
खंडोबा हे महाराष्ट्रातील बहुसंख्य जातींचे कुलदैवत असले तरी त्याचा धनगरांशी आदिम संबंध आहे. तो कुरूब-धनगरांचा प्रिय देव आहे. खंडोबाचा मूळ इतिहास पांडुरंगाइतकाच पुरातन असुनही खंडोबाभोवती बाराव्या-तेराव्या शतकानंतर ज्या पौराणिक कथा बनवल्या गेल्या त्यामुळे त्याचे ऐतिहासिक स्वरुप पार बदलले आहे. भक्त व काही स्वार्थी धर्मपंडित म्हणवणा-यांनी या कथा कधी प्रेमाने तर कधी स्वार्थाने बनवल्या असे दिसून येईल. या कथांच्या जंजाळात फारसे न अडकता आपल्याला मल्हारी मार्तंड खंडोबाचे मुळ स्वरुप येथे शोधयचे आहे.
मल्लारी-माहात्म्य या ग्रंथाने खरे तर अनेक भाकडकथांना जन्म दिला. खंडोबाचे कधी शिव, कधी विष्णू तर कधी इंद्राशी साधर्म्य साधण्याचा प्रयत्न केला गेला. मार्तंड-विजय, जयद्रिमाहात्म्यसारखे ग्रंथही पुरानकथांच्या पद्धतीनेच ढोबळपणे लिहिले गेले. हे ग्रंथ बाराव्या-तेराव्या शतकानंतरचे असल्याने खंडोबा या लोकदैवताला "प्रतिष्ठा" यापुर्वी नव्हती असा समज होणे स्वाभाविक आहे. महानुभाव साहित्यात खंडोबा (मैराळ) ह क्षेत्रपाळ देव असल्याचे म्हटले आहे. सन ११६० मध्ये बसवेश्वरांनीही मलैय्या, बेंतर, बिरैय्या केटय्या या देवतांची बळी मागणारे म्हणून्ज निर्भत्सना केलेली दिसते. पण पुढे जंगमही खंडोबाचे उपासक बनले हेही ऐतिहासिक वास्तव आहे. असे असले तरी संशोधकांनी सर्व कथांचा अभ्यास करुन जी मते मांडली आहेत त्यांचा थोडक्यात आढावा घेऊयात.
१) डा. माणिकराव धनपलवार यांच्या मते मैलार (मल्हार) हा शिकारी मेंढपाळ असावा. मैलाराच्या उपासनेत घोडा व कुत्र्याला महत्व आहे. हे मत डा. रा. चिं. ढेरे यांनाही मान्य आहे. हा मेंढपाळ-श्रेष्ठ मैलार एखाद्या प्रतिस्पर्धी टोळीशी झलेल्या संघर्षात क्षतविक्षत होऊन पडला असावा. खंडोबाच्या पूजाविधीत भंडा-याला (हळदीला) जे महत्व मिळाले ते मूळ जखमी झालेल्या नायकाला केलेल्या हळदीच्या उपचारांत असावे.
२) खंडेराय हा शिवजीप्रमाणेच इतिहासात होऊन गेलेला एखादा महान वीरपुरुष असावा असे मत त्र्यं. ग. धनेश्वर यांनी व्यक्त केले आहे. हा मुळात वीरदेव असावा व तो सन ६२० मद्ध्ये होऊन गेला असावा.
३) खंड म्हणजे वस्त्राचा तुकडा. मैलारास वस्त्रांच्य तुकड्याचा मुखवटा असतो म्हणून खंडोबा हे नांव पडले असावे असेही डा. रा. चिं. ढेरे म्हणतात. पण वस्त्रांच्या तुकड्याचे मुखवटे महालक्ष्मी व अनेक मुर्त्यांना असतात, पण त्यंना वस्त्रवाचक नांव नाही यावरुन ढेरेंचे मत बाद होते.
४) खंड-खांडा हे खंडोबाचे आयुध असल्याने त्यास खंडोबा म्हणतात हे मत बहुतेकांना मान्य असून जनप्रियही आहे.
५)खंडोबा हा शेळ्या-मेंढ्या व गायी-गुरांचा रक्षणकर्ता होता. त्यामुळेव पशुपालन हा ज्यांचा प्रमुख व्यवसाय होता त्यांचे तो दैवत होता. महाराष्ट्रात पैठण येथे खंडक नांवाचा यक्ष वास करत होता. खंडक यक्ष म्हणजेच खंडोबा असे मत म. के. ढवळीकर यांनी व्यक्त केले आहे.
६) खंडोबाला बाणाई ही धनगरकन्या पत्नी आहे तशीच म्हाळसा ही लिंगायत वाण्याची मुलगी आहे. पशुपालक व नागर सम्स्कृती, या दोन्ही समाजातील बायका करणे देवाला आवश्यक होते असे गुंथर सोंथायमर यांनी मत व्यक्त केले आहे.
