Thursday, April 14, 2016

अस्मितांच्या बाजारात.....

भारत आधुनिक तेंव्हाच होईल जेंव्हा आम्ही भारतीय नागरिक आचार-विचार प्रगल्भ, जिज्ञासू आणि भविष्यवेधी होऊ. आम्हाला महापुरुष बोट धरुन चालवतात. पुढची दिशाही दाखवतात. काळाचा घाला कोणाला सोडत नाही. बोट सुटते. आम्ही ज्या दिशेला बोट दाखवले त्या दिशेकडे जायचा मात्र प्रयत्न करत नाही. जेथे साथ सुटली तेथेच रेंगाळत राहतो. स्मारके बनवणे अथवा जयघोषात रममान होणे हाच जणू आमच्या अनुयायी असंण्याचा एकमेव निकष बनतो. आम्ही पुढे जात नाही. आम्ही त्यांचे काम, विचार पुढे नेत नाही. अजुन वरचे मजले बांधायचे बाकी आहेत हे आमच्या गांवीही नसते. 

आम्ही स्मरण करतो म्हणजे नेमके काय करतो? अभिवादन करतो म्हणजे नेमके काय करतो? खरे तर यातुन आम्ही काहीच करू शकत नाही हेच सिद्ध करतो. म्हणून आमच्या समस्या त्याच जुनाट आणि बुरसटलेल्या आहेत. आमच्या जातीअंतांच्या सभा वक्त्यांच्या जातीची नांवे घेतच होतात. आमचा पाण्याचा प्रश्न स्वातंत्र्यपुर्व काळात होता तो आजही तसाच आहे. आमच्या अर्थिक आणि जातीय विषमता यात काही बदल झालेला नाही. वैचारिक प्रगल्भता आली असावी असे वाटावे अशी सामाजिक, शास्त्रीय, आर्थिक संशोधनेही आम्ही केली नाहीत. ज्ञानाची कोठारे एका टिचकीवर आज उपलब्ध झाली पण आम्ही त्या साधनांचा गैरवापरच जास्त केला. आमचेच पंख आम्ही वांझ, खोटारड्या अस्मितांच्या लालसेपायी कापून घेतले. खरे म्हणजे जीवंत बोट जी दिशा दाखवत होते ती दिशा आम्ही सोडली आणि काल्पनिक बोटाच्या छत्रछायेत आमचे गौरव शोधत राहिलो.

गौरवात भर घालु न शकणारे नागरिक ज्या देशात होतात त्या देशाला भविष्य नसते. अभिवादन सार्थ कृतीतून होते. ज्ञान-विचार-समग्र सामाजिकतेत भर घालून होते, पोकळ आठवणी काढत आणि त्यातच रमत होत नसते याचे भान आम्हाला आजही नाही. अस्मितांच्या बाजारात महापुरुष हरवले आहेत. आम्ही दिग्भ्रमित माणसे बनलो आहोत नि त्यामुळेच स्वजातीय महापुरुषांना घट्ट कवटाळुन बसत स्वत: तर प्रतिगामी होतच आहोत, महापुरुषांनाही छोटे बनवत आहोत. त्यांच्यात अस्मिता शोधणे महत्वाचे असले तरी त्यांच्या पेक्षाही किमान दोन पावले पुढे जाण्याचे व खरी आदरांजली वाहण्याचे आपल्याला भान नाही. बाबासाहेबांना दर वर्षी जयंती नि पुण्यतिथीला अभिवादनाचे कार्यक्रम होतात. पण आमच्यात कोणती वैचारिक प्रगल्भता आली याचा आम्ही कधी विचार करणार? त्यांनी ज्या वैचारिक, सामाजिक स्वातंत्र्याकडे बोट दाखवले त्या दिशेने कधी वाटचाल करणार?

( 13.4.2016. सिंहगड टेक्निकल इंस्टिट्यूट, आंबेगांव -पुणे येथे विद्यार्थ्यांसमोर बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त बोलतांना मांडलेले विचार.)

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...