निसर्गाने माणसाला बुद्धी दिली, त्याने आपल्या बुद्धीच्या बळावर त्याने आकाशात उड्डाण भरायला सुरुवात केली आणि खोल गंभीर सागरतळावरून प्रवास करण्यासाठी पाणबुडीही शोधली. विश्वात अन्यत्र कोठे मानव-सदृश्य सृष्टी आहे काय याचाही अविरत शोध त्याने घेतला. त्याच वेळेस त्याला आपलीच प्रतिकृती असेल असा बुद्धिमान पण आज्ञाधारक आणि न थकणारा 'कृत्रिम माणूस' तयार करण्याची ओढ प्राचीन काळापासूनच लागून राहिली होती. मानवाची कल्पनासृष्टी आणि शक्ती अजब आहे. ती कल्पनेतून एखादा आविष्कार घडवते आणि मग त्याला सत्यात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करते. हा प्रवास सोपा नसतो. तो असंख्य अपयशांनी भरलेला असतो. पण मानवाचे मुलभूत वैशिष्ट्य हे की तो आपले प्रयत्न सोडून देत नाही आणि हळूहळू मानवी कल्पना सत्यात आणण्याचा प्रयत्न करतो. यंत्रमानव म्हणजे रोबो ही अशीच एक संकल्पना मानवी मनाला प्राचीन काळापासून आकर्षित करत राहिली. आहे. आज आपण ज्याला 'रोबोट' किंवा यंत्रमानव म्हणतो, ती संकल्पना संपूर्णपणे विसाव्या शतकातील पाश्चात्त्य देणगी आहे असा अनेकांचा समज असतो. परंतु रोबोचा इतिहास शेकडो-हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी कल्पकतेत, पुराकथांमध्ये आणि थक्क करणाऱ्या रेखाटनांमध्ये पेरला गेला होता. असे म्हणतात की मानव तसा आळशी प्राणी आहे आणि आपले श्रम कमी करण्यासाठी तो आपल्याच प्रमाणे श्रमाचे किंवा वारंवार यांत्रिकपणे कराव्या लागणारे काम करून घेण्यासाठी कृत्रिम साधन साधन कधीतरी शोधणार हे उघड होते. आणि तसे झालेही प्राथमिक यंत्रमानव तर बनू लागले आणि आता मानवाप्रमाणे बुद्धीमान यंत्रमानव बनवण्यासाठी आजचे विज्ञान झगडत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता त्याच्या आता हाताशी आहे. जगात चीन-अमेरिकेसारखे देश कामगारांची जागा यंत्रमानवांना देत आहेत. यामुळे मानवी रोजगाराचे काय होणार हा भयंकर प्रश्न तत्वचिंतकाना भेडसावू लागला आहे हे आपण पाहतोच.
पण या शोधाचा इतिहास पहायला आपल्याला प्राचीन काळात जावे लागते. भारतीय वाङ्मयाचा अभ्यास केला, तर यंत्रमानवाची संकल्पना भारतात मध्ययुगातच अवतरली होती हे आपण बाराव्या शतकातील बौद्ध ग्रंथ 'लोकपन्नती' मध्ये आणि भोजाच्या समरांगण सूत्रधार या ग्रंथात पाहू शकतो. लोकपन्नती ग्रंथात आलेल्या कथेनुसार प्राचीन काळी 'रोम' (यवनपूर) मध्ये अजिबात न थकणाऱ्या आणि अद्भूत कामे करणाऱ्या 'यंत्रपुतळ्यां'चे गुप्त तंत्रज्ञान होते. रोमचे राजे या तंत्रज्ञानाबाबत कमालीचे सावध होते आणि ते इतर देशांत जाणार नाही याची काळजी घेत असत. परंतु, पाटलीपुत्र येथील एका कल्पक तरुणाने या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी गुप्तहेरासारखा रोममध्ये प्रवेश केला आणि तिथल्या यंत्रकाराची मुलगी आणि त्याच्या कलेशी जवळीक साधून, त्याने ते यंत्र बनवण्याचे रहस्य आणि आराखडे आत्मसात केले. पण ही वार्ता फुटली. हे तंत्रज्ञान चोरून भारतात निघत असताना रोमच्या गुप्तहेरांनी त्याचा पाठलाग केला. पकडले जाण्याच्या भीतीने त्या तरुणाने ते रेखाटने आणि साचे स्वतःच्या मांडीत कापून लपवले. त्याचा यात प्राण गेला असला तरी त्याचा मुलगा ते गुपित भारतात घेऊन येण्यात यशस्वी ठरला. या तंत्रज्ञानाचा वापर करून सम्राट अजातशत्रू आणि नंतर सम्राट अशोकाच्या काळात, भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींचे रक्षण करण्यासाठी विशेष 'यंत्र सैनिक' तैनात करण्यात आले होते. हातात नग्न तलवारी घेऊन अहोरात्र फिरणाऱ्या या स्वयंचलित यंत्रांना त्या काळी 'भूत वाहन' असे नाव दिले गेले होते. समरांगण सूत्रधारमध्ये यंत्रशास्त्रविषयक प्रकरणात लाकुड किंवा धातूने यांत्रिक बाहुल्या किंवा पक्षी कसे बनवावेत, याचे सविस्तर वर्णन दिले आहे. यामध्ये मानवी आणि प्राण्यांच्या आकाराचे कारंजे, तेल भरणाऱ्या बाहुल्या, नृत्य करणाऱ्या आणि वाद्य वाजवणाऱ्या बाहुल्यांचा उल्लेख आढळतो.
