मित्रा
अंत:करणात तुझ्या घोंगावणारे वादळ
आणि दांभिकांच्या अविरत कोसळणा-या
झुंडीबद्दलचा उद्वेग
पाहिला कि मलाही आठवतो
तो संतप्त उद्वेगी पावसाळा
जो कोसळु पहात असलेल्या सरी उरी आवरत
घेत आकुंचुन आपले विराट रूप नि
कसा सहज जातो निघून
या क्षितिजाकडुन दुस-या क्षितिजाकडे
बेपर्वा असा कि जसे
कशाकशाशीच घेणे नाही!
(एवढा संतप्त?)
पण मित्रा-
तुझ्या वर्षण्यानेच हे अद्न्य जन
आणि वर्षेची मुळात गरजच काय असे विचारणारे
वांझ भूमीपुत्र
अखेर तुझ्या कोसळण्यातच संतोष पावणार असतील...
तर जा एकदाचा कोसळुन...
त्यांना अखेर मिळू देत एक समाधान...
नाहीतरी
कोठे ना कोठे कोसळायचे तर आहेच ना तुला?
रिते करायचेच आहे ना तुझे आस्तित्व
त्या जलभरल्या मेघांप्रमाणे?
(पावूस एका भुमीवर उद्वेगला तरी तो थांबणार आहे?
दुर्दैव हे कि मित्रा ही भुमी आपली आहे...वांझ असली...अनुत्पादक असली तरी...)
हे बघ...
जशी जगाला गरज आहे
नियमित येणा-या सर्जक पावसाळ्याची
नि पावसाला गरजच कि
वाट मिळेल तेथे
आपले पान्हे सोडायची
पण तो पान्हा
सुफल भुमीवर पडेल
कि खडकाळ रानोमाळावर
जेथे
कदाचित होणार नाही कसले नवनिर्माण...
पण त्याची पर्वा पावसाने जर कधी केली नाही
तर तुच तुझा वर्षाव
का बरे रोखतो आहेस?
(या वांझ भूमीत काहीच उगवणार नाही हाही निर्णय खरा नव्हे...
किमान उगवेल एक त्रुणांकुर
सावळया आभाळाला इवल्या पात्यांत
दिठीत घेणारा?)
हे बघ मित्रा...
मलाही अनेकदा म्रुत्युभयाने केले होते उदास...
वाटत होते
गेलो झरून मी पुर्णपणे
तर माझे असेल ते आस्तित्व काय?
ज्यामधे असेल विरलेलो मी
ते जीवनदायी
माझ्या स्म्रुती तरी
ठेवतील काय?
पण त्या ज्या-ज्या म्रुत्तिकांत
विझलो मी
त्या कणांतुन पाहतो
पुन्हा पुन्हा येणारा पावसाळा
आणि झेलत आलो आहे
त्या थेंबाथेंबातला
तोच उन्माद आणि जिव्हाळा
त्या त्या पर्जन्य-क्षणांनी
दिलीय एक जाणीव प्रगल्भ
....
जर हेच मेघ याच थेंबाथेंबातुन स्वत: मरत असतात
नवसर्जनासाठी
आणि हेच कण-कण पुन्हा मरत
मेघ बनत असतात
पुन्हा दिव्य स्रुष्टी घडवण्यासाठी...
आकार वेगळा असेल...वेळ वेगळी असेल...
किंवा वेळ आणि आकार
हेच एकमेकांत निराकार होत व्यापलेले असतील...
आणि ज्या भुमीवर काळ आणि हे आकारविहीण मेघ आस्तित्व रीते करतील
ती भुमीही वेगळी असेल...
पण जर झरून निराकार होण्यात
खंत मानत नाहीत हे मेघ...
तर मग मला म्रुत्युचे भय
असावे तरी का बरे?
बघ मित्रा...
जे भय मला नाही
जे भय तुलाही नाही
महास्तित्त्वात आपले
आस्तित्व विलीन व्हावे
हा भासही नाही...आभासही नाही
स्वप्नही नाही...
जे असे एक वास्तव
मग उद्वेग कशाला त्यास्तव?
आपण वर्षू तेथे काटे उगवणार कि
फुले
याची पर्वा कोसळतांना पावूस जर कधी करत नाही...
मग आपणच का बरे
खंतावलो आहोत?
चल...धरुयात हात हाती
तुडवुयात हीच माती
तशीच सफर करुयात आभाळावरती
झरू जेथे
उगतील काही त्रुणपाती...
कारण....
त्या त्रुणपात्यांत पुन्हा आपणच असणार आहोत
आणि
नव्या पावसाळ्याला आपल्या इवल्या बोटांनी
तुडवले जात नाही तोवर
पुन्हा पुन्हा
निमंत्रण देणार आहोत...
ना संताप...ना उद्वेग...ना आशा...ना अपेक्षा...
ही स्रुष्टी
जोवर स्रुष्टीची होत नाही
तोवर पुन्हा पुन्हा मरणार आहोत...
मग कशाला हवा उद्वेग आणि क्रोध बरे?
No comments:
Post a Comment