Tuesday, August 18, 2015

माझ्या दृष्टीने तरी बाद!

मी एकदा मागेच एका लेखात म्हटले होते कि, "इतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्वाचा घटक असतो. इतिहास हा कसा सांगितला गेला आहे यावर समाजाचे त्याबाबतचे आकलन अवलंबुन असते. असे असले तरी सामान्य माणसांवर वदंतांचा प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा अधिक प्रभाव असतो असे आपल्याला सामान्यतया दिसून येईल. इतिहास हा जेत्यांचा वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणा-यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. दुसरे असे कि इतिहासकार हासुद्धा एक मनुष्यच असल्याने त्याच्या लेखनावर त्याच्या समजुती, पुर्वग्रह आणि त्यानुरुप असलेल्या त्याच्या व्यक्तिगत आकलनाचा प्रभाव पडत असतो. अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषन इतिहासकारपरत्वे बदलते असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्य संशोधनामुळे सामाजिक पुर्वग्रहांना, रुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते आणि त्यातुन जी वादळे निर्माण होतात तशी पुर्वग्रहविरहित, संपुर्ण द्न्यान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खिळ बसते."

बाबासाहेब पुरंदरे यांना दिल्या जाणा-या पुरस्काराबद्दल राळ उठलेली आहे.  मी वेळॊवेळी अनेक परिप्रेक्ष्यात लेख लिहुन तसेच मिडियातील चर्चांत भाग घेऊन माझी मते व्यक्त केलेली आहेत. माध्यमांतील चर्चेत विचारले गेलेले प्रश्न या संदर्भातच आणी किमान वेळेत बोलावे लागते. आपलेही समाधान नाही आणि दर्शकांचेही. असो. मी येथे या वादामुळे निर्माण झालेले माझ्या मनातील प्रश्न व्यक्त करु इच्छितो. हे प्रश्न मला विचारले गेले नाहीत आणि मीही सविस्तर लिहिले नाही.

माझ्या दृष्टीने पुरंदरे हा विषय महत्वाचा कधीच नव्हता. माझी त्यांची ओळख नाही आणी मी त्यांचा वाचकही नाही. "राजा शिवछत्रपती"हे पुस्तक मला कोणत्या स्थितीत वाचावे लागले हे मी पुर्वेच लेखात स्पष्ट केले आहे. या पुस्तकातील काही विधानांवर घेतले जाणारे आक्षेप आणि ते सत्य आहेत कि नाही हा माझा उद्देश्य होता. मी आजही हेच ठामपणे सांगेल कि सर्व आक्षेप हे हेतुपुर्वक निर्माण केले गेलेले असून त्यात तिळमात्र तथ्य नाही. ते आक्षेप घेत पुरंदरेंना विरोध करणे अत्यंत चुकीचे आहे. किंबहुना लेनने केलेल्या बदनामीपेक्षा हे सोयीने अर्थ घेत केले गेलेले आरोप घातक आहेत व मी ते जाहीरपणे बोललोही आहे.

"राजाशिवछत्रपती" हा इतिहास ग्रंथ नाही. त्यामुळे इतिहासकाराला लावाव्या तशा काटेकोरपणाच्या कसोट्या त्याला लावता येत नाहीत. राजा शिवछत्रपती ही रुढ अर्थाने कादंबरीसदृश असली तरी कादंबरीच्याही शैलीपेक्षा वेगळी शैली यात आहे. मला ती शाहिरी शैलीही वाटत नसून आपल्या इष्ट दैवताबद्दल रसाळपणे सांगत वाचकांना त्यात दंगवू पाहणा-या आख्यानाची आहे. कादंबरीत किंवा आख्यानात इतिहासाची काही सुसंगती लागते तशी यातही आहे. पण ती अपरिहार्यपणे अशा वाड्मयप्रकारात आलंकारिक होत जाते. तशी आलंकारिकता या पुस्तकात आहेच. किंबहुना १९६० नंतरचा नववाचकवर्ग या भारतीय शैलीमुळे मोहित झाला नसला तरच नवल. पण आजच्या (काही) प्रगल्भ वाचकाला ही शैली न रुचण्याची तेवढीच शक्यता कारण वाड्मय शैल्यांत खूप क्रांती झाली आहे. पण हे २०१५ साली या आख्यानमय कादंबरीवरील टीकेची कारणे होऊ शकत नाहीत. मग शेक्सपियरवरही टीकेची झोड उठवावी लागेल.

