Saturday, August 31, 2013

आम्हाला आमचे आम्ही व्हावे लागेल!

कोणत्याही समाजाच्या नैतिकतेचे आणि प्रागतिक सुसंस्कृततेचे मापदंड म्हणजे साहित्य आणि साहित्यविचार सृजन असते. साहित्य हे इतिहास-वर्तमानाचे व्यक्तिसापेक्ष वाटले तरी वैश्विक आकलन जसे असते तसेच ते भविष्याची तेवढीच प्रगल्भ दिशाही दिग्दर्शित करीत असते. मानवी भाव-भावनांना कवेत घेण्याचा प्रयत्न करत स्वत:लाच उमगून घेण्यासाठी मदत करणारे साहित्य हे सापेक्षतेतील निरपेक्षतेची अट पाळत असते. विचारकलहांना नुसते जन्म देत ते थांबत नाही तर विचारकलहांतुनच नवसांस्कृतिक प्रवाहांना जन्म द्यायला ते सहाय्यभूत ठरते. ते सर्जनशील बंडखोर असते. दोन-सव्वादोन हजार वर्षांपुर्वीच्या गाथा सप्तशतीतील सर्जक काव्याला ओलांडू शकेल असे या मातीचे काव्य अभावानेच आहे. प्रेमचंद, शरदबाबू, भैरप्पांसारख्यांचे आदर्श ठेवण्याऐवजी पाश्चात्य साहित्यिक मापदंड आपण डोक्यावर घेतल्याने आपले असे प्रतिबिंब साहित्यात मिळणे अशक्य होत गेले. पाश्चात्य मानसिकता आपल्या देशी नायकांवर थोपत जेही काही साहित्य म्हणून निर्माण झाले ते कितीही देशीवादात बसवले तरी त्यात देशीपणा येणे शक्य नव्हते कारण त्यात "देशी" असे काहीच नव्हते आणि म्हणूनच ते आमचे अभावानेच प्रतिबिंब होते. आम्ही आमचा नव्याने सांस्कृतिक शोध घेण्याची गरज आहे ती यामुळेच!

मला आणि माझ्या आणि तुमच्या पिढ्यांना आपल्या प्रेरणा अन्य मातीतील साहित्यात शोधाव्या लागत असतील तर त्याचा नेमका अन्व्यार्थ काय? चिंतन-मंथन नको यावर?

आमच्या पिढीला पराकोटीचा भांडवलशाहीवाद सांगणा-या आयन -यंड असतील अथवा हेमिंग्वेच्या मानवतावादी कादंब-या असतील अधिक भावल्या असतील तर ते अपयश आमच्या सर्जकतेचे आहे. कारण आम्ही वैश्विक अवकाश व्यापणारे साहित्य निर्माण करायला हवे याचे भान ठेवले नाही. ज्यांनी निर्माण केले ते आपल्याच सामाजिक दोषांमुळे अडगळीत फेकले गेले. आजही आपण बदललेलो नाही. ज्या देशात लेखकाचे आडनांव बघून त्याचे लेखन वाचायचे कि नाही, वाचले तरी त्यावर बोलायचे अथवा लिहायचे कि नाही असे निर्णय होतात त्या देशाची संस्कृती अध:पतीत असते याबाबत शंका घ्यायचे कारण नाही.

पाश्चात्य लेखक कोणत्या देशाचे, वंशाचे, धर्मपंथाचे याचा विचार न करता आम्ही भारतियांनी त्यांना डोक्यावर घेतले आहे. त्यांच्या विचारांनी प्रभावित झालो आहोत. पण आम्ही आमच्याच मातीच्या...रक्ताच्या आणि सहजीवन जगणा-या लेखकांच्या बाबतीत कुठे अकारण अतिउदार तर कोठे अतिकृपण राहिलो आहोत. म्हणून आमची साहित्य संस्कृती तेवढीच घटत्या पातळीवर राहिलेली आहे.

आम्हाला आमच्या मातीचेच सृजन हवे आहे. आम्हाला आमचेच नवविचार हवे आहेत. कारण हे आमचे जगणे आहे. आमचा भवताल अन्य देशांशी तुलना करता येत नाही. कारण संस्कृती आणि समाजमानसिकताच मुळात वेगळी आहे. तिला बदलायचे असेल तर आमच्या साहित्याला बदलावे लागेल. आमच्या लेखकांना बदलावे लागेल.

आम्हाला आमचे आम्ही व्हावे लागेल!

तत्वज्ञानातील अनुत्तरीत प्रश्न आणि मानवी भविष्य

  ईश्वर आहे की नाही, चेतना म्हणजे काय, विश्वाला काही अर्थ आहे की नाही, मुक्त इच्छा अस्तित्वात असते की नाही, वास्तवाचे खरे स्वरूप का...