
"बापू, नाझींची बाजू सध्या प्रबळ आहे. ते जिंकतील असे वातावरण आहे."
"ते आज तरी खरे आहे. पण हिंसक आणि हुकुमशाही वृत्ती जिंकू शकणार नाहीत असे मला आतला आवाज सांगतो."
"बापू, इतिहासात अनेकदा नृशंस प्रवृत्ती जिंकलेल्या आहेत. नाझीही जिंकतील कदाचित. काय सांगावे?"
"जवाहर, तुला काय वाटते?"
"नाझी जिंकले तर भारत त्यांच्या ताब्यात जाईल. हिटलर तसेही भारतीयांकडे कसे बघतो हे त्यानेच जाहीर म्हटले आहे."
"मला माहित आहे."
"पण आपल्याला वाईटात वाईट घडेल हे गृहित धरून काही पर्यायी योजना करायला हवी बापू!"
"तुला काय वाटते?"
" स्थिती अनिश्चित आहे. दोस्त जिंकले तरी ते हरल्यासारखेच असतील...त्यांची प्रचंड हानी होते आहे. त्यांचे साम्राज्य लयाला जाईल! आज नाहीतर उद्या."
"आणि नाझी जिंकले तर?"
"ते युद्धखर्च वसूल करण्यासाठी वसाहतींना प्रचंड लुटतील आणि आहे त्यापेक्षा भयंकर वंशवादी गुलामी आणतील!"
" त्यात आपण कोठे बसतो?"
"बापू, कोठेही नाही. मी हिटलरचे निमंत्रण नाकारले आणि मुसोलिनीची भेट टाळली. तुम्हाला मानवाला गुलाम करणारे वंशद्वेष्टे आवडत नाहीत हे मला माहित आहे."
"सुताचा धागा तुटला....थांब जवाहर....हं...आता बोल...तुला वंशवादी आवडत नाहीत...चुकीचे असले तरी लोकशाहीवादी आवडतात..बरोबर?"
"हो बापू!"
"त्यांच्याशी लढता येते. अधिकार सनदशीर मार्गाने मागता येतात. ज्युंचा झाला तसा या काळया हिंदुंचाही वंशविच्छेद होवू शकतो...जर नाझी दोस्तांना हरवू शकले तर...बरोबर?"
"हो. मग इंग्रजांचे राज्य जावून त्यांचे येईल. शेवटी हा संघर्ष वसाहतवादासाठी आहे बापू!"
"बरोबर. आज ते जिंकत आहेत?"
"हो बापू!"
"समजा ते जिंकले तर त्यांच्या बाजुला आपले कोण आहे?"
"आज तरी कोणी नाही बापू...रासबिहारी आहेत...पण त्यांची शक्ती नगण्य आहे. ते तेवढे प्रभावी नाहीत."
"तुला असे वाटत नाही कि त्यांच्या बाजुलाही आपलाच भारतवादी माणूस हवा?"
"म्हणजे?"
"जवाहर...असे समज...नाझी जिंकनार. सध्याचे वातावरण तसेच आहेत. दोस्त मार खात आहेत. अमेरिका चूप आहे. माझा आतला आवाज सांगतो कि नाझी जिंकनार नाहीत. तरीही आपल्याकडे पर्याय पाहिजे! त्यांच्याही बाजुला आपला माणूस पाहिजे. म्हणजे ते जरी जिंकले तरी भारतीय सत्ता आपल्याच माणसाकडे येईल!"
"हे कसे शक्य आहे बापू?"
"सूत मस्त कातले जातेय. जवाहर..."
"ते मी पाहतोच आहे बापू!...पण या स्थितीवर उपाय काय?"
"काही नाही. पण आपल्याला स्वातंत्र्य कोणत्याही किमतीवर हवे. या महायुद्धात कोणतीही बाजू जिंकू शकते, आणि जवाहर आपण कोणाच्याही बाजुने नाही. युद्धखोरी मानवजातीला शाप आहे. पण समजा नाझी जिंकले तर काय याचा विचार आपण केला पाहिजे. ते जिंकले तर ब्रिटिश वसाहती आपोआप त्यांच्या वसाहती होतील. आणि आपण जसे शांततामय मार्गाने ब्रिटिशांशी लढू शकतो तसे यांच्याशी नाही लढू शकत."
"बरोबर बापु"
"मग त्यांचा बाजुने आपलाही माणूस पाहिजे. समजा ते जिंकले तरी आपल्या देशाची हानी होणार नाही!"
"पण मग लोकशाही कशी येईल बापू?"
"नाही येणार! पण त्या हुकुमशाहीचा प्रवर्तक आपलाच मानूस असेल तर ती हुकुमशाहीही मानवता केंद्रीत तरी असणार!"
"तुम्ही अतार्किक अव्यवहारीच बोलता बापू!"
"नाझी गटाकडे मी माझा सैनिक पाठवतो आहे जवाहर...धक्का बसल्यासारखा माझ्याकडे पाहू नकोस...तुला काय वाटले, दोस्त हरले तर काय या स्थितीचा मी विचार केलेला नाही? माझा पर्यायी सैनिक मी तयार ठेवला आहे!"
"कोण बापू?"
"सुभाष...."
"....तो तयार होईल?"
"जवाहर...देशासाठी तो काय करणार नाही? चल, जाऊ दे...आपल्याला फक्त वातावरण बनवायचय...बनवु...आणि हे बघ सुत आता तुटत नाहीय!"