सध्या वेद हे हिंदू धर्माचे मुख्य अंग आहे असे मानले जाते. पण हिंदू धर्माची व्याख्या मात्र होत नाही, कारण तशी व्याख्या करण्यात वेदच अडचणीचे ठरतात हे धर्माभ्यासकांना माहितच आहे. एक तर वेद पठण, वेदोक्त संस्कार व वैदिक कर्मकांड करण्याचा/करवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त त्रैवर्णिकांना आहे, ज्यांची लोकसंख्या अधिकाधिक १५% आहे. उर्वरितांना तसे अधिकार कधीही नव्हते व नाहीत त्यामुळे वेद हे हिंदू धर्माचे मुलस्त्रोत आहेत असे मानणारे दांभिक ठरतात हे उघड आहे. परंतू वैदिकही हिंदुच आहेत या जाणीवपुर्वक जोपासल्या गेलेल्या भ्रमापायी अनेकांचा गैरसमज होतो हेही वास्तव आहे. हिंदू शब्दाची व्याख्या का झाली नाही यासाठी आपण आधीचे व्याख्या करण्याचे प्रयत्न पाहुयात.
खालील व्याख्या मी श्री. ज.स.करंदीकर, श्री. दा.न. शिखरे, पं. महादेवशास्त्री दिवेकर व डा. रा. ना. दांडेकर यांच्या विवेचनातुन घेतल्या आहेत.
१. "ज्याचे आईबाप हिंदू असतील तो हिंदु."
या व्याख्येतील त्रुटी अशी कि अहिंदू माता-पित्यांच्या संततीला हिंदु करुन घेतले तर ती त्याला लागु होत नाही.
२. हिंदुस्तानात जन्म झाला तो हिंदू.
या व्याख्येत परदेशात जन्म झालेल्या हिंदुंना बाहेर टाकले जाते तर ज्या मुस्लिम अथव अन्य धर्मियाचा जन्म हिन्दुस्थानात झाला आहे त्यांनाही हिंदू मानावे लागते.
३. जातीभेद मानतो तो हिंदू.
असे मानल्यास लिंगायतादी जातीभेद न मानणारे संप्रदाय अहिंदु ठरतात. एवढेच नव्हे तर ही व्याख्या जातीभेदाला गंभीर रुप देते.
४. जो हिंदु कायदा मानतो तो हिंदु.
काही विद्वान ही व्याख्या मानतात. पण दत्तक, वारसा, विवाह याबाबतीत हिंदु कायदा संदिग्ध आहे. शिवाय हिंदू कोड बिल हे बौद्ध व जैन धर्मियांनाही लागु असल्याने तेही हिंदू ठरतील, पण ते वास्तव नाही.
५. सावरकरांची व्याख्या:
"आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका
पित्रुभू: पुण्यभुश्चैव स वै हिंदुरेते स्म्रुत:
अर्थात सिंधु नदीपासुन समुद्रापर्यंत पसरलेली ही भारत्भूमी ज्याला वाडवडीलांची भूमी आणि पुण्यभुमी वाटते तो हिंदू होय.
ही व्याख्या प्रादेशिक आहे आणि भावनिक आहे. राष्ट्रवादासाठी ती योग्य असली तरी ती धर्माचे दिग्दर्शन करत नाही.
६. लो. टिळक यांची व्याख्या अशी आहे:
प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानाननेकता
उपास्यानामनियमं एतद्धर्मस्य लक्षणम
अर्थात: वेदांविषयी प्रामाण्यबुद्धी, साधनांची अनेकता आणि उपास्य नेमके कोण असावे याविषयी निश्चित नियम नसने, हे हिंदु धर्माचे लक्षण होय.
