Sunday, May 8, 2011

शेतकरी दिवसेंदिवस अडचणीतच येत चालला आहे.

जर आपण आज शेतीकडे गांभिर्याने पाहिले नाही, शेती कशी शेतकर्यांना फयदेशीर होइल हे पाहिले नाही, तर भविष्यात "शेतीच" उरणार नाही. मग खाणार काय? मोटारी? सोफ़्ट्वेर कि रसायने कि वीज? जे जीवनाचे मुळ आहे तिकडे दुर्लक्ष, द्वेष (गावठी ना...) आणि सवलती दिल्या जातात त्याचा रोष...पण जर त्यांन त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव दिला पाहिजे हे समजत नाही. टाटा वा मारुतीने वा कोणत्याही टी. व्ही. कंपनीने आपल्या उत्पादनांचे भाव वाढवले तर कोणी बोंब मारत नाही...पण शेत्मालाचे भाव वाढले तर सारे गळे काढु लागतात. पण असे का होते यावर कोणी विचार करत नाही. पेट्रोलचे भाव वाढले तर ते पुन्हा कमी होण्याची क्वचित शक्यता आहे हे माहित असते...पण २-४ दिवस आदळ-आपट करत पुन्हा पंपावरच्या रांगा आणि वाहनखरेद्या थांबत नाहीत. पण शेतमालाच्या भावात चढ-उतार का होतो आणि त्याचा फायदा शेतक-याला कितपत होतो याचा विचार करण्याची शक्ती मध्मवर्ग ते उच्च वर्गी हरपून बसला आहे. शेतकरी दिवसेंदिवस अडचणीतच येत चालला आहे.

यामुळेच शेतीकडे आजची सुशिक्षित पीढी आकर्षित होत नाही...एक कप चहाला आम्ही १५-२० रुपये मोजायला तयार असतो पण एक कोथींबिरेची जुडी १० रुपयाला झाली तर कासाविस होतो...सरकारला शिव्या घालतो...हा आमचा दांभिकपणा नव्हे का? जर उद्या शेतीच थांबली...आणि तशी सुरुवात झालेलीही आहे...तरुण शहरांकडे पळत आहेत आणि शेतकरी तरुणांना लग्नासाठी मुलीही मिळणे अशक्य होवु लागले आहे. याचे परीणाम काय होणार आहेत हे आजच समजावुन घेतले पाहिजे...त्यात खूप भांडवलदार जमीनी खरेदीचा सपाटा लावत असल्याने क्रुषियोग्य जमीनही कमी होत आहे. (अर्थात हे फक्त पस्चिम महाराष्ट्रात घडतेय.) हे भांडवलदार (खरे तर राजकारणीच यात जास्त आहेत.) काय शेती करण्यासाठी जमीनी विकत घेत नाहीत हे उघड वास्तव आहे. आणि जमीनी विखुन मिळालेले पैसे कोठे गुंतवावे याचे मार्गदर्शन नसल्याने, शेतक-याला अन्य व्यवसायाचा सहसा कसलाही अनुभव नसल्याने हे "गुंठासम्राट" दारु, बाया आणि राजकारण यावर पैसे उडवण्यास सज्ज असतात. कित्तेक तरून मी एडस्ने मरतांना पाहिले आहे. पण याबद्दल कोणीही चकार शब्द काढायला तयार नाही. त्यांचे प्रबोधन व्हावे असे कोणाला वाटत नाही. हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

येथे प्रतिपाद्य मुद्दा हा आहे कि शेती तोट्यात का जाते? त्याची मला खालील कारणे दिसतात: (अन्यही आहेत पण ती पुढील लेखात.)

१. शेतक-यांची अनुकरणाची प्रव्रुत्ती...कांद्याचा भाव वाढतो आहे असे दिसले रे दिसले कि जो तो भसाभस कांदेच लावणार. मग एवढे उत्पादन होते कि मागणी पेक्षा पुरवठाच एवढा वाढतो कि शेतक-याचा उत्पादन खर्चही निघत नाही. जो कांदा काही महिन्यांपुर्वी सोण्याचा भाव मिळवत होता तोच कांदा अक्षरश: फेकुन द्यावा लागतो. हे एक उदाहरण झाले. असेच अन्य पीकांबाबतही होते हे आपण नेहमी पहातच असतो. हे असे होते कारण एकुणातील गरज लक्षात घेवुन जेवढ्या प्रमाणात लागवड व्हायला हवी तशी होत नाही आणि तसे नियंत्रणही आस्तित्वात नाही. नैसर्गिक धोके लक्षात घेवुन गरजेच्या १५ ते २०% एवढीच अधिक लागवड झाली तर बाजारभावाचा प्रश्न ब-यापैकी मिटु शकतो.

