Saturday, August 20, 2011

चळवळ समतेसाठी आहे...नव्या मनुवादासाठी नाही!

प्रा. हरी नरके यांच्या लोकप्रभा साप्ताहिकातील क्रमश: प्रकाशित झालेल्या २ लेखांवर श्री. भैय्या पाटील यानी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरची ही माझी प्रति-प्रतिक्रिया:

सर्वप्रथम, श्री. पाटील यांनी नमुद केल्याप्रमाने, जर हरी नरके यांचे लेखन संदर्भ सोडुन बाष्कळ, द्वेषमुलक आणि थिल्लर असेल तर एका मोठ्या संघटनेच्या महत्वाच्या पदाधिका-याने त्याची दखल घेवून प्रत्युत्तर का द्यावे? (खरे तर प्रा. नरके यांचे लेखन हे खेडेकरांच्या विचारधारेशी संबंधित असल्याने त्यावर त्यांनीच प्रतिक्रिया देणे योग्य ठरले असते.) हरी नरके यांनी बामसेफ़ आणि मराठा सेवा संघाला सोडले आणि लगोलग ब्राह्मनी छावणीने त्यांना (ते बेअक्कल असल्याने आणि नरकेंनी त्यांच्यावर किती टीका केली आहे आणि करत आहेत तिकडे दुर्लक्ष करुन... त्याला बेदखल ठरवुन) लगोलग पदरात घेतले असेही सुचवले आहे त्यांनी. परंतु मग त्यांना सामाजिक जातीय तिढा अद्याप समजलेला नाही असे नाईलाजाने म्हणावे लागते. दुसरे असे कि खेडेकर साहेबांना जसा हवे ते लिहिण्याचा अधिकार आहे तसाच आणि तेवढाच अधिकार त्यांच्या वा अन्य कोणाच्याही लेखनावर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तो जर नरकेंनी बजावला असेल तर त्यावरही टीका करण्याचा आपणास अधिकार आहे आणि तो आपण बजावला आहे. परंतु यात मुळ वादाचे केंद्रबिंदू बदलवण्याचा प्रयत्न नाही काय? मुळ टीका ही खेडेकरांच्या जातीयवादी भुमिकेबाबत आणि वंशसंहाराला उत्तेजन दिले आहे त्याबाबत आहे. त्याबाबत श्री. पाटील यांनी मौन पाळुन अप्रत्यक्षरित्या समर्थनच केले आहे असे दिसते.

प्रा. नरके यांनी बामसेफ व मराठा सेवा संघाची साथ सोडली. मला असे वाटते कि आपण ज्यांच्यासाठी, ज्यांच्या कल्याणासाठी बुद्धी राबवत आहोत त्यांचे छुपे हेतु वेगळेच आहेत हे समजले तर विवेकी भुमिका घेत दुर जाणे योग्य कि मेंदू विकुन आहे तेथेच ठिय्या मांडणे योग्य? शाम सातपुते हे संघ स्वयंसेवक आहेत, भा.ज.प. चे नगरसेवक होते हे लक्षात आणुन दिल्याबद्दल त्यांचे आभार. पण मग हाच न्याय आपल्याबाबत लावला तर? म्हणजे आपण स्वत: एके काळी संघाचे स्वयंसेवक होता आणि आता नाही...हे आपल्यातील वैचारिक परिवर्तनच नव्हे काय? प्रा. नरकेंना आपण मोठे केलेत कि त्यांनीच तुम्हाला मोठे केले याबद्दलही विधान केले असते तर बरे झाले असते.