श्री. दा. न. शिखरे टिळकांच्या या व्याख्येवर आक्षेप घेतात ते असे: "वेदप्रामाण्य मान्य नसलेला चार्वाकापासून ते संतांपर्यंत एक अवाढव्य प्रवाह आहे तो या व्याख्येप्रमाणे हिंदू ठरत नाही. एवढेच नव्हे तर स्त्रीया आणि शुद्रांना मुळात वेदांचा अधिकारच नाहे. याखेरीज महत्वाचा प्रश्न असा कि वेदांच्या पुर्वीही हिंदु धर्म आस्तित्वात होताच कि! शिवाय "श्रुती-स्म्रुती-पुराणोक्त अशीही व्याख्या करता येत नाही कारण श्रुती अनेक असून त्यात खुपच मतभिन्नता आहे. पुराणांतील मतभेदांबाबत तर बोलायलाच नको. तसेच कोणते आचार आवश्यक आहेत हेही लोकमान्यांनी स्पष्ट केलेले नाहीत. त्यामुळे अव्याख्येयता हीच हिंदु धर्माची व्याख्या आहे असे म्हटले तर त्याचा व्यवहारात काही उपयोग होत नाही." ("सर्वश्रेष्ठ हिंदू धर्म": श्री. दा.न.शिखरे)
आता वेद हे हिंदू धर्माचे मुलस्त्रोत अथवा धर्मग्रंथ होऊ शकत नाहीत त्याचीही तपासणी केली पाहिजे. ती खालीलप्रमाणे-
१) वैदिक धर्मग्रंथांत (हिंदू नव्हे) इंद्र, वरुण, नासत्य, मित्र, इत्यादि जवळपास ६४५ देवता आहेत. यात एकही अन्य हिंदू पुजतात ती देवता नाही. यजुर्वेदात तर "न तस्य प्रतिमा अस्ति" म्हणत मुर्ती/प्रतिमापुजेचा निषेध तर केलाच आहे. (यजु. ३२.३) पण ऋग्वेद ७.२१.५ आणि १०.९९.३ मद्ध्ये शिवाची "शिस्नदेव" म्हणून निर्भत्सना केली असून लिंगपुजकांचा केवढा ्द्वेष वेदरचैते करत असत याचे स्पष्ट दिग्दर्शन होते. विनायक गणपतीला वैदिक लोक तर विघ्नकर्ता मानत असत, विघ्नहर्ता नव्हे हे तर सर्वविदित आहे. म्हणजे ज्या देवता हिंदू भजतात, त्यांचा निर्देशच मुळात वेदांमद्ध्ये अवमानात्मक येतो ते ग्रंथ अर्थातच हिंदुंचे धर्मग्रंथ असू शकत नाहीत.
२) शिवाला यज्ञाचा विध्वंसक मानले जाते. यज्ञांत शिवाला हवि दिला जात नाही. शैव अथवा शैवप्रधान मुर्तीपुजक लिगरुपाने शिव-शक्ती पुजा करतात, यज्ञ हा शैवांचा अर्थात हिंदुंचा कर्मकांडाचा भाग नाही. रुद्र आणि शिव यांचा काडीएवढाही संबंध नाही हे मी अन्यत्र दाखवून दिलेलेच आहे.
३) वेद अथवा वैदिक समाजरचना ही पुरुषसत्ता प्रधान असून वेदांत फक्त अदिती, रात्री, पृथ्वी, सरस्वती व उषस या स्त्रीदेवता आहेत. अदिती (देवतांची माता) सोडली तर बाकी नदी व निसर्गातील घटनांच्या स्त्रैण प्रतिनिधी आहेत. हिंदू शैवप्रधान धर्मात मात्र शिव व शक्ती हे नेहमीच युग्म स्वरुपात समतेने पुजले जातात.
४) शिवपुजा सिंधू पुर्व काळापासून प्रचलित असून वेदरचना ही अत्यंत उत्तरकालीन आहे. त्यात शिवप्रधानता नसल्याने ते हिंदू धर्माचे अंग होऊ शकत नाहीत. वेदरचना भारतात झालेली नाही. एतद्देशियांचा धर्म हा वैदिक धर्मापेक्षा सर्वस्वी वेगळा असल्याचे हेच कारण आहे. त्यामुळे वैदिक साहित्य हे हिम्दू धर्माचा स्त्रोत नाहीत.