यासाठी आवश्यक ती आकडेवारी उपलब्ध असते का? असली तरी ती पुरेशी असते का? आणि समजा असली तरी मुळात सर्व उत्पादक एकून किती लागवड करत आहेत हे कोणाला माहित असते का?
याचे उत्तर नाही असेच आहे. खरे तर बियाण्यांच्या एकून खपावरच नियंत्रण असले तर? म्हणजे काही केल्या त्या-त्या विशिष्ट क्षेत्रांत विशिष्ट प्रमाणातच बियाणी उपलब्ध करायला हवीत म्हणजे अतिरिक्ततेचे आर्थिक ओझे कोणावरच पडणार नाही. शेतक-याला माल फेकून द्यावा लागणार नाही, उलट योग्य तो भाव मिळेल. किमान आज होते तशी परवड होणार नाही.

मान्सून चांगला गेला म्हणुन उत्पादन वाढले आणि म्हणुन भाव कोसळतात हा येथे अतिरेकी सिद्धांत होतो. मुळात काय उत्पादित करायचे, किती प्रमाणात करायचे याचे प्रोडक्ट मिक्स अनियोजित असल्याने भाव कोसळतात. सर्वच शेतमालाचे भाव उत्पादन खर्चापेक्षा कोसळत नाहीत हे आपण लक्षात घेत नाही. मग मान्सून चांगला असो कि वाईट. कारण मान्सुन समजा वाईट गेला तर भाव चढे राहिल्याने एकुणातील गोळाबेरीज कायम रहाते. चांगल्या मान्सुनमुळे समजा उत्पादन वाढले तर भाव जरी कमी मिळाले तरी उत्पादनच वाढले असल्याने पुन्हा तेवढेच पैसे हाती येवू शकतात.

पण अनुकरण आणि एकून बाजारपेठेची गरज न समजावून घेता विशिष्ट पीकांचे प्रमाण वाढले तर मात्र दयनीय स्थिती निर्माण होते हे समजावून घेणे, शेतक-याला समजावून सांगणे आणि त्याच्या मनोव्रुत्तीतच एकुणात बदल घडवून आणने आवश्यक आहे.

मी अनेक प्रगतीशील शेतक-यांना विराण-खडकाळ माळांवरही लाभदायक शेती करतांना पाहिले आहे आणि मला त्या सर्वांचा सार्थ अभिमानही वाटतो. पण त्यांनी पारंपारिकतेचा त्याग केला, अभिनव कल्पना वापरल्या म्हणुनच ते यशस्वी ठरलेत हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

२. उस उत्पादक शेतकरी ही महाराष्ट्राची एक समस्या आहे. याने शेतक-यांना पैसा दिला हे खरे आहे पण त्यामुळेच ते ऐदी आणि निसर्गाचे भक्षक बनत चालले आहेत याकडे कोणाचे लक्ष नाही ही दुर्दैवाची बाब आहे. १६-१८ महिने...एकदा लागवड केल्यानंतर फक्त फायदेच उचलायचे, म्हणजे बाकी काळ अक्षरश: शेतीकडे फिरकायची विशेष गरज नाही. पाण्याचा एवढा अतिरिक्त मारा करायचा...(पाणी मुबलक आहे म्हणुन किंवा कोण विचारतो म्हणुन...) पण त्यामुळे अत्यंत सुपीक शेतजमीनी खारावत चालल्या आहेत आणि एकट्या सांगली जिल्ह्यात दरवर्षी २-३ हजार एकर जमीन खारावत चालली आहे...नापीक होत चालली आहे. एवढेच नव्हे तर उसाचा उतारा (एक किलो उसाला) जो ११ ते ११.५०% होता तो कमी होत होत आता ८-९% वर आला आहे. भावासाठी आंदोलने करण्यात झाला आहे शेतकरी पटाईत...पण ही गंभीर समस्या त्यांना समजत नाही आणि कोणी समजावून सांगत नाही.

याला कारण आहेत महाराष्ट्राचे राजकारणी...विशेशत: शुगर बेल्टमधले. शेतकरी ऐदी बनले त्याचा वापर यांना हुकमी मतपेढीसारखा तर होतोच पण राजकीय महत्वाकांक्षा त्यांच्यात निर्माण करत आर्थिक वापर करुन घेता येतो. तो कसा यावर नंतर बोलूयात. पण येथे नमूद हे करायचे आहे कि या सा-यात शेवटी शेतकरी (ऊसौत्पादक) मरणार आहे. याचे भान आताच असणे गरजेचे आहे. आलटुन-पालटुन पीके घेतली नाहीत तर जमीनीचा कस कमी होतो. पाण्याचा अतिरिक्त वापर झाला तर जमीनी खारावतात...नापीक होतात...हे सम्जावून सांगण्याची गरज आहे. व्यापक प्रबोधनाची गरज आहे.

