जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थी नेता कन्हय्याकुमारने जेलमधुन सुटका झाल्यानंतर दिलेले भाषण सध्या फार गाजते आहे. कन्हैय्या एक उत्कृष्ठ वक्ता आहे यात शंका बाळगण्याचे कारण नाही. तो साध्या सरळ शब्दांत थेट तुमच्या हृदयाला हात घालु शकतो. तो तुमचीच भाषा बोलतो. तरुणाईचा जोश आणि युवकांत स्वाभाविक असलेला व्यवस्थेबद्दलचा रोष त्याच्या देहबोलीतुन आणि शब्दाशब्दातुन अगदी अंगावर येईल असा जाणवतो. त्याचे हे भाषण वक्तृत्वाचा उत्कृष्ठ नमुना होते. इतके कि मोदींना वक्तृत्वात प्रबळ प्रतिस्पर्धी मिळाल अशीच चर्चा सोशल मिडियात आहे.
याहीपेक्षा महत्वाची बाब घडतेय ती ही कि कन्हैय्याकडे सध्यस्थितीतील अराजकावर मत करु शकणार संभाव्य त्राता म्हणुन, भविष्यातील एक नेत म्हणुन त्याच्यकडे पाहिले जात आहे. आंबेडकरी व अन्य बहुजनवादी चळवळीम्तेल विचारवंत वकार्यकर्तेच नव्हेत तर अन्यही सामान्य ते बुद्धीवादी कन्हय्याकडे आकृष्ट झाले आहेत हे सध्याचे चित्र आहे. आम्हा भारतियंना कधे अण्णा हजारे तर कधी केजरीवाल, कधी मोदी तर कधी हर्दिक पटेल यांच्या रुपात आपला एकमेव त्राता पाहण्याची एक खोड आहे. एकाने निराश केले कि दुसरा शोधायचा हा धंदा आपल्याला नवा नाही. यामुळे देशाचे व आपले काय भले झले आहे, वैचारिकतेत काय गुणात्मक वाढ झाली आहे याचा विचार केला तर उत्तर निराशाजनक आहे हे मात्र खरे.
कन्हैय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यासाठी जे पुरावे जमा केले गेले, विशेषता: व्हिडियो क्लिप्स या छेडछाड करण्यात आल्याचे समोर अल्याने देशभर वादळ उठले. माध्यमांच्या विकावू भुमिकांवर झोड उठली. कन्हय्या प्रकरणाचे राजकारण तत्पुर्वीच सुरु झाले होते. वादग्रस्त वक्तव्ये सत्ताध-यांतील अनेक बुजुर्गांनी केली. त्याहीपेक्षा संतापजनक घटना म्हणजे कन्हैय्याला कोर्टाच्या आवारात खुद्द वकीलांनीच मारहान केली. पोलिस स्टेशनमध्येही भाजपा कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारले. न्यायव्यवस्थेची अशी विटंबना भारतात पुर्वी कधी झाली नसेल. त्यात् ज्या उमर खालिदसह त्यच्या सहका-यांनी देशविरोधी घोषणा दिल्या असा आरोप आहे ते मात्र फरार झाले. कन्हैय्याच्या वाट्याला सहानुभुती येणार हे उघडच होते. सत्ताधारी भाजपा हे प्रकरण हतालण्यात अपेशी ठरलेच व उन्मादी वर्तन/वक्तव्ये करत त्यांनी सरकारला चार पावले मागे नेले. त्यांचे वर्तन निषेधार्हच् आहे यात शंका बाळगण्याचे काहीएक कारण नाही.
कन्हैय्याने देशद्रोही घोषणा दिल्या किंवा त्य घोषणा दिल्या जात असतांना तो तेथे उपस्थित होता याबाबतचे निर्णायक पुरावे अद्यापही समोर आलेले नाहीत. असे असतांना आरोप ठेवले जाणे, आधी कस्टडी व नंतर तब्बल १५ दिवस त्याला जेलमद्ध्ये रहावे लागणे हा आपल्या पोलिस यंत्रणॆतील त्रुटींचा भागाहे. म्हणजे एकदा का गुन्हापत्रात तुमच्यावर काही कलमे लावली गेली कि न्यायालयिन प्रक्रियेत, प्रत्यक्ष सुनावनीच्या वेळी ,जोवर तुम्ही ती कलमे चुकीची आहेत अथवा तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध करु शकत नाही तोवर या अटक-जेल या मांडवाखालून जावेच लागते. पोलिस अनेकदा अज्ञानाने किंवा जाणीवपुर्वक अशी काही कलमे गुन्हापत्रात टाकुन देतात कि हा सारा छळवाद सहन करणे आरोपीला भाग पडते.