तर मुद्दा लोकांचा हा नाहीच कि हा इतिहास आहे कि कादंबरी कि आख्यान. जर तो तुम्ही शब्दश: इतिहास मानत असाल तर तुम्ही मध्ययुगात जगत आहात. विश्वास पाटील,रणजित देसाई, मदन पाटील अशांच्याच कादंब-या इतिहासाची पुस्तके म्हणून अभ्यासक्रमात ठेवायला हवीत. इतिहासकारांनी  उगाचच इतिहासाची साधने, रियासती वगैरे लिहायच्या फंदात पडू नये. खरे म्हणजे इतिहासालाच हात लावू नये. हे कोणाला मान्य असेल तर असो. पण इतिहासाचे जग वेगळे आणि कादंबरीकाराचे वेगळे हे समजायची आमची सामाजिक लायकी उरली आहे काय हा माझ्या समोरील प्रश्न आहे.

इतिहास रुक्ष असतो. परस्परविरोधी माहित्या, मते, पुराव्यंनी गजबजलेला असतो. याचा अन्वयार्थ अनेक पद्धतींनी काढला गेला तरी तोही रुक्ष असतो. त्यात बौद्धिक/तार्किक कसरती असतात.  कोणते साधन कोणत्या प्रसंगाबाबत प्रमाण मानावे याचा गोंधळ होत असतो. इतिहास संशोधकाचा जसा वकूब तसा तो आपापले प्रमाण ठरवतो. भारतासरख्या देशात तर इतिहासलेखनाची परंपराच नव्हती. होती ती पुराणकारांची अनैतिहासिक परंपरा. ती आपण शिकतोय ती पाश्चात्य पद्धतीतून. अजून आपण त्यात बाल्यावस्थेत आहोत हे अमान्य करण्याचे कारण नाही.

म्हणजे इतिहासकारच अजून प्रगल्भ नाहीत, असंख्य पुरावे महत्वच समजत नसल्याने कालौघात नष्ट झालेले. ब्राह्मी/खरोष्टीतील उरले-सुरले शिलालेख जतन करायला नि वाचायला येथे ब्रिटिशांनाच यावे लागलेले. असंख्य ताम्रपट तर कधीच  मोडीत गेलेले. लिखित पत्रांचे/साधनांचे मग काय होणार? जेथे समाजाचीच अशी अनास्था असते तेथे इतिहासाचे वाटोळे होणार हे स्वाभाविकच आहे.

बरे, आपला अजुन एक प्रोब्लेम आहे. जातीय वर्चस्वतावाद.

तो कोणात आहे?

एके काळी, पुराणे सांगतात, वैदिक ब्राह्मण श्रेष्ठ कि वैदिक क्षत्रीय श्रेष्ठ असा वाद होता. हा वाद हिरिरीने लढला जायचा. पुढे क्षत्रियांची वैदिकता संपली. (ते का संपली यामागचे कारणमिमांसा वेगळी आहे.) पण तेही वैदिक धर्मानुसार शूद्र बनले.  पण त्यांच्यातील क्षत्रीय समज गेले नाही. हे कथित क्षत्रीय सरंजामदारच होते. आणि त्यांचा ब्राह्मणांशीचा वादही सनातनच होता. ब्राह्मणांनी पौराणीक साहित्यतून वैदिक धर्म व ब्राह्मणत्वचे अतोनात स्तोम माजवले. कथित क्षत्रिय साहित्यातुन का होईना बाद झाले. ब्राहमणांनी प्रत्यक्षात नसला तरी असा सुड घेतला असे म्हणावे लागेल.

