Wednesday, November 9, 2011

नवी भग्वद्गीता

(भगवान श्रीक्रुष्ण जर दिल्या शब्दाला जागुन दुर्योधनाच्या पक्षाला मिळाले असते तर त्यांचे तत्वद्न्यान काय असु शकले असते हे मी "शुन्य महाभारत" या कादंबरीत विस्ताराने दाखवले आहे. अशा स्थितीत गीता कशी असली असती...ती येथे...)


कृष्णसखा पार्थ, अर्जुन, दीनवदनाने श्रीकृष्णासमोर उभा होता. अमावास्येच्या आदल्या दिवसाची रात्र असल्याने आकाशात तारकांनी गच्च दाटी केली होती आणि हवा संथ गतीने वाहात यच्चयावत सृष्टीस परमात्मस्पर्शाने आशीर्वाद देत होती.

अर्जुन म्हणाला

हे कृष्णा, माझे मन मोहाने ग्रस्त झाले आहे. उद्या सकाळी युद्ध सुरू होणार आहे आणि हे युद्ध माझ्याच आप्तांशी असल्याने मी हे युद्ध का करावे, माझ्याच भ्रात्यांच्या वधास कारणीभूत होऊन पातकांचा असह्य भार का घ्यावा हा प्रश्न मला व्यथित करतो आहे. आता तूही आमच्या बाजूस नाहीस त्यामुळे धर्मानेही आमची साथ सोडली आहे की काय असे मला तीव्रतेने वाटते आहे.

हे मधुसूदना, युद्ध हे भीषण कर्म आहे आणि त्यामुळे असंख्य जीवांचा संहार होणार आहे. केवळ राज्यलाभासाठी जर माझ्याच आप्तेष्टांची हत्या झाली तर माझी कीर्ती कलंकित होईल, हे तर निश्चित. त्यामुळे शस्त्रसंन्यास घेऊन पुन्हा अरण्याची वाट चालावी असे मला वाटते आहे. युधिष्ठिराचेही असेच मत आहे. धृतराष्ट्रपुत्रांस खुशाल राज्यलक्ष्मीचा भोग घेऊ देत. आमचे त्याबद्दल आता काहीही म्हणणे नाही. तू हे माझे मत दुर्योधनापर्यंत पोहोचव आणि या युद्धास टाळ. तसे केल्याने आमचीही कीर्ती अक्षय राहील आणि आम्ही धर्माने वागलो असेच इतिहास सांगेल. क्षणिक लाभापेक्षा अजेय कीर्ती ही फार लाभाची ठरेल असे मला निश्चयाने वाटते.

श्रीकृष्ण म्हणाला

हे पार्था, धर्म सूक्ष्म आहे आणि मानवी व्यवहार हे एवढे गुंतागुंतीचे आहेत की, प्रसंगी काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरविण्यात ज्ञानवंतही कमी पडत असतात.

उद्या सुरू होणारे युद्ध हे तुम्हा आप्तेष्टांत आहे, असे जे काही तू समजतो आहेस ते केवळ मायेमुळे. हे पार्था, मानवी जीवनच मुळात मायेने व्यापलेले आहे. मायेमुळेच कोणी मित्र वाटतो तर कोणी शत्रू. कोणी प्रिय वाटतो तर कोणी अप्रिय.

दुर्योधन-भीष्मादी व्यती तुला आप्त वाटतात कारण ही माया.आरे, मायेमुळे मानवात वास करणारा आत्मा झाकलेला असतो. ती माया मनुष्यास सत्य काय ते कदापि कळू देत नाही. मायेचे आवरण दूर कर. मायेचे आवरण योगाने दूर केलेस, तर तुझ्या लक्षात येईल की, तुझा येथे कोणीही आप्त नाही. तसाच तुझा कोणी शत्रूही नाही. त्यामुळे हे पार्था, तू का मोहग्रस्त होतो आहेस?

शोक हा अनित्य आहे, म्हणूनच शोक त्याज्य आहे. आनंद शाश्वत आहे म्हणून आनंद प्रेय आहे. आणि हेही लक्षात घे पार्था, की जन्म आणि मृत्यू या घटनाही अनित्य आहेत. म्हणून जन्माबद्दल आनंद व्यक्त करणे आणि मृत्यूबद्दल शोक करणे, त्याज्य आहे. हा शाश्वत धर्म मी तुला सांगत आहे.

आप्तांशी युद्ध करावे की नाही हा मोह तुझ्या मनात निर्माण झाला आहे; पण "आप्त' हे आप्त नाहीत हे तुला मायेचे आवरण दूर केल्याखेरी किळणार नाही. तेव्हा या भूतलावर तुझे युधिष्ठिर, द्रौपदीसह कोणी आप्त नाहीत हे शाश्वत सत्य तू ध्यानी घे.

कारण हे धनंजया, प्रिय वाटणे हा जेव्हा मनुष्याचा स्वभाव बनतो तेव्हा त्याला काही अप्रियही वाटणार हे निश्चित आहे आणि प्रिय आणि अप्रियतेमधील सीमारेषा मानवी भावनांनी घातलेल्या असतात. भावनांचा त्याग केलास तर कोणी प्रिय वाटणार नाही की कोणी अप्रिय. आणि साधू हा भावनाहीन असला पाहिजे.

आणि ज्याला भावना नाहीत त्याला प्रिय आणि अप्रिय काहीच नसते. त्याचे मन निर्विकार आणि अलिप्त असते. अशा व्यतीस कोणतेही कर्म षिद्ध नसते की निषिद्ध.

तेव्हा हे शत्रुतापना, तुला हा जो शोक होत आहे, त्याचे मला काही एक कारण दिसत नाही. कारण हे पार्था, तू या युद्धाच्या दिशेने स्वत:हून चालत आला आहेस आणि हे तुझे वर्तन अंती युद्धातच परिणत होणे हे अधिक इष्ट असे मला वाटते.

हे धनंजया, जर कौरव तुझे आप्त आहेत तर तेवढेच पांडवही तुझे आप्त आहेत. एवढेच नव्हे तर पांडवांवर श्रद्धा ठेवून या संगरात तुझ्या बाजूने जे कोणी उतरले आहेत तेही तुझे आप्तच आहेत. आता हे युद्ध करावयाचे की नाही याचा निर्णय घेण्याची वेळ टळून चुकली आहे.

मनुष्य आपल्याच कर्मांनी आपले भवितव्य नित्य घडवीत असतो. परन्तु जे काही घडते ती आपली नियती असते या विरोधाभासाने मानवी मन व्याप्त असल्याने, हे पार्था, मनुष्य आपल्या कर्मांवर नियंत्रण ठेवीत नाही.

उद्या घडणारे युद्ध हे एकाकी घडते आहे असे नसून त्याची बीजे सर्वांनीच इतिहासात पेरून ठेवली आहेत आणि त्यास खतपाणी घातलेले आहे. तेव्हा आता एकाएकी त्या कर्माचे फल म्हणून हे, जे युद्ध ते, तुला अव्हेरता येणार नाही.

