Tuesday, March 15, 2011

दिवस असेही...दिवस तसेही...!

दिवस असेही...दिवस तसेही...!
-संजय सोनवणी
प्रकरण-८
त्या भीषण अपघाताने माझ्या शरीराच्या उजव्या बाजुची पार वाट लागली होती. उजवा पाय पुरा प्लास्टरमद्धे, ४ बरगड्या फ़्राक्त्चर, तर डोक्याला ३२ टाके अशी अवस्था मी दोन दिवसांनी शुद्धीवर आलो तेंव्हा होती. जवळपास एक महिन्याची स्म्रुती नष्ट झाली होती. मी कारखान्याचे उद्घाटन करुन गडचिरोलीवरुन परत येत असताना हा अपघात झाला असेच मला वाटत होते. प्र्त्यक्षात अपघात नंतर झाला होता. सनसवाडीजवळ...म्हनजे पुण्याला मी जवळपास पोहोचलोच होतो...तेंव्हा...टायर फुटल्यामुळे. दोन दिवस मी बेशुद्धच होतो. ज्यांनी नंतर माझी अपघातग्रस्त कार पाहिली त्यांचा मी जीवंत असण्यावर विश्वासच बसत नव्हता. शुद्धीवर आल्यानंतर दोन दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. घरी कसे-बसे दोन दिवस काढले. तिस-या दिवशी राणीचे न ऐकताच मी प्लास्टरमधील पाय खुरडत चक्क कार्यालयात पोहोचलो. मी अपघातातुन नुकताच गेलो आहे, जखमी आहे यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. पण कामांचे डोंगर उभे होते. कंपनी नवी होती...मार्केट उभे करायचे होते, उत्पादन सुरळीत करायचे होते...वेळ होताच कोठे आराम करायला? त्याच अवस्थेत काही दिवसांत मी ट्रेनने चेन्नैला जावुन आलो. जातांनाच्या या प्रवासात एक गंम्मतच झाली.
सोलापुरच्या पुढे कसलातरी अपघात झाल्याने ट्रेन जी सोलापुर स्टेशनवर थांबली ती थांबलीच. मी कंटाळुन पेपर घ्यायला खाली उतरलो. काही वेळात संतप्त प्रवाशांची ट्रेनवर जोरदार दगडफेक सुरु झाली. ही पळापळ माजली. माझा पाय पुरा प्लास्टरमद्धे. मला पळताही येइना. एक-दोनदा हेल्पाटलोही. कसाबसा माझ्या डब्यात घुसलो. ट्रेन निघाली ती दुसर्या दिवशी. तोवर हालच हाल. चेन्नई येथील डीलरची नियुक्ती करुन येतांना मग मात्र मी विमानानेच परत आलो.
------२ इ.एम-------------
अपघात होवुन अता १५-१६ दिवस झाले होते. प्लास्टरचे ओझे मला पुरते बेचैन करत होते. हालचालींवर खुप मर्यादा येत होत्या. मी रुबी हालमधील डाक्टरांना प्लास्टर काढण्याबाबत विचारले. त्यांनी मला वेड्यात काढले. किमान १ महिना तरी प्लास्टर काढता येणार नाही असे त्यांनी सांगीतले. मी सरळ हर्डीकर होस्पिटलमद्धे गेलो. त्यांनी एक्स-रे काढला आणि त्यांनीही प्लास्टर काढता येणार नाही असे सांगीतले. पण निराश होइल तो मी कसला? सरळ घरी आलो, राणीला कात्री मागितली. ती मला वेड्यात काढत होती. पण मी हट्टाला पेटलो होतो. प्लास्टर काढणे सोपे जात नव्हते. एक-एक पदर कसाबसा सोडवत तासा-दिडतासात उजवा पाय मोकळा केला. प्लास्टरमद्धे दडपुन ठेवल्याने डाव्या पायापेक्षा पार बारीक वाटत होता. थोडे चालुन पाहिले. जमले. दुस-या दिवशी दुसरी कार चालवत मी कार्यालयात पोहोचलो.
------------------२ इ,एम.--------------
दिपक शिंदेंनी मला घाल घाल शिव्या घातल्या. म्हातारपणी या एडचाप साहसवादाची फळे भोगावी लागतील अशी खरी ठरणारी भविष्यवाणीही केली. मी निर्लज्जाप्रमणे हसत होतो. त्याला माझ्या समोरील समस्यांची कदाचित त्यावेळीस जाणीव नव्हती. म्हातारपणी काय होइल यापेक्षा मला त्या काळातील समस्या मोठ्या वाटत होत्या. सुरेश पद्मशाली आणि इतर मंडळीने नवे उपद्व्याप सुरु केले होते. पुण्यातील अन्य संचालकांना त्याशी काही विशेष देणेघेणे नव्हते. तेथील पाचही संचालक कारखाना म्हनजे आपली खाजगी मालमत्ता आहे अशाप्रमाणे वागत होते. सुरेश पद्मशाली तर कामगारांचे साप्ताहिक वेतन आपल्यच हस्ते दिले जावे यासाठी भांडत असे. त्याला राजकिय महत्त्वाकांक्षा आहेत आणि पब्लिक लिमिटेड कंपनी आणि सहकारी संस्था यातील फरक त्याच्या समजाबाहेरचा आहे हे लक्षात येत होते. तेथील सर्व संचालक व इतरांचे भाग-भांडवल पाच लाखाच्या आतच होते...म्हनजे एकुन भांडवलाच्या २.५%. पन आपण बरोबरीचे हिस्सेदार आहोत या समजात ते होते. याचा परिणाम होत होता तो दैनंदिन उत्पादनावर आणि वितरनावर. अय्यर नावाचा प्लांट म्यानेजर होता...त्याला हे लोक नाचवायला लागले होते. जणु तो खाजगी नोकर होता. मी वारंवार तेथे जावुन तेथील व्यवस्था नीट लावायचा प्रयत्न करत होतो. कधी कधी भडकतही होतो. विजय वडेट्टीवारांना उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रेक्षकांत बसवले याचा अजुनही राग होता. मी परोपरीने सांगायचो...अरे मी कंपनीचा अध्यक्ष असुन मी प्रेक्षकांत बसलो त्याचे मला काही वाटत नाही तर तुम्ही अशा क्षुद्र गोष्टी कशाला मनाला लावुन घेता? आदिवासी भागात कारखान्याचे स्वप्न साकार झाले हे महत्वाचे नाही का? पण त्यांच्या मनोव्रुत्त्याच वेगळ्या होत्या आणि त्यांच्याशी जमणे अशक्य आहे हे लवकरच लक्षात आले.
