Thursday, March 24, 2016

वैदिक आणि हिंदूवादाचे तत्वज्ञान


भारतात वैदिक धर्मियांना कर्मकांडात्मक व तात्विक आधारावर विरोध करणारे अनेक लोक होऊन गेले. आजही आहेत. महात्मा फुलेंमुळे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला नवतत्वज्ञान मिळाले. या वादात ब्राह्मण/क्षत्रीय व वैश्यही हिंदुच आहेत असे गृहित धरले गेले होते व इतर दोन वर्ण सोडून टीकेचा भर केवळ ब्राह्मणांवरच होता. या वादाला ब्राह्मणांनी भीक घातली नाही, कारण त्यांचचे उच्चवर्णीय हे स्थान अबाधित राहत होते. बहुजनांमद्ध्ये धर्मेतिहासाचे अध्ययन/विश्लेशन करण्याची परंपरा जवळ जवळ नाहीच असे म्हटले तरी चालेल. त्यामुळे वैदिक धर्मव्यवस्थेवरील हल्ले हे पोकळ, अर्धवट ज्ञानावर व बव्हंशी शि्वीगाळ करतच झाले. हा मार्गच चुकीचा होता. वैदिक धर्मच मुळात स्वतंत्र, वेगळा धर्म असून परकीयांनी एतद्देशियांना दिलेल्या हिंदू नांवाचा वैदिक धर्मियांनी खुबीने उपयोग करुन घेतला हे लक्षातच आले नाही.

पाश्चात्य विद्वान हा फरक जाणून होते. त्यांनी हिंदू धर्म व ब्राह्मणी धर्म (Brahmanical Religion) अशी आपल्या विवेचनात ठळक विभागणी केली होती. भारतातही हा धर्म सनातन अथवा सनातन वैदिक धर्म या नांवानेच ओळखला जात होता. भारतातील विद्वानही वैदिक धर्म, वैदिक संस्कृती व अवैदिक अथवा अनार्य संस्कृती या नांवाने हे दोन स्वतंत्र धर्म व संस्कृतींचे विभाजन मान्यच करत होते व आजही करत आहेत. असे नसते तर सिंधू संस्कृतीला वैदिक संस्कृती ठरवण्याचे आटोकाट प्रयत्न आधुनिक काळातही केले गेले नसते. सरळ "हिंदू संस्कृती" म्हणुन तिचा उल्लेख केला गेला असता व तेच संयुक्तिक झाले असते. वैदिक संस्कृती-धर्म हे स्वतंत्र आहेत याची जाणीव, विशेषत: ब्राह्मणांना, होती व आहे. तिचे वर्चस्व/श्रेष्ठत्व व भारतातील जेही काही चांगले आहे, अगदी भाषाही, ती वैदिक संस्कृतीची देणगी आहे असे सिद्ध करत बसण्याचे उद्योग विसाव्या शतकात तर फार वाढले. आर्य आक्रमण सिद्धांताने वैदिकही स्वत:ला आद्य आक्रमक समजत आपले मुळस्थान अन्यत्र (भारताबाहेर) शोधू लागले. अलीकडचेच मराठी पुस्तक, मधुकर ढवळीकर यांचे, "आर्यांच्या शोधात" हे पुस्तक या आर्यवादाच्याही प्रभावाचा व भारतीय संस्कृतीचे मूळ वैदिकच असल्याच्या प्रयत्नांचा एक उत्तम नमुना आहे. आर्य सिद्धांताच्या विरुद्ध आजकाल बोलायची पद्धत आली आहे तीही शास्त्रीय कारणांनी नव्हे तर आपण परकीय वंशाचे ठरतो या भयातून हेही लक्षात घ्यावे लागते.