कारण ते आता तुझ्या एकटयाच्या हातीही नाही. फार तर तू एकटा संन्यस्त होऊ शकशील. परंतु मग तुला जे वाटते की तुझी कीर्ती अक्शक्य होईल ते काही खरे नाही. बाबारे, एक भित्रा मनुष्य अशीच तुझी त्रैलोयात कीर्ती होईल. सृष्टीचा चिरंतन धर्म आणि मानवी धर्म यात भेद आहे तो यामुळेच. कारण अमुक एक कर्म करावे की नाही याचे सर्वदा मनुष्यास स्वातंत्र्य असते असे नाही. मनुष्य जन्मास येतो तेव्हा तो स्वतंत्र असतो. आणि ज्या परिस्थितीत त्याची वृद्धी होते, त्या परिस्थितीचे पारतंत्र्य आपसूक त्याच्या गळ्यात पडत असते.

मी तुला सांगितलेच आहे हे सव्यसाची, की या जगात काही प्रिय नसतानाही मनुष्यास काही गोष्टी प्रिय वाटतात. कारण त्याची परिस्थिती. तसेच या जगात काही एक अप्रिय नसताही त्या गोष्टी अप्रिय वाटतात कारण मनुष्याची परिस्थिती. मनुष्य खर्‍या अर्थाने परिस्थितीचे अपत्य असतो.

परिस्थिती मनुष्यास घडविते, यश देते किंवा अपयश देते.

परंतु हे प्रिय कुंतिपुत्रा, परिस्थितीच मुळात अनित्य असल्याने मनुष्याचे यश आणि अपयशही तेवढेच अनित्य असणार हे उघड आहे.

तेव्हा उद्या जी परिस्थिती असणार आहे त्या परिस्थितीचा तू दास आहेस आणि हे माया-मोहाने भरलेले संभाषण विसरून तुला प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करावा लागणार आहे. परंतु उद्याची परिस्थिती ही अनित्य आहे कारण परवाची परिस्थिती कशी असेल ते उद्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे अशा अनित्य स्थितीत विजय लाभतो की पराजय, मृत्यू लाभतो की जीवन हे सुद्धा ठरवणे तेवढेच अनित्य आहे.

म्हणून हे कौंतेया, असा शोकमग्न होऊ नकोस.'



अर्जुन म्हणाला

हे नारायणा, मी मनुष्य आहे आणि मी विकारांनी ग्रस्त आहे हे तर सत्य आहे परंतु तू आताच म्हणालास की सृष्टीचा चिरंतन धर्म आणि मनुष्याचा धर्म यात भेद आहे. मला हे सांग की असे का? धर्म हा एकच असला पाहिजे आणि तो सर्वांना सारखाच लागू पडला पाहिजे असे मला वाटते. तेव्हा हे उदारहृदया, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दे.



कृष्ण म्हणाला

हे पार्था, तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यात खचितच मला आनंद वाटेल. कारण धर्म म्हणजे नेमके काय हा प्रश्न मनुष्यास केव्हा ना केव्हा अवश्य पडत असतो.

धर्म ही मूलत: मानवनिर्मित गोष्ट नाही. मनुष्य ज्या धर्मास निर्माण करतो आणि त्या स्वनिर्मित धर्मामुळे आपले आणि इतरांचे कल्याण होईल असे समजतो, तो मुळात मानवी धर्म असल्याने आणि या धर्माचा निर्माता मानवच असल्याने मानवी विकारांचा स्पर्श मानवी धर्मास होणे सहशिय आहे.

पण मनुष्य हाही सृष्टीचे अपत्य असल्याने सृष्टीधर्म त्यालाही लागू पडत असतो. परंतु मायेमुळे मनुष्य सृष्टीचा धर्म समजावून घेण्यात अपयशी ठरतो.

मानवी विकारांचे कारण त्याचे मन होय आणि या मनामुळे मनुष्य राग, लोभ, दया, हिंसा, स्वार्थ, परमार्थ या विकारांनी ग्रस्त होत असतो. या विकारांमुळेच मनुष्य बराह्मण धर्म, क्षात्र धर्म, वैश्य धर्म आणि शूद्र धर्म हा वेगवेगळा आहे असे समजून मानवी धर्माचे विभानि करीत धर्माचा संकोच करीत असतो.

शिवाय या मानवी धर्माचे नियंत्रण स्वत: मनुष्यच करीत असल्याने परिस्थितीनुरूप धर्माचे परिवर्तन करण्यात येत असते. शिवाय धर्माचे नियंत्रण नेमके कोणत्या मानवी गटाच्या हातात आहे त्यावरही धर्माचे स्वरूपलू शकते. आणि जे बलहीन आहेत त्यांच्यावर धर्म लादला जातो तर जे शक्तिशाली आहेत तेच आपल्या मताप्रमाणे धर्म घडवतात हा इतिहास आहे.

याचाच अर्थ असा की, मानवी धर्म अनिश्चित असून तो अक्शक्य नाही. धर्म ही मनुष्याची विशिष्ट परिस्थितीतील सोय होय आणि जो धर्म मनुष्य आपली सोय म्हणून वापरू शकतो तो धर्म शाश्वत आणि चिरंतन आहे असे कसे म्हणता येईल?

म्हणजेच, मानवी धर्म शाश्वत नाही आणि जे शाश्वत नाही त्याप्रमाणेच आचरण करण्याचा आगरह कोणी का धरावाबरे?

आता हे पार्था, मी तुला चिरंतन धर्माची गुह्ये सांगतो. हा धर्म सृष्टीच्या उत्पत्तीकाली ब्रह्मदेवाने केला आणि त्याच धर्माने सारे चराचर चालत असून ज्या योगे आकाशीच्या तारका भूमंडळावर कोसळत नाहीत किंवा तेजोमय सूर्य पृथ्वीच्या निकट येऊन पृथ्वीस दग्ध करीत नाही किंवा ज्या योगे अरण्यातील समस्त हिंस्र प्राणिजगत एकत्र येऊन मानवांवर सामूहिक हल्ले करीत नाहीत, तो धर्म मी तुला सांगतो.

पार्था, लक्षपूर्वक ऐक.

सर्व सृष्टी ही अवकाशात उत्पन्न होते आणि अवकाशातच लय पावते. अवकाश हेच सृष्टीचे निर्मितीकारण आहे आणि अवकाश हेच सृष्टीचे संहाराचे कारण आहे. याच परम अवकाशास आपण ब्रह्मदेव म्हणतो आणि सर्व चराचरात ब्रह्माचे आस्तित्व आहे, असे म्हणतो. आणि हे तत्त्व फार गूढ आहे, जे तत्त्व यापूर्वी कोणी एजेकलेले नाही, ते तत्त्व मी तुला सांगत आहे.

अवकाशरूपी ब्रह्म हेच सृष्टीचे राजकारण आहे आणि यातूनच दिव्य अद्भुत गोष्टींची निर्मिती झाली आहे, हे निश्चयाने सत्य आहे.

या निर्मितीसाठीच सर्व राजतत्त्वांबरोबरच धर्माचीही निर्मिती झाली. हा धर्म हाच विश्वाचा नियमनकर्ता प्राण आहे. त्याच योगे सर्व सृष्टीचे व्यवहार नित्य होत असतात. ज्याप्रमाणे राज सूर्य ज्या समयी उगवतो त्याच समयी तो नित्य उगवत असतो. ऋतुचकर आपल्याला कळूही न देता अब्जावधी वर्षे अव्याहत चालू राहते. जो प्राणी आज जन्माला आला तो युवा होऊन वृद्ध होताना आणि एक दिवस मृत्युमुखात जाऊन स्थिर होताना आपल्याला दिसतो.