दरम्यान उत्पादन सुरळीत होवु लागले असले तरी अपेक्षित उत्पादन मर्यादा गाठता येत नव्हती. कारण तेथील भयंकर पावसाळा. इलेक्ट्रोलिटिक पद्धतीत तांब्याचे बसबार वापरले जातात. तेथील पराकोटीच्या बाष्पमय हवेमुळे त्यांच्या प्रुष्ठभागावर ओक्सोईड्सचा थर येइ आणि जेवढा करंट आणि वोल्टेज क्यथोड आणि अनोडमद्धे जायला हवा तेवढा जात नसे. वारंवार साफ करणे एवढेच आम्ही करु शकत होतो. पल्वराईझरमद्धे आयर्न चिप्सची पावडर बनवत असता त्यावरही लवकर गंज येई आणि ती अनीलींग केली तरी पावडरमधील ओक्साईड्सचे प्रमाण हव्या त्या मर्यादेपर्यंत खाली येत नसे. त्यामुळे भरपुर चाचण्या घ्याव्या लागल्या...शेवटी हवे तसे उत्पादन घेण्यात यशस्वी झालो. इतके कि अमेरिकेतील डोन हार्वे या मेटल पावडरच्या मोठ्या वितरकाने आमचे उत्पादन अमेरिकेत वितरीत करण्याबद्दल रस दाखवला. आमचे सारे नमुने त्यांच्या कसोट्यांवर पुरेपुर उतरले होते. ही आनंदाची बाब होती.
कारखान्यात असणे ही फार आनंददायक बाब असायची. सुरुवातीची आमची शेड ५००० स्क्वे. फ़ुटांची होती तर कार्यालय ४५० स्क्वे. फुटांचे. एक खानसामा होता. तांत्रिक कर्मचारी व माझे जेवण तेथेच व्हायचे. एलेक्ट्रोलिटिक प्लांट विभाग ते अनीलिंग विभाग यात सारखे फिरत कणाकणाने क्यथोड्सवर जमा होणार्या शुद्ध लोह-भुकटीचा चंदेरी थर पहाणे ही वेगळीच अनुभुती होती. त्या वेळीस ७०-७२ कामगार होते आणि २४ तास चार शिफ़्टमद्धे कारखाना चालु असायचा.
असे असले तरी मी संतुष्ट नव्हतो. पद्मशाली तेथील लोहखनीज खानीचे हक्क मिळवुन देण्यात अपयशी ठरल्याने आमची उत्पादन पद्धती बदलावी लागली होती आणि कच्चा माल पार गुजराथेतुन आणावा लागत असल्याने आम्हाला स्थानिक फायदे शुन्य उरले होते. कामगार स्वस्त असले तरी ते तेवढेच कमी उत्पादक होते...त्यामुळे तोही फायदा होत नव्हता. उत्पादन खर्चात वाढ झाली होती ती वेगळीच. यामुळे मी टीकेचे लक्ष होत चाललो होतो. ज्या ध्येयाने कारखाना सुरू केला ते ध्येय, स्थानिकांना रोजगार मिळवुन देण्यापलीकडे यशस्वी झाले नव्हते. सरकारी यंत्रणेचा पराकोटीचा संताप येत होता. पण याही स्थितीवर मात करण्याची जिद्द होती. काय वाट्टेल ते झाले तरी मी येथील कारखाना यशस्वी करणार होतो. एवढेच नव्हे तर सिंटर्ड उत्पादनांचा कारखानाही येथेच उभारणार होतो. जो आतबट्ट्याचा व्यवहार ठरेल अशी भिती जी वाटु लागली होती, तीवर मात करनार होतो. थोडक्यात अति-उच्च शुद्धतेची लोहभुकटी बनवण्यासोबतच अन्य स्वस्त कच्चा माल वापरुन व्यापारी दर्जाची कमी शुद्धतेची लोह भुकटीही उत्पादित करणे आवश्यक होते. ती भुकटी सिंटर्ड आणि वेल्डिंग रॊड निर्मितीसाठी लागत होती. पण त्यासाठी भांडवल कसे उभे करायचे हा एक प्रश्नच होता.
----------२ इ.एम.--------------
गडचिरोलीवरुन परतत असतांना सहज विचार आला...आपण कंपनीचा पब्लिक इस्श्यु आनला तर?
कल्पना आकर्षक होती.
पण ती प्रत्यक्षात कशी आनायची हा प्रश्न होताच. लिस्टींग एवढे सोपे नव्हते. मला वा आमच्या कोनत्याही संचालकाजवळ तेवढा अनुभवही नव्हता. माहितीही नव्हती. लोकांनी आपल्या कंपनीत का पैसे गुंतवायचे? आम्हाला कोणी गाडफादरही नव्हता. आणि नवे तंत्रद्न्यान कोनते वापरायचे हाही प्रश्न होता. प्रवासात काही कल्पना ठळक होत गेल्या. त्यातील अडचणी कोणत्या यावरही विचार केला.
पुण्यात आल्यावर दुसर्या दिवशी मी अभय साहेबांसमोर पब्लिक इश्युची कल्पना मांडली. त्यांनी स्वभावता:च प्रतिक्रिया व्यक्त न करता त्यांचा एक नातेवाइक तरुण मर्चंट ब्यांकेत कामाला आहे असे सांगुन त्याला फोन करुन यायलाही सांगीतले. मी खुष झालो. पुण्यातील इतर संचालकांनी मला वेड्यात काढले. पब्लिक इश्यु म्हनजे काही जोक नव्हता. मला तो जोक वाटत नव्हता. इश्यु वास्तवात येणारच होता.
खरी अडचण झाली होती ती गडचिरोलीच्या संचालकांची. पद्मशाली संख्येच्या बळावर कारखाना ताब्यात घेण्याच्या वल्गना करु लागला होता. त्याला अजुनही ही सहकारी संस्थाच वाटत होती. मी त्याला शह देण्यासाठी थोडे राजकारणही खेळलो आणि त्याचे काही खंदे लोक त्यांचे शेअर्स विकत घेवुन त्यांना दुर सारले, राजीनामे घेतले. यामुळे पद्मशाली चिडले. त्यांनी नीनावी पत्रे सर्वत्र पाठवण्याचा सपाटा सुरु केला. अगदी महाराष्ट्र ब्यंकेलाही त्याने पत्रे पाठवली. हे कळताच कधी न संतापणारे अभयसाहेबही चिडले आणि पद्मशालीची संचालक मंडळावरुन हकालपट्टी करण्यात आली.