आता वेळ कथित काही क्षत्रियांची आहे. ब्राह्मणांचे सारे काही नाकारायचे, ते बहुजनांचे द्वेष्टे आहेत असा प्रचार करायचा आणि समाजव्यवस्थेतून त्यांना हद्दपार करायचे अशी ही व्युहनीति असावी असे चित्र दिसतेय. शिवाजी महाराज हे सर्वांचे अभिमानस्थल. त्यांचीच बदनामी ब्राह्मणांनी केली असे ओरडायला सुरुवात केली तर  मोठा समुदाय आपल्या मागे येईल आणि ब्राह्मणद्वेषाला अधिक धार देता येईल असे त्यांना वाट्ते. हे वाटण्यातही चूक नाही.

पण ते विसरत आहेत कि हा काळ व्यक्तिगत अथवा एखाद्या जातीसमुहाच्या द्वेषांचे द्वेष करुन निराकरण करण्याचा नाही. माणूस जरा का होईना पुढे गेला आहे. छत्रपती शाहुंना वैदिक मंत्राभिप्रेत असतांना कोणी ब्राह्मण शुद्रांसाठीचे पौराणिक मंत्र म्हणतोय हे दाखवुन देणारे राजारामशास्त्री भागवत होते. शिवाजी महाराजांची जवळपास विस्मरणात गेलेली समाधी महात्मा फुलेंनी शोधली. त्यांचे समाधीचे जिर्णोद्धारकार्य टिळक,  केळकर यांनी केले तसेच तुकोजीराजांनी त्या कार्याला आर्थिक हातभारही लावला. शिवाजी महाराज स्वातंत्र्य चळवळीतही आदर्शभुत ठरले ते काही एकट्या कथित क्षत्रियांमुळे नव्हेत. म्हणजे एक काळ असा आला होता कि वैदिक आपल्या वैदिक अस्मिता सोडण्याच्या काळात आले होते तर अवैदिक समुदायही राष्ट्रकर्यासाठी जुने संघर्ष सोडायला तयार होते.

पुरंदरेंचे पुस्तक या संक्रमणकाळातील आहे हे लक्षात घ्यायला हवे. आज मराठ्यांनी लिहिलेल्या इतिहासग्रंथांत/कादंब-यांत जसा मराठेपणा डोकावतोच तसाच ब्राह्मणाने लिहिलेल्या पुस्तकात ब्राह्मणीपणा डोकावणे अपरिहार्य आहे. ही आपल्याच व्यवस्थेची अपरिहर्य अवस्था आहे. मानसिकता आहे. आणि हे वाचकंना समजावून घ्यावे लागते. समस्या अब्राह्मण व अमराठा समुदायांची आहे. पुरंदरे प्रकरणाने ती अपरिहार्यपणे अधोरेखित केली आहे. बाकी समुदायांनी आपली कुतरओढ क करुन घ्यायची?

वर्चस्व कोणाचे असावे, इतिहास खरा कोणाचा, कोण शिवद्रोही आहे हे असामयिक व अप्रस्तुत प्रश्न या वादाने निर्माण केले आहेत. त्याचे निराकरण कसे करायचे हा उद्याचा प्रश्न आहे आणी आपणा सर्वांना याचे उत्तर शोधावे लागेल.

यात इतिहास कोठे आहे? जातीयतेत इतिहास हरवुन जातो. जातियतेच्या जोखडांतून बाहेर पडणा-यांना जातियतेतच ढकलले जाते. इतिहासातील महान व्यक्तीवर प्रेम करतांना, रसभरितपणे त्यावर लेखन करतांना आधी आपण त्या महापुरुषाच्या जातीचे आहोत काय हे तपासून पाहणे अपरिहार्य बनून जाते.  त्या  जातीचे/धर्माचे असू तर मग कितीही अनैतिहासिक लिहिण्याची मुभा आपसूक मिळते. नसलो तर अनिवर्य काळजी घ्यावी लागते.