हे धनंजया, सृष्टीच्या या नियमात कधीही बाधा येत नाही, हे शाश्वत सत्य आहे. दक्षिणायनाचे उत्तरायणात परिवर्तन होणे, हे आपण निश्चयाने सांगू शकतो. त्याचयोगे आपण आपलेही जीवन या अव्याहत ऋतुचकराशी जुळवून घेत असतो.

हे पार्था, ऋतुचकर शाश्वत आहे. नभोमंडपी नक्षत्रांनी आपले स्थान कधीलायचे हे सुद्धा शाश्वत आहे, परंतु मनुष्य कधी आणि कसे वागेल याचे भाकीत कोणीही ज्ञानी मनुष्य करू शकत नाही, हे तेवढेच सत्य नाही काय?

पार्था, धर्माचे ऊनि एक गुह्य तुला मी सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक. सृष्टी जड, अर्धचेतन आणि चैतन्य या तीन तत्त्वांत वाटली गेली आहे. जड सृष्टी ही अपरिवर्तनीय आणि शाश्वत आहे, याचा अनुभव आपण नित्य घेत असतो. अर्धचेतन सृष्टी म्हणजे सकल चराचरात वास करणारी जीवसृष्टी. यात डोळ्यांनीही दिसणार नाहीत अशा अंतूंपासूनि ते समुद्रतलात विहार करणारे, हजार माणसांचे वनि जेवढे भरेल, एवढे अवाढव्य जीव वास करत असतात आणि मी असे ऐकतो की त्यातील अनेक जीव मनुष्याच्या निर्मितीपेक्षाही प्राचीन आहेत आणि त्यांचे सामर्थ्य एवढे आहे की, ते कोणत्याही धैर्यशाली पुरुषासही भयभीत करू शकतील.

परंतु हे पार्था, ही जीवसृष्टी एवढी पुरातन आणि समर्थ असताही, या सृष्टीने कधी या भूमीच्या एका कणावरही अधिकार सांगितल्याचा इतिहास नाही. ही सृष्टी जन्मास येते, नियत कर्मे करत असते आणि एक दिवस मृत्यूही पावत असते. जन्म आणि मरणाबाबत या सृष्टीने कधी हर्ष किंवा खेद व्यत करत असताना मी पाहिलेले नाही किंवा क्षणिक हर्ष-खेदासच जीवनाचा आधार मानत भविष्यामध्ये कसे वर्तन करावयाचे याचा त्यांनी निर्णय घेतला आहे, असे माझ्या पाहण्यात नाही.

कारण हे पार्था, चिरंतन धर्माचे पालन करण्यात मानवेतर जीवसृष्टीच श्रेष्ठ आहे आणि चैतन्याचेच म्हणशील तर, चैतन्य कोणत्याही दुर्तत्त्वाहून अबाधित आहे. अग्नी हे चैतन्य आहे आणि अग्नी हा शुद्ध असतो हे सारे ज्ञानीनि जाणतात. प्रकाशही चैतन्य आहे आणि तो निर्विकार आणि सनातन असून सार्‍या जीवसृष्टीचे कारण असूनही कधी अहंग्रस्त झाल्याचे ऐकिवात नाही. नियमानेया धरेवर र्पन्यि वर्षत असतो आणि त्यायोगे ही पृथ्वी सुफलाम होत असतानाही र्पन्याने किधी अहंभाव बाळगून "मी अमुक जीकाणी वर्षेन, अमुक जीकाणी नाही' असे ठरवल्याचे एजेकवातनाही.

हे धनंजया, चैतन्य हेच मूळ ब्रह्मस्वरूप आहे. या चैतन्याने अर्धचेतन आणि जड सृष्टीची निर्मिती केली आहे. असे असूनही सर्व जीवमात्र, जड आणि अदृष्ट सृष्टीस चैतन्य सारख्या प्रमाणात आप-पर भाव न ठेवताही आपला भाग देत असते.

आणि हे पार्था, हाच शाश्वत-सनातन आणि चिरंतन धर्म आहे. परंतु मानवी धर्माचे काही वेगळेच आहे.

मानवी धर्म स्थिर नाही. मानव स्थिर नाही. सृष्टीविषयीचे ज्ञान मिळवण्यासाठी मनुष्य कष्ट घेतो हे खरे, परंतु हे ज्ञान तो स्वत:च्या स्वार्थासाठी आणि अभ्युदयासाठी वापरीत असतो आणि एवढे करूनही त्याचा स्वार्थही शाश्वत नाही.

मानवाचा स्वार्थ शाश्वत नाही, म्हणून त्याचा परमार्थही शाश्वत नाही.

म्हणूनच मानवाचे जग हे अनित्य आहे आणि त्याचा धर्मही अनित्य आहे. तेव्हा मनुष्य आपल्या स्वनिर्मित धर्माने वागणार हे जर सत्य आहे, तर त्याला शाश्वत धर्माचा तरी काय उपाय?

शाश्वत धर्माने पाहू जाता हे पार्था, तुझे कोणी आप्त नाहीत. कोणी इष्ट नाहीत. तू तुझाच आहेस आणि तू जर तुझाच असशील तर मायेचे आवरण नष्ट करून तथागत दृष्टीने सर्व परिस्थितीकडे पाहावयास हवे. मग भूमीसाठी युद्ध का करायचे हा प्रश्न तुला पडणे स्वाभाविक आहे. कारण पार्था, भूमी ही मनुष्याच्या मालकीची वस्तू असू शकत नाही, कारण ती फक्त मानवासाठी निर्माण झालेलीनाही.

दुसरे असे की, हे शत्रुतापना, इतर वाईट आहेत हे समजून त्या वाइटाचे निराकरण करण्याचा फक्त आपल्याला अधिकार आहे, असे जे समजतात. तेही अज्ञानी होत.

तुझा संघर्ष कौरवांशी आहे. ते तुझे आप्त आहेत असेच तू म्हणतो आहेस आणि आप्तांशी संघर्ष नको अशी उपरतीही तुला झाली आहे.

परंतु त्यामुळे तुला जो संदेह झाला आहे, त्याचे काही निराकरण होत नाही. कारण तू संन्यास घेण्याच्या गप्पा मारीत असताना दुर्योधनाचा दावा बरोबर आहे, असेही काही केल्या म्हणत नाहीस.

आणि जर तुझ्या मते दुर्योधनाचा दावा बरोबर नाही, असे असेल तर तो दावा खोटा करण्यासाठी तरी तुला युद्ध करावे लागेल, नाही तर दुर्योधनाचा दावा खरा आहे, असे मान्य करून तरी तुला युद्ध टाळावे लागेल.

आता, युद्ध करायचे की नाही, याचा निर्णय तुला घ्यावाच लागेल. या युद्धात जय मिळेल की पराजय, आप्तांची हत्या होईलकी तुझी, याचा विचार करण्यात काही एक अर्थ नाही, असे मला निश्चयाने वाटते. तेव्हा शोक सोड आणि युद्धास दृढनिश्चयाने तयार हो, असेच माझे तुला सांगणे आहे.