मागे वळुन पहाता आता असे वाटते कि ती जरा घाईत केली गेलेली चुक होती. पद्मशालीला ओळखण्यात मी सपशेल चुकलो होतो. त्याला काढुन टाकल्यावर तो अजुनच चिडला. पत्रकार परिषद घेतली आणि आमच्यावर आरोप करायला सुरुवात केली. या कारखान्याचे खरे मालक गडचिरोलीचे भुमीपुत्र असुन पुणेकरांनी त्यावर बेकायदेशीर कब्जा केला आहे असे हास्यास्पद आरोप सुरु केले. ते तिकडील व्रुत्तपत्रांत छापुनही आले. हे माझे पित्त भडकवायला पुरेसे होते. मी त्यावर पद्मशालीची भेट घेवुन त्याला शांत करायला हवे होते...आणि कारखान्याच्या कामात जास्त लक्ष घालायला हवे होते, पण उलट मी संतापुन त्याचे आरोप खोडत बसलो. माझा संताप रास्तही होता कारण अक्षरश: काहीएक न करता त्याला हुकुमशाही गाजवायची होती. प्रत्यक्षात प्रत्येक बाबतीत...अगदी वाहतुकीसाठी ट्रुक मिलवायलाही आमचे काय हाल होत होते हे तो डोळ्यांनी पहातच होता. किंबहुना त्यामुळेच आम्ही निराश होवुन पळुन जावू असा त्याचा होरा असावा. पण तसे घडनार नव्हते. आणि समजावुन सांगुन उपयोग होत नाही असा जुना अनुभवही होताच. पण मी किमान जाहीर प्रत्त्युत्तरे तरी टाळु शकलो असतो. या स्थितीचा फायदा तेथील चिंधीचोर पत्रकारांनी घ्यायला सुरुवात केली. शेवटी पद्मशालीची मजल पाच लाख रुपये द्या नाहीतर कारखाना बंद पादणार या धमकीपर्यंत येवुन पोहोचली. हे अतीच होते. मी ब्ल्याकमेलींगला बळी पडणारा नव्हे हे त्याला कळालेच नाही. मी त्याला एक रुपयाही दिला नाही. उलट त्याच्यावर पुण्यात बदनामी व अन्य अनेक फौजदारी खटले दाखल केले. प्रतिक्रिया म्हणुन त्यानेही गदचिरोलीत असेच बदनामीचे खटले दाखल केले. त्याला पैसे द्यायचे नाही या नादात आम्ही कोर्टात भरपुर पैसे बरबाद केले. नैतिक द्रुष्टीने मी बरोबर होतो...पण व्यावसायिक द्रुष्टीने ती घोडचुक होती.
कारण यामुळे कंपनीची...आमची बदनामी तर होतच होती...पण महत्वाचा वेळही वाया जात होता.
याचा अर्थ कामे थांबली होती असा नाही. इंग्लंडमधील आटोमाशन सिस्टेम या कंपनीबरोबर माझी तांत्रिक सहकार्याची चर्चा सुरु होती. ती कंपनी आटोमाशन पद्धतीने लोहपावडर बनवण्याचे तंत्रद्न्यान पुरवत असे. त्या कंपनीचा मालक भारतात आमच्याकडे येवुन गेला...तांत्रिक सहकार्याचा करारही त्याच्याबरोबर केला. तोवर काही प्रमानात अमेरिकेत निर्यातही सुरु झाली होती. पब्लिक इश्युसाठी मुंबईतील एका कंपनीची मर्चंट ब्यांकर म्हणुन नियुक्तीही झाली होती. अर्थव्यवस्था महत्वाकांक्षांना मोकळे रान देत होती. डोक्यात असंख्य प्रकल्प घॊळत होते. एकच स्वप्न होते ते १००० कोटीचे मराठी मानसांचे साम्राज्य उभे करण्याचे. प्रत्येक क्षेत्रात मला उतरायचे होते. अवाढव्य प्रकल्प उभारायचे होते. मी मुळचा स्वप्नाळु...स्वप्नांना कष्टांची आणि धाडसाची जोड होतीच. दैनंदिन व्यवस्थापन हे माझे कधीच क्षेत्र नव्हते. त्यासाठी अद्याप आप्मच्याकडे कोणी धुरन्धर नव्हता. पण शोध सुरु होता...ट्रायल-एरर चालुच होते. सर्वांमद्धे एक धेय असावे यासाठे प्रयत्न होते. अशोक चांदगुडे यांची मला चांगली साथ मिळत होती. गडचिरोलीला असो वा अन्य कोनत्याही संकल्पनेतील प्रकल्प...ते माझ्या सोबतच असत. बाकी मंडळीकडुन मी आता अपेक्षा बालगण्याचे सोडुन दिले होते. यामुळे माझ्यावरील कामांचा लोड वाढला होता. घराकडे माझे विशेष लक्षही नव्हते. येणारा प्रत्येक पैसा, मग तो कमाइचा असो कि कर्जाचा, व्यवसायात वा इतर संचालकांच्या गरजांसाठीच जात होता...मी अजुनही भाड्याच्याच घरात रहात होतो.
---------------२ इ.एम-----------
पब्लिक इश्यु आणने ही काही चेष्टेची बाब नव्हती हे खरेच आहे. कसलीही व्यावसायिक पार्श्वभुमी नसतांना वयाच्या तिसाव्या वर्षी मी दोन लिस्टेड कंपन्यांचा संस्थापक अध्यक्ष झालो ही महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक घटना आहे यातही शंका नाही. गडचिरोलीसारख्या नुसत्या आदिवासीच नव्हे तर नक्षलवादी भागात अगणित अडचणी सोसत तब्बल पाच वर्ष कारखाना चालवला हेही खरे. असे धाडस आजही करण्याची हिम्मत कोणात असेल असे मला वाटत नाही.
गडचिरोलीला कारखाना काढुन कारखानदार म्हणुन मिरवणे हा माझा उद्देश कधीच नव्हता. त्याबाबत माझा द्रुष्टीकोन स्वच्छ होता. नक्षलवाद उफाळुन यायला कारण होते तेथील पराकोटीचे दारिद्र्य आणि अद्न्यान. सरकारने या भागाकडे पुरेपूर दुर्लक्ष केले होते. कोणी वाली नव्हता. एकिकडुन नक्षलवादी आणि दुसरीकडुन पोलिस या कात्रीत आदिवासी सापडलेले होते. त्यांची अवस्था पाहिली तर अश्रुच डोळ्यात उभे रहात. आम्हालाही नक्षलवाद्यांच्या धमक्यांची पत्रे यायला सुरुवात झाली होती. पोलिस काय करनार? तेही छापे मारत...गवगवा करुन घेत...माहिती मिळवण्यासाठी आदिवासींचा पराकोटीचा छळ करत. पोलिस गेले कि नक्षलवादी उगवत आणि ते अवघ्या आदिवासी वस्तीवर अत्याचार करत. हे चित्र भयावह होते. अस्वस्थ करणारे होते. या विभागात पुरेपुर औद्योगिक क्रांती झाल्याखेरीज हे चित्र बदलु शकणार नाही हे समज्त होते. मी अडखळत का होईना येथे सुरुवात केली होती. स्थानिक अधिकारी/सुशिक्षित नागरिकांना त्याचे अप्रुप नसले तरी जनसामान्य मला देवासारखेच मानत असत. गडचिरोली हीच माझी नकळत कर्मभुमी बनुन गेली होती. माझ्या यशामुळे अनेक उद्योग येथे येतील ही आशाही होतीच. तशा आशयाचे अनेख लेख मी लिहितही होतो.
