अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर काही काळात इसपूच्या पहिल्या शतकात पश्चिमोत्तर भारतावर आक्रमण झाले ते शकांचे. शक (सिथीयन) मुळचे मध्य आशियातील गवताळ प्रदेशात राहणारे भटके लोक. ते उत्तम प्रतीचे घोडेस्वार आणि योद्धे होते. ग्रीकांच्या सत्तेचा अस्त बल्ख प्रांतातून घडवून आणायलाही हीच जमात कारणीभूत झाली.
राजा मोएस हा पहिला शक अधिपती मानला जातो. त्याने अफगाणिस्तानपाठोपाठ गिलगीट-बाल्टीस्तानमधील व्यापारी मार्गांवर सत्ता स्थापन केली. काबुल-कंदाहार ही शहरेही या काळात भरभराटीला आली. या काळात अफगानिस्तानाच्या भूमीत नव्याने सांस्कृतीक अभिसरण झाले. भारतीय भागावरही त्याची सत्ता असल्याने त्याने जी नाणी पाडली ती द्वैभाषिक होती. एका बाजूला गांधारी प्राकृत तर दुस-या बाजूला ग्रीक भाषा असे त्यांचे स्वरूप होते. अझेस या शक राजाच्या मृत्युनंतर दक्षिण अफगाणिस्तान गोन्डोफारेस या पार्थियन राजाच्या अंमलाखाली आला. (इसपू २०.) अराकोशिया, सिस्तान, सिंध आणि पंजाब एवढा भाग त्याच्या आधिपत्याखाली होता. काबुल खोरेही जिंकून घेत तक्षशिला ही त्याने राजधानी बनवली. पण ही राजवट अल्पजीवी ठरली. गोन्डोफारेसच्या मृत्युनंतर विखंडीत होत गेली आणि प्रभावहीन बनली. असे असले तरी शक प्रान्ताधीपाती (क्षत्रप) भारताच्या विविध भागांवर राज्य करतच राहिले. उत्तरेतील आणि पश्चिमेकडील नहपान, रुद्रदामन हे आपल्याला परिचित आहेतच. पण या शकांनी भारतीय समाजव्यवस्था स्वीकारून ते येथेच मिसळून गेले. त्यांचा वेगळा प्रभाव फारसा शिल्लक राहिलेला आढळून येत नाही.
पार्थियन सत्ता अल्पावधीत नष्ट होण्याचे कारण घडले ते मध्य आशियातील युएची शाखेतील कुशाणांच्या आक्रमणाचे. कुशाणांनी अफगानिस्तनचा भूभाग झपाट्याने आपल्या अंमलाखाली तर आणलाच पण उत्तर भारतही क्रमश: त्यांच्या प्रभावाखाली गेला. या साम्राज्याचा संस्थापक कुजूल कडफिसेस हा होय. (पहिले शतक) त्याने तक्षशिला हीच आपली पहिली राजधानी बनवली. कुशाण साम्राज्याचा काळ भारताच्या इतिहास व संस्कृतीवर मोठा प्रभाव टाकणारा काळ मानला जातो. त्यांनी भारतातच आपली राजधानी वसवून अफगाणिस्तान ते मध्य आशियापर्यंत एक विशाल साम्राज्य उभे केले. या काळात बौद्ध धर्माचे वर्चस्व वाढल्याचे आपल्या लक्षात येते. मध्य आशियात बौद्ध धर्म तर गेलाच पण या विस्थापित बौद्धांनी पाली व गांधारी प्राकृत भाषेवर संस्कार करत वेगळ्याच परिणत भाषेचा विकास सुरु केला. तिचे विकसित रूप म्हणून संस्कृत भाषेचा उदय दुस-या शतकापर्यंत झाल्याचे आपल्याला आढळून येते. कुशाण काळाची ही एक मोठी उपलब्धी मानता येईल. पुढे संस्कृतचा स्वीकार वैदिक, हिंदू, जैन आणि अन्य धर्मियांनीही करायला सुरुवात केली कारण स्थानपरत्वे अर्थबद्दल न होता किमान शब्दात व्यापक अर्थ देण्याचे सामर्थ्य त्या भाषेत होते.
कनिश्क या घराण्याचा सर्वात बलाढ्य सम्राट होय. याच्या काळात अफगाणिस्तानातील बल्ख हे जागतिक व्यापारी मार्गांचे भरभराटीला आलेले मध्यवर्ती केंद्रबिंदू बनले. एका अर्थाने बल्ख प्रांत जागतिक संस्कृतींचे मिलनस्थल बनला. साम्राज्याचा व्याप मोठा असल्याने या काळात व्यापारी मार्गांना सरक्षण मिळाल्याने व्यापारही मोठ्या प्रमाणात भरभराटीला आला. भारतातील हिमालयीन भागातून मध्य आशियाला जोडणारे प्राचीन व्यापारी मार्गही या काळात मोठ्या प्रमाणात व्यापार, राजकीय आणि लष्करी हालचालीसाठी वापरले गेले. तक्षशिलेवरून अफगाणिस्तानात जाणारे व्यापारी मार्गही या काळात मोठ्या वर्दळीने व्यापले जावू लागले. सांस्कृतिक अभिसरणाच्या या काळाने भारतातील कलाशैलीवरही मोठा परिणाम केला. “गांधार शैली” या काळातच परिणत अवस्थेला पोचली.
