
आर्य, द्रविड, सेमेटिक, मंगोलाईड आदि वंश संकल्पना चुकीची असून सारी मानवजात होमो सेपियन या उत्क्रांत मानव प्रजातीची वंशज आहे. जे शरीर रचना, रंग आदि फरक दिसतात ते स्थानिक भूगर्भ, भूगोल आणि पर्यावरणाच्या कारणामुळे हे १९५२ सालीच युनेस्कोने सर्व मानव-अनुवांशिकी शास्त्रज्ञांच्या प्रदिर्घ चर्चेनंतर जाहीरनामा प्रसिद्ध करून स्पष्ट केले आहे. आर्य म्हणवणारे लोक इराणी होते आणि ऋग्वेद-अवेस्ता त्याचे लिखित पुरावे आहेत. आर्य हा वंश नव्हता. वैदिक धर्माने आधी स्वत:ला आर्य धर्माचे म्हणवले. नंतर आर्य या शब्दाचाही अर्थ बदलला आणि सभ्य गृहस्थ असा त्याचा अर्थ झाला तर धर्माचे नाव सनातन व नंतर वैदिक धर्म असे झाले. हा धर्म हेल्मंड खो-यातून अल्प प्रचारकांमुळे भारतात आला व मिशनरी पद्धतीने पसरवला गेला. हे धर्मांतरीत अर्थात येथीलच होते. त्यामुळे यांच्या जनुकांत लक्षणीय फरक पडणे शक्य नव्हते.
महत्वाचे म्हणजे राखीगढीतील सांगाड्यांत सापडलेल्या जनुकांचा काळ आणि वैदिक धर्म भारतात आल्याचा काळ यात किमान तेराशे वर्षांचे अंतर आहे. राखीगढीतील जनुकांत तेथील लोक एतद्देशियच होते हे सिद्ध होणे स्वाभाविक आहे. त्यावरुन "आर्य" येथीलच होते, मुलनिवासी होते असा निष्कर्श काढणे अडानीपणा आहे. आर्य हा वंश नसून धर्म होता अणि तो फार फारतर इसपू १२०० मध्ये भारतात आला. हा धर्म एतद्देशीय नाही. पण तोही एतद्देशीय ठरवण्याच्या नादात आर्य हा कोणी वंश नसुनही "आर्य येथलेच" सांगायचा प्रयत्न होतो आहे. हा म्हणजे पणतुने खापर पणजोबाला जन्माला घातले असे सांगण्यासारखे आहे. शिवाय ऋग्वेदातून समोर येणारी संस्कृती आणि सिंधू संस्कृतीत कसलेही साधर्म्य नादी तर इराणमधील अवेस्तन संस्कृतीशी आहे हे सांगायलाही डा. शिंदे विसरले.
सिंधू संस्कृती कोणत्याही आक्रमणाने नष्ट झाली नसून प्राकृतीक संकट आणि संपलेला विदेश व्यापार यामुळे लोकांनी शहरे सोडून ग्रामीण भागात वस्त्या सुरु केल्याने शहरे ओस पडली व अवशेषग्रस्त झाली हे कधीच सिद्ध झाले आहे. त्या आपत्तीकाळात (इसपू १८००) वैदिक धर्माचा जन्मही झालेला नव्हता. पण एके काळी लोकप्रिय झालेल्या आर्य आक्रमण-विस्थापन सिद्धांतामुळे मुलनिवासीवाद, द्रविदवाद जन्माला आला होता. मुलनिवासीवाद्यांना अजुनही हा सिद्धांत प्रिय आहे हेही एक वास्तव आहे. पण भौतिक लिखित पुराव्यांच्या कसोटीवर तो टिकत नाही तसेच वैदिक धर्म येथलाच हा अट्टाग्रहही टिकत नाही. वैदिक धर्मीय आज स्वत:ला हिंदू म्हणवून घेत असले तरी त्यांच्या धर्मपरंपरा अत्यंत स्वतंत्र आहेत.
डा. वसंत शिंदे यांनी जनुकांच्या आधारे आर्य येथलेच (जनुके कोणाचा धर्म/वंश/भाषा सांगत नाहीत) असा सिद्धांत ते सांगाडे ज्या काळातील आहेत तेंव्हा आर्य/सनातन/वैदिक धर्म स्थापन झालेलाही नसता मांडला आहे तो समूळ अवैज्ञानिक आणि भारतीयांची दिशाभूल करणारा आहे. ही सरकारमान्य सांस्कृतीक लबाडी आए एवढेच या संदर्भात म्हणता येते. अर्थात शिंदेंचा सिद्धांत भारतीय सोडून पाश्चात्य आनुवांशिकी अभ्यासकांना मान्य नाही हेही महत्वाचे.