इ.स. पूर्व तिसऱ्या शतकातील चिनी ग्रंथांमध्येही राजा मु आणि यान शी या यांत्रिक अभियंत्याने बनवलेल्या मानवाकृती यंत्राची कथा आढळते. अर्थात ही मानवी काम करू शकणारी यंत्रे खरेच अस्तित्वात होती याचे पुरावे मात्र उपलब्ध नाहीत.
मध्ययुगात या कल्पनेला गती दिली ती अरब शास्त्रज्ञांनी. १२ व्या शतकात होऊन गेलेला बदी अल-जझारी हा इस्लामिक सुवर्णकाळातील एक अफाट कल्पक इंजिनिअर आणि मेकॅनिक होता. त्याला 'फादर ऑफ रोबोटिक्स' म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
अल-जझारीने केवळ कल्पना केल्या नाहीत, तर 'द बुक ऑफ नॉलेज ऑफ इंजिनिअर्स मेकॅनिकल डिव्हाइसेस' या पुस्तकात शेकडो स्वयंचलित यंत्रांची हुबेहूब रंगीत रेखाटने आणि ब्ल्यूप्रिंट्स तयार केल्या. त्याने पाण्याचा दाब, कप्प्या आणि फिरणाऱ्या चक्रांच्या सहाय्याने चक्क एका नौकेमध्ये वाद्ये वाजवणारे कृत्रिम 'बँड वादक' तयार केले होते. पाणी जसे जसे पुढे सरकायचे, तसे हे यांत्रिक बाहुले अचूक तालात ड्रम आणि सनई वाजवायचे. राजमहालात राजाच्या करमणुकीसाठी आणि हात धुण्यासाठी पाणी ओतणारे यांत्रिक नोकरही त्याने बनवले होते.
त्यानंतर १४९५ च्या सुमारास, जगप्रसिद्ध चित्रकार आणि संशोधक लिओनार्डो दा विंची याने आपल्या डायरीत एका यांत्रिक सैनिकाचे सविस्तर रेखाटन केले. अंतर्गत दोऱ्या आणि चक्रांच्या साहाय्याने हा लोखंडी सैनिक उठू शकत होता, हात हलवू शकत होता आणि आपले हेल्मेट उघड-बंद करू शकत होता.
गंमत म्हणजे, विज्ञानाने प्रत्यक्षात असा यंत्रमानव बनवण्यापूर्वी 'रोबोट' हा शब्द एका नाटकामुळे प्रचारात आला. १९२० मध्ये झेक प्रजासत्ताकचे लेखक कारेल चापेक याने ‘आर.यु. आर’ नावाचे एक विज्ञान-नाटक लिहिले. झेक भाषेत 'रोबोटा' म्हणजे 'सक्तीचे श्रम' किंवा 'वेठबिगारी'. या नाटकात त्यांनी कारखान्यात काम करणाऱ्या कृत्रिम यंत्र-मजुरांना पहिल्यांदा 'रोबोट' म्हटले आणि हा शब्द जगभर कायमचा रूढ झाला. पुढे १९५४ मध्ये जॉर्ज डेव्होल या अमेरिकन संशोधकाने 'युनिमेट' नावाचा जगातील पहिला औद्योगिक रोबोट प्रत्यक्षात तयार केला आणि तो कारखान्यात धोक्याच्या जागी जड लोखंड उचलण्याचे काम करू लागला.
पुराकथांतील रोमहर्षक 'भूत वाहने' आणि अल-जझारीच्या पाण्याच्या रेखाटनांपासून सुरू झालेला हा प्रवास आज जपानच्या 'असिमो' पासून थेट 'सोफिया' या कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोटपर्यंत येऊन पोहोचला आहे. चीन मध्ये सैनिकी काम करणारे रोबो शोधण्याचा वेगाने प्रयत्न होतो आहे. युद्धत होणारी मानवी सैनिकांची जीवितहानी यामुळे तर थांबेलच पण सैनिकी शक्ती कितीतरी पटीने वाढलेली असेल.उद्या माणसाची जागा बुद्धीमान यंत्रमानवाने घेतली तर मानवाचे काय होईल आणि जगातील सारे सैन्य रोबोजनी रिप्लेस केले तर युद्धांचे अंतिम परिणाम किती भयंकर असतील यावर अनेक काल्पनिका आल्या आहेत. मानवी शोधांनी मानवाची अद्भुत कल्पकता सिद्ध केली असले तरी त्यातून मानवजातीवरच संकटे कोसळण्याची भीती आहेच. पाहूयात मानव आता या संभाव्य संकटावर आय मार्ग काढतो?
-संजय सोनवणी