1
सर्वात महत्वाची बाब म्हनजे शेती हा अजुनही भारतीय अर्थव्यवस्थेचा व ५५% जनजीवनाचा मुख्य आधार आहे हे लक्षात घेऊन शेतीमालाधारित लघू ते मध्यम उद्योग, अगदी खेडोपाडीही काढण्यासाठी का उत्तेजन दिले गेले नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. भारतात आजही ३०% फळ-भाजीपाला पुरेशा साठवणुकीच्य साधनांचा अभाव, वाहतुकीच्या अपु-या सुविधा यामुळे वाया जातो. निर्जलीकरणासारख्या वा अन्य खाद्योद्योगांच्या सोप्या तंत्रज्ञानाच्या पद्धती आम्ही ग्रामीण शाळा-कोलेजांमधून अभ्यासक्रमातुनच जर शिकवल्या असत्या तर दोन बाबी नक्कीच झाल्या असत्या. शेतमाल म्हणजे राष्ट्रीय साधनसंपत्तीच आहे. ती वाया जाण्यापासून वाचली असती. मुल्यवर्धकता आली असती. आणि ग्रामीण तरुणांना रोजगारही स्थानिक पातळीवरच उपलब्ध झाले असते. होलंड व इंग्लंडमध्ये मी अनेक अत्यंत छोट्या ते बहुराष्ट्रीय प्रक्रिया उद्योगांना भेटी दिल्या. मांस-मासळीपासुन ते भाजीपाल्यांचे निर्जलीकरण कसे केले जाते हे पाहिले. आपल्याकडे उन्हात वाळवण्याची कला आहे. सुक्या मासळीची एकटी देशांतर्गत बाजारपेठच १७ हजार कोटींची आहे. जगभर मागणी आहे. परंतू सोप्या असलेल्या तंत्रज्ञानाशीही आम्ही आमच्या नागरिकांना ओळख करून दिली नाही. त्याचा परिपाक म्हणजे ग्रामीण व किनारपट्ती भागात वाढत चाललेली बेसुमार बेरोजगारी.
म्हणजेच विकेंद्रीकरण, कि ज्यायोगे लोकसंख्याही योग्य प्रमाणात वितरीत होईल, पाणी ते वीज यासारख्या मुलभूत सुविधांवर आज पडलाय तसा अतिरेकी ताण पडनार नाही आणि घरापासून ते जमीनींच्या किंमतीही आटोक्यात राहतील. आजवर आम्ही ते केले नाही. आतातरी ते करण्याची गरज आहे.
दुसरे म्हणजे पंतप्रधानांनी १०० स्मार्ट सिटी बनवण्याचा संकल्प सोडला आहे. या आधीच बजबजलेल्या शहरांना "स्मार्ट" करण्याची गरज नाही तर अविकसीत भागांतील निवडक शहरे "स्मार्ट" बनवण्याची गरज आहे. अशा शहरांना सर्व पायाभूत सुविधा कशा उपलब्ध होतील हे पाहण्याची गरज आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरांत नवीन उद्योगांना परवानग्या देण्याचे थांबवले पाहिजे, लोकसंख्येचा ताण आता पुढे किमान वाढणार नाही हे पाहिले पाहिजे. प्रगत देशांनी आपल्या प्रत्येक संसधनांचा व्यावसायिक वापर अत्यंत कुशलतेने केला आहे. विकेंद्रीकरणाचे धोरणही राबवले आहे. ते आपल्याला जमलेले नाही. ते आता तरे जमायलाच हवे.
* * *
2
खेदाने म्हणावे लागते कि आम्ही परिवर्तनास लायक असा समाज नाही. आम्हाला नेमका कशाचा विरोध, का आणि कसा करावा याची समज अद्याप नाही. आमचे विरोध हे आमच्या केवळ अहंभावातून आलेले आहेत. विरोधांना सत्य आणि तथ्य याचे पाठबळ नसले तर ते विरोधही हास्यास्पद होऊन जाणार हे आम्हाला समजत नाही. किंबहुना पुरोगामीपणाचे, परिवर्तनाचे तत्वज्ञानच आमच्याकडे नाही असे वाटावे अशी स्थिती आहे. तत्वज्ञानाचा पाया केवळ सत्य हाच असतो हे आम्हाला कोणीतरी शिकवायची गरज आहे. आम्ही उलट आमच्याच अहंकाराभिमानात बेभान होत इतस्तता: दगड फेकत बसु तर परिवर्तन तर सोडाच, आपल्याच मार्गात आपण रोडे निर्माण करून ठेवू. पुढे जाण्याची, सत्यशोधनाची बाब तर दुरच.
* * *
3
माणसाला आपल्या कमतरतांची, उणेपणाची जाण असल्याने त्या न्यूनगंडावर मात करण्यासाठी त्याने आपल्या प्रतिभेने सुपर ह्युमन दैवते निर्माण केली.
आपले राष्ट्र, आपला प्रांत, आपला धर्म आणि आपली जात याच्या अहंभावांना जपण्यासाठी आपापल्या राष्ट्र, प्रांत, धर्मातीलही व्यक्तींची सुपर ह्युमन दैवते बनवली.
आपापले दैवत श्रेष्ठ ठरवण्यासाठी ते जे नव्हतेच अशी मुल्ये, जी स्वत:ला कधी पाळायचीच नव्हती , त्यांच्यावर लादली.
आपल्यातील न्युनांवर तोकडे समाधान शोधले.
माणसांचा इतिहास हा त्याच्या न्युनगंडाचा इतिहास आहे.
