काल जेजुरी येथे उमेश कुदळे व त्यांच्या तरुण मित्रांनी सावली प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या जेजुरीतील पहिल्याच व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना मी मांडलेले काही निवडक मुद्दे-
१. आम्ही १९४७ साली स्वतंत्र झालो असे मानत असलो तरी ते खरे नाही. खरे मानवी प्रगल्भ स्वातंत्र्य आमच्यापर्यंत आमच्यामुळेच पोहोचलेले नाही. आम्ही आमच्या जातींच्या, पोटजातींच्या, धर्मांच्या आणि स्वत:च्याच अविकसित मानसिकतेच्य बेड्यांत अडकलेलो आहोत.
२. आम्ही भारतीय कृतघ्न आहोत. ते महानायकांची नांवे घेतात, जयजयकार व्करतात पण त्यामागे प्रेरणा व आचरण हा उद्देश्य नसून केवळ आपल्या खोट्या अस्मितांचा बाजार मांडणे हा त्यांचा प्रमूख हेतू असतो. जयंत्या-पुण्यतिथ्या साज-या करणे हे आम्हीच व्यर्थ बनवून टाकले आहे. अम्ही कधीच पुरोगामी नव्हतो असे वाटावे अशी स्थिती आहे.
३. प्रगल्भ, विचारी, तर्कनिष्ठ नागरिक बनवले हा शिक्षणाचा मूळ हेतू. काय शिकावे हे शिकण्यासाठी शाळा-कोलेजेस. पण आम्ही शिक्षणाचे साध्य दूर ठेवले आणि आवड असो को नसो...त्या सर्व विषयांत उत्तमोत्तम मार्क पाडून घेण्याच्या स्पर्धेत उतरलो. कलामांनी आम्हाला महासत्ता होण्याचे स्वप्न दाखवले. ते साध्य होण्यासाठी ज्ञानसत्ता आधी मिळवावी लागते. त्यासाठी आमच्याकडे योजनाच नसेल तर महासत्तेचे स्वप्न स्वप्नच राहील. आमचे शिक्षण विद्यार्थ्याला ज्ञानार्थी नव्हे तर पोटार्थी बनवते. तेही जेथे स्कोप वाटतो अशाच क्षेत्रात आम्ही झुंडीने घुसतो. खरे तर स्कोप नाही असे एकही क्षेत्र नाही. पण आम्ही आमच्या नैसर्गिक कल असणा-या विषयांकडे न वळता झूडीच्या नियमांनी अनियमित चालु लागतो. सर्वांना यश मिळणे असंभाव्य होऊन जाते.
४. आम्हाला इतिहासाचे प्रेम आहे असे आम्हाला वाटते. पण तेही खोटे आहे. आम्हाला आमचे महापुरुष ख-या-खु-या ऐतिहासिक मानवी स्वरुपात पहायचे नसतात तर आमच्या विचारधारांचे रंग लेपवून पहायचे असतात. विशिष्ट विचारधारांनी प्रेरित असाच इतिहास लिहिला जात असल्याने आम्हाला तटस्थ इतिहासच नाही. इतिहास आम्हाला संघर्षासाठी, जातीय महत्तांसाठी हवा असतो. इतिहास आपल्या गतीत घडून गेलाय...तो तुमच्या सोयीसाठी घडलेला नाही हे लक्षात घ्यायला हवे. सोयीने कोणाचे उदात्तीकरण करायचे नि कोनाला बदनाम करायचे वा दुर्लक्षित ठेवायचे हे धंदे इतिहासात चालत नाही याचे भान आपल्याला नाही.
५. समतेचा, स्वातंत्र्याच्या सिद्धांतापासुनही आम्ही कोसो दूर आहोत. आम्हाला आपल्या जाती सोडा, जातींअंतर्गतच्या पोटजातीतही समत्वाची भावना आजही आणता आलेली नाही. भटक्या-विमुक्तांसारख्या वंचित-शोषित जातींच्या प्रश्नांचा स्पर्षही आमचा तथाकथित संवेदनशिल मनांना होत नाही. आम्ही स्वत:ला धार्मिक समजतो. पण ज्याने यच्चयावत विश्व निर्माण केले त्या देवालाही आम्ही भिकारी बनवून टाकले. हा आमचा उद्दामपणा आहे. यच्चयावत विश्वातील कणाकणात परमेश्वर भरलेला आहे असे आम्ही एकीकडे म्हणतो आणि माणसांबद्दलच एवढे निघृण होतो. आजही अनेक मंदिरांत दलित अथवा स्त्रीयांना प्रवेश नाही. पानवठ्यांचीही हीच कहानी आहे. संताची वचने सोयीनुसार फेकायला आम्हाला लाज वाटत नाही, पण मानवतेबद्दलचा त्यांचा कनवाळुपणा आम्हाला शिकावासा वाटत नाही. देव-धर्म मानावी कि न मानावा, हा व्यक्तिगत प्रश्न असला तरी ही दांभिकता आमच्यात कोणी भरली?
६. आम्हाला जागतिकीकरणाचे आव्हान अजुनही नीटसे उमगले नाही. हे आव्हान नुसते जगण्याचे, पोट भरण्याचे नाही तर बदललेल्या परिस्थितीला समजावून घेत तीवर स्वार होत तिचा लगाम हाती घेण्याचे आहेत. खेड्यांचे खेडेपण शहरांनी आणि शहरांतील काही उपयुक्त मुल्ये खेड्यांनी घ्यायची गरज आहे. हे होत नाही. उलट दोहोंतील दरी वाढत चालली आहे व ते एकमेकांकडे साशंकतेने, असुयेने तर कधी द्वेषाने पहात आहेत. खरे तर निरंतर अभिसरणाची, चुका दूर मरत नवी उदात्त मुल्ये निर्माण करण्याची गरज आहे. ६५% खेड्यांतील जनता जोवर वैचारिक समृद्ध होत नही तोवर महासत्ता बनता येणे शक्य नाही.
७. आधुनिक साधनांनी जग आमच्या हातात, मोबाईलवरील इंटरनेटमुळे, आले आहे. पण आम्ही त्या जगाच्या उघड्या खिडकीकडे पाठ वळवत आमच्या विकृत्यांचा उन्माद-उच्छाद मांडण्यासाठी त्याचा उपयोग करीत आहोत. याला प्रगल्भ भारत म्हणता येत नाही. किमान आम्ही ’विद्यार्थी’ भारत तरी बनु का? प्रश्नच आहे ...उत्तर आपल्यालाच शोधावे लागेल.
(जवळपास दीड तास मी बोललो. अजुनही खूप मुद्दे होते. पण लक्षात राहिलेले हे. सावली प्रतिष्ठानच्या पुढील उपक्रमांना शुभेच्छा!)