एके दिवशी मी गडचिरोलीत असतांनाच एक बातमी वाचण्यात आली. एका अत्राम नावाच्या गरीब आदिवासीला नक्षलवादी समजुन गडचिरोली पोलिसांनी छळ करुन त्याची हत्या केली होती. ही घटना संतापजनक होती. सामान्यांनी जायचे तरी कोठे? पोलिस त्या भागात अक्षरश: हुकुमशहा बनले होते. येणारे सारे पोलिस अधिकारी बव्हंशी शिक्षेवर असत वा प्रशिक्षनार्थी असत. त्यांना स्थानिक प्रश्नांशी काहीएक घेणेदेणे नव्हते. ते असत लगोलग बदल्या करवुन घेण्याच्या प्रयत्नांत. अनेकजण तर रुजुही होत नसत वा दीर्घ सुट्ट्यांवर निघुन जात. अत्त्रामच्या हत्येचे पराकोटीचे दु:ख झाले...पण करनार काय? नुसत्या निषेधांनी काय होणार? आम्ही मयत अत्रामच्या परिवाराला आर्थिक मदत दिली. यामुळे गडचिरोली पोलिस माझ्यावर खूप संतापले. पोलिस मरतात तेंव्हा कोण मदत देतो काय असा प्रश्न मला एका डी. वाय. एस. पी. ने विचारला. मी म्हनालो...तुम्हाला सरकार पैसा देते...हुतात्मा ठरवते...परिवाराची काळजी घेते...या आदिवासींना कोणी काही दिलेय काय? या प्रसंगाने पोलिस आणि माझ्यात एक दरी निर्माण झाली हे खरे.
काहीही झाले तरी येथे यशस्वी व्हायलाच हवे होते. नवा कच्चा माल शोधुन स्वस्त उत्पादनपद्धती राबवायलाच हवी होती. स्पोंज आयर्न बनवणार्या काही कंपन्या विदर्भात होत्या. तो कच्चा माल म्हणुन वापरता येईल काय या द्रुष्टीने माझा अभ्यास चाललाच होता. आणि भांडवलासाठी पब्लिक इश्युची कल्पना सुचली होतीच!

पण हे होत असतांना अननुभवाचे फटके कसे बसतात हे सांगणे आवश्यक आहे. जागतिकीकरणाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी त्यावेळी खुपजण स्पर्धेत उतरले होते. विदेशी तंत्रद्न्यान....भागिदा-या...तांत्रिक सहकार्य हे परवलीचे शब्द बनले होते. ग्रीन हाऊस प्रकल्पांची लाट आली होती. ग्रीन हाऊस प्रकल्प म्हणजे अक्षरशा: कागदावरील प्रकल्प. ते प्रत्यक्षात आनण्यासाठी चक्क पब्लिक इश्यु आणले जात. मर्चंट ब्यांकर्सची तर एवढी भाउगर्दी उसळली होती कि त्याला सीमाच नाही. किंबहुना तेच अनेकांना घोड्यावर बसवुन इश्यु आनायला प्रोत्साहित करत. सारेच इश्यु यशस्वी होत नसत हेही खरे पण हे ब्यांकर्स त्यासाठीही आयडिया घेवुन येत...आणि या कल्पना प्रवर्तकांना शेवटी खड्ड्यात लोटनार-या असत.
मर्चंट ब्यंकर म्हणजे काय हे आधी समजावुन घ्या. पब्लिक इश्यु आणायच्झा असेल तर अशा कंपनेला प्रथम लीड म्यानेजर नियुक्त करावा लागतो. ही जबाबदारी शासनमान्य मर्चंट ब्यांकर कंपन्या घेत. पब्लिक इश्युसाठी ज्या कंपनीचे काम स्वीकारले आहे तिचा सढ्याचा प्रकल्प/त्याचे आर्थिक अहवाल आणि प्रत्यक्ष कामकाज तपासणे, तसे अहवाल बनवणे, तसेच पुढील नियोजित प्रकल्पाची सर्वांगीण छानणी करणे, रसा अहवाल बनवणे व सेबीकडुन पब्लिक इश्युची अधिक्रुत अनुमती घेणे हे त्यांचे महत्वाचे काम असते. आजही अशीच परिस्थीती आहे, पण कायदे खुप बदलले आहेत...हर्षद मेहता आणि केतन पारेखची मेहेरबानी.
या कालात जो इश्युवरील खर्च अभिप्रेत असे तो कोनत्या-ना-कोनत्या कारणाने वाढवत नेण्यात हे सारेच मर्चंट ब्यांकर वस्ताद होते. मग ते खर्चासाठी अतिरिक्त पैसे नसले तर शेअर्स पुनर्खरेदीच्या तत्वावर विकुन ६० ते ७०% प्रतिवर्षी अशा भयंकर व्याजदराने उभे करुन देत....शेअरचे लिस्टींग झाले कि ते शेअर बाजारात विकुन त्यांचे पैसे काढुन घेतील असे सांगीतले जायचे आणि त्यासाठी असंख्य कंपन्यांचे भाव लिस्टींग होताच भराभर चढले अशी उदाहरणे दिली जात. त्यामुळे ६०% काय आणि १००% काय...व्याजदर कागदावरच राहील, शेअरचे भाव वाढल्यामुळे ते बाजारात शेअर विकुन वसुली करुन घेतील अशा दाखवल्ल्या गेलेल्या व्यर्थ आशेपोटी त्या पधतीने प्रवर्तक मंडळी पैसे उभे करत...आणि गंमत म्हनजे हे पैसे देणारे अशाच कंपन्यांचे अधिकारी वा त्यांचे नातेवाईक असत.
या कंपनीचे अधिकारी होते रानडे आणि दास नावाचा उडिया माणुस. आम्हालाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने मीही या पद्धतीने पैसे उभे केले. त्यातील काही चक्क माझ्या व्यक्तिगत नावावरही घेतले. (आणि मी आजही ते फेडतोच आहे.) जवळपास वर्षभर सेबीची परवानगी आणि इतर पुर्तता करण्यात गेले. तोवर मी विदेशी तंत्रद्न्यान आयात करायचे नाही हा निर्णय घेतला होता...कारण मीच तोवर अत्यंत स्वस्तात लोहभुकटी उत्पादित करण्याचे सोपे आणि स्वस्त तंत्रद्न्यान गडच्रोली येथील कारखान्यातच भरपूर चाचण्या घेवुन शोधुन काढले होते. आणि ते होत स्पोन्ज आयर्न पासुन प्राथमिक भुकटी तयार करुन ती म्यग्नेटिक सेपरेशन आणि अनीलींगद्वारे शुद्ध बनवणे. यात वीजेची बचत होती तसेच कच्चा माल स्वस्त आणि निकट उपलब्ध असल्याने उत्पादन खर्च अत्यंत कमी होत होता. त्या उत्पादनाच्या यशस्वी ट्रायल्स घेतल्या आणि एक वेगळेच तंत्रद्न्यान जन्माला आले...पुढे कावासाकी स्टीलच्या पावडर मेटालर्जी विभागाला मी जपानमद्धे त्या प्रक्रियेचा डेमो दिला तेंव्हा जपानी तंत्रद्न्यही अवाक झाले होते.