अर्जुन म्हणाला

हे नारायणा, तू मला शाश्वत धर्म आणि मानवी धर्मातील फरक सांगितलास. हे खरे की, मानवी धर्म हा शाश्वत नाही. परंतु मीही मनुष्यच आहे आणि मनुष्य असल्याने मला मनुष्यांचा धर्म लागू पडतो, हे तर सत्य आहे.

मी मनुष्य असल्याने मला विकार आहेत. ते असल्यानेच कौरव हेही माझे आप्तच आहेत, भीष्म माझे पितामह आहेत आणि द्रोणाचार्य माझे गुरू आहेत, हे मी कसे विसरू?

हे परमात्मना, स्मृती मनुष्यास असतात आणि त्या अन्य जीवसृष्टीपेक्षा तीव्रतर असतात हे तर तुला ज्ञात आहे. आणि स्मृतीया मनुष्याच्या जीवनात ज्या घटना घडतात त्यांचे संगरह करतात आणि मनुष्याचे कोणाही व्यतीशी असणारे वर्तन हे त्याच्या त्या-त्या व्यतिसंदर्भात साचलेल्या स्मृतींशी संबंधित असेल हेही तर सत्यआहे.

परंतु हे कृष्णा, अन्य सजीव वा अजीव सृष्टीस स्मृती आहेत की नाहीत हा प्रश्नच आहे. परंतु ज्याअर्थी अन्य पशू सूड घेण्यास तत्पर झाल्याचे पाहण्यात नाही, त्याअर्थी पशूंस स्मृती नसाव्यात किंवा असल्या तरी अत्यल्प असाव्यात, असे मला वाटते.

परंतु हे करुणाकरा, मनुष्याच्या स्मृती तीव्रतर असून अगदी बालपणीही घडलेल्या घटना त्याच्या लक्षात राहातात आणि त्या स्मृतींवर आधापरत त्याचे भविष्यातील वर्तन होत असते. मनुष्यास स्मृतीच नसत्या तर आम्हीही येथे युद्धासाठी का मिलो असतो?

आणि त्यामुळेच मनुष्यधर्म हा वेगळा असणार आहे, हे निश्चितच आहे. प्रत्येक घटनाच्या स्मृती मानवावर संस्कार करीत जाणार असल्याने मानवी व्यवहार अनित्य राहणार आहे हे तेवढेच खरे. परंतु हे श्रीकृष्णा, मनुष्यास उपरती होऊन त्याने कधी ज्ञानवंतांनी सांगितलेल्या मार्गाकडे पाहून मोक्षासाठी प्रयत्न करू नये असे थोडेच आहे?

युद्ध हे नि:संशय भीषण कर्म होय आणि हे कर्म करण्यापेक्षा ते न केलेले बरे असे मला वाटते, तेव्हा तू मला योग्य ते दिग्दर्शनकर.


श्रीकृष्ण म्हणाला

हे पार्था, मी तुला कर्मविषयक सिद्धांत विस्ताराने विषद करतो. तो तू लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुझा मोह दूर होईल.

मनुष्यच काय परंतु ही चराचर सृष्टी प्रतिक्षणी कर्म करीत असते. कर्म केल्यावाचून सजीव काय, अजीव सृष्टीही पळभर राहात नाही. मनुष्यास नकळतही मनुष्य अनेक कर्मे करीत असतो किंवा काही कर्मे करावीत की न करावीत याचे स्वातंत्र्यही मनुष्यास नसते. परंतु ही निसर्गाची शाश्वत कर्मे आहेत आणि या कर्माची कोणतीहीहा मनुष्यास होत नाही.

परंतु संकल्प करून त्यानुसार जी कर्मे मनुष्य करीत असतो, त्या कर्मांची इष्टानिष्टता कशी आहे, यापेक्षा त्या कर्माचा संकल्प इष्ट आहे की अनिष्ट यावर कर्माचे इष्टानिष्टत्व ठरत असते.

कर्माची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली आहे. प्राणिमात्र अन्नपासून होतात. अन्न र्पन्यापासूनि उद्भवते तर र्पन्यि यज्ञापासून होते आणि सारी सृष्टी म्हणजेच यज्ञ होय असेही तू समजावून घे. कर्म अनंत आहे आणि अक्षय आहे. कर्माखेरी जिगाचे रहाटगाडगे पळभरही चालणार नाही, हे तू समजून अस.

परंतु संकल्पाने केलेले कर्म हे शुभ आहे की अशुभ, ते सर्वांच्या हितार्थ आहे की त्यातून सर्वांचेच अहित होणार आहे, असे कोणतेही संकल्पधारी कर्म सर्वथा त्याज्य होय.

कारण हे शत्रुतापना, असे पाहा की, माझे म्हणून या त्रिभुवनात काही एक कर्तव्य उरलेले नाही. नियत कर्मे करीत असूनही मी नैष्कर्म्य वरत धारण केले आहे, कारण माझ्या मनात या कोणत्याही कर्माचा संकल्प नाही. संकल्प नसता केलेल्या कोणत्याही कर्माचे पातक मनुष्यास जाकटत नाही, असे "कर्म' असूनही कर्म नसते हे समजून अस.

कारण मी संकल्पित कर्म करू लागलो तर मीच उत्पन्न केलेले लोक नष्ट करणारा होईन आणि मग सृष्टीचा घात होईल.

संकल्पाने जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा तो संकल्प करणारा कर्माचा कर्ता होतो. त्यामुळे कर्त्यास कर्माचा शुभाशुभ दोष लागतो. एवढे नव्हे तर ज्यांच्यावर कर्त्याच्या कर्मांचा परिणाम होतो, त्यांचीही फळे कर्मकर्त्यास जाकटत असतात.

प्रत्येक कर्मास कर्मफळ अटळपणे जाकटलेले असते आणि त्याचा भोग प्रत्येक मनुष्यास घ्यावा लागतो.

आणि असे पाहा की, ज्ञानी मनुष्यही आपल्या प्रकृतिस्वभावाने वागत असतो. त्यामुळे इंद्रियनिगरह करून कर्म केले असता कर्मफल जाकटत नाही, असे जे मानतात ते मूढ होत.

आणि हे कौंतेया, मनुष्य सृष्ट किंवा दृष्ट असे जे काही कर्म करतो ते कामामुळे. काम हा मनुष्याचा मोठाच शत्रू होय. परंतु त्याने मनुष्याच्या आत्म्यास आच्छादिले आहे. त्यामुळे मनुष्यास सत्य आणि शाश्वत ज्ञानाचे कधीही दर्शन होत नाही.

त्यामुळे युद्ध हे भीषण कर्म होय, हे जे तू म्हणतो आहेस ते यथार्थच आहे. कारण या कर्मामागे संकल्प आहे आणि एकाच्या संकल्पसिद्धीसाठी अन्य जीवांस अपाय व्हावा असे कर्म शाश्वत धर्माने त्याज्य असायला हवे.

परंतु हे पार्था, तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय म्हणून तुझा जो नियत धर्म आहे, त्याचे काय याचाही तू विचार केला पाहिजेस. कारण असे पाहा की, स्वधर्माने वागत असता मृत्यू आला तरी तो श्रेयस्कर होय, असे पूर्वज्ञानवंतांनी म्हणून ठेवले आहे. स्वधर्माचा त्याग करून परधर्माचा अंगीकार केल्यानेही तुझा नाश होईल, असे मला वाटते.


