Tuesday, September 29, 2015

शून्य महाभारत...



१९९१ सालची गोष्ट आहे. मी तेंव्हा औंध येथे राहत होतो. माझे एक प्रकाशक मित्र आणि मी एके सकाळी औंधमधीलच त्यांच्या एका मित्राला भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या गप्पा चालू होत्या. त्यात माझा सहभाग काहीच नसल्याने हालचे निरिक्षण करत होतो. नजर भिंतीवरील क्यलेंडरवर पडली. त्यावर एक चित्र, अनेकदा आधीही पाहिलेले, कृष्ण गीता सांगतोय आणि अर्जून अत्यंत विनम्रतेने गुढग्यावर बसून ऐकतोय.
मी त्या चित्रात जरा गुंगून गेलो. क्षणात असे वाटले कि समजा महाभारत युद्धात कृष्ण जर कौरवांच्या बाजुला गेला असता तर? बरे, त्यात अशक्य काहीच नव्हते.

कृष्णाकडे मदत मागायला दुर्योधनही गेला होता आणि अर्जुनही. आधी कोण आले यावर निकाल न देता आधी कोणाला पाहिले यावर कृष्णाने आपली सेना आणि शस्त्र हाती न घेणारा कृष्ण यात निवड करायला अर्जुनाला सांगितले. पण आधी आला होता तो दुर्योधन. समजा पहिला प्रश्न दुर्योधनाला विचारला असता तर आणि त्याने कृष्णालाच मागून घेतले असते तर?

या कल्पनेने मला अनेक वर्ष झपाटले. शेवटी ९७-९८ मद्ध्ये कधीतरी ही कादंबरी प्रत्यक्ष लिहायला घेतली. तत्वज्ञान किती निसरडे आहे आणि गतकाळातील त्याच घटना याचे बाजू बदलताच संदर्भ कसे बदलतात आणि नवी गीताही कसा आकार घेऊ शकते याचे विदारक दर्शन मी अवघ्या शंभरेक पानांत केले. द्रोण, भिष्म आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे द्रौपदीची चिरवेदना अभिव्यक्त केली. नवी गीताही लिहिली. पांडवांचे कृष्णाने बदललेल्या भुमिकेवरचे जे बदललेले विचार आहेत ते मानवी तळाला ढवळून काढणारे आहेत.
मानवी जीवन आणि त्याकडे पहायचे आपले दृष्टीकोन हे स्थायी नसतात. क्षणभंगूर असतात. आपल्याला जे प्रिय वाटते ते प्रिय वाटायला लावलेही गेलेले असू शकते. शेवटी मानवी जीवन काय आहे?

विभ्रमांतील भ्रम आणि आपण तरीही किती उरफोड करत आपल्यालाच सत्य माहित आहे असा आव आनत असतो! जीवन त्यामुळेच विलक्षण आणि जगण्यायोगे बनून जाते...

शून्य महाभारत...

यातुनच मानवी कोलाहलाची अंतिम शुन्यता मी दाखवली आहे!

(नवीन आवृत्ती प्राजक्त प्रकाशनाने प्रकाशित केली आहे व तिला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. वाचकांच्या मेल्स आनंद देवून जातात. लोक विचार करत नाही, तळगर्भात जायचा प्रयत्न करत नाहीत हा समजही भ्रम या सदरात मोडतो!)

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...