कनिश्काने मात्र आपली राजभाषा ग्रीक हीच ठेवली. तो पारशी धर्माचा अनुयायी होता आणि नाना देवतेचा भक्त होता. त्याच्या असंख्य नाण्यांवर नाना देवीची प्रतिमा असल्याने चलनाच्या धातूतुकड्यांना नाणे ही सद्न्या पडली ती आजतागायत वापरात आहे. हीही कुशाण साम्राज्याची एक छाप म्हणता येईल. त्याने काढलेल्या नाण्यांवर शिव आणि गौतम बुद्धाच्याही प्रतिमा आढळून येतात. याचा अर्थ त्याने भारतीय धर्मांनाही बरोबरीचे स्थान दिले होते. या काळात जैन धर्मानेही मोठी उचल घेतली. कुशानांची भारतातील दुसरी राजधानी मथुरा येथिल कंकाली टीला येथे झालेल्या उत्खननात कुशाण काळातील असंख्य जैन प्रतिमा आणि जैन विहारांचे अवशेष मिळाले आहेत. या काळात कुशाण साम्राज्यात कला आणि साहित्यालाही बहर आल्याचे दिसते. या काळात एका जैन लेखकाने माहाराष्ट्री प्राकृत भाषेत लिहिलेल्या ‘अंगविज्जा’ या ग्रंथात कुशाणकालीन समाज व धर्मव्यवस्थेचे विस्तृत वर्णन वाचायला मिळते. कुशानांनी भारतीय धर्म व समाजव्यवस्थेवर परिणाम केला असला तरी सर्व धर्मांना त्यांनी आदराने वागवलेले दिसते.
कनिष्काची सत्ता काश्मीरवरही होती. कुशानांनी काश्मीरमध्ये कनिश्कपूर आणि हुश्कपूर ही शहरेही वसवली. काश्मीरमधील कुंडलवन येथे कनिश्काने भिक्खू वसुमित्राच्या अध्यक्षतेखाली बौद्धांची चवथी धर्मसंगीती भरवली होती. पहिल्या शतकात भरलेल्या या धर्मसभेत अश्वघोशासहित पाचशेहून अधिक बौद्ध विद्वान उपस्थित होते.
व्यापारी मार्गावरील नियंत्रण हाच मुख्यता: सत्तास्थापनेचे कारण असल्याने कुशाणानी तक्षशिलेपासून चीन व मेसोपोटेमियाकडे जाणा-या व्यापारी मार्गांची देखभाल केली व व्यापा-यांना विशेष संरक्षण पुरवले. देशी उत्पादनांनाही त्यामुळे भरभराटीचे दिवस आले. अर्थव्यवस्था बळकट झाली. या व्यापारी मार्गावरच असलेल्या हुंझा आणि बामियान येथे भव्य बुद्धप्रतिमा निर्माण केल्या गेल्या. बौद्ध आणि जैन मठ व विहाराचीही निर्मिती अगदी मध्य आशियातही केली गेली.
कुशाण सत्ता दक्षिण भारतात पसरू शकली नाही याचे कारण म्हणजे सातवाहन साम्राज्य. बलाढ्य सत्ता असलेल्या सातवाहनांनी कुशाणाना दक्षिणेत प्रवेश करू दिला नाही. उलट गौतमीपुत्र सातवाहनाने शक क्षत्रप (प्रांताधिकारी) नहपानाशी युद्ध करून त्याला नाशिकजवळ झालेल्या युद्धात ठार मारले.
कुशाण राजवट हा भारतातील एक महत्वाचा अध्याय होय. या राजवटीचा अंत होण्याचे कारण म्हणजे भारतातून गुप्त साम्राज्याचा होऊ लागलेला विस्तार आणि बल्ख प्रान्तावरील सस्सानियान या पर्शियन घराण्याचे हल्ले. शेवटी त्यांची बल्ख प्रांतावर सत्ता प्रस्थापित केली. सन २२५ पर्यंत गांधार प्रांतही जिंकून घेतला. कुशाणांची सत्ता आकुंचित होत तक्षशिलेपुरती सीमित झाली आणि चवथ्या शतकात शेवटी गुप्त साम्राज्याचे मांडलिक बनली सुमारे तीनशे वर्षाच्या या कालावधीत त्यांनी ग्रीक आणि पर्शियन धर्मकल्पना भारतात रुजवल्या. अनेक ग्रीक देवी-देवतांचीही मंदिरे या काळात उभारली गेली. गौतम बुद्धाच्या तत्कालीन प्रतिमांवर ग्रीको-पर्शियन शैलीचाही मोठा प्रभाव दिसून येतो.
दीर्घ काळ टिकलेली कोणतीही सत्ता समाजजीवनावर एक ठसा सोडून जात असते. शेवटचा कुशाण अधिपती किपुनाडा. त्याची सत्ता सन ३५० मध्ये संपुष्टात आली. परकीय सत्तेचे एक पर्व संपले पण कुशाणांचा प्रभाव मात्र दीर्घकाळ राहिला.
-संजय सोनवणी