म्हणजेच वैदिक धर्म वेगळा आहे, श्रेष्ठ आहे याची स्पष्ट जाणीव वैदिकांच्या जाणीवेत व नेणीवेत असतेच. वैदिक धर्म स्वतंत्र असल्याची मान्यता पुरातन काळातच होती. हिंदू धर्माचा उदय पौराणिक काळात झाला असे विद्वान मानतात. पण वैदिक धर्म वेगळाच राहिला. म्हणजे वैदिकांसाठी वेदांतील मंत्र तर हिंदूसाठी पौराणिक मंत्र अशी वाटणी आरंभीपासुनच होती. जेही काही संस्कृतात आहे ते म्हणजे केवळ वैदिकांचे हा समज तर नंतरच्या क्लाळात एवढा प्रबळ बनवला गेला आणि इतर भाषांना अपभ्रंश अथवा संस्कृतोद्भव ठरवत एतद्देशियांना स्वतंत्र भाषाही नव्हती कि काय असे वाटायला लावणारा न्यूनगंड निर्माण केला गेला. वैदिक वर्चस्व ठेवत ही सर्व मांडणी केली गेली व हिंदुंच्या बोकांडी वैदिक भूत बसले. ते कसे क्रमश: बसत गेले, कोणत्या काळापासून आणि त्यासाठी कोणत्या राजकीय/सामाजिक/आर्थिक परिस्थित्या कारणीभूत ठरल्या याचे विवेचन मी स्वतंत्रपणे केलेलेच आहे. येथे एवढेच सांगणे महत्वाचे आहे कि वैदिक कर्मकांडे आणि तत्वज्ञान सर्वस्वी वेगळी होती तर शिव-शक्तीदि मुर्तीपुजा करणा-यांची संस्कृती व धर्म हा वेगळाच होता. शिव-शक्तीप्रधान पुजकांच्या संस्कृतीचे स्पष्ट भौतिक पुरावे सिंधू कालापासून देशभर आढळतात...आज तर ते मोजता येत नाहीत एवढे विपुल आहेत. पण त्यांची गणना अर्वाचीन केली गेली. य धर्माची हजारोंने आगमादि शस्त्रे उपलब्ध असतांना वैदिक साहित्याच्या अभ्यासाकडे जेवढे लक्ष द्यायला हवे होते तेवढे लक्ष दिले गेले नाही. त्याला दोष देत नाही. काही कारणही नाही. आम्हीच आमच्य धर्माभ्यासाची परंपरा त्यागली असेल तर कोणाला का म्हणून दोष द्यावा?

अनेक विद्वान (व माझे विरोधकही) दावा करत असतात कि वैदिक व अवैदिक (आर्य व अनार्य) धर्मांत संम्मीलन होउन हिंदू धर्म निर्माण झाला आहे. दोन विभिन्न टोकांच्या धर्मात होणारे सम्मीलन स्वागतार्ह आहे यात शंका नाही. समजा तसे झालेच असते तर खालील बदल दिसले असते:

१) वैदिक कर्मकांड व वेदोक्त अधिकार, ज्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी सरसकट खुले झाले असते.
२) अवैदिक देव स्विकारतांना त्यांच्यावर वैदिक "संस्कार" करण्याची व भाकडकथा निर्माण करण्याची गरज न भासता त्यांना त्यांच्या मुळच्याच स्वरुपात वैदिकांनी स्विकारले असते.

थोडक्यात वैदिक व अवैदिक हा फरकच शिल्लक राहिला नसता. ते खरे समान पायावरील सम्मीलन झाले असते. विभेद राहिलाच नसता. सर्वांना एकधर्मीय म्हणवुन एकत्र येता आले असते. पण तसे झालेले नाही.

पण विभेद आहे. स्पष्ट व ठळक विभेद आहे. व तोही वैदिकांचे हिंदुंवरील वर्चस्व या पद्धतीचा आहे. जणु काही हिंदू धर्माची मालकी कोणीतरी वैदिकांना देवून टाकली आहे. इतकी कि वैदिक म्हणतील तोच हिंदू धर्म असे मानण्याची प्रथा जनमानसात निर्माण झाली आहे. या देशातील सर्व काही निर्मिती वैदिकांचीच असून हिंदू हे त्यांचे गुलाम होते, त्यांचे पुर्वज हे कुचकामी, वैदिकांनी हरवलेले, जातीव्यवस्था लादून घेत स्वत:ला अजुन अवमानित करुन घेणारे होते अशी विचारधारा सामान्यांचीच नव्हे तर सुशिक्षित हिंदूचीही बनल्यामुळे ते हीणगंडाचे शिकार झाले आहेत. बरे, तशी वस्तुस्थिती असली...तसे पुरावे असले तरी मान्य करायला हरकत नाही...पण या बौद्धिक आंधळेपणातुन वास्तव शोधायचही प्रयत्न कोणी केला नाही व हिंदुंचे योगदान उच्च रवाने संशोधन करत मांडण्याचा प्रयत्न केला नाही. जेंव्हाही कोणी असा प्रयत्न केला त्यांना, "कशाला हिंदू धर्मात फुट पाडता...?" असे विचारत नाउमेद करण्याचे प्रयत्नही कमी झालेले नाहीत.