पुढचे असे कि, दादोजी कोंडदेवाचे सत्य स्वरुप समोर आणले कि पुरोगामी आणि वाघ्या कुत्र्याबद्दल लिहिले तर प्रतिगामी...(मुलनिवासी नायकमधील लेख...बातम्या) हा कसला न्याय आहे? आपण नरकेंच्या गार्गी ते सावित्री या गाजवलेल्या भाषणाबद्दल लिहिले आहे. महावीर सांगलीकर व मी या भाषणाला उपस्थित होतो. खरे तर कोणाही बहुजनीयाला अभिमान वाटेल असे ते भाषण होते. गार्गी-मैत्रेयीबद्दल (आणि त्या दोघीही बहुजनीयच होत्या हे आपणास माहित नाही हे आपले दुर्दैवच नव्हे काय?) ते जेम्तेम ५-१० वाक्ये बोलले आणि नंतर अगदि झाशीच्या राणीवरही, केसरीकारांवरही यथायोग्य टीका करत त्यांनी सावित्रीबाईंची महत्ता सिद्ध केली. आपण या भाषणाला उपस्थित नव्हता. मी आणि सांगलीकर होतो. पण हे भाषण भांडारकरमद्धे झाले याबाबतच रोष आहे. तेही कसलीही माहिती नसता. एक जातीविशिष्ट चष्मा घातला कि जे होते तेच आपण केले आहे. नरकेंनी पुर्वी लेन प्रकरणी भांडारकर संस्थेवर संतप्त टीका केली हे आपले म्हणने मान्य करत मी विचारतो कि दोष संस्थेचा असतो कि त्यात कार्य करणा-या लोकांचा? आणि त्या संस्थेतील नेमका कोण दोषी होता हे आजतागायत आपणास उमगले नसता त्याची जाण होवून त्या संस्थेतच विधीवत मार्गाने जावून बहुजनीय विद्वत्तेची महत्ता वाढवणे, त्यात सहभागी होत बहुजनोपयोगी संशोधन योग्य कि त्या संस्थांपासुन फटकुन राहणे योग्य?

आणि श्री. भैय्या पाटील...बाबासाहेबांनीच आम्हाला (बहुदा तुम्ही अनुपस्थित अस्सावेत) शिकवले आहे कि प्रत्येक भारतीय नागरिकाला समान दर्जा आहे...मग तो कोणत्याही जात/धर्म/वर्गीय असो. ब्राह्मणांचा विरोध करायचे म्हणजे नेमके काय हे आपण आम्हाला शिकवावे. त्यांना कसे जाळुन-कापुन मारायचे हेही सांगितले असते तर बरे झाले असते. एखाद्या जातीचे वा विचारधर्माचे लोक ठार मारले म्हनजे तो विचार संपतो हा अलौकिक विचार आपली संघटना मांडत आहे याबद्दल आपले अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. कारण आपण म्हणता ते वास्तवात आणायचे असेल तर सर्वप्रथम घटना दुर्लक्षित करावी लागेल. बाबासाहेबांचे नाव घेता कामा नये. गतैतिहासात धर्मपुरोहित ते सत्ताधा-यांनी जीही काही पापे केली त्याबद्दल फक्त धर्मपुरोहितांबाबत बोलावे...सत्ताधारी मात्र वगळावेत असे तात्विक/बौद्धिक आरक्षण आपणास हवे आहे असे दिसते...म्हनजे इतरांनी आपल्या न्याय्य हकांबाबत बोलले तर ते मात्र भटाळले...आणि तुम्ही म्हणता तसे वागले...बोलले तर मात्र बहुजनीय हा खाक्या कसा चालेल? चालणार नाही...चालत नाही याची जाण आल्याने हा आपला उद्रेक आहे. माझी आपणास संपुर्ण सहानुभुती आहे. जेवढा असा उद्रेक आपण वाढवत रहाल तेवढेच बहुजन शहाणे होत जातील. तुम्ही बदला हे सांगायचा अधिकार अर्थातच मला वा कोणाला नाही...तुम्ही सर्वोपरी आहात...श्रेष्ठ आहात...शत्क्तिशाली आहात हे माहितच आहे. तुम्ही म्हणाल तो इतिहास...बाकी सारी बकवास....हे आपले धेयवाक्यही मी तरी माझ्य ह्रुदयात कोरुन ठेवले आहे. पण फक्त प्रतिवाद करता येतील असे ऐतिहासिक प्रश्न उपस्थित करा ही विनंती.