अर्जुन म्हणाला

हे ज्ञानवंता, तू असा कोड्यातल बोऊन मला संभरमित का करतो आहेस? एकीकडे युद्ध हे त्याज्य आहे, असे तू म्हणतो आहेस आणि तूच मला माझ्या धर्माने वाग असेही सांगतो आहेस, असे का याचा उलगडा तू कर.


श्रीकृष्ण म्हणाला

जे काही आपोआप प्राप्त होते, त्याचा संतुष्ट मनाने स्वीकार करणारा मनुष्य हा त्रैलोयातही श्रेष्ठ असतो, परंतु जे प्राप्त होत नाही ते प्राप्त करण्याचा संकल्प करून जो कोणी कर्म करीत असतो तो नि:संशय अधम कोटीत जातो.

युधिष्ठिरास राज्यश्री प्राप्त व्हावी या संकल्पाने तू युद्धायमान झाला आहेस आणि म्हणूनच हे युद्ध त्याज्य आहे, असे मला म्हणावेसे वाटते.

परंतु ज्या संकल्पाने तू युद्धरत झाला आहेस, त्याच संकल्पाने प्रतिपक्षही युद्धास सज्जा असल्याने शाश्वत धर्म काय आहे आणि आपण आप्तांशी युद्ध का करावे हा तुझ्या मनात निर्माण झालेला प्रश्न निरर्थक आहे.

आणि तुझा संकल्प प्राचीन असल्याने आणि काळाचे रहाटगाडगे उलटे फिरविता येत नसल्याने तुला तुझ्याच संकल्पापासून हटता येणे शक्य नाही आणि म्हणूनच आता संकल्प कसाही असो, त्या संकल्पार्थ एवढी सिद्धता केल्यानंतर तुला हा कर्मयज्ञ करणे करमप्राप्त आहे.

कारण हे शत्रुंया, जिन्माने तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियास योग्य असेच संस्कार तुझ्यावर झाले आहेत. युद्ध करणे हा क्षत्रियाचा विहित धर्म आहे आणि त्या धर्माने युद्ध हे कर्म तुला प्रेय असणे स्वाभाविक आहे. तू युद्ध कर असे जे मी म्हणालो ते तुझ्या धर्मावर आणि संकल्पावर दृष्टी ठेवून.

तू या युद्धातून दूर झालास तरीही हे युद्ध होणारच नाही, असेही आता नाही. कारण हे युद्ध फक्त तुझ्या व्यतिगत संकल्पनासाठी होते आहे, असे म्हणणे अर्धसत्य आहे. द्रुपद, धृष्टद्युम्न, भीम, द्रौपदीसह अनेकांचे या युद्धासाठी संकल्प सिद्ध आहेत, कारण त्यांचे व्यतिगत संकल्पही हे युद्ध होण्यासाठी बाबिदार आहेत. तेव्हा हे युद्ध केवळ तुझ्यासाठी होत आहे, असे अहंभावी विधान तू करू नयेस हे उत्तम.

त्यामुळे या यज्ञाचा संकल्प झालाच आहे. यज्ञासाठी समिधाही आयत्या तयार आहेत आणि होताही मंत्रध्वनी करीत आहे, असे असता हा यज्ञ होणे हेच श्रेयस्कर.

बरे, हे युद्ध केल्याने तुला स्वर्गप्राप्ती होणार की नाही किंवा युद्ध न केल्याने स्वर्गप्राप्ती होईल की नाही याचे तरी ज्ञान तुला कोठे आहे? तुला समजलेला भूतकाळ तेवढा तुला ज्ञात आहे, वर्तमान अत्यंत अस्थिर असून प्रचंड गतीने तो भूतकाळाच्या महापात्रात विलीन होत आहे आणि भविष्य गडद अंधाराने व्याप्त आहे.

आणि हे पाहा, संकल्प कसाही असो, तो नेटाने सिद्धीस नेणारा मनुष्य हा संभरमित मनुष्यापेक्षा कधीही श्रेष्ठ होय.

तेव्हा हे पार्था, हा संभरम सोड आणि नेटाने संकल्पसिद्धीसाठी प्रयत्नकर.


अर्जुन म्हणाला

तू जे म्हणालास ते ठीकच आहे, परंतु हे श्रीकृष्णा, माझ्या मनाचे समाधान काही केल्या अद्याप होत नाही. युद्ध म्हटले की हत्या अटळ आहे आणि ज्याची हत्या होते तो मृत्यूनंतर कोठे जातो, कसा वागतो, कसा राहतो हे जाणण्याची इच्छा मला झाली आहे. कारण तू सारे जाणतोस.


श्रीकृष्ण म्हणाला

पार्था, हासुद्धा तुझा नियत मोह आहे. हे शुभंकरा, जन्म आणि मृत्यू हे प्रत्येकास अटळ आहे. जो जन्माला आला, त्याला मृत्यू येणारच हे तुला माहीतच आहे आणि असे पाहा की, प्रत्येक जीव सतत मृत्यूस सोबत वागवीत चालत असतो, असे सारे म्हणतात.

जो जन्मताना दिसतो, तो जन्मताच मेलेला असतो. फक्त कालरूपी मायेमुळे मनुष्यास जीवन आणि मृत्यू यामध्ये अंतर दिसते आणि केवळ या मधल्या काळातील यश आणि अपयशासाठी मनुष्य संघर्ष करीत असतो. ज्यांना ही काळाची माया कळली आहे, त्यांच्या दृष्टीने मुळात कोणतीही घटना घडत नाही. कारण कोणतीही घटना काळाच्या बंधनात असते आणि स्वत: काळ हा मायारूपी आहे.

म्हणूनच जे म्हणतात की, सृष्टीची उत्पत्ती झाली, ते मूढ होत किंवा या सृष्टीचा लय होणार आहे असे जे मानतात तेही अज्ञ होत. अवकाश जसे निर्गुण आणि निराकार असते, जे या सृष्टीला जन्म देते असे वरकरणी दिसते तशीच सृष्टी ही खरे तर निर्गुण आणि निराकार आहे, परंतु ती असल्याचा भास होतो तो काळामुळे आणि हे लक्षात घे की, खरे तर काळ मागे गेल्यासारखा फक्त भासत असतो. परंतु जर काळनामक तत्त्व आहे, तर ते येते कोठून आणि जाते कोठे, कशात लय पावते हे कोण सांगणार? आणि जर काळच मुळात भरामक आहे, तर ज्या काळामुळे सृष्टीचा किंवा मनुष्याचा जन्म झाल्यासारखे वाटते तो जन्मही खरा नव्हे किंवा मृत्यूही खरा नव्हे. त्यामुळे खर्‍या अर्थाने पाहाशील तर जन्मातच मृत्यू आहे आणि मृत्यूतच जन्म आहे. जीवन हे एका स्थिर, अविचल कालजेयी बिंदूप्रमाणे आहे.

ज्याला भरमांतील भरामक जीवन जगायचे आहे, त्याला त्याच जगण्याच्या नियमांनी वागणे इष्ट होय, हे मी तुला सांगतो. परंतु ज्याला हा भरम नष्ट करण्याची विजजगीषा आहे, जो कमबद्रियांचे व्यापार आवरू शकतो, त्याला जन्म नसतो की मृत्यू. त्याला सुख नसते की दु:ख, त्याला भावना नसतात की विचार. तोच कालातीत होतो आणि अवकाशात विलीन होतो.

