हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे अथवा प्रतिज्ञाचे पालन करण्यावर व आत्मसंयमावर विशेष भर असतो. वैदिक साहित्यात जे वैदिक धर्मनियमांचे पालन करत नाहीत आणि स्वत:चीच स्वतंत्र साधना पद्धती वापरतात आणि अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य या पाच महाव्रतांचे पालन करतात ते व्रात्य असा अर्थ जैन धर्मीय घेतात.
पण
वैदिक साहित्यात अव्त्र्णारे व्रात्य नेमके कोण होते याबाबत विद्वानांत अनेक
मत-मतांतरे आहेत. व्रात्य हा शब्द वैदिक साहित्यात इतक्या परस्परविरोधी अर्थाने
वापरला गेला आहे कि गोंधळ होणे स्वाभाविक आहे. वर्णसंस्कारलोप झालेले वैदिक म्हणजे
व्रात्य या अर्थापासून ते व्रत करणारे व्रती म्हणजे व्रात्य, समूहातून च्युत
झालेले ते व्रात्य (पाणिनी अष्टाध्यायी ४/३/५४). लाट्यायन श्रौतसूत्रानुसार
(८/५/२) व्रतीन म्हणजे लुटमार करून जगतात ते आयुधजीवी म्हणजे व्रात्य, तांड्य
ब्राह्मणानुसार लाकडी तख्त असलेल्या गाडीतून, हाती बिनादोर किंवा बाण नसलेले
धनुष्य घेऊन हवे तिथे फिरणारे आणि नृत्य, संगीत इ. विद्या मानवी समूहाला शिकवणारे
ते व्रात्य अशा अनेक व्याख्या आपल्याला पहायला मिळतात. मनुस्मृतीत (१०, २१-२३)
मध्ये ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य संस्कारलोप झाल्याने समाजच्युत झालेले ते
व्रात्य असून त्यांची संतती हीन जातीय मानली आहे. ‘सावित्रीपतित’
झाल्यामुळे-म्हणजे उपनयनाच्या संस्काराचा लोप झाल्यामुळे –जातिभ्रष्ट झालेले असतात, ते ‘व्रात्य’
होत, अशा आशयाचा निर्देश मनुस्मृतीत आलेला आहे
(२·३९). अधम, पतित, पाखंडी, भटक्या अशा लोकांची गणनाही व्रात्यांमध्ये
केली जात असे. पण अगदी याउलट वर्णन अथर्ववेदात केले
असल्याचे आपल्याला दिसून येते.
अथर्ववेदातील
पंधरावे कांड हे ‘व्रात्यकांड’ असून,
त्यात व्रात्यांचा गौरव केला आहे. ह्या कांडाच्या नवव्या व दहाव्या
सूक्तांत म्हटले आहे की, सभा, समिती,
सेना आणि सुरा ज्याला अनुकूल आहे, असा व्रात्य
ज्या राजाकडे अतिथी म्हणून जातो, त्या राजाने त्या
व्रात्याला स्वत:पेक्षा श्रेष्ठ समजून त्याचा सन्मान करावा. अथर्ववेदातील व्रात्य आत्मध्यानी योगी असून वेगळ्या
प्रकारचे यज्ञ करणारे आहेत. व्रात्यांना ‘महादेव’ असेही म्हटले गेले आहे. हे
व्रात्य आर्यच असून वेगळ्या प्रकारचा यज्ञ करीत असत असे पंचविश ब्राह्मणानुसार
दिसते. पण त्यांचे यज्ञ हे वरुणादी वैदिक देवांना उद्देशून नसून अन्य देवाला
उद्देशून असत. शिवाय त्यांच्या यज्ञात सोमाचा समावेश नसे. पण त्याच वेळेस रुद्र ही
त्यांची प्रमुख देवता होती व रुद्राला त्याचमुळे व्रातपती म्हटले गेले आहे असेही परस्परविरोधी
विधान केले गेले आहे. रुद्र ही उशीरा का होईना वैदिक दैवतांमध्ये सामील केली
गेलेली देवता होय.