आणि एकच सांगतो...ज्यांनी खरा इतिहास घडवला...देशाचे पुरातन काळापासुन अर्थशास्त्र...विद्न्यान सांभाळले, गावगाड्यातील चौकटीत का होईना संस्क्रुती वर्धिष्णु ठेवत, सेवा संस्क्रुतीही देवुन याच समाजाला सर्वार्थाने बळ दिले आणि संस्क्रुती निर्माण केली त्यांना आम्ही वारंवार अभिवादन करतो. ज्यांनी फक्त राजकीय फायद्यांसाठी, अगदी शिवाजी महाराजांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि फक्त निर्माणकर्त्यांकडुन खंडन्या वसुल करण्यात धन्यता मानली...आजही मानत आहेत त्यांना सुचवू इछ्छितो कि हे पुढे भविष्यात चालनार नाही...तुमचे जाणते...अजाणते नेते...जाणते राजे...यांनी इतिहास पाजळावा तेवढा पाजळावा...पण गरीब शेतकर-यांच्या छातीत वर्तमानात गोळ्या माराव्यात? स्वता:ला काय परमेश्वर समजतात कि काय? त्याबद्दल तोंड उघडले असते तर बरे झाले असते.

आपले म्हनने आहे कि बहुजनीय स्त्रीयांची पराकोटीची बदनामी ब्राह्मणांनी केली आहे. कोणत्या पुराणात काय नेमके लिहिले आहे याचे संदर्भ न देता (जणू काही कोणीच पुराणे वाचलेच नाहित असा आव आणत) बेधडक विधाने करणे हे काही योग्य नाही. धर्मांमधील सांकेतिकता आणि त्यांचे होणारे कथात्मक रुप हे समजलेले दिसत नाही म्हणुन हा व्रुथारोप आहे. ब्राह्मणांनी ब्रह्मदेवाने आपल्याच मुलीवर कुद्रुष्टी टाकल्याची कथा लिहिली म्हणुन त्याला "बेटीचोद" म्हणता...आणि क्षत्रिय स्त्रीयांनी परशुरामाने प्रुथ्वी नि:क्षत्रीय केल्याने ब्राह्मणांपासुन संतती पैदा केली असे त्यांनीच लिहिले म्हणुन त्यांना बहुजन द्रोही...स्त्रीयांची असह्य बदनामी केली असे म्हनता...पण मुळात या कथांत तार्किकता नाही...इतिहास नाही... परशुरामाचे खरे स्वरुप आहे त्याच पौराणिक इतिहासातुन समजावुन घ्यायचे नाही असे कसे चालेल? दास विश्रामधाममधील (अगदी रामदासांचेही) अत्यंत अनैतिक, ब्राह्मण श्रेश्ठत्वाचे अहंगंडयुक्त लेखन हे निषेधार्हच आहे आणि त्याचा विरोध व्हायलाच हवा. पण हे लोक आजचा समाज चालवतात असे आपणास का वाटते हे समजत नाही. (आपण अर्थात या बाबींचा उल्लेख केलेला नाही.) आणि त्यांनी काही शतकांपुर्वी असे लेखन केले त्याचा बदला आजच्या वर्तमानात कसा घेवू शकता? जे चुक आहे ते पुराव्यांनीशी उघड करणे हे श्रेय कि उगाचच कसलाही संदर्भ न देता खेडेकरांच्या लेखनाचे अंध समर्थन करणे योग्य?