हे पार्था, तुला जे वाटते आहे की, तुझ्याकडून हत्या होणार आहेत, त्या कोणाच्या? येथे मारण्यासाठीच कोणी नाही तर मरणारा कोण असेल? आणि ज्यांना मारशील असे तुला वाटते ते पूर्वीच मेलेले आहेत. आणि त्यात तुझाही समावेश आहे.

जे आज घडते आहे, ते पूर्वीही अनंत वेळी घडले आहे आणि पुढेही घडत राहणार आहे. प्रत्येक वेळी हेच संभरम, हेच शोक, याच आकांक्षा आणि त्याच त्या सुखाची कल्पना असते. पार्था हे कधी विस्मरू नकोस.

त्यामुळे या लोकानंतर अन्य कोणता लोक मिळेल आणि तेथे सुखे मिळतील की यातना, याचा विचार पार्था, फक्त अज्ञ लोक करीत असतात.

हे पार्था, येथे तुला मी समोर दिसतो आहे आणि कृष्ण नामक ही व्यती आहे, असे तू म्हणतोस. त्याचप्रमाणे येथे भीष्माचे, कर्णाचे, दुर्योधनाचे आणि अन्यांचे वास्तव्य आहे. या सर्वांपेक्षा तू स्वत:स वेगळा समजतोस. परंतु हे धनंजया, खरे पाहता सारे एकाकार आहेत. एकाच अस्रि भरमांची रूपे आहेत. मी आणि तू एकच आहोत. खरे तर कोणी शत्रू नाही की कोणी मित्र. मग एकास पुण्य मिळेल आणि दुसर्‍यास पाप असे कोणतेही कर्म अस्तित्वात नाही. एकास मोक्ष मिळेल, तर दुसर्‍यास नरक असेही काही नाही.

परंतु मनुष्य आपल्या प्रत्येक कर्मास समर्थन देण्यासाठी तत्त्वज्ञानाचा आश्रय धरीत असतो आणि हेच त्याच्या अध:पतनाचे खरे कारण आहे. कारण जर मनुष्य हाच एक भरम आहे, तर त्या भरमाला आधार देणारे तत्त्वज्ञानही एक भरमच नाही काय?

परंतु मनुष्य नुसत्या भरमात नसतो, तर संभरमातही असतो. तो भरममय असल्याने तो स्वत:विषयीही भरम निर्माण करीत कर्तव्य आणि अकर्तव्याच्या द्वंद्वात सापडलेला असतो. अमुक एक कर्तव्य केल्याने मला सुख मिळेल की ते कर्तव्य न करण्याने सुख मिळेल असे द्वंद्व त्याला सामोरे येत असते आणि कोणीही महापुरुष असला आणि त्याने कोणतेही कर्तव्य इष्ट समजून जाणतेपणे पार पाडिले तरीही त्याला दोष देणारे ऊनिच भरमित लोक या पृथ्वीतलावर नसतीलच असे नाही.

तेव्हा जे ज्ञानी आहेत त्यांनी कर्म केले काय आणि न केले काय, अज्ञ लोकांनीही कर्म केले काय आणि न केले काय,कोणाचेही शाश्वत कल्याण किंवा शाश्वत अकल्याण होऊ शकत नाही.

तेव्हा कर्मसंबंधाने अभिमान बाळगणे सर्वथा गैर होय.

तेव्हा हे युद्धरूपी कर्म त्वां केल्याने जे मृत्यू पावणार आहेत, त्यांचे काय होईल किंवा तुझे काय होईल ह्या विचारांमध्ये काहीएक अर्थ नाही. कारण जो स्वत:च मृत आहे, अशास कोण कायमारणार?


अर्जुन म्हणाला

हे गोपाळा, तू तर मला हे अतिभयंकर तत्त्वज्ञान सांगितलेस. तू म्हणतोस त्याप्रमाणे जर सत्य असेल, तर जे मला दिसते, अनुभवास येते आणि ज्या ज्ञानाने अनुभवांचे विश्लेषणही करता येते ते सारेच असत्य होऊन जाईल. मग जर काही सारेच भरम आहेत, तर हे सारे का आणि कशासाठीहोते?

मी जन्माला आलो, हा मी तुझ्यासमोर असल्याने सत्य अनुभव आहे, तद्वतच आम्हा पांडवांना राज्याधिकारापासून वंजात करण्यासाठी धार्तराष्ट्रांनी ज्या ज्या लृप्त्या लढवल्यात याचाही अनुभव असल्याने तेही सत्य आहे. आता यद्वत तू माझ्यासमोर आहेस, आकाशात अनंत तारकामंडळ तेजाने प्रेपरत आहे, तद्वत हे सारे अनुभव घेणारा मी सुद्धा तुझ्यासमोर असल्याने हे सारे सत्य असलेचपाहिजे.

आणि जे सनातन सत्य, तूही एक मानव सांगतो आहेस, तर तुझ्या सत्यातही काहीतरी खोट असली पाहिजे.

शिवाय तू म्हणतोस तसेच खरे मानले तर मग या सृष्टीचा नियंता म्हणजे तूच तो अत्यंत करूर आणि जीवघेणे खेळ करणारा आहेस, असेच मला म्हणावे लागेल.

तेव्हा हे मधुसूदना, खरे सत्य तेवढेच मला सांग. असे खेळ माझ्याशी करून मला अधिकच दिशाहीन करू नकोस.



श्रीकृष्ण म्हणाला

हे कौंतेया, सत्य मानवास नेहमीच भयभीत करते. म्हणूनच जे सत्य प्रिय वाटते तेच तो स्वीकारतो आणि आनंदात लीन होतो. सूर्य जोवर लोभस दिसतो तोवर त्याकिडे दुरून पाहण्यास महात्म्यांनाही आनंद होतो. परंतु जेव्हा सूर्याचे लोभस तेज हे भरम असून खरा सूर्य पाहताच येत नाही हे लक्षात येते तेव्हा मात्र मनुष्याचा भरमनिरास होतो आणि सूर्याचेही भय वाटू लागते.

प्रत्येक मनुष्यमात्रास वाटते की, या सृष्टीचा रचनाकर्ता दयाळू आहे आणि त्याची मनोभावे अर्चना केली की आपल्याला सुख मिळेल. परमात्मा दयाळू नाही, हे सत्य मनुष्याच्या कधीही लक्षात येत नाही. यापेक्षा मनुष्याचे अधिक दुर्दैव ते काय असणार?

हे परंतपा, लक्षपूर्वक ऐक, मी दयाळू नाही की निर्दय नाही. मी कोणावर कृपा करीत नाही, की अवकृपा करीत नाही. जो मला भतो त्याला मी निकटतम मानेन आणि जो भणारि नाही त्याला अन्य लोक मिळेल असेही काही नाही. कारण जर भरममय का होईना सारे लोक माझ्यातच वास करीत असतात तर कोणाहीबद्दल आपरि भाव मी कसा ठेवीन?

हे पार्था, मला तूही प्रिय नाहीस, की दुर्योधनही प्रिय नाही. मला हे विश्व प्रियही नाही की अप्रियही नाही. या विश्वात काहीही त्याज्यही नाही की प्रेयही नाही. खरे तर मी याही बाजूस नाही की त्याही बाजूस नाही.