म्हणुनच त्याला दैवते लागतात.
नि हीच माणसाची शोकांतिका आहे!
* * *
4
अभिव्यक्ति ही माणसाची उपजत प्रेरणा आहे. अभिव्यक्ती आहे म्हणून संस्कृती आहे. अभिव्यक्ती, मग ती भाषा असो, वास्तुकला, चित्रकला, साहित्य ते अर्थव्यवहार असो...वा अन्य कोणतेही कृत्रीम माध्यम...ज्यातुन माणूस व्यक्त होतो...असते अभिव्यक्तीच.
आम्ही जेही काही...कोणत्याही माध्यमांतुन आज अभिव्यक्त होतो ती एकुणात आमची आजची संस्कृती दाखवते आणि भविष्यातील संस्कृतीचे दिशादर्शन करते.
म्हणुनच आजच्याच अभिव्यक्तीबद्दल आम्ही आत्ताच अधिक सजग असले पाहिजे!
नसलो, तर आम्ही संस्कृती पुढे नेणे तर दुरच, पण संस्कृती, जी आहे म्हणतो...नि जी कधीकाळी अतिमहान होती म्हणत तीबाबत आजही जो उरबडवेपणा करतो, त्यासारखा बाष्कळपणा करणारे अन्य असंस्कृत जीव जगात असू शकतील काय?
* * *
5
विश्व अथांग आहे. आपल्या ज्ञात विश्वात अब्जावधी आकाशगंगा आहेत. एकेका आकाशगंगेत मोजता येणार नाहीत एवढे आपल्या सुर्याच्या हजारो-शेकडोपट मोठे तारे आहेत. पृथ्वीसदृश जे ग्रह मिळतात तेही एवढे अवाढव्य आहेत कि आपण कल्पनाही करु शकत नाही. तो गुरू-बिरू तर क्षुल्लक बालक. पृथ्वीची त्यात मिजास काय?
असे म्हणतात कि ज्ञात विश्वाचा व्यासच १६ अब्ज प्रकाशवर्षे आहे. तो अजुनही अधिक असू शकेल...किंवा कमीही.
या पसा-यात हा मनुष्य किती छोटा! दुर्लक्षणीय घटक.
तरीही तो महान आहे कारण आहे त्या विश्वाचा शोध घेण्याचा, ते समजावून घेण्याचा तो किमान प्रयत्न तरी करतो!
पण त्याचे क्षुल्लकत्व एवढेच कि तो माणसालाच समजावून घेण्याचा प्रयत्न करत नाही!
या विरोधाभासातून आम्ही कधी बाहेर पडू?
* * *
6
मानवी धारणा या खरेच प्रागतिक असतात काय? अनेकदा स्वत:ला प्रागतिक समजणारे आपल्याच धारणांचे नीट विश्लेषन करू न शकल्याने स्वत:ला प्रागतिक समजत, पुरोगामी समजत प्रतिगामी होत जातात. याचे मूळ कारण म्हणजे प्रतिगामीपणा काय आणि पुरोगामीपणा काय याच्याच व्याख्या त्यांना स्पष्ट नसतात.
शेकडो-हजारो वर्षांपुर्वी अमूक होते तसेच वर्तन, तशीच संस्कृती, तेच ग्रंथ आणि त्यातील तशाच्या तशा मान्यता वर्तमानातही पुजनीय/भजनीय व अंतिम सत्य मानतो व तसे वर्तन वर्तमानातही करायचा प्रयत्न करतो वा तशा भावना/विचार तरी जपत इतरांनीही तसेच वागावे व तसाच विचार करावा असा प्रयत्न करतो तो प्रतिगामी असतो असे आपण मानतो. प्रतिगामीपणाला काळ व समाजाचे वा व्यक्तीचे बंधन नसते. पाच-पन्नास वर्षांपुर्वीचे विचारही जो वरीलप्रमाणेच मानतो तोही तेवढाच प्रतिगामी असतो.
पुरोगामीपणाची व्याख्या जरा व्यापक आहे. ती जीवनाची सारी अंगे स्पर्शते. मग ती भौतिक असोत, ज्ञानात्मक असोत वा निखळ वैचारिक असोत. जोही कोणी काल होता त्या स्थितीपेक्षा आज वैचारिक/ज्ञानिक/आर्थिक उत्थान करीत उद्या याहीपेक्षा मोठा पल्ला गाठायचा प्रयत्न करत असतो आणि अधिकाधिक मानवतावादी जो होत जातो त्याला आणि त्यालाच फक्त पुरोगामी म्हणता येते.
* * *
7
जोवर आपण आपल्या मनावर साठलेल्या मालिन्याच्या, आता कणखर बनुन गेलेल्या पुटांना जीव तोडून खरवडून काढत नाही, तोवर आपण माणसाकडे आणि भवतालाकडे नितळ नजरेने पाहू शकणार नाही. द्वेष, घृणा, स्थार्थादि भावनांनी आपल्याला नको एवढे प्रदुषित केले आहे. एवढे कि आपण ’मनुष्य’ म्हणवून घेण्याच्याही योग्यतेचे राहिलेलो नाही. खर-या-खु-या माणसांचा आदर करण्याचीही योग्यता राहिलेली नाही. ’दांभिकतेचा कळस’ म्हणूनच आजच्या मानव म्हणवणा-या प्राण्याचे वर्णन करावे लागेल. आमचा परमेश्वराकडे अथवा अंतिम सत्याकडचा प्रवास सोडा...’माणूस’ होण्याच्या दिशेने थोडा जरी प्रवास सुरु झाला तर किती बरे होईल!