जेलमद्ध्ये गेल्यावर, एक दिवस जरी घालवावा लागला तर, माणसावर तो एक आघातसतो. एक तर मानूस अधिक कट्टर बनतो, व्यवस्थेचा द्वेष करु लागतो किंवा शहाणा असेल तर आत्मचिंटन करत अधिक तेजाने उजळु शकतो. कन्हैय्याने जेलमधुन बाहेर पडल्यावर दिलेले भाषण त्या द्रूष्टीने पहावे लागते. तो स्थिरचित्तहोत, आपल्या विचारांशी प्रामाणिक होता हे महत्वाचे आहे.
पण भाजप/अभाविप/भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा उन्माद थांबला नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. "कन्हैय्याला गोळी घाला...११ लाख रुपये मिळवा." किंवा "कन्हैय्याची जीभ छाटा...५ लाख रुपये मिळवा" या अक्षरश: तालिबानी घोषणांनी सत्ताधारी पक्षातले काही लोक आयसिसच्या आतंकवाद्याम्च्या पंक्तीला बसत आहेत असे विदारक व विषण्ण करणारे चित्र निर्माण झाले आहे. शासनाने अशी वक्तव्य करणा-यांवर व पोस्टरे छापणा-यांवर अद्याप तरी कारवाई केलेली नाही. पक्षातुन निलंबन ही काही कायदेशीर कारवाई नाही. त्यांच्यवर गुन्हे दाखल व्हायला हवेत. त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.
कन्हय्याला पाठिंबा आहे तो त्याच्या न्यायाच्या लढाईसाठी. एका तरुणाचे भवितव्य न्यायालयीन त्रुटींमुळे बरबाद होऊ नये यासाठी. या देशात घटनात्मक राष्ट्रवाद राहिल कि संघाचा सांस्कृतिक राष्ट्रवाद याचा एकदाचा निवाडा आवश्यकच आहे. सध्या वातावरण असे आहे कि विरोधी पक्ष अथवा विचारवंतही हा लढा कसा लढायचा या संभ्रमाने ग्रस्त आहेत. कन्हैय्यामधे ते एक त्राता किंवा संधी शोधु लागले आहेत हे त्यांच्या वैचारिकतेचा पाया भक्कम नसल्याने असे म्हणावे लागेल.
कन्हैय्याचे भाषण प्रभावी झाले असले तरी त्यातील एकही मुद्दा नवा नाही. वेगळे तत्वज्ञान नाही. भुखमरी...मनुवाद...भांडवलवाद इइइइ पासून आजादी हा त्याच्या भाषणाचे मुख्य सुत्र. याबाबत भारतात आजतागायत अस्म्ख्य समाजसुधारक, विचारवंत आणि राजकीय नेतेही बोलत आले आहेत. लिहित आले आहेत. आंदोलनेही झाली आहेत. अण्णा हजारेंचे जनलोकपालसाठीचे आंदोलन तर जगभर्गाजले. अण्णा त्या वेळचे हिरो होते. ती जागा केजरीवालांनी कशी हिरावली हे समजलेच नाही. लगोलग त्यानंतर विकासाचा नारा देत मोदी सर्वांवर हावी पड्ले. अलीकडेच हार्दिक पटेल हा देशभरच्या चर्चांचा केंद्रबिंदु बनला होता. रोहित वेमुलाच्या आत्पहत्या प्रकरणाने निर्माण झालेले रोषाचे वातावरण पेटत असतांनाच जे एन यु मधील हे प्रकरण घडले. त्यातुन कन्हैय्या एका नवीन मुक्तिदात्याच्या स्वरुपात अवतरला आहे असा आभास अगदी विचारवंतांना व्हावा याचे नेमके कारण काय?