आणि हे जर असे आहे तर खड्ड्यात जाणारच ना इतिहास?

जातीतुन बाहेर पडत दुस-या जातीच्या महनियांबद्द्ल लिहायचे तरी कसे?

उद्या कोण उपटसुंभ "आमच्या महापुरुषांची बदनामी केली..." असे फुटकळ ओळींचे असंदर्भ उद्धरणे देत तुमच्यावर राळ उठवणार नाही हे कशावरुन? राळ उठवायची तंत्रे जातिपरत्वे वेगळी असली तरी राळ्ही राळच असते.

तर, पुरंदरे प्रकरणातुन शिकायचा बहुजनीय धडा असा ..

मला ब्राह्मण - मराठ्यांना सांगायचेय कि

तुमचे महापुरुष तुमच्याजवळच ठेवा. तुम्हाला हवे तसे ते प्रोजेक्ट करा....ज्यांनीही "बदनामी" केली असे वाटते त्यांच्याशी खुशाल भांडा...

आम्ही इतिहासाच्या मुडद्याच्या विध्वंसक जीवंतपणाला श्रद्धांजलि वाहत राहु.


तसेही आम्ही तुमच्या ऐतिहासिक इतिहासात खिजगणतीतही नव्हतो आणि आजही नाही.

थोडक्यात मराठेशाहीचा विषय माझ्या दृष्टीने तरी बाद!

14 comments:

  1. हडप्पा संस्कृती जशी नष्ट झाली तशीच आपली आधुनिक संस्कृती नष्ट व्हावी. कसल्याच खाणाखुणा नकोत. कळूच नये कधी इथे असं काही होतं... पुन्हा नव्याने सगळं उभं राहू दे.. कदाचित तेही नाही झालं तरी छान... माणूस हा निसर्गातला अनैसर्गिक घटक आहे. त्यामुळं हे मळमळतं वातावरण काही बदलणार नाही...

    ReplyDelete
  2. आप्पा- पराकोटीचे निराश झाल्याचे दाखवत आपण या वादातून सुटका करून घेण्याचा चाणाक्षपणा आणि धोरणीपणा दाखवत आहात त्याची गम्मत वाटते .
    बाप्पा - इतिहासाचार्य राजवाडे असे वागले नसते . !ते असले कातडी बचाव वागणारे नव्हते !
    आप्पा - शेजवलकर यांच्यात कऱ्हाडे कोकणस्थ वाद होता , पण तेही असे मैदान सोडून - नकोच तो मराठेशाहीचा विषय - असे म्हणणारे नव्हते !
    बाप्पा - आम्ही तुमच्याकडून ही अपेक्षा ठेवत नव्हतो ,
    आप्पा - संजय सर तुम्ही आम्हाला नाउमेद केले । कशाला कंटाळलात , कशाला घाबरलात ?
    बाप्पा - का इतके निराश झालात ?शरद पवार तर म्हणाले ना - की यावर पडदा टाका ! पण तो असा नाही टाकायचा . नवी पुस्तके लिहा ,
    आप्पा - कुणीही मराठा , किंवा संभाजी ब्रिगेडी नवीन शिवाजीचा इतिहास का लिहित नाही ? असा प्रश्न विचारा ! अगदी पार मालोजी पासून आज पर्यंत - सर्व लिहा !अगदी त्याना हवा तसा - किती खप होतो बघुया तरी !बाप्पा - प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांच्याकडे जसे वक्तृत्व होते तसे कुणाकडेही नव्हते . ओघवती भाषा , योग्य शब्द आणि उत्तम मांडणी , तसेच शिवरायांचे गुणगान गाताना शिवशाहीर बाबासाहेबांचे शब्द आहेत !एकेक शब्द आपापल्या जागी अगदी शोभून दिसणारा .
    बाप्पा - अगदी तुमचे राजमान्य राजश्री अविनाश पाटसकर धरून कोणाही क्षत्रियाच्या अंगात दम नाही - इतके ओघवते शिव गुणगान गायचे - म्हणून ही तडफड होते आहे - गेले ५० वर्षे का हे सगळे गप्प होते ? स्वतः नेमाडे यांनी परवा बाबासाहेब पुरंधरे यांच्या हातून पुरस्कार घेतला , तसेच शरद पवारांनी आजवर बाबासाहेब पुरंधरे यांचा ३ वेळा सत्कार केला - ते कसे काय ? जितेंद्र आव्हाड याना इतका डोईजड झाला की काय ? सुप्रिया सुळे नी तर बाबासाहेबाना अमहाराष्ट्र भूषण बद्दल अभिनंदनाचे पत्र पाठवले !आणि अजित पवार तर म्हणतात की मी त्यांचा आदर करतो ! आता काय म्हणावे ?
    संभाजी ब्रिगेड ही भाडोत्री मंडळी आहेत . चहू म्हटले की भुंकणारी !
    आणि यातून संघ ( आर एसेस )नामानिराळा रहात आहे - हेही विशेष !
    आप्पा - संजय सरकार तुम्ही निराश होऊ नका , तुम्ही लिहा , शिवाजी आपल्या सर्वांचाच आहे , तुम्हालाही बक्षीस मिळेल ! जमेल तुम्हाला - नक्कीच !
    बाप्पा - चला तर लिहा - इ स १६३० , गडावर नगारे वाजू लागले - आमच्या शिवबांचा
    जन्म झाला !
    आप्पा - काय झाले जन्म तारखेपासूनच वाद ? नो प्रोब्लेम आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे -
    थोरल्या मासाहेबांची कृपा - दुसरे काय ?उगीच दाडोजीला बदनाम करू नका -