असो. पण इकडे तेंव्हा मला मी नव्या आर्थिक पेचात जात आहे हे लक्षात आले नाही हेही खरे. उलट लोहभुकटीपासुन जी सिंटर्ड उत्पादने होतात ती स्वता:च गडचिरोलीत उत्पादित करण्याची स्वप्ने मला पडत होती. सिंटर्ड गियर्स ते बुशींग/कपलिन्ग तेथे उत्पादित करण्याची योजना होती. त्यासाठी मशिनरीचाही शोध सुरु केला...भारतात त्या मिळत नाहीत हे लक्षात येताच अमेरिकेकडे मोहोरा वळवला.
तेंव्हा इंटरनेट नव्हते. मोबाइल फोनही यायचेच होते. त्यामुळे फ्यक्स आणि फोन हीच काय ती संपर्काची साधने होती...अर्थात पारंपारिक पत्रे/कुरियर इ. वगळता.
मी "सुर्योदय सिंटर्ड प्रोडक्तस लि. या कंपनीची स्थापना केलेली होतीच...तिचा प्रकल्प अहवालही तयार होता आणि ब्यांकेतुन कर्ज घेवुन तो कारखाना उभारायचा मानस होता...पण हा सुगावा लागताच रानडे यांनी कर्ज कशाला घेता...त्यापेक्षा त्यासाठी पब्लिक इश्यु आणुन भांडवल उभे करता येइल असे सांगितले...तसे आश्वासनही दिले. मी साशंक होतो खरा पण हा माणुस चमत्कार घडवुन आणेल अशी आशाही होती...आणि याही कंपनीचा पब्लिक इश्यु आणायचा निर्णय घेतला.
-----------२ इ.एम-------------
दर्म्यान लेखन सुरुच होते. एव्हाना क्लीओपात्रा, ओडीसी, म्रुत्युरेखा इ. ४-५ कादंब-या प्रसिद्ध झाल्या होत्या. पुष्प प्रकाशनाचे कामही वेगात सुरु होते. कर्वे रोडवर आम्ही हजार चौरस फुटाचे कार्यालयही विकत घेतले होते. त्यामुळे पुष्पला नारायणपेठेतील कार्यालय स्वतंत्रपणे वापरता येवु लागले. विनोद सर्व कारभार पहाण्यात निष्णात झाला होता. माझा प्रत्यक्ष सहभाग हळु-हळु संपत आला होता...एवढा कि माझ्या पुस्तकांच्या नव्या आव्रुत्त्या आल्यात हे मला त्या प्रसिद्ध झाल्यावर कळे. विनोदला तसा प्रकाशन व्यवसाय आवडत नसे, पण आता हळुहळु तो रुळला होता.
मी १९९४ मद्धेच नीतिशास्त्र नावाचा नीतितत्वांचा आधुनिक परिप्रेक्षात वेध घेत, वैद्न्यनिक पायावर नैतीक मुल्यांची नव्याने व्याख्या करत त्याची आधुनिक काळाला सुसंगत अशी मांडनी करनारे पुस्तक लिहायला सुरुवात केली होती. जागतिक पातळीवर जी. ई. मूर नंतर नीतिशास्त्रांवर नवी मांडणी कोणी केलीच नव्हती. मला ते एक आव्हान वाटले. या पुस्तकातील "विश्वनिर्मिती-उभारणी आणि संहार" हे प्रकरण लिहित असताना मी आधुनिक संशोधनांचाही सखोल आढावा घेत असता बिग ब्यंग सिद्धांतातील त्रुटी लक्षात येवु लागल्या. मग मी झपाटुन भौतिकशास्त्र आणि विश्वनिर्मिती शास्त्राच्या मागे लागलो. या सिद्धांतात अवकाशाला अगदीच ग्रुहित धरण्यात आले असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणजे अवकाशावर वस्तुमानाचा प्रभाव पडतो हे जसे गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भात मान्य केले आहे तसेच क्वंटम मेक्यनिक्स मद्धेही वस्तुमान हे सभोवतालच्या अवकाशास प्रभावित करते हे मान्य केले आहे...पण विश्वाचा महाविस्तार पचवण्यासाठी ते अमर्याद उपलब्ध आहे असे चुकिचे ग्रुहितक घेतले गेल्याचे माझ्या लक्षात आले. स्थिर विश्व सिद्धांतात विश्व-विस्तार मान्य केला आहेच पण निरंतर विस्तारामुळे रिक्त होणा-या अवकाशात १ चौ. मीटर= १ हायड्रोजनचा अणु या प्रमाणात नवनिर्मिती होते असे मानुन स्थैर्य आणि विस्ताराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
हे सारे अमान्य करुन मी नवीन सिद्धांत मांडायला सुरुवात केली. त्यात मी अवकाश हेच मुलभुत एकमेकद्वितीय मुलदभूत आस्तित्व विश्वारंभी होते हे ग्रुहितक घेत "अवकाशताण सिद्धांत आणि विश्वनिर्मिती" या सिद्धांताची रचना केली. हा सर्वच सिद्धांत येथे सांगत नाही, पण या सिद्धांतानुसार वस्तुमान म्हणजे modified space असुन गुरुत्वाकर्षण हे क्रुत्रीम बल आहे व ते वस्तुमानातील अतिरिक्त धन उर्जांच्या समतोलासाठी निर्माण होते...तसेच प्रकाशवेग हा विविध गुरुत्वत्रिकोणांतुन प्रवास करत असतांना वारंवार वेग बदलत (कमी-जास्त) असल्याने प्रकाशवेगच्या आधारावर दोन तारे वा दिर्घिकांमधील काढलेले अंतर चुकीचे येईल आणि एकून विश्वाचा विस्तार वा आयुष्य त्या आधारावर मोजता येणार नाही हे स्पष्ट केले. (अलीकडेच २० अब्ज प्रकाशवर्षे दुर असलेली दीर्घिका सापडल्यामुळे महास्फोट सिद्धांतावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहीले आहेच. तूवर विश्वाचे वय १६ अब्ज वर्ष मानले जात होते.) या सिद्धांतात मी जी प्रमेये सिद्ध केली आहेत त्यामुळे विश्वनिर्मितीतील अनेक अनुत्तरीत प्रश्न सोडवण्याचा एक मार्ग उपलब्ध झाला आहे...अर्थात कोणताही सिद्धांत परिपुर्ण असु शकत नाही हे मला माहित आहेच. हा सिद्धांत मराठीत पुस्तकरुपाने २००६ साली प्रसिद्ध झाला असला तरी त्यातील काही प्रकरणे तत्पुर्वी इंग्रजीतुन प्रसिद्ध झाली होती आणि त्याला जगभरच्या वैद्न्यानिक विश्वातुन चांगला प्रतिसाद मिळाला. अपवाद अर्थातच मराठीचा...आणि वर मराठीतुन मुलभूत विद्न्यानावर लिहिले जात नाही ही बोंब आहेच.