भाजपा सरकार सत्तेत आल्यापासूण चर्चेत राहिले आहे ते विकासकामांसाठी नाही, अर्थव्यवस्थेच्या तब्बेतीला सुधरवण्याच्या प्रयत्नांसाठी नाही...तर शिक्षणाचे वैदिकीकरण, गोमांस बंदी व अखलाखची हत्या, साधु-साध्व्यांची वादग्रस्त वक्तव्ये, आरक्षणावरची संघप्रमुखांची संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये, पुरस्कार वापस्या, महिलंना मंदिरप्रवेश इइइइइ. या सा-या चर्चांतच देश ढवळत राहिला. विकासाची चर्चा करायला विशेष वावच उरला नाही. निष्प्रभ पडलेल्या विरोधी पक्षांनीही अशी चर्चा घडवण्याचा प्रयत्न केला नाही. विचारवंतही सत्ताधा-यांनी निर्माण केलेल्या या वायफळ, समाजात फुट पाडणा-या प्रयत्नांना केवळ प्रतिक्रियावादी होत केवळ त्याला विरोध कसा करायचा या प्रश्नात अडकले. नको त्य चर्चांमद्ध्ये उभयपक्षांनी आपला वेळ वाया घालवला.
भाजपा/संघ हा पुरोगाम्यांचा विरोधाचा पहिल्यापासून केंद्रबिंदु राहिला आहे. पलटवार म्हणूण संघवादीही पुरोगाम्य्यांना "फुरोगामी" "सिक्युलर" असे हिणवाय़चे प्रमाण तर अजब वाटावे एवढे वाढलेले आहे. खरेतर एका सुंदर संकल्पनेलाच, घटनेच्या मुळ गाभ्यालाच बदनाम करन्याचा हा उद्योग आहे. हे खरे असले तरी गोंधळलेले पुरोगामीही त्याला जबाबदार नाहीत असे कोण म्हणेल?
या गोंधळातुन बाहेर येत तत्वचिंतकाच्या आणि प्रबोधकाच्या भुमिकेत शिरुन आजच्या परिस्थितीला तोंड देवू शकेल अशी मांडणी नव्याने करायची आवश्यकता होती व आहे. घटनात्मक राष्ट्रवादाचे जतन हाच आपल्या देशापुढील मुख्य प्रश्न आहे. संघाचा सांस्कॄतिक राष्ट्रवाद रोखला पाहिजे. हे सर्व खरे. पण कन्हैय्याच्या रुपात ज्यांना एकाएकी एक मसिहा दिसू लागला आहे हे चिंताजनक व कदाचित बौद्धिक दिवालखोरीचे लक्षण आहे.
कन्हया ज्या कम्युनिस्ट विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतो त्यांना तरी घटनात्मक राष्ट्रवाद मान्य आहे काय? मुळात "लाल सलाम’ मद्ध्ये रक्तरंजित राज्यक्रांतीचे सुचन आहे. साम्यवादाला अंतिम उद्दिष्ट म्हणूण लोकशाही मान्य आहे काय? माओवाद कोणाचे अपत्य आहे? माओवादाचे वाढते समर्थक आणि वारंवार होणा-या हिंसा कशाचे लक्षण आहे? संघाच्या जशा अनेक उपशाखा आहेत तशाच साम्यवाद्यांच्या आहेत हे सत्य नाही काय? एकीकडे धर्मवाद आहे तर दुसरीकडे मानवी जीवनाला विसम्गत, अनैसर्गिक असा पोथिनिष्ठच साम्यवाद आहे. साम्यवादी राष्ट्रांचे अखेर काय झाले हे आपल्याला सोव्हिएट रशियाच्या पतनातुन चांगले माहित आहे. चीनने साम्यवादी राज्यव्यवस्था स्विकारली असली तरी अर्थव्यवस्था मात्र भाम्डवलशाहीवादी का बनवावी लागली याचा विचार केला पाहिजे.