७) मल्लारी, हे नांव मलय/मैलार या पर्वत-अरण्यवाचक शब्दांतुन आले असावे असेही काही विद्वान मानतात. मार्तंड या शब्दातून प्राचीन सुर्यपुजेचे अंशही खंडोबाला चिकटवले गेले असतील असेही एक मत आहे.
मुख्य मुद्दा येथे लक्षात घ्यायला हवा तो हा कि खंडोबा ही देवता जर मुळात अकराव्या-बाराव्या शतकानंतर उदयाला आली असती तर त्याच्या मुळाबद्दल एवढी मते असायचे कारण नव्हते. जी देवता पुरातन असते, तिचे मुळ स्वरुप कालौघात विस्मरणात जाते व समकालीन संदर्भ कवी/भक्त आपापल्या प्रतिभेने चिकटवत जातात. धर्ममार्तंड त्यात स्वार्थी भर घालत राहतात. त्यामुळे पुराणकथांची व वेगवेगळ्या स्प्ष्टीकरणांची एवढी रेलचेल उडते कि सत्य काय हे शोधणे दुरापास्त व्हावे.
तरीही खंडोबाशी निगडित मुख्य कथा म्हणजे मणी-मल्ल दैत्यांची. या दोन्ही दैत्यांचा संहार केला व मल्ल दैत्याला मारणारा व मरण्याआधी दैत्याची इच्छा म्हणून नांवात मल्ल-हारि=मल्हारी (मल्लाचा विनाश करणारा-ठार मारणारा) आहे हे पुराणकथा सांगतात व मणी दैत्य त्याचा भाऊ होता असेही म्हणतात. जेंव्हा मुळ इतिहास विसरला जातो तेंव्हा त्याचे पौराणिकीकरण चालु होते. तरीही खंडोबाच्या नांवात मल्हारी असल्याने यावर जरा विशेष लक्ष द्यायची गरज आहे.
मल्ल हा प्रत्यक्षत व्यक्ती अथवा दैत्य नसून ते महाराष्ट्रातील एका प्राचीन विभागाचे नांव होते. या प्रांताला महाराष्ट्र नांव का पडले याचे विवेचन करतांना चि. वि. वैद्य म्हणतात, इ. स. पू. ६०० च्या सुमारास आर्य लोक दक्षिणेत आले आणि गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र इ. वसाहती करून स्थायिक झाले. अशोकाच्या शिलालेखात जो ‘रास्टिक’ लोकांचा उल्लेख आढळतो, ते हेच लोक होत. आंध्रभृत्य म्हणजेच सातवाहन यांच्या साम्राज्यात ते एका सत्तेखाली येऊन त्यांचे एक मोठे राष्ट्र निर्माण झाले व या मोठ्या राष्ट्रालाच महाराष्ट्र असे नाव पडले.
मराठी विश्वकोशात म्हटले आहे कि या प्रदेशाला महाराष्ट्र हे नाव पडण्यापूर्वी याचे विदर्भ, अश्मक, कुंतल, अपरांत, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र असे घटक विभाग असून त्यांचे उल्लेख प्राचीन संस्कृत वाङ्मयात वारंवार आलेले आढळतात. बृहदारण्यकोपनिषद, रामायण व महाभारत यांतून विदर्भाचा उल्लेख अनेक वेळा आलेला आहे. गोदावरी नदीच्या तीरावरील प्रदेश तो अश्मक (राजधानी प्रतिष्ठान किंवा पैठण), कृष्णेच्या उगमाजवळचा अथवा त्याच्या पश्चिमेचा तो अपरांत म्हणजे कोकण, गोपराष्ट्र म्हणजे नासिकभोवतालचा प्रदेश व त्याच्या दक्षिणेचा प्रदेश तो मल्लराष्ट्र असे मानले जाते. या सर्व प्रदेशांत प्राकृत भाषा प्रचलित होऊन त्या सर्वांचा मिळून एक मोठा प्रदेश निर्माण झाला व त्यालाच महाराष्ट्र असे संबोधले जाऊ लागले, अशीही व्युत्पत्ती दिली जाते.
पांडुराष्ट्र म्हणजे आजच्या पंढरपुरचा परिसर हे आपण पाहिले. मल्ल राष्ट्र नाशिकच्या दक्षीणेचा होता हे उघड आहे. हे राष्ट्रिक (राष्टिक) आर्य होते हे मत चि. वि. जोशींच्या तत्कालीन आर्य-आक्रमण सिद्धांताला धरुन आहे व ते कसे अनैतिहासिक आहे हे आपण सुरुवातीलाच पाहिले आहे.
कुसुमावती देशपांडेंच्या म्हणण्यानुसार पांडुराष्ट्र व मल्लराष्ट्र ही अनार्यांची होती.