जी फुट होती व आहे ती सांगण्यात फुट पाडण्यासारखे मुळात काही नाही. कोणाला यामुळे आपले वर्चस्व संपेल, माहात्म्य संपेल असे वाटत असेल तर तो त्यांच्या न्यूनगंडाचा प्रश्न आहे. स्वतंत्र धर्म असुनही, तसे वागत असुनही ते मान्य न करुन त्यांनी आपली बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करण्याचे खरे तर काही कारण नाही. ज्यांना हे माहित नाही त्यांना माहित करुन स्वत्व समजावुन घ्यायला प्रेरित करण्याचा हा प्रयत्न आहे. असंख्य सामाजिक समस्या या अभ्यासातून सुटतील याची मला खात्री आहे.

आणि वैदिक गेली दोनशे वर्ष आपली पाळेमुळे शोधण्याच्या आकांतात शेकडो ग्रंथ आणि हजारो लेख लिहित असतांना हिंदुंनी मात्र आपली पाळेमुळे शोधु नयेत, शोधली तर त्याला "फुट पाडणे" म्हणायचे ही विकृती आहे, दांभिकपना आहे. असे करतांना तात्विक प्रश्न अथवा उत्तरे न घेऊन येता वैदिक मंडळी प्राय: दिशाहीण प्रश्न विचारुन भरकटवण्याचा मुर्ख प्रयत्न करत बसतात. याचे कारण यातुन आपण एकाकी पडू अशी भिती त्यांना वाटते हे आहे. म्हणजे आपल्या वैदिक रक्षणाला आयते हिंदू गुलाम भेटावेत हे त्यांची आंतरिक इच्छा आहे. त्यामुळेच समतेच्या विरोधात हेच नेहमी असतात. त्यांना प्रश्न न विचारणा-या समाजाची "समरसता" हवी असते. संस्कृती म्हणजे त्यांच्या दृष्टीने वैदिक संस्कृतीच असते व तिचेच माहात्म्य गायचे असते. हिंदुंनी मात्र आपल्य संस्कृतीबाबत बोलायचे नाही. बोलले तर तुम्ही फुट पाडणारे, ब्रिगेडी, कम्युनिस्ट अथवा ब्राह्मण द्वेष्टे ठरवले जाता. मला हे चारी ठरवण्यचे प्रयत्ब्न आजतागायत झालेले आहेत.

कारण त्यांना वैदिक गुलामीतुन हिंदुंना स्वतंत्र होऊ द्यायचे नाही. हिंदुंना मुस्लिम-ख्रिस्त्यांचे भय दाखवत वैदिक धोका मात्र समजू द्यायचा नाही. ते स्वाभाविक आहे. वर्चस्ववादी मनोवृत्त्या हेच करणार, त्यात वावगेही काही नाही.

पण आम्हाला आमचे अस्तित्व व परंपरा समजावून घेण्याचा आम्हा हिंदुंना अधिकार आहे कि नाही?

मी तोच प्रयत्न करतो आहे. मी वैदिक धर्माचाच काय कोणत्याही धर्मियाचा द्वेष करत नाही. मी माझे...माझ्या धर्माचे अस्तित्व समजावून घेत माझ्या बांधवांना ते समजावुन सांगण्याचाच नव्हे तर त्यांनीही आपल्या धर्मेतिहासाचे स्वतंत्र अध्ययन करत वैदिक कचाट्यातून हिंदू धर्म सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत हा प्रयत्न आहे. ज्याचे योगदान त्याला दिले जायलाच हवे यात शंका असण्याचे कारण नाहे. पण ज्यात ज्यांचा काडीइतकाही संबंधच नाही त्यांनी ते योगदान लुबाडावे हे काही योग्य नाही. वर्तमानातही मी पाहतो आणि या प्रवृत्तीचा खेद वाटतो. माझा विरोध असेल तर या प्रवृत्तीला आहे.

असे समजा ही सांस्कृतिक स्वातंत्र्याची लढाई आहे. सत्य समजावून घेत विद्वेषरहित आत्माभिमानाने प्रेरित हिंदू समाज हवा...वर्चस्वाखली पिचलेला नाही हे आपल्याला समजावून घ्यावे लागेल. लबाड्या दाखवल्या कि वैदिक आणि बाटगे वैदिक फारच चिडतात. ते चिडतात हाच त्यांच्या लबाड्यांचा मोठा पुरावा आहे. त्यांच्याकडे उत्तर नाही...!

याला अल्प अपवाद आहेत आणि मी त्यांच्याबदल कृतज्ञच असतो.

थोडक्यात, वैदिक धर्म आणि हिंदू धर्म पुर्णतया वेगळे आहेत. हिंदुंनी हे समजावून घेतल्याखेरीज त्यांच्या मानसिकतेत क्रांतीकारी बदल होत त्यांचा अभ्युदय होणे शक्य नाही. 

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...