मग मला तू भलेसि की नाही हे महत्त्वाचे नाही. कारण मला भजावे की अन्य कोणास हा तुझा प्रश्न आहे आणि कधी कधी भरमही भरमाला शांती देऊ शकतो, तद्वत कोणाचीही पूजा ही कोणासही शांती देऊ शकेल; पण म्हणून माझी कृपा झाली किंवा अवकृपा झाली, असे जे समजतात, ते मूढ-अज्ञ नि होत.

तू म्हणतोस की तू जन्माला आलास आणि माझ्यासमोर आहेस म्हणून तुझे आस्तित्व सत्य आहे. धृतराष्ट्रांनी तुम्हा पांडवांना यातना दिल्या हा तुझा अनुभव तुझ्या दृष्टीने सत्य आहे.

आणि जर तू म्हणतोस त्याप्रमाणे तुझा अनुभव सत्य असेल तर दुर्योधनाचाही जन्म झाला आहे, हे सुद्धा सत्य आहे. त्याचप्रमाणे तुम्हा पांडवांचा राज्यावर अधिकार नाही, असे त्याला जे वाटते तेही सत्य आहे आणि जर तुझेही सत्य आणि त्याचेही सत्य तर मग "सत्य' विषयक अनेक प्रवाद निर्माण होऊ शकतील.

आणि दुर्योधन तेवढा दुष्ट आणि तुम्हीच धर्मशील असे ठरवायला तरी नेमका कोणता आधार आहे बरे?

हे कौंतेया, या भरमाचा पडदा तरी मी दूर करू इच्छितो. असे पाहा की, एका स्त्रीशी पाच बंधू मिळून विवाह करणारे आणि त्या स्त्रीची अनुज्ञाही न घेणारे तुम्ही, या धरतीवरील या भरामक काळातील कोणता नियम पाळलात बरे? ज्या द्रुपदाचा पूर्वी पराभव करून तो आपल्या गुरूचा शत्रू आहे, हे विदित असताही नंतर त्याच्याशी सख्य साधणारे तुम्ही पांडव कोणत्या नियमाने चालले आहात बरे?

ज्या कुंतीस, कर्ण हा ज्येष्ठ पांडव आहे हे, सत्यज्ञान असताही अद्यापही तुम्हा पांडवांस सांगत नाही, त्यामागील गूढार्थ काय बरे?

मी अशी अनेक उदाहरणे, हे पार्था तुला सांगू शकतो आणि असे असूनही आपण धर्मशील आहोत अशी वल्गना तू कशी करू शकतोस? जे अधर्माने वागत असतात त्यांनी, इतरांनी मात्र धर्माने वागले पाहिजे किंवा तुम्ही स्वत: ज्या तत्त्वास धर्म मानता त्याच धर्माने इतर सर्वांनी वागायला हवे, असे समजण्यात किंवा आगरह धरण्यात कोणता अर्थ आहे बरे?


एखाद्या धीवराने जाळे फेकले आहे, हे ज्ञात असता त्या जाळ्यात जे मासे अडकतात तेषी की धीवरषी? धर्म फार सूक्ष्म आहे. हे पार्था, तुम्ही म्हणता की जुगार हा अन्यायी होता आणि त्यात तुमचे राज्य हिरावले गेले. जुगार अन्यायी होता तर तुम्ही स्वतंत्र राजे असल्याने, जसे आज युद्धोत्सुक आहात, तसेच तेव्हाच युद्ध करण्याचा मार्ग तुमच्याकडे खुला होता. परंतु तुम्ही तेव्हा युद्ध टाळलेत आणि द्यूत न्याय्य होते हे अप्रत्यक्षपणे मान्य केलेत. मग दुर्योधनास त्याचा दोष कसा लागतो? शिवाय आपली या सृष्टीच्या कणावरही, अगदी स्वत:च्या देहावरही, सत्ता नाही हे मान्य असतानाही स्वत:स आणि पत्नीस डावावर कसे लाविलेत? जे कर्म तुम्ही स्वत:च्या इच्छेने केलेत, स्वत:स व पत्नीस डावावर लावण्याचा अधिकार नाही हे माहीत असताही स्वत:स व पत्नीस डावावर लाविलेत त्याबद्दल अन्य कोणाकडेही कोणता दोष येतो बरे?

आणि एवढे असताही आज तुम्ही पांडव युद्धास तयार झाला आहात. आपण तेवढे धर्मशील आहोत असे म्हणत आहात. उद्या युद्ध सुरू होणार आहे, हेही तुला ज्ञात आहे आणि तरीही युद्धसंन्यासाबाबत तू बोलतो आहेस. म्हणजे तुझा संकल्पही दृढ नाही, हेच यातून प्रतीत होत नाही काय?

तेव्हा तुझा संकल्प सत्य नाही. हे पांडवा, म्हणूनच तूही सत्य नाहीस आणि तू जेवढा सत्य नाहीस हे सत्य आहे तद्वतच आज आणि उद्या हे अंतरही सत्य नाही. युद्धही सत्य नाही आणि ज्यांच्याशी तू युद्ध करेन म्हणतोस किंवा ज्यांच्याशी युद्ध करणार आहेस, असे म्हणतोस तेही सत्य नाही. कारण ज्यास शाश्वत धर्म म्हणतात, असा धर्म मानवी जगतात कधीही अस्तित्वात नव्हता. मुंग्यांना वारुळ मेरुपर्वत वाटतो आणि छोटा तलाव महासागर वाटतो. त्याचप्रमाणे मनुष्याचे आहे. परंतु हे विश्व अतिविराट असूनही शून्य आहे, याचे ज्ञान त्यास कधी होत नाही.

हे अर्जुना, तू संभरमित आहेस, कारण तुझा संकल्प संभरमित आहे. तुझे अस्तित्व हे सुद्धा संभरमित आहे. तू म्हणतोस की नभोमंडपीच्या तारका हे सत्य आहे. परंतु तेही सत्य नाही. हे कौंतेया, काल हा केवढा भरामक आहे, हे तुला माहीत नाही. तू ज्या तारकांना शा या क्षणी पाहात आहेस, तशाच त्या या क्षणी नाहीत आणि याक्षणी त्या कशा आहेत, हे ज्ञात होण्याचे मानवाकडे कोणतेही साधन नाही, हे तुला माहीत नाही.

हे परंतपा, जेव्हा तू आकाशाकडे पाहतोस तेव्हा तो आकाशाचा वर्तमान नसतो, तर तू अतिदूरच्या भूतकालाकडे पाहात असतोस. कदाजात या क्षणी अनेक तारका पतन पावलेल्या असतील तर त्यांची जागा नव्या तारकांनी घेतलेली असेल.

आणि भवितव्याकडे पाहण्याचे तर मनुष्याकडे कोणतेही साधन नाही. कारण द्रष्टा आणि दृश्य हे दोन्हीही भरामक आहेत. कारण खरे तर कोणी द्रष्टा नाही आणि कोणतेही दृश्य नाही. परन्तु कालनामक राशीमुळे द्रष्टा आणि दृश्य हा विभेद निर्माण होतो.