ऋग्वेदात
मात्र व्रात्य समाज कोठेही अवतरत नाही. त्यामुळे व्रात्य हे भात्र्तातील्च
वैशिष्ट्यपूर्ण रीतीने व्रतांचे पालन करणारा समण (जैन) समुदाय असला पाहिजे व वैदिक
मंडळीने याच शब्दाचा नंतर वेगवेगळ्या अर्थाने हेटाळणीने वापर केला असावा हे
विद्वानांचे मत ग्राह्य धरावे लागते. पुढे तर व्रातपती ही सद्न्या गणपतीला अर्पण
करण्यात आली.
व्रात्य ही एक भटकी जमात होती हे लोक
मुळात आर्यवंशाचेच होते परंतु आर्यांच्या समाजव्यवस्थेपासून फुटून निघालेले आणि
त्यामुळे तिच्यापासून पूर्णतः स्वतंत्र असे जीवन जगणारे
होते, असे मत आल्ब्रेख्त वेबर ह्यांनी व्यक्त केले आहे. मॉरिस ब्लूमफील्ड ह्यांच्या मते व्रात्य हे आर्यवंशीय परंतु अब्राह्मण जमातीतून आर्य
ब्राह्मणांमध्ये आलेले लोक होत. पण हे आणणे “संस्कार” केल्याखेरीज होत नसे. तांड्य
ब्राह्मणात (१७.२-४) केलेली व्रात्यस्तोम यज्ञाची रचना त्यासाठीच, म्हणजे धर्मांतर
करण्यासाठी केली गेली. आरंभीच्या काळात वैदिक धर्मियांनी एतद्देशीय अनेकांना
धर्मप्रचाराद्वारे आपल्या धर्मात घेऊन कोणता ना कोणता वर्ण बहाल केला. असे करतांना
त्यांना काही विधीन्च्या निर्मितीची गरज होती.
सिंधूच्या
खोऱ्यात राहणारे लोक व्रात्यच होते, असेही मत व्यक्त
करण्यात आले आहे. मोहें-जो-दडो येथील उत्खननात सापडलेल्या एका मुद्रेत तीन मुखे
कोरलेली असून त्यांतील एक पुरुषाचे, दुसरे स्त्रीचे आणि
तिसरे त्यांच्या पुत्राचे आहे, असे निरीक्षण नोंदविण्यात आले
असून ही त्रिमूर्ती म्हणजे व्रात्यांचा देव असावा, असाही
तर्क केला जातो.
वैदिक
वाङ्मयात व्रात्यांची जी वर्णने आलेली दिसतात, त्यांनुसार व्रात्य
हे उघड्या युद्धरथात बसून संचार करीत धनुष्य, भाले अशी आयुधे
ते जवळ बाळगीत डोक्याला पागोट्यासारखे शिरस्त्राण, अंगावर
तांबडे काठ असलेली वस्त्रे, पांघरायला दोन घड्या घातलेले
मेंढ्याचे कातडे असा त्यांचा वेश असे. त्यांचे नेते करड्या रंगाची वस्त्रे परिधान
करीत आणि गळ्यात चांदीचे अलंकार घालीत व्यापार वा शेती ह्यांपैकी ते काहीच करीत
नव्हते. आर्य ब्राह्मणांची भाषाच ते असम्बब्धपणे बोलत असे वैदिक वाड्मय सांगते.
सामवेदाच्या
तांड्य ब्राह्मणामध्ये व्रात्यांना शुद्ध करून आर्य
ब्राह्मणांत समाविष्ट करण्यासाठी करावयाच्या ‘व्रात्यस्तोम’
विधीचे वर्णन आहे (१७.१.४). येथे व्रात्यांचे चार प्रकार सांगितले
आहेत : (१) आचारभ्रष्ट, (२) नीच कर्मे करणारे, (३) जातिबहिष्कृत आणि (४) जननेंद्रियाची शक्ती नष्ट झालेले. ह्या चार
प्रकारच्या व्रात्यांसाठी चार व्रात्यस्तोमही सांगितलेले आहेत. ह्या सर्व
व्रात्यस्तोमांचे विधान अग्निष्टोम यागाप्रमाणे आहे. काही ठिकाणी शूद्र पिता आणि क्षत्रिय माता ह्यांच्या संततीसही
व्रात्य म्हणून संबोधिले जात असे, असे दिसते.