पण थोडे धन हाती आले रे आले कि अत्याधुनिक खादीचे शुभ्र कपडे घालत, गळ्यात -हातात सोण्याच्या साखळ्या घालत क्वालिस वा अन्य नेत्यांनी लोकप्रिय केलेल्या वाहनांतुन चमचे घेत महानेत्यांच्या दारात पडीक असलेले मी जेंव्हा पहातो तेंव्हा खिन्न होतो. आणि दुर्दैवाने हे मराठा समाजाचेच असतात हे एक दुर्दैव. राजकारणाची नैसर्गिक हाव हे त्यांच्या भवितव्यातील अध:पतनाचे कारण असनार आहे हे मला येथे नमुद करतांना त्यांनी राजकारण हा व्यवसाय करावा...चांगला आहे...पण त्यासाठी शेतक-यांचा-शेतीचा बळी देवू नये असे विनम्र आवाहन करायचे आहे. त्यासाठी शिवरायांनी आखून दिलेली मार्गदर्शक तत्वे तरी आठवावीत. शेतक-यांना आता ३ ते ४% दराने कर्ज द्यावे असे निर्णय झाले आहेत. ते शेतक-यांपर्यंत पोहोचेल तेंव्हा पोहोचेल...पण शिवरायांनी ०% दराने शेतक-यांना कर्ज उपलब्ध करुन देण्याचा कायदा केला होता, तसे ते शेतक-यांना मिळतही होते याचे विस्मरण शिवरायांच्या नावावर दुकाने चालवणा-यांना माहित नाही असे दिसते. असे यांचे शिवप्रेम.

आज शेतकरीच नाईलाज म्हणुन शेती करतोय...दुसरा पर्यायच नाही म्हणुन, ही एक विघातक मानसिकता बनु लागली आहे. त्याला आपल्या कार्यात रस निर्माण व्हावा, त्याला त्यासाठी उचित मोबदला मिळायला हवा ही जाण आणि भान राजकीय नेते विसरलेत हे खरे आहे पण उर्वरीत समाजाचे काहीच कर्तव्य नाही कि काय?

सर्वच क्रुषिवलांचे प्रबोधन व्हावे...त्यांना अनुदाने...सबसीड्या...कर्जमाफ्या इइइ बाबत भिकारी न बनवता त्यांचा रास्त आत्माभिमान-स्वाभिमान वाढवावा, त्यांना जागरूक शेतकरी बनवावे आणि देशाचा सर्वांगीण विकास साधावा असे स्वप्न पाहनारा नव्हे तर प्रत्यक्षात ते क्रुतीत उतरवणारा पंजाबराव देशमुखांसारख्या, बाबासाहेबांसारख्या दुरद्रुष्टीच्या आणि प्रसंगी कठोर होत त्याची अंम्मलबजावणे करण्याची नैतीक शक्ती असणा-या नव्य महामानवाच्या शोधात मी आहे.


तोवर अखिल सुजाण समाजानेच हे महानायकत्व स्वीकारायला हवे. प्रत्येकाला जमेल तसे आपापले योगदान द्यावे लागणार आहे. समाज हाच नेता आणि समाज हाच अनुयायी अशी एक प्रगल्भ व्यक्तित्ववाद्रहित संकल्पना राबवायला हवी आहे. ज्यामुळे मनुष्य स्थीर झाला त्याचे एकमेव कारण आहे ते शेती. जीही संस्क्रुती आणि धर्म आपण जपतो त्याचे निर्मितीकारण आहे शेती.

आणि तीच जर लयाला जाण्याच्या वाटेवर असेल आणि आपणच असंवेदनशील असू तर आपले भविष्य अंध:कारमय आहे हे समजून चालावे.

7 comments:

  1. अतिशय उत्तम लेख झालाय ... सुशिक्षितांच्या डोळ्यावरचे झापड काठताना त्यांच्या शेतकअरयांविषयी असलेला नकारात्मक स्वभावाला सणसणीत चपराक मारलीये....

    ReplyDelete
  2. अप्रतिम लेख. ...विचार प्रवर्तक.....१ मे १९६० रोजी सोने १२५ रुपये तोळा होते. कापुस २५० रुपये क्विन्टल होता...आज सोने २२००० रुपये आहे..पान्ढरे सोने ...कापुस ५००० रुपयेही नाही. शेतीवरील बोजा ,छोटे आकारमान .कमी बाजारभाव..मात्र वाढलेले वीज,, पानी,,,खते,,फ़वारणी,,मजुरीचे दर यामुळे शेती परवडत नाही.आपण नवा विचार दिला आहे.धन्यवाद..

    ReplyDelete
  3. Dear Sir,
    This is one of the Great post of blog world

    ReplyDelete
  4. अप्रतिम लेख. ...विचार प्रवर्तक.....१ मे १९६० रोजी सोने १२५ रुपये तोळा होते. कापुस २५० रुपये क्विन्टल होता...आज सोने २२००० रुपये आहे..पान्ढरे सोने ...कापुस ५००० रुपयेही नाही. शेतीवरील बोजा ,छोटे आकारमान .कमी बाजारभाव..मात्र वाढलेले वीज,, पानी,,,खते,,फ़वारणी,,मजुरीचे दर यामुळे शेती परवडत नाही.आपण नवा विचार दिला आहे.धन्यवाद..

    ReplyDelete
  5. Dusari gost manaje aaj shetakari navin zade lavat va jagavat pan nahi, va banhavarche jhade todatat.

    ReplyDelete
  6. अप्रतिम आणी सुंदर लेख

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...