Monday, October 5, 2015

वैदिक धर्म म्हणजेच हिंदू धर्म?


डा. सदानंद मोरे यांच्या "अज्ञात पैलू थोरांचे" या स्तंभातील "व्यासांचे वारसदार ज्ञानेश्वर!" या लेखात काही अनैतिहासिक विधाने आली आहेत. वैदिक धर्म पुरातन असून वैदिक धर्म म्हणजेच आजचा हिंदू धर्म अशा आशयाचे विधान त्यांनी केले आहे. वैदिक धर्म वेदांवर आधारित असून तो यज्ञयागाच्या कर्मकांडाभोवती फिरतो हे त्यांना मान्य आहे. त्यात मुर्तीपुजेला स्थान नाही. वैदिक धर्म भारतात इसपू १५०० च्या आसपास आला. तो आर्य आक्रमकांमुळे किंवा धर्मप्रचारकांच्या माध्यमातून आला असे प्राच्यविद्येचे बहुसंख्य विद्वान मानतात. पण त्याहीपुर्वी सिंधू काळापासून आजतागायत चालत आलेला जो लिंगपुजकांचा/प्रतिमापुजकांचा धर्म होता त्याबाबत मात्र डा. मोरे यांनी त्यांच्या लेखात अवाक्षरही काढलेले नाही. वैदिक धर्मात यज्ञद्वारे आहूति देणे हेच अमूर्त देवतांना संतुष्ट करण्याचे माध्यम असून प्रतिमापुजा या धर्माला मान्य नाही. हिंदू हे आजही प्रतिमा/मुर्तीपुजक आहेत व ते वैदिक धर्मतत्वांच्या विरोधात आहे. एवढेच नव्हे तर हिंदू ज्या देवता पुजतात त्यातील एकही देवता ऋग्वेदात उल्लेखली गेलेली नाही. तीन वर्णाच्याच लोकांना वेदाधिकार होता हे मान्य करत असतांना ज्यांना वेदाधिकारच नाही ते वैदिक धर्मीय कसे असू शकतील याकडेही डा. मोरे यांनी कसे दुर्लक्ष केले हाही प्रश्न आहे. वैदिक स्त्रीयांनाही पुर्वकाळात वेदाधिकार होते. ते नंतर काढून घेतले हेही डा. मोरेंनी नमूद केले असते तर जरा वास्तवपुर्ण झाले असते.
या पार्श्वभुमीवर वैदिक धर्माला प्राचीन काळी पर्यायच (म्हणजे प्रतिस्पर्धी धर्म) नसल्याने या धर्माला फक्त "धर्म" म्हटले जायचे हे डा. मोरे यांचे विधान विपर्यस्त आहे हे उघड आहे. डा. रा. ना. दांडेकर यांनी सिंधू संस्कृतीचा धर्म हा मुर्ती/लिंग/मातृपुजकांचा असून नंतर कधीतरी जन्माला आलेल्या वैदिक धर्मापेक्षा तो पुर्णतया वेगळा होता. या संस्कृतीच्या मुख्य देवाला "सिब" असे म्हटले जात असून सिंधू संस्कृतीचा धर्म आदिशिवाचा होता हे स्पष्ट होते, असे नमूद केले आहे. (संदर्भ- Hinduism- Dr. R. N. Dandekar) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीही आपल्या "वैदिक संस्कृतीचा विकास" या ग्रंथात तसेच पाश्चात्य विद्वानांनीही आपल्या विवेचनांत सिंधू संस्कृतीचा धर्म शिव-शक्तीप्रधान असल्याचे स्पष्ट नमूद केलेले आहे. वेदपुर्व काळातच व्यापक प्रमाणात शिवप्रधान धर्माचे उत्खनित पुरावेही मिळत असता "वैदिक धर्माला पर्यायच नव्हता." ही डा. मोरे यांची मांडणी अनैतिहासिक व विपर्यस्त आहे हे उघड आहे. वैदिक धर्म हा शिव-शक्तीप्रधान, पुजा हेच कर्मकांड असलेला धर्म नव्हे हे उघड आहे. मग वैदिक धर्म हा हिंदू धर्म कसा हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो.
आजही सिंधूकाळातील मुर्ती-प्रतिमापुजकांचाच धर्म सर्वव्यापी असून वैदिक धर्माने त्याचे स्वतंत्र अस्तित्व राखलेले आहे. त्यामुळे वैदिक धर्म म्हणजेच हिंदू धर्म ही मांडणी सत्याला धरून नाही. वैदिक धर्मीयही बहुसंख्याकांच्या धर्म मुर्तीपुजकांचाच (म्हणजे शैव अथवा हिंदू) असल्याने कालौघात मुर्तीपुजक बनले असले तरी त्यांनी आपले वैदिकत्व त्यागलेले नाही या वास्तवाकडेही त्यांनी लक्ष द्यायला हवे होते असे मला वाटते.

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...