५) वैदिक लोकांत जानवे घालण्याची प्रथा नव्हती. फक्त यज्ञप्रसंगी यज्ञोपवित (जानवे) घालण्याची प्रथा होती. परंतू हा धर्म भारतात आल्यानंतर या धर्माच्या लोकांनी अन्य धर्मियांपासून आपले वेगळेपण दाखवण्यासाठी जानवे नित्य घालण्यास सुरुवात केली. (The Indian Encyclopaedia, Volume 1, edited by Subodh Kapoor)
६) वैदिक आचार व तत्वज्ञान सर्वस्वी वेगळे असून त्या धर्माबाहेर जे लोक होते त्यांना ते शूद्र म्हणत. त्यांना वेदाधिकार असण्याचे कारण नव्हते व नाही कारण त्यांचा धर्म सर्वस्वी स्वतंत्र होता. त्यांचे स्वत:चे पुरोहित होते व आहेत, जे आज मागे ढकलले गेले आहेत...उदा गुरव. कारण पोटर्थी वैदिकांनी बव्हंशी देवतांचे अपहरण केले अथवा स्वसमाधानासाठी त्यांना वैदिक देवतांशी जुळवायचा अयशस्वी प्रयत्न केला. शक्तीला अदितीशी तर शिवाला रुद्राशी, विठ्ठल-बालाजीला (जे शैव होते) त्यांना वैदिक विष्णुशी जुळवायचे प्रयत्न केवळ पोटार्थी कारणासाठी होते, एकधर्मीय होते म्हणून नाही.
७) वेदांशी हिंदुंचा कधी संबंधच आला नसल्याने वैदिक धर्म म्हणजे हिंदू हे कोनालाही मान्य होण्याचे कारण नाही.
८) वैदिक स्मृत्या या वैदिक धर्मापुरत्या मर्यादित होत्या. अन्यांनी त्या पाळल्याचे एकही उदाहरण नाही. शिशुनाग, नंद, मौर्य, सातवाहन ते हरीहर-बुक्क हे सारे सम्राट शूद्र होते. वैदिक धर्मनियमांनुसार शुद्रांना राजेपण तर सोडाच...संपत्तीसंचय करण्याचाही अधिकार नाही. (पहा - मनुस्मृती)
९) वेदांतील एकही देवता हिंदू व्यक्ती पुजत नाही, त्यांची मंदिरेही नाहीत. वेदांतिल त्या देवता वैदिक धर्मियांच्याच होत्या त्यामुळे हिंदुंना त्या पुज्य वाटण्याचे काही कारण नाही.
१०) वैदिक मंत्र त्रैवर्णिकांसाठी तर पुराणोक्त शुद्रांसाठी अशी वाटणी पुरातन काळापासुन होतीच. पुराण्काळ नंतरचा नसून "पुराण" या शब्दातच पुरातनता निहित आहे. पौराणिक मंत्र हे सर्वस्वी आजही ज्या देवता हिंदू पुजतात त्यांबाबत असून वैदिक मंत्र हे वैदिक देवतांचे असतात. ही विभाजनी सरळ सरळ दर्शवते कि शुद्रांचा धर्म वेगळा होता व आहे तर वैदिकांचा वेगळा आहे.
वरील अल्प विवेचन पाहता वेद हे हिंदु धर्मियांचे ना मुलस्त्रोत आहेत ना धर्मग्रंथ आहेत. ते वैदिकांचे धर्मग्रंथ असून त्यांच्याशी व ते प्रमाण मानणा-यांशी हिंदुंचा संबंध नाही. वेदांमद्ध्ये हिंदुंना उपयुक्त असे काहीएक नसून उलट हा जन्माधारित विषमतेचे तत्वज्ञान मांडणारे ग्रंथ आहेत हे पुरुषसुक्तावरुनच स्पष्ट दिसते. विषमतेच्या तत्वज्ञानाच्या प्रभावात हिंदुही ती उच्चनीचता व जातीभेद पाळु लागले हा त्यांचा दोष असून वैदिक आपला प्रभाव निर्माण करण्यात त्यामुळेच यशस्वी झाले असे म्हणने क्रमप्राप्त आहे. हा वर्चस्वतावादी प्रभाव झिडकारुन लावल्याखेरीज हिंदुंचे कल्याण नाही एवढेच!
(हिंदुंचे तत्वज्ञान व त्यांचे धर्मसाहित्य कोणते याबाबत सविस्तर नवीन लेखात देतो.)