    ReplyDelete
  3. संजय सर ,
    आपण थोड्यावेळापूर्वी एबीपी माझा वर भूमिका घेतली ती अत्यंत समतोल आणि वाखानान्या सारखी होती , त्याउलट , संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता , अतिशय भोंगळ उत्तरे देत होता , आणि त्यावेळेस आपण मिश्किल हसत होतात , आम्हीही , कोर्टाचा निर्णय काय होणार ते जाणून होतो , कारण सरोदे म्हणाले त्याप्रमाणेच झाले कोर्टाने तर पोकळे आणि कांबळे याना १०००० दंड केला हेही एक विशेष !

    आता संध्याकाळी काय घडते ते पाहुया ! आपण प्रतिक्रिया देणार नाही , हे माहित वाहे तरीही आपले अभिनंदन !
    या सर्व प्रक्रियेतून आपली बाजू नित मांडणारे कार्यकर्ते ब्रिगेड निर्माण करेल असे वाटते . त्यांनीही आपली बाजू लोकशाही पद्धतीने मांडली तर उत्तमच !

    ReplyDelete
  4. माफ करा सोनवणी साहेब, पण तुमचे हे विचार वाचून उद्वेग वाटला. लेखाचा बहुतांश भाग अत्यंत संतुलित असताना तुम्ही शेवटच्या भागात त्यावर पाणी फिरवलेत. किंबहुना, आता तर संशय येऊ लागला आहे की त्यासाठीच आधीचा भाग असा लिहून तुम्ही शेवटच्या धक्क्यासाठी पार्श्वभूमी तर तयार करत नव्हतात.



    "मला ब्राह्मण - मराठ्यांना सांगायचंय की" असे तुम्ही मह्णता. म्हणजे शेवटी हेच की सूज्ञ जन जे म्हणतात की महापुरुषांना जातीयतेच्या संकुचित कप्प्यात बांधून ठेऊ नका त्याला तुम्ही "मला ब्राह्मण - मराठ्यांना सांगायचंय की" हे म्हणून तिलांजली दिलीत. म्हणजे काय? तुम्ही मराठी नाही?