असो. पण या सिद्धांतामागे मी जवळपास ७-८ वर्ष पडल्याने नीतिशास्त्र मागे पडले...ते मी शेवटी पुर्ण केले येरवडा तुरुंगात जामीनाची वाट पहात असतांना. तोही टिळक यार्डमद्धे...जेथे ते राजद्रोहाची शिक्षा भोगत होते...हा एक दैवदुर्विलासच म्हनायला हवा. कारण टिळकांनी राजद्रोहाच्या आरोपात शिक्षा भोगत असतांना गीतारहस्य लिहिले...आणि मी ...?
असो त्याबद्दल पुढे.
नीतिशास्त्र या ग्रंथाचीही मराठीने वाट लावली असल्याने तो आता ईंग्रजीत अनुवादित करुन प्रसिद्ध करण्याच्या मागे आहे. आधुनिक परिप्रेक्षात वैद्न्यानिक आणि अभावनायुक्त उत्स्फुर्ततावादी नीतितत्वे मांडनारा हा एकमेव ग्रंथ आहे हे मी कसलेही औद्धत्य न करता सांगु इच्छितो.

असो. हे सारे सुरू असताना पद्मशालीचे उपद्व्याप सुरुच होते. मी त्याला पाच लाख द्यायला नकार दिल्यावर त्याने आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करने सुरु केले...जणु ही सहकारी संस्था होती जेथे संचालक भ्रष्टाचार करु शकतील. पण तिकडील पत्रकारही बिनडोक...ते बिन्धास्त तो म्हणेल तसे छापत होते. मी त्याच्यावर एकामागोमाग एक बदनामीचे दावे दाखल करत चाललो होतो. एकुण ५८ दावे केले मी. एकदा त्याला न्यायालयात हजर रहात नाही म्हणुन पोलिसांनी पकडुन आणले...आणि पट्ठ्या खवळला. त्याने कंपनीत गैरव्यवहार असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.
येथे एक नवे वादळ सुरु झाले. इश्युची तारीख घोषित झाली होती. तो यशस्वी करणे हे एकमात्र ध्येय होते. त्यासाठी पळापळ होत होती. मुम्बैच्या वा-या पराकोटीच्या वाढल्या होत्या. एकदा मुंबईतुन परततांना रात्री अपघातही झाला. एक बंद पडलेला रस्त्यावर तिरपा पसरलेला ट्रक समोरुन येणा-या ट्रकच्या हेडलाइट मुळे दिसलाच नाही...त्या ट्रकच्या मागच्या कोप-याला कार धडकली आणि उजव्या बाजुला रस्त्यावर काही कळण्याच्या आतच गर्रकन वळाली. कारची डावी बाजु पार फाटली. नशीब तिकडे कोणी बसलेला नव्हता...आणि समोरुन दुसरा ट्रक येत नव्हता...नाहीतर...असो...मी पुन्हा एकदा वाचलो.
त्यावेळीस श्री लक्ष्मीनारायण नावाचे एस. पी. गडचिरोलीला होते. अत्यंट कडक-कर्तव्यदक्ष माणुस म्हणुन त्यांची ख्याती होती. इंतरपोलसाठी त्यांचीए निवड झाली आहे अशा वदंता होत्या. त्यांनी एकदा गडचिरोलीच्या कलेक्टरला अटक करण्याचा पराक्रमही केला होता. (गडचिरोलीत कलेक्टरपेक्षा पोलिस अधिक्षकाला जास्त अधिकार आहेत.) त्यांनी मला समंस पाठवले. मी खवळलो. मी तत्काळ "असल्या खोट्या आरोपांसाठी मला समंस पाठवण्याचा तुम्हाला कसलाही अधिकार नाही" असा उलट फ्यक्स पाठवला. मला त्यावेळीस माझ्या न्याय्य बाजुचा सार्थ अहंकार होता. कोणी एक ब्लाकमेलर खोट्या तक्रारी करतो आणि परस्पर शहानिशा न करता पोलिस मलाच जबाबासाठी बोलवतात म्हनजे काय़? त्यांना आस्म्ही एवढ्या लांबून हा कारखाना कसा चालवतो हे माहित नाही काय? ते स्वत: कारखान्याला भेट देवुन प्रत्यक्ष कामकाज पाहून शहानिशा करुन घेवू शकत नाहित काय?
त्यात अत्रामच्या कुटुंबियांना आम्ही केलेली मदत त्यांच्या डोळ्यात सलत असावी. नाहीतर एका फालतु (सरकारी वकीलही नंतर पोलिसांना हेच म्हणाले) ज्यात फक्त आरोप आहेत अशा तक्रारीच्या आधारावर त्यांनी गुन्हा नोंदवलाच नसता. मी रागावलो होतो. या कारखान्याला शासनाने एक रुपयाची मदत केली नव्हती. आम्ही होते नव्हते ते सारे गहान ठेवून हा कारखाना एक स्वप्न साकारन्यासाठी चालवत होतो. वारंवार जीव धोक्यात घालत होतो. एकाही व्रुत्तपत्राने वा सामाजिक संघटनांनी त्या प्रयत्नांची दखल घेतली नव्हती...घ्यावी ही अपेक्षाही नव्हती...पण आरोप? गुन्हा दाखल?
माझ्या संतप्त फ्याक्सची परिणती अशी झाली कि श्री. लक्ष्मीनारायण यांनी त्या तक्रारीच्या आधारावर खरोखरच गुन्हा दाखल केला. झाले. चौकशीचे सत्र मागे लागले. अटकपुर्व जामीण घ्यावा लागला. दर्म्यान इश्यु यशस्वीरित्या भरला गेला. लिस्टींगची प्रक्रिया सुरु झाली. आणि त्याच्वेळीस नागपुरवरील जवळपास सर्वच व्रुत्तपत्त्रांनी आमच्याविरुद्ध...विशेश्ता: माझ्या, आघाडी उघडली. पद्मशाली हीरो बनला. मी सर्व व्रुत्तपत्त्रांना निवेदने पाठवली...काहींनी छापली...काहींनी नाही. मी ग्रुहमंत्री ते मुखमंत्र्यांना निवेदने पाठवली. पण उपयोग शुन्य. तसाही विदर्भाकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे असतो?
