
मेरी म्यग्डालेन ही येशु ख्रिस्ताच्या जीवनातील अत्यंत महत्वाचे तितकेच विवादास्पद पात्र मानले जाते. ही येशु ख्रिस्ताची एकमेव स्त्री शिष्या होती. अलीकडच्या काळापर्यंत बायबलमधील दुस-या एका मेरीशी (जी वारांगना होती) तिचे साधर्म्य कल्पित तिची यथेच्छ बदनामीसुद्धा केली गेली आहे. पण ते वास्तव नाही हे अलीकडे संशोधकांनी शोधुन काढले आहे. एवढेच नव्हे तर तिचा येशु ख्रिस्ताशी विवाहसुद्धा झाला होता असेही नवे संशोधन समोर आले आहे.
म्यग्डाला भागातुन ग्यलीलीमद्धे आलेली मेरी रुपवती तर होतीच परंतु उच्च घराण्यातुन आलेली होती असे म्हणतात. तिचे वडील धनाढ्य सरदार होते, पण मेरीने अकल्पित जीवन जगण्याचा निर्धार केला आणि ती येशु ख्रिस्ताची शिष्या बनली.
ज्यू धर्मातील घुसलेल्या अनिष्ट परंपरांवर प्रहार करणारा येशू हा खरे तर धर्म सुधारक. तो जन्माला आला ज्यू म्हणून आणि म्रुत्युही पावला एक ज्यू म्हणुनच. पण त्याच्या बलिदानामुळे त्याच्याच शिष्यांनी प्रयत्नपुर्वक ख्रिस्ती धर्म स्थापन केला.
येशुच्या जीवनात तिचे स्थान खुपच उच्च दर्जाचे राहिले आहे. ल्युकनुसार येशुला सुळावर चढवले तेंव्हा ती येशुपासुन गर्भवती झाली होती. अशीही ख्रिश्चनांचीे श्रद्धा आहे कि येशुचे पुनरुत्थान झाले तेंव्हा त्याने पहिले दर्शन मेरीला दिले होते.
मेरीचे महत्व येथेच संपत नाही. ती तत्वद्न्यानातही अग्रेसर होती. येशुशी तिची झालेली प्रश्नोत्तरे बायबल साहित्यात येतात त्यावरुन तिच्या बुद्धीची झेप दिसुन येते. येशुच्या पुनरुत्थानानानंतर मेरीने सारे जीवन येशुच्या कार्याला वाहुन घेतले. ख्रिस्ती धर्माच्या स्थापनेत तिचाही मोठा वाटा असावा असा तर्क बांधता येतो. तिची तपस्या पाहुन देवदुतही तिला भेट देत असत असे म्हणतात. तिचा मृत्यु अल्जेरियामद्धे झाला. आजही तिची समाधी तेथे आहे आणि असंख्य ख्रिस्ती धर्मियांसाठी ते एक तिर्थस्तळ बनले आहे.
नंतर सनातनी चर्चने मेरी म्यग्डानेलला नाकारले. स्त्रीयांचे महत्व मान्य करायला तेंव्हा चर्च तयारच नव्हती. तिला ते बायबलमद्ध्ये येणा-या ज्या काही समान नांवाच्या मेरी आहेत, त्यातल्या त्यात मेरी नावाच्या अभागी स्त्रीशीच जुळवत राहिले. येशुच्याही आईचे नांव मेरीच होते, जिला चर्च आजही "कुमारिका मेरी" मानते. पण आता मेरी म्यग्डालेन ही स्वतंत्र व्यक्ती होती असे स्पष्ट दिसते.
मेरीचे चित्रण अगणित कादंब-या, नाटकांतून आधुनिक साहित्यात येते तसेच तिची चित्रेही जगप्रसिद्ध चित्रकारांकडुन रेखाटली गेली आहेत. त्यात लिओनार्दो द व्हिन्सी ते जोसे अन्टोनीलेझ सारखे महान चित्रकारही आहेत.
येशुच्या जीवनावर व त्याच्या तत्वज्ञानावर मेरीचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे. पण पुरुषप्रधान व्यवस्थेत मेरी म्यग्डानेल दुर्लक्षितच राहिली. मातॄदेवतेच्या उत्सवात तिचीही आठवण, एवढाच या छोटेखानी टिपणाचा उद्देश्य!