेत असतांना कोणी ब्राह्मण शुद्रांसाठीचे पौराणिक मंत्र म्हणतोय हे दाखवुन देणारे राजारामशास्त्री भागवत होते. शिवाजी महाराजांची जवळपास विस्मरणात गेलेली समाधी महात्मा फुलेंनी शोधली. त्यांचे समाधीचे जिर्णोद्धारकार्य टिळक,  केळकर यांनी केले तसेच तुकोजीराजांनी त्या कार्याला आर्थिक हातभारही लावला. शिवाजी महाराज स्वातंत्र्य चळवळीतही आदर्शभुत ठरले ते काही एकट्या कथित क्षत्रियांमुळे नव्हेत. म्हणजे एक काळ असा आला होता कि वैदिक आपल्या वैदिक अस्मिता सोडण्याच्या काळात आले होते तर अवैदिक समुदायही राष्ट्रकर्यासाठी जुने संघर्ष सोडायला तयार होते.

पुरंदरेंचे पुस्तक या संक्रमणकाळातील आहे हे लक्षात घ्यायला हवे. आज मराठ्यांनी लिहिलेल्या इतिहासग्रंथांत/कादंब-यांत जसा मराठेपणा डोकावतोच तसाच ब्राह्मणाने लिहिलेल्या पुस्तकात ब्राह्मणीपणा डोकावणे अपरिहार्य आहे. ही आपल्याच व्यवस्थेची अपरिहर्य अवस्था आहे. मानसिकता आहे. आणि हे वाचकंना समजावून घ्यावे लागते. समस्या अब्राह्मण व अमराठा समुदायांची आहे. पुरंदरे प्रकरणाने ती अपरिहार्यपणे अधोरेखित केली आहे. बाकी समुदायांनी आपली कुतरओढ क करुन घ्यायची?

वर्चस्व कोणाचे असावे, इतिहास खरा कोणाचा, कोण शिवद्रोही आहे हे असामयिक व अप्रस्तुत प्रश्न या वादाने निर्माण केले आहेत. त्याचे निराकरण कसे करायचे हा उद्याचा प्रश्न आहे आणी आपणा सर्वांना याचे उत्तर शोधावे लागेल.

यात इतिहास कोठे आहे? जातीयतेत इतिहास हरवुन जातो. जातियतेच्या जोखडांतून बाहेर पडणा-यांना जातियतेतच ढकलले जाते. इतिहासातील महान व्यक्तीवर प्रेम करतांना, रसभरितपणे त्यावर लेखन करतांना आधी आपण त्या महापुरुषाच्या जातीचे आहोत काय हे तपासून पाहणे अपरिहार्य बनून जाते.  त्या  जातीचे/धर्माचे असू तर मग कितीही अनैतिहासिक लिहिण्याची मुभा आपसूक मिळते. नसलो तर अनिवर्य काळजी घ्यावी लागते.

आणि हे जर असे आहे तर खड्ड्यात जाणारच ना इतिहास?

जातीतुन बाहेर पडत दुस-या जातीच्या महनियांबद्द्ल लिहायचे तरी कसे?

उद्या कोण उपटसुंभ "आमच्या महापुरुषांची बदनामी केली..." असे फुटकळ ओळींचे असंदर्भ उद्धरणे देत तुमच्यावर राळ उठवणार नाही हे कशावरुन? राळ उठवायची तंत्रे जातिपरत्वे वेगळी असली तरी राळ्ही राळच असते.

तर, पुरंदरे प्रकरणातुन शिकायचा बहुजनीय धडा असा ..

मला ब्राह्मण - मराठ्यांना सांगायचेय कि

तुमचे महापुरुष तुमच्याजवळच ठेवा. तुम्हाला हवे तसे ते प्रोजेक्ट करा....ज्यांनीही "बदनामी" केली असे वाटते त्यांच्याशी खुशाल भांडा...

आम्ही इतिहासाच्या मुडद्याच्या विध्वंसक जीवंतपणाला श्रद्धांजलि वाहत राहु.


तसेही आम्ही तुमच्या ऐतिहासिक इतिहासात खिजगणतीतही नव्हतो आणि आजही नाही.

थोडक्यात मराठेशाहीचा विषय माझ्या दृष्टीने तरी बाद!

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...