आपण सारेच एका प्रदिर्घ युद्धाचे सहभागी घटक आहोत. हे एक सांस्क्रुतिक युद्ध आहे. या युद्धाचा जय वा पराजय हा केवळ आपल्या बौद्धिक पात्रतेवरच ठरणार आहे...कोण अभिजन कोण बहुजन याचा निकालही यावरच अवलंबुन आहे. संस्क्रुती घडवतो तो अभिजन आणि त्याचे अनुसरन करतो तो बहुजन अशी खरी व्याख्या आहे. जर आपणा सर्वांना संस्क्रुतीचे पुनर्निर्माण करायचे असेल, गतकाळात जे गमावले ते परत प्राप्त करायचे असेल तर आपला समग्र द्रुष्टीकोन बदलायला हवा. आपण व्यक्तीवर टीका करत आहोत कि प्रव्रुत्तीवर याचाही विचार करायला हवा. या लेखात जीही काही टीका आहे ती स्वागतार्ह असली तरी ती व्यक्तिगत आहे, नरकेंनी त्यांची साथ सोडली, मराठा आरक्षणाला विरोध केला म्हणुन वगैरे...हे यामुळे समाजाला तरी समजले हे या लेखाचे फलित आहेच. प्रा. नरके यांनी त्यांच्या लेखांत खेडेकरसाहेबांच्या साहित्याची समीक्षा केली आहे आणि कोणताही समिक्षक समिक्षा करतांना मुळ लेखकाच्या लेखनातील समिक्षार्ह भाग अवतरणांत देतो तसा दिलेला आहे. खेडेकरांचे साहित्य योग्यच आहे असा श्री. भैय्या पाटील यांचा विश्वास असल्याने व तो त्यांनी उपरोक्त लेखात व्यक्त केला असल्याने, व त्याबाबत मुळ लेखकास कसलाही खेद नसल्याचे व्यक्त केले असल्याने मग प्रश्न हा निर्माण होतो कि मग हे प्रत्युत्तर मुळात आहे कशासाठी? समिक्षेची समिक्षा डा. आ. ह. साळुंखे यांनी एकदा फार विद्वत्तापुर्वक केली होती. तशी समिक्षा करायला आणि मुळ लेखकाचे म्हनने योग्यच आहे हे सिद्ध करायला हरकत नाही...किंबहुना तेच अभिप्रेत होते. परंतु नरके कसे भटाळले आहेत, त्यांच्या भुमिकेत कसा बदल झाला आहे, त्यंनी खाकी चड्डी कशी घातली आहे वगैरे...वगैरे...सांगत नरकेंचे व्यक्तिगत शिर्कान करणे हा जर या लेखाचा हेतु असेल तर तो योग्य आहे काय? प्रतिपक्षाला छोटा दाखवून, बदनाम करुन आपण मोठे होत नसतो. मुलनिवासी नायक हा पेपर (?) आणि त्यांचे विद्वान संपादक गेली ८-९ महिने असाच द्वेषाचा गर्भ वाढवत आहेत. त्याचे पतन...अध:पतन होईल तेंव्हा होवो वा गांधारीप्रमाणे १०१ "आदर्श" प्रसवो...त्याची खंत कोणाला असल्याचे दिसत नाही.

परत सांगतो कि जसे ब्राह्मणच ब्राह्मणांचे शत्रु आहेत असे मी वारंवार स्पष्ट करत आलो आहे...तसेच बहुजनच बहुजनांचे शत्रु आहेत हे विलास खरात ते स्वत:ला बहुजनीय च्गलवळीचे कार्यकर्ते समजणारे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले कथित विचारवंत चळवळीचे शत्रु आहेत कारण त्यांच्यात आपल्याच विचारवंतांना, त्यांच्या वैचारिक अधिष्ठानाला...मान्य करण्याची, मुक्तद्वार देण्याची, त्यांच्याशी वैचारिक लढा देण्याची क्षमता नाही. काही आडमुठे ब्राह्मण स्वता:ला सावरकरवादी/नथुरामवादी/सनातन प्रभात वादी समजत एक ब्राह्मण माहात्म्याचा जयघोष करत एक रोष निर्माण करत आहेत तसेच...आणि त्याहीपेक्षा भयंकर क्रुत्य करायला/विधाने आपण करीत आहात....म्हणुन चळवळींचा म्रुत्यु होतो तो असा. सारे विचारवंत या चळवळीपासुन दुर का पळत आहेत त्याचे कारण यात आहे. हुकुमशाही कोणालाही मान्य असु शकत नाही...ज्यांना मान्य आहे त्यांनी बहुजनीय चळवळीत राहिले काय आणि समाजद्रोही संघटनांत राहिले काय...फलित एकच आहे. चळवळ समतेसाठी आहे...नव्या विषमतेसाठी नाही...नव्या मनुवादासाठी नाही हे क्रुपया लक्षात घ्यावे.


1 comment:

  1. पुरोहित ही माणसाच्या भटक्या आयुष्याच्या काळात उदयाला आलेली संस्था असावी. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, वणवे, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे पुनर्वसन करावे लागे ते करणे/करविणे ही या वर्गाची जबाबदारी असावी. कर्मकांड करणारा तो पुरोहित ही कल्पना नंतरची वाटते. कारण वैदिक काळात यजमानच कर्मकांड पार पाडीत असे. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यानाही वेदाधिकार होता. शूद्र ही संकल्पना परंपरा नाकारणाऱ्यांपुरतीच मर्यादित होती.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...