इंद्रजीत कुलकर्णी व मेधा पाटील...
कोल्हापुरात अत्यंत निर्दयपणे मारले गेलेले प्रेमविवाहित दांपत्य. हे घृणास्पद कृत्य केले ते मुलीच्याच भावंडांनी. सख्ख्या बहिणीचा आणि मेव्हण्याचा गळा त्यांनी कसा चिरला असेल? कोठून येतो हा निर्दय पाशवीपणा? या भयानक हत्याकांडाची विशेष चर्चा महाराष्ट्रात झाली नाही. माझे मित्र प्रकाश पोळ यांनी लोकसत्तातून लिहिल्यामुळे वाहिनीवर चर्चा झाली. त्या चर्चेत माझे स्नेही प्रा. हरी नरके यांनीही महाराष्ट्रीय जातीयवादाचे मर्म उलगडून दाखवले. फेसबुकवर बोटचेप्या खंती आल्या पण त्यात यातील दाहकता समजण्याएवढा पाचपोच नव्हता. म्हणजेच जातीयवादाच्या केवढ्या गहन गर्तेत महाराष्ट्र सापडला आहे यावर मंथन (झालेच तर) करण्याची आवश्यकता आहे.
सांस्कृतिक/वैचारिक लढे, वादविवाद होत राहणे हे सुदृढ समाजाचे लक्षण म्हणता येईल, पण त्यात, असल्या वादांशी काडीइतकाही संबंध नसलेल्या, कोवळ्या जीवांच्या अजरामर प्रेमभावनेला, त्यांच्या सहजीवनाच्या स्वप्नांना अशा क्रूर पद्धतीने कायमचे नष्ट करु पाहणा-या विकृतींना स्थानच असू शकत नाही. दोषेंना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असल्या मागण्या ठीक आहेत. पण मुळात असल्या घटना घडणारच नाहीत यासाठी आपापल्या द्वेषबुद्ध्यांना नष्ट करणारी सामाजिक विचारधारा आम्हाला प्रभावशाली करता येत नसेल तर महाराष्ट्राचे धिंदवडे निघतच राहणार!
प्रकाश पोळांनी अत्यंत सत्य मांडलेय...मरणारा मुलगा ब्राह्मण होता म्हणून कथित पुरोगामी गप्प बसले काय? जी मुलगी मेली ती तर तशाच उच्च म्हणवल्या जाणा-या जातीतील...मारणारे तिचे सख्खे भाऊ. बहिणीने उच्च असो कि तथाकथित नीच जातीतील मुलाशी लग्न केलेच कसे या प्रश्नाने त्यांचा तिळपापड व्हावा व निर्दयतेने दोन हत्या व्हाव्यात आणि मरणारा मुलगा ब्राह्मण होता म्हणून हे तथाकथित पुरोगामी शांत बसले असतील तर मात्र या लोकांना "फुरोगामी" म्हणणारे निंदक, संघी, योग्यच आहेत असे म्हणावे लागेल. कारण त्यांची तीच लायकी आहे.
मी या हत्याकांडाचा तीव्र निषेध करतो.