    तुम्ही मग म्हणता "तुमचे महापुरुष तुमच्या जवळच ठेवा. तुम्हाला ते हवे तसे प्रोजेक्ट करा............तसेही आम्ही तुमच्या ऐतिहासिक इतिहासात (म्हणजे काय देव जाणे) खिजगणतीत नव्हतो आणि आजही नाही." म्हणजे शिवाजी महाराज तुमचा जातीतले नाही किंवा त्यांचा इतिहास एका ब्राह्मणाने लिहीला म्हणून मराठेशाहीचा विषय तुमच्या दृष्टीने बाद? या विचारात स्पष्टपणे जातीय द्वेषच डोकावतो आहे.



    सोनवणी साहेब, शिवाजी आमचा आहे, बाजीराव आमचा आहे, आणि आंबेडकरही आमचेच आहेत. तसेच ज्ञानेश्वर, तुकाराम, आणि चोखामेळाही आमचेच आहेत. चांगले विचार आणि कार्य असेल, तर तो महापुरुष कोणत्या जातीतला आहे, याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. महापुरुषांना जातीयतेच्या कप्प्यात आम्ही तरी बंद करु इच्छित नाही.



    जाता जाता एक गंमत सांगतो:

    दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याचा वाद उत्पन्न झाला, तेव्हा आम्हाला समजलं की ते ब्राह्मण होते. शाळेत इतिहासाच्या पुस्तकात त्यांचे रेखाचित्र (स्केच) होते त्यात त्यांचा वेष सर्वसामान्य मावळ्यासारखाच होता त्यामुळे त्यांची जात तेव्हा लक्षात आली नव्हती, आणि शिवाजी महाराजांचे गुरू आणि एक ऐतिहासिक महत्वाचा माणूस म्हटल्यावर त्यांची जात तपासायला जायची कधी इच्छा आम्हाला झाली नाही, आणि आमच्यावर महापुरुषांची जात विचारण्याचे संस्कारही झालेले नाहीत.

    तेव्हा "तुमचे महापुरुष" या मानसिकतेतून तुम्ही लवकर बाहेर पडावेत, ही त्या सर्वशक्तीमान परमेश्वराकडे प्रार्थना करुन मी आपली रजा

    ReplyDelete
    Replies
    1. Aple mhanane agdi yogya ahe joshi
      Saheb

      Delete
    2. योग्य विचार आणि योग्य भाषा

      Delete
  5. शाब्बास मंदार !,
    असेच लिहित जा , थोडक्यात आणि ! भेट देत जा हि विनंती , कारण हा ब्लोग समृद्ध झाला , विचारांनी , तर चांगलेच आहे . फेसबुक वर संजय सोनावणी यांचे होयाबाच असतात , पण या ब्लोगवर बऱ्यापैकी विचारांची देवान घेवाण होते . अभिनंदन !

    ReplyDelete
  6. आता एकच एक आयडॉल घेऊन जाणारे समूह वेगवेगळया फसव्या राजकारणाला बळी पडतांना दिसतांत . परंतू या आयडॉल वगळताही जे समाज गट आहेत. जे आपल्या कर्तव्याने निष्ठेने आपले काम करीत आहेत. त्यांच्यातला व्यावहारिकपणा पैसा शोधण्याची चाणाक्ष वृत्ती क्रिएटीविटी त्यासाठी लागणारे कष्ट व्यापार तसेच पोट भरण्यासाठी लागणारी स्वत:ला बदलवून घेणारी वृत्ती ते लोक आंतरराष्टीय स्तरावर मोठ मोठया इंडस्ट्रीज चालवत आहेत. नव्हेत. त्या त्या देशांचे ते जबाबदार नागरीकही झाले आहेत. ते भारतीयच आहेत. आणि हे काय चालविले आहे महाराष्ट्रात . ज्यांनी देशाला मार्गदर्शन दिले. अजूनही महाराष्ट्रातील तया देशभक्तांना समाजसुधारकांना ज्ञानार्थींबाबत इतर राज्यातील लोक मलाच त्यात्या राज्यांत गेल्यावर आठवून काढून संदर्भ देत असतात. बाकी लेख उत्तम

    ReplyDelete
  7. बी ग्रेड्यांच्या संकुचित आणि द्वेषपूर्ण मानसिकतेमुळे पुरंदरेंसारख्या प्रामाणिक व तपस्वी संशोधकास विनाकारण त्रास दिला जातोय.. निव्वळ जातीय द्वेष..श्शी..