सर्व कथांचे अवलोकन केल्यावर आणि विद्वानांची मते लक्षात घेतल्यानंतर माझ्या लक्षात आले आहे ते असे:
मल्ल हा दैत्य नसून ते प्रदेशाचे अथवा राज्याचे नांव होते हे ऐतिहासिक सत्य आहे. हे राज्य आजचा पुणे जिल्हा ते त्याहुनही दक्षीणेचा भाग यात पसरले असावे. ही शक्यता आहे कि जेजुरी ही मल्लराष्ट्राची राजधानी असावी. कर्हेपठार येथील गिरिदुर्ग या राजधानीचे केंद्र असावा. येथुन तत्कालीन राजा कारभार हाकत असावा व त्याचे नांव मणी असावे.
मणी-मल्ल या दैत्यद्वयाच्या नांवांची सांगड अशी लागते. मल्ल हे राज्याचे नांव तर मणी हे खंडोबाकालीन राजाचे नांव.
मल्ल राष्ट्र हे सातवाहनकाळ सुरु होईपर्यंत अस्तित्वात होते याचे पुरावे उपलब्ध आहेतच. म्हणजेच इसवी सनपुर्व पाचवे ते सनपुर्व तिसरे शतक या काळात खंडोबा नांवाचा एखादा मेंढपाळ वीरपुरुष होऊन गेला असावा. मणीही पशुपालकच समाजातील असावा पण तो अन्यायी असल्याने खंडोबाने बंड करून त्याच्या उच्छेद केला असावा. त्यामुळे मल्ल राष्ट्र हरवणारा म्हनून मल्हारी ही नावाचे व्युत्पत्ती अधिक संयुक्तिक आणि सत्याच्या जवळ जाणारी आहे. मल्लारि...मल्हारी अशी उकल करता येते. शकारि म्हणजे ज्याने शकांवर जय मिळवला अशी जी उपाधी तशीच ही मल्ल राष्ट्रावर विजय मिळवला म्हणून मल्हारी.
पराक्रमी पुर्वजांची पूजा करणे हा धनगर संस्कृतीतील एक महत्वाचा भाग आहे. खंडोबाने मणी राजाच्या संहारानंतर स्वत: राज्यकारभार केला असणे संयुक्तिक आहे. त्याच्या निधनानंतर त्याची शिवावतार समजून लिंगस्वरुपात पूजा करणे स्वाभाविक होते. खंडोबा नांवाचा उगम अन्यत्र शोधण्याची आवश्यकता नाही. हेच नांव मुळचे असणे अधिक सत्याच्या जवळ जाणारे आहे. तसेच खंडोबाच्या आधी मुर्त्या असणे शक्य नाही. खंडोबाची पुजा आधीपासून लिंगरुपातच होत आली असली पाहिजे. मार्तंड ही उपाधी सुर्यपुजेशी निगडित नसून त्याचा अर्थ "मार्तंडाप्रमाणे ज्याचे तेज फाकले आहे असा मल्हारी." असा घ्यावा लागेल.
तसेच बाणाई ही धनगरकन्या असणे स्वाभाविक असले तरी म्हाळसा ही लिंगायत वाण्याची मुलगी होती ही कथा नंतर कोणीतरी (लिंगायतांनीच) बनवलेली आहे हे उघड आहे. याचे कारण असे कि लिंगायत हा शैव पंथ असला तरी त्याची स्थापना बाराव्या शतकातील आहे. बसवेश्वरांनी खंडोबाचा आधी निषेधच केलेला होता हे आपण पाहिलेलेच आहे.
राजाला दोन किंवा अधिक पत्न्या असने हे त्या काळात गैर नव्हते. म्हाळसा हीसुद्धा धनगरच असण्याची शक्यता आहे. नंतर सामाजिक संदेश देण्यासाठी दोन समाजांतील पत्न्या दाखवल्या जाणे शक्य आहे. खंडोबाचा घोडा व श्वान (वाघ्या) हे त्याचे मुळ रुप धनगर असण्याचेच द्योतक आहे.
नंतर जवळपास दीड हजार वर्षांच्या कालौघात खंडोबा ह क्षेत्रपाळ, पशुंचा संरक्षक देवता म्हनून मानला जात त्याचे आजचे स्वरुप बनले आहे. मुळ इतिहास नीटसा लक्षात न ठेवला गेल्याने दंतकथांतुन अद्भुतरम्य कथा खंडोबाभोवती गुंफल्या गेल्या. कर्मकांडांचा त्यात समावेश झाला. वाघ्या-मुरळीसारख्या अनिष्ट प्रथाही निर्माण केल्या गेल्या. आज त्या कायद्याने नष्ट करण्यात आल्या आहेत. होळकर घराण्याने जेजुरीच्या विकासात अनमोल योगदान दिलेले असून ते सर्वांस माहितच आहे!
* * *