काहींच्या मते
व्रात्य हा भारतातील एक आर्येतर समाज होता. त्याच्यात विद्वान,
सदाचारी, सतत भ्रमण करीत राहणारे असे ‘अर्हत’ आणि लोकांना पीडा देणारे, त्यांना लुटणारे ‘यौध’ असे दोन
मुख्य वर्ग होते अशीही माहिती वैदिक साहित्यात मिळते.
वरील आणि इतर अशा अनेक परस्परविरोधी व्याख्या व विवरणे पाहून
वैदिक समाजातील संस्कार लोप झालेले वैदिक ते व्रात्य आणि वैदिकेतर समाजातील व्रतांचे
पालन करणारे ते व्रात्य असे किमान दोन व्रात्यांचे मुख्य प्रकार व त्यांचेही काही
उपप्रकार असावेत असे दिसते. ऋग्वेदात व्रात्य शब्दाचा उल्लेख नाही. व्रत शब्द
मात्र अनेकदा येतो. “अदब्धानी वरुणस्य व्रतानी” (ऋ. १.२४.१०) असे वरुणाला उद्देशून
म्हटले आहे. येथे व्रतानी म्हणजे “अटल नियम” असलेला असा अर्थ आहे. व्रत करणारा जो
त्याला व्रती म्हणायला हवे होते, व्रात्य हा शब्द अर्थवाही होत नाही हेही येथे
लक्षात घ्यावे लागते. शिवाय गौतम बुद्ध व महावीरांनाही वि. का. राजवाडे यांनी राधामाधवविलासचम्पू
या ग्रंथाच्या प्रस्तावनेत “व्रात्य क्षत्रीय” असे म्हटले आहे. म्हणजेच वैदिक
संस्कारलोप झालेले क्षत्रीय. मुळात जर हे दोघेही महामानव कधी वैदिक धर्माचेच
नव्हते तर ते संस्कारलोप झाल्याने व्रात्य क्षत्रीय कसे बनतील? पण सर्वांचा उदय
वैदिक परंपरेतच झाला हे दाखवण्याचा छंद वैदिकांनी अहर्निश जपल्याचे दिसते.
अथर्ववेदामध्ये व्रात्य हा शब्द प्राधान्याने येतो व तोही
गौरवाने. पण येथे लक्षात घ्यायची बाब म्हणजे अथर्ववेदाची रचना वैदिकांमधून फुटून
निघालेल्या एका गटाने केली. हे लोक बहुदा व्रात्यांच्या तत्वद्न्यानाने प्रभावित
असावेत. त्यामुळे वैदिक धर्मीय इसवी सनाच्या दुस-या शतकापर्यंत तरी या वेदाचा
समावेश वैदिक धर्मसाहित्यात करत नव्हते. मनुस्मृतीही तीनच वेदांना प्रमाण मानते व
अथर्ववेदाचा उल्लेखही करत नाही. याचे प्रमुख कारण असे सांगितले जाते कि हा वेद
प्रामुख्याने एतद्देशीय तंत्रांची व व्रात्यविचारांची नक्कल अथवा त्या विचारांचे वैदिकीकरण
करण्यासाठी म्हणून लिहिला गेला होता. उपनिषदे ही समण तत्वज्ञानाने प्रभावित आहेत
हे आता मान्य झाले आहे. व्रात्य आणि जैन समण एकच असे यावरून म्हणता येते. वैदिक
धर्मियांनी अनेकदा या विशेषणाचा विपर्यास केला असल्याने एक गोंधळ निर्माण झाला आहे
असे निश्चयाने म्हणता येते.
-संजय सोनवणी
No comments:
Post a Comment