परंतू केवळ भाजपा-संघाचे शत्रु म्हणूण दुस-या कोनत्याही शत्रुलाच आपला भागीदार बनवायचा विचार कोणत्या शहाणपणाचा निदर्शक आहे? साधनशुचितेचा विचार कोठे गेला? डा. आंबेडकर साम्यवादाचे खंदे विरोधक होते. त्यांनी मार्क्स नव्हे तर बुद्ध निवड्ला. हे त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण होते. पण आज आंबेडकरवादीही, कन्हैय्या म्हनतो म्हणून, लाल-निळ्य़ाची युती कशी होइल या तंद्रीत आज असतील तर त्यांना बाबासाहेबांचा मार्ग मान्य नाही असा अर्थ घ्यायचा काय? तसेही माओवादाचे आकर्षण आज शिक्षित वंचितांमद्धे अनिवार वाढलेले आहे. काही नेते तर उघडपणॆ नक्षक्लवादाचे समर्थन करतात. त्यात आता कन्हैय्या त्यांचा, शेतक-यांच्या मुलांचा आदर्श होत असेल, विचारवंतही मोहून जात कन्हैय्याचे समर्थन करण्याच्या नादात, भाजपाला / संघाला विरोध करण्याच्या नादात, नकळतपणे आपण कोणत्या विघातक विचारसरणीला देशात मोकळे रान देणार आहोत हाही विचार करत नसतील तर मोठाच दुष्काळ पडला आहे असे समजावे लागेल.
आपला प्रश्न घटनात्मक राष्ट्रवादाचा आहे. विकासाच्या दिशा त्यातच आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहिष्णुता ही तीउदात्त मुल्यांचे जतन झाले तरच सामाजिक सौहार्द वाढेल व त्यातुनच विकासाच्या वाटा मिळतील यात शंका असायचे कारण नाही. सांस्कृतिक राष्ट्रवाद हा जसा धोका आहे तसाच साम्यवादी राष्ट्रवादही धोका आहे. एका धोक्याला तोंड देता येत नाही म्हणून दुस-या धोक्यला जे जवळ करतात ते एका परीने भस्मासुरालाच जन्म देतात याचे भान ठेवायला हवे.
कन्हैय्या वरकरणी घटनेवर विश्वास् दाखवतो. मग तो तसाही इतर अनेक दाखवतात. जोवर व्यापक संधी मिळत नाही तोवर या देशात प्रत्येकाला तो दाखवणे भाग आहे. हे राजकारण झाले. त्यामुळे कन्हैय्याने घटनेवर विश्वास्दाखवला म्हणून हुरळुन जाण्यात अर्थ नाही. आम्ही भारतीय आदर्शांच्या नेहमीच शोधात असतो व स्वत:ला कोना न कोणाचे गुलाम बनवून घेण्याच्या नादात असतो. मानवी स्वातंत्र्याचे महत्व आम्हाला अजुन समजलेले नाही. आमचा इतिहासच अशा बौद्धिक गुलामीचा आहे. राजकीय गुलामगि-या त्यातुनच आलेल्या आहेत. स्वतंत्र तारतम्याने विचार करण्याची क्षमता आम्ही गमवुन बसलो आहोत. वैचारिक नव्हे तर भावनिक लाटांवर आरुढ होण्य़ात आम्ही धन्यता मानतो. कोणाचे ना कोणाचे भक्त होतो. ज्याक्षणी माणुस कोणाचा भक्त बनतो तो त्याक्षणी आपल्या स्वतंत्र विचार करण्याच्या क्षमतेची आहुती देत असतो.
कन्हैय्याला न्याय मिळालाच हवा. त्याच्या स्वातंत्र्य़ाचे रक्षण, मग त्याची विचारसरणी कोणतीही असो, व्हायलाच हवे. त्याच्या हत्येच्या धमक्या देना-यांना गजाआड करावे. पण त्याच्यात हिरो शोधणॆ, त्याची तुलना भगतसिंगांशी करणे हे मात्र अतिरेकी झाले. कन्हैय्याचे राजकीय, वैचारिक भवितव्य काय असेल हे माहित नाही. त्याला त्याच्या विचारांना पसरवण्याच्या कार्यालाही शुभेच्छा. पण सुज्ञ नागरिकांणी साम्यवादाच्य विळख्यात नकळत जावु नये. संघ भाजपाचा विरोध करायला सम्यक, घटनात्मकच मार्ग वापरले पाहिजेत.