पण खरा कळस चढवला तो पुण्यातील नव्यानेच सुरु झालेल्या एका व्रुत्तसमुहाच्या पुणे आव्रुत्तीने. त्यांचा एक प्रतिनिधी मला भेटायला आला...अत्यंत मित्रत्वाच्या नात्याने माझ्याशी बोलला...माझ्याविरुद्ध त्याच्या व्रुत्तपत्त्रात बातमी येण्याची शक्यता सांगितली...मी लगोलग त्यांच्या संपदकांना जावुन भेटलो...सारी बाजु सांगण्याचा प्रयत्न केला...पण उपयोग शुन्य. त्यांनी काही ऐकुनच घेतले नाही.
दुस-या दिवशी भाग एक प्रसिद्ध. क्रमश: मालिका प्रसिद्ध करण्याचा निर्धार. जेही काही लिहिलेले ते अत्यंत चुकीचे आणि ज्यातील काहीच कळत नाही त्यावरुनचे निश्कर्ष. उदा. ३.२५ लाखाला घेतलेली अमोनिया क्र्यकर फर्नेस ताळेबंदात दुस-या वर्षी २.७५ लाखाची कशी झाली? म्हणजे भ्रश्ताचार...यांना घसारा नावाची काय गोष्ट असते हेही माहित नाही? मी संतापलो. सरळ श्री. श्याम अगरवालांकडे गेलो. त्यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले...लिही...त्यावेळीस त्यांचे सायंदैनिक "संध्यानंद" नुकतेच सुरु झाले असले तरी लोकप्रिय होते. मी पराकोटीचा प्रति-आघात केला. सायंकाळी ४ वाजता तो पेपर येताच अक्षरश: धुमाकुळ उडाला. खुद्द त्या पेपरमधील वातावरण तंग झाले. तेथील अनेक मित्रांनी मला फोन केले आणि मी योग्य तेच केले असा निर्वाळा दिला. दुस-याही दिवशी पुढचा भाग...माझे सायंकाळी उत्तर...शेवटी त्या व्रुत्तपत्त्रवर खुलासा छापायची वेळ आली. सात दिवस ते ती मालिका चालवणार होते ती तीन दिवसांत गुंडाळली. मला एशिअन एज आणि अजुन काही राष्ट्रस्तरीय व्रुत्तपत्त्रांनी पुरेपुर पाठिंबा दिला. पण त्यामुळे पुण्यातील बव्हंशी श्रमिक पत्रकार खवळले. त्यांना हा माझा व्रुत्तपत्रिय लेखन स्वतंत्र्यावरचा आघात वाटला. दरम्यान मला ज्येष्ठ पत्रकार आदरणीय श्री. गोपाळराव पटवर्धन यांनी घरी बोलावुन घेतले आणि माझी बाजु विचारली. मी त्यांना अथ-पासुन इतिपर्यंत सारे काही सांगितले. माझे स्पष्टीकरण त्यांना पटले. काही दिवसांत पुणे श्रमिक पत्रकार संघाने माझ्या निषेधाचा ठराव मांडायचा निर्णय घेतला. पण गोपाळरावांच्या विरोधामुळे जरी ठराव पास झाला असला तरी तो झाला माझे नाव वगळुन. खरोखर अशी निरपेक्ष भुमिका घेणारे गोपाळरावांसारखे पत्रकार झाले नाहित याचा खेद वाटतो.
दर्म्यान मी श्री लक्ष्मीनारायण यांच्याही विरुद्ध आघाडी उघडली होती. अक्षरश: हजारो निवेदने मी सारे आमदार/मंत्री/पोलिस महासंचालक यांना पाठवली. मी पोलिसांच्या आतताईपनामुळे प्रक्षुब्ध झालो होतो. हा सरळ सरळ अन्याय होता. तपासात मी सहकार्य करत होतो पण मी त्यासाठी म्हणुन एकदाही गदचिरोलीला गेलो नाही आणि गेलो तरी श्री लक्ष्मीनारायण यांना भेटलो नाही. माझ्या असंख्य निवेदनांचा त्यांनाही फटका बसला...त्यांची पुढे बदली झाली ती एका पोलिस ट्रेनिग केंद्रावर.
पण आता वाटते मी त्यांना आधीच भेटलो असतो तर कदाचित हा एवढा संघर्ष करण्याची मुळात वेळच आली नसती. मी कायद्याचे पालन करत समंसचा आदर ठेवायला हवा होता. पण सत्य माझ्या बाजुला आहे याचा पराकोटीचा विश्वास त्यावेळीस माझ्यावर हावी होता एवढेच काय ते खरे. आणि यामुळे मला जगाची नवी रुपे दिसली, विलक्षण अनुभव आले हेही खरे. पत्रकारिता ही कोणत्या थराला गेली आहे हे बघुन आजही मन विषण्ण होते. पुण्यातील पत्रकारांनी तर माझे नाव प्रदिर्घ काळ वाळीत टाकले ते टाकलेच. काही वाईट बातमी माझ्याबाबत असली तरच ती प्रसिइद्ध होई...एवढेच. (आजही अपवाद वगळता हीच स्थिती आहे.) पण फायदा हा झाला कि नंतर प्रदिर्घ काळ त्या विशिष्ट व्रुत्तपत्त्रानेच काय अन्य व्रुत्तपत्त्रांनीही कोणाही विरुद्ध व्यक्तिगत बदनाम्या करनारी भडक व्रुत्ते "शोध-पत्रकारितेच्या" गोंडस नावाखाली छापणे बंद केले.
तत्पुर्वी अनेकांना आयुष्यातुन अक्षरशा: उठवण्यात आले होते. पुणे विद्यापीठातील एका संशोधकाला तर शेवटी देशत्याग करावा लागला होता तर एक बिल्डर जवळपास वेडा झाला होता...कशामुळे तर त्यांच्याविरुद्ध अशा बिनबुडाच्या सवंग बातम्या छापल्या गेल्याने. आजही प्रत्येक घटनेची दुसरी बाजु असते याचे भान मराठी पत्रकारितेला कमीच आहे. पण त्यामुळे एखादा आयुष्यातुन उठु शकतो याची जाणीव असावी ही अपेक्षा आहे. पण एकंदरीत हे सारेच प्रकरण त्यावेळी खुप गाजले, असंख्य लोकांनी माझ्या धाडसाला दाद दिली हेही खरे. पण हाच धाडसी आणि त्याच वेळीस परिणामांबद्दल बेपर्वा असनारा माझा स्वभाव मला अनेकदा अडचणीत आणनार आहे याची मला तेंव्हा जाणीव नव्हती. समोरच्या लोकांना त्यांच्या फेस व्यल्युवर घेणे आणि तसे वर्तन करणे हा माझा मोठाच दोष आहे.