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. मंदार जोशीजी, खोलात जाऊन विचार करा. माझा उद्वेग स्वाभविक आहे. माझे अनेक मित्र या ब्लोगमुळे नाराज झाले,पण दुस-या दिवशी मला पुन्हा एबीपी माझावर सम्यक्बाजु मांडतांना पाहुन त्यांचया मनावर आलेले मळभ दूर झाले. ते असले व मी जातीयवादे नसलो तरी या ब्लोगमधे जे लिहिलेय ते वास्तव्कसे नाकारता येईल? त्र्ययस्थ दृष्टीने आपल्या समाजाकडे नजर टाकली तर हे नागडे चित्र दिसते. त्याला माझा नाईलाज आहे. आम्ही काय समजतो यापेक्षा बहुसम्ख्यंक वास्तव काय आहे हे तपासायला हवे. हे जे फालतु वाद सुरु आहेत यात मी निर्णायक नसली तरी प्रसंगी धोके पत्करुन भुमिका घेतली आहे व घेईनही. तंव्हा किती लोक (कोणीही असो) बाजुने आले हा प्रश्न तुम्हाला पडला का? म्हणजे जातीयवाद करणारे हे वाद उत्पन्न करणार आणि ज्याशी आमचा संबंध नाही त्यात आम्ही दोन्ही बाजुंनी भरडले जाणार. ब्लोग वाचुन टीका/स्तुती करणे वेगळे असते...मैदानात उतरुन दोन हात करणे वेगळे असते. या दोन्ही समुदायंनी आपापले महापुरुष अतिउदातीकरण करत रंगवले आहेत हे तुम्हाला अमान्य आहे काय? जोहे संघर्ष आहे वर्चस्वतावादाचा तो यच समुदायांत का आहे? मग आम्हाला आमच्या डोक्यावर खरे-खोटे मिठमसाला लावलेल्या महापुरुषंना बसवत नकळत वर्चस्वतावाद लादण्याचा हा प्रयत्न नाही काय? त्यांनी सत्तेसाठी राजकारण केले कि खरोखर रयतेसाठी केले हे प्रश्न उद्या विचारलेच जाणार आहेत. मी सुतोवाच केला आहे एवढेच.

    " शिवाजी महाराज तुमचा जातीतले नाही किंवा त्यांचा इतिहास एका ब्राह्मणाने लिहीला म्हणून मराठेशाहीचा विषय तुमच्या दृष्टीने बाद? या विचारात स्पष्टपणे जातीय द्वेषच डोकावतो आहे." हे तुमचे विधान तुम्ही लेख न वाचताच केले आहे. गेले २-३ महिने मी या वादात आहे. लेख लिहुन पुरंदरेंवरीलाक्षेप धादांत खोटे आहेत हे मीच पुराव्यानिशी मांडले व वाहिन्यांवरुनही अनेकदा ठामपणे सांगितले हे तुम्हाला माहित नसेल तर बहुदा तुम्ही महाराष्ट्रात राहत नसावात. उलट येथुन पुढे आपापल्या जातीतील पुरुषांवरच लिहवे असा पायंडा (भितीपोटी) पडेल हा इशाराही मी दिला आहे.माझ्या प्रकाशन संस्थेकडून एका तरुण संशोधकाने लिहिलेले शिवाजी महाराजांवर आगळा प्रकाश टाकणारे हस्तलिखित याच भावनेतून परत नेले. आणि यचाच सामाजिक परिपाक असा, कि तुम्ही तुमची चरित्रलिहित बसा...आम्हाला त्यात रस असण्याचे (लिहिण्यचे) कारन नाही. गांभिर्याने या धोक्यावर विचार करा.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...