Monday, May 8, 2017

भांडवलदरांची मोठी बाजारपेठ!

१९७९ सालची गोष्ट. नासाने अवकाशात सोडलेली स्कायलॅब पृथ्वीवर कोसळणार होती. गांवाकडे अफवांचा बाजार जोरात होता. ती नेमकी कोठे पडणार हेही पाहित नव्हतं. गांवाकडे ही स्कायलॅब पडून सारे मरणार ही अफवा एवढी जोरदार होती कि अनेकांनी आहे नाही ते विकुन जीवाची मुंबई करण्याचा चंग बांधला. आवडीचे सारे खाऊन घ्यायचे ठरवले. थोडक्यात भयलाटच उसळली होती. वृत्तपत्रांशिवाय काही कळण्याचे साधन नव्हते. गांवात एकच पेपर येई. त्यात रोज बातम्या आणि अन्य अफवा असतच. सारे जगणे त्या मरणाच्या भयाभोवती फिरत होते. अखेर नासाच्या शास्त्रज्ञांनी स्कायलॅब दूर समुद्रात पाडली आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
कयामत येणार, जजमेंटचा दिवस जवळ आला आहे अशा अफवा भिंतींवर रंगवलेल्या तुम्हीही पुर्वी पाहिल्या असतील. शंभर वर्षात पृथ्वीवरून स्थलांतर करावे लागेल असे आता शास्त्रज्ञही सांगू लागलेत. आधार काय तर तो काही नाही. पण भयनिर्मितीचे धंदे नेहमीच जोमात असतात. असंख्य उत्पादने आपण या कोणत्या ना कोणत्या कृत्रीम भयापोटीच विकत घेत असतो हे आपल्या लक्षातही येत नाही. पन्नाशी ओलांडलेले आयुर्वेदाचे नुस्खे अभ्यासत बसतात...वापरतातही नि त्यांची उपयोगिता सांगत बसतात. आम्हीच तुमचे तारणहार, विरोधी पक्षाहाती सत्ता दिली तर तुमचे वाटोळे पक्के असे राजकीय पक्षही बजावण्यात वस्ताद असतात! भयभीत माणुस ही भांडवलदारांची सर्वात मोठी बाजारपेठ असते. धर्मांनी याचा सर्वात जास्त वापर केलाय! सर्वात मोठे भय तर मृत्युचे. त्याचा व्यापार इस्पितळेही कसा करतात हा अनुभव सर्वांना आहेच!
भयभीत माणसाला काहीही बरे करू शकत नाही. बव्हंशी आजार याच मानसिकतेतून उद्भवतात हे आपल्या लक्षातही येवू नये एवढी आपली व्यवस्था चतूर असते. भयापासून दूर राहणे, अकारण चिंता करत दिवस वाया न घालवणे हे अधिक श्रेय:स्कर नाही काय?

तत्वज्ञानातील अनुत्तरीत प्रश्न आणि मानवी भविष्य

  ईश्वर आहे की नाही, चेतना म्हणजे काय, विश्वाला काही अर्थ आहे की नाही, मुक्त इच्छा अस्तित्वात असते की नाही, वास्तवाचे खरे स्वरूप का...