-----------२ इ.एम-------------------
गडचिरोली पोलिसांचा तपास कधी संपला हेही कळाले नाही. जवळपास दोन वर्षांनी एके दिवशी पोलिसांचे पत्र आले...
"तुमच्याविरुद्ध कसलेही पुरावे मिळाले नसल्याने केस ’सी" समरी करुन तपास बंद करण्यात आला आहे."
अर्थात ही बातमी छापतील ती व्रुत्तपत्त्रे कसली?
---------२ इ.एम.---------
अमेरिकेतुन आमच्या लोह भुकटीला चांगला प्रतिसाद येत होता. डोन हार्वे हा आमचा तेथील वितरक. शिवाय याच काळात तेथील एका आयर्न पावडर बनवणार्या कंपनीतील भारतीय मेटालर्जी इन्जिनीयर संजय कुलकर्णीशी ओळख झाली होती. त्याला आमच्या आयर्न पावडरची शुद्धता खुप आवडली होती. तो ज्या कंपनीत काम करत होता त्यांनीही एवढी शुद्धता गाठली नव्हती. अमेरिकेत आपण खुप मोठे मार्केट उभे करु शकतो असा त्याला विश्वास होता. पण त्यासाठी मला अमेरिकेला जाणे आवश्यक होते. याच वेळीस निर्जलीक्रुत फळभाज्यांच्या उत्पादनातही पडण्याची माझी तयारी सुरु होती. त्यासाठीही कंपनी स्थापन करुन ठेवली होती. होलंड व इन्ग्लंड येथील काही उत्पादक व वितरकांशीही दर्म्यान बोलणी सुरु होती. त्यांनीही चर्चेसाठीचे निमंत्रण दिले होते. सिंटर्ड उत्पादनासाठीच्या मशिनरीज सप्लायर्सनाही भेटायचे होते.
निर्जलीक्रुत फळभाज्यांचे ते मांस-मासे यांचे उत्पादन का तर मला या व्यवसायात अवाढव्य भवितव्य दिसत होते. प्रत्येक क्षेत्रात आमच्या "सुर्योदय" ग्रुपचे स्थान असावे असे माझे स्वप्न होते आणि वेगाने शिकता येइल एवढी प्रतिभा देवाने मला देवुन ठेवली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या देशातील शेतीची स्थिती अशीच हलाखीची राहील जोवर क्रुषिमालावर प्रक्रिया करणारे अवाढव्य उद्योग उभे राहणार नाहीत. ही जाणीव मला तेंव्हाच झाली होती. त्या उत्पादनांना जागतीक बाजारपेठ उपलब्ध तर होतीच पण देशांतर्गतही होती व आहे...पण अजुनही या क्षेत्रात काही घडले नाही. आणि तशी इछाशक्ती भारतीय उद्योजक वा सरकारमद्धे नाही. आजही भारतात प्रक्रिया उद्योगांअभावी लाखो टन शेतमालाचे वाटोळे होत आहे. त्याचा ना खरेदीदारास फायदा, ना शेतकर-याला...अब्जावधी रुपयांचे राष्ट्रीय उत्पादन वाया जात आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे तर कधी अनुपलब्धतेने भाव गगनाला भीडतात म्हणुन खरेदीदार रस्त्यावर येत आहेत अशी विनोदी स्थिती भारतात आहे.
मी संगतवार माझा दौरा ठरवला. अर्थात त्याचे नियोजन केले ते माझे मित्र आणि काही काळ संचालक असलेले श्री. प्रशांत वाणी यांनी. प्रथम होलंड मग इंग्लंड आणि मग अमेरिकेतील डेट्रोइट येथे जायचे होते. सर्व भेटी ठरवण्यात आल्या होत्या. विसा तयार होते. निघायचा दिवस आला. रात्रीची फ़्लाईट होती. मी त्या दिवशी फारच गंभीर होतो. मनात नाना कल्लोळ उठले होते. विदेशगमनाचा कसलाही आनंद नव्हता...होती ती जबाबदारीची वाढलेली जाणीव. मी येथवर कंपनीचा गाडा अक्षरशा: खेचत आनला होता...बाहेरचे विरोधी ठीक होते...बाह्य संघर्ष मला आव्हानदायी वाटत...त्याशी तोंड देणे आव्हानदायी असे. पण अंतर्गत विरोधाचे अनेक सुप्त प्रवाह होते...त्याची मला चांगलीच जाण होती. माझा वेग नको तेवढा जास्त आहे हे कळत होते...पण जर मराठी मानसांचे एक नवे साम्राज्ज्य उभे करायचे असेल तर त्याला इलाज नव्हता. माझ्यात नुसती कल्पकता नव्हती तर कल्पनांना साकार करण्याची अदम्य इछ्छा होती...आणि मी काही गोष्टी अल्पावधीत केल्याही होत्या...
आणि हाच माझा वेग अनेकांना पसंत नव्हता...
आणि जे करुन ठेवले होते त्याकडेही बघायची इछ्छा नव्हती...
मला मार्ग काढावे लागणार होते...पण कसे हे मला कळत नव्हते. दैनंदिन व्यवस्थापन आणि अचुक वित्त व्यवस्थापन यासाठी मला अशाही स्थितीत अवलंबुन रहावे लागत होते कारण मी त्यात पुर्ण अडाणी होतो...
के.एल.एम. च्या अवाढव्य जंबो-जेटमद्धे बसलो तेंव्हा मला नकळत खुप एकाकी वाटु लागले.
अश्रु झरु लागले.
----------------------------------------------------------------------------------------(

4 comments:

  1. sanjay sonawani yanche he atmakathan sachchepana, sayyam,pardarshkata aani thetpana yanchyamule aswaswastha karate. yatale anubhavvishva garagarayala lawate.talamalichi hi gatha navya janiwa deil,asa vishvas watato.sanjay tuhmi amhala jivanache nave padar sangat ahat. great. dhanyawad. we are proud of you brodher.

    ReplyDelete
  2. Its Unbelievable. एक माणूस एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच काम करू शकतो यावर विश्वास बसत नाही.

    ReplyDelete
  3. एका अत्भुत क्षमतेच्या माणसाचे हे प्रामाणिक आत्मकथन लवकरात लवकर प्रसिद्ध व्हावे ही मनापासूनची इच्छा. आजच्या पिढीबरोबरच पुढील शेकडो पिढ्यांना संजय सोनवणींचे हे आत्मचरित्र प्रेरणादायी ठरणार यात मला तरी शंका नाही

    ReplyDelete
  4. sir
    ata purn vachale an thaka zalo.
    bhayan aanubhav an vastav vachun man helaun gele.
    pan khhup prashna nirman zale an mukhha mhanje pude kay zale
    plz sir aatmacharitra liha
    aahmi vat pahatoy

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...