तेव्हा मी तुझ्यासमोर उभा आहे हे सुद्धा खरे नाही, कारण "मी' म्हणजे नेमके काय याचे ज्ञानही तुला नाही. मी तुला कधी द्वारकाधीश वाटतो, तर कधी परमात्मा. मी कधी सखा वाटतो, तर कधी शत्रू. "मी' म्हणजे काय याचे तुझे ज्ञान जर अपूर्ण असेल तर मी "मी' आहे हे तुझे ज्ञानही भरामक होय.

आणि तू तुझ्या जीवनात जे अनुभव घेतलेस आणि तो जो तू माझ्यासमोर उभा आहेस असे जे काही तू म्हणालास, तेही सत्य नाही. कारण तुझे अनुभव जे तुला तुझे वाटतात आणि त्या अनुभवांचा अन्वयार्थ जो तू काढला आहेस, तोही सत्य नाही. तुझा अनुभव तू तुझ्या परिप्रेक्ष्यातून पाहतो आहेस म्हणून तू शाश्वत अर्थाने माझ्यासमोर उभा आहेस असेही नाही.

नदीमध्ये त्याच पाण्यात हात घालता येत नाही. तो हातही तोच नसतो. आणि त्याहीपुढे जाऊन खरे तर पाणीही नसते आणि हातही नसतो.

हे पार्था, मनुष्यास कधीही ज्ञान होत नाही. ज्ञानाचा समज होत असतो. आणि समज सिसेलितात तसतसे मानवाचे ज्ञानहीलत असते आणि जे परिवर्तनीय आहे आणि परिवर्तनीय म्हणून काळासह आहे ते ज्ञान हे सत्य ज्ञान असू शकत नाही.

कारण पार्था, असे ज्ञानीनि म्हणतात की चराचर सृष्टी भूताकडून भविष्याकडे जात असते आणि काळ मात्र भविष्यातून येवून भूतकाळात विलीन होत असतो. त्यामुळे मनुष्य जगत असतो असे म्हणणेही तर्कदुष्ट आहे. खरे तर तो भविष्यातून वर्तमानात येणार्‍या काळात जगत असतो आणि काळ मात्र भूतकाळात विलीन होत असतो. आणि मनुष्य मात्र भूतकाळातून वर्तमानात आणि नंतर भविष्यकाळात प्रवेश करीत असतो.

असा परस्पराजविरोध प्रवाह, आणि असा प्रवाह की जो मनुष्यास जिवंत असल्याचे समाधान देतो तो काळ, एवढा भरामक आहे.

आणि याच काळाची गंमत अशी की, वर्तमान क्षणिक असतो. भूतकाळ सीमित असतो आणि भविष्यकाळ प्रदीर्घ असतो.

आणि तरीही मनुष्यास वाटते की तो धर्मशील आहे आणि त्याला मोक्षाचा अधिकार आहे.

परंतु काळ हाच भरामक असल्याने कोणासही इतिहास नाही आणि कोणासही भविष्यकाळ नाही. मग वर्तमानाची तर गोष्टच सोड. मग मोक्ष कोठे आहे?

आणि अनुभवास येते ते सारे सत्यच असे विधानही काही केल्या करता येत नाही. सूर्यराज उगवतो असे सत्य आपल्याला अनुभवयाला मिळते. परंतु सूर्य उगवत नसून पृथ्वीच स्वत:भोवती फिरत असल्याने सूर्य स्थिर असूनही चर वाटतो असे असूच शकणार नाही काय?

तेव्हा तुला माझा अनुभव येतो आहे हे विधानही जर सत्य नसेल तर तुला कौरवांच्या संदर्भात काय अनुभव आला तोही असत्य असू शकेल. किंवा कौरवांना तुमच्या संदर्भात जो अनुभव आला तोही असत्य असू शकेल.

तेव्हा जरन्ही बाजू सत्य नाहीत तर सत्याचा जय होईल हे विधानही असत्य आहे.

परंतु तुला तुझे भरम आहेत आणि कौरवांना त्यांचे भरम आहेत. या युद्धात पराजित झाल्याने तुमचे किंवा कौरवांचे भरम नष्ट होतीलच असेही नाही किंवा जय मिळाल्याने तुमचे किंवा कौरवांचे भरम नष्ट होतील असेही नाही. आणि जो नंतर याचा इतिहास सांगितला जाईल तोही सत्य असेलच असेही नाही.

तेव्हा एवढ्या असत्य इतिहासात आणि भरामक वर्तमानात आपण जगत असताना आणि आपणच उद्या एक नवा असत्य इतिहास घडवीत असताना धर्म आणि सत्याच्या वल्गना करण्यात अर्थ तरी काय बरे?

आपण नेहमीच भरामक इतिहासात जगत असतो आणि भरामक इतिहासाला जन्म देत असतो.

पण असे असूनही जी सत्यसृष्टी या कालापासून किंवा आपल्या तथाकथित अनुभवांपासून अलिप्त असल्याने, आणि जी स्वत:तच शून्य असल्याने ज्याला आपण इतिहास म्हणतो तो इतिहास नसून आपल्या साजेयस्कर स्मृतींचा एक हिस्सा असतो. आणि या स्मृतीही खर्‍या नसतात कारण जो स्मृतींचा अर्थ देतात तो कधी खरा नसतो. आणि इतिहास कधीही वर्तमानातलता येत नाही. आणि इतिहासाचा अन्वयार्थ मग स्वाभाविकपणेच असत्य असतो. कारण जे नसतेच ते प्रदीर्घ वाटत असताही अल्प असते. हे सारेच जसे नाही तसे वाटत असल्याने तो एक भरमच होय.

तेव्हा हे पार्था, तू जविंत आहेस असे तुला वाटते परंतु तू जविंत नाहीस, तसेच हे यच्चयावत विश्वही जविंत नाही. असे असताही तुला तू जविंत मानतोस आणि मलाही तू तुझ्या परिप्रेक्ष्यात का होईना अनुभवतो आहेस ते काळामुळे आणि हा काळ भूतकाळाकडून भविष्याकडे जात नसून भविष्याकडून भूतकाळाकडे जात असतो. आणि हा विरोधाभास असल्याने तुझेही अनुभव विरोधाभासी आहेत हे निश्चित समजून अस.

आणि या भरमात का होईना, पण एक जीवन आहे. ते जीवन आकलनात येत नसताही ते आकलनात आले आहे असे वाटते, तोही एक भरम होय. आणि जो आकलन करीत असतो, तो आकलनकर्ता यथार्थ आकलन करून आपले वर्तन करेल असे काही निश्चयाने सांगता येत नाही.

तेव्हा आकलन आणि आकलनकर्ता यांतही विरोधाभास आहे असे दिसते तर मग आकलनही खरे नाही आणि आकलनकर्ताही खरा नाही.

कारण घटना जर एकच असेल तर तिचे आकलन भिन्न कसे हा प्रश्न निर्माण होईल आणि आकलन भिन्न असेल तर घटना ही पुन्हा निरपवाद आणि अगम्य होऊन जाईल.

तेव्हा हे पार्था, मायेस दूर कर आणि माझ्याप्रमाणेच समजावून घेण्याचा प्रयत्न कर. तरीही तुझे आकलन आणि माझे आकलन यात फरक पडणार आहेच आणि जर असेच असेल तर ज्ञानाच्या आणि परमार्थाच्या बाता मारण्यात अर्थ तरी काय बरे?

उद्या युद्ध सुरू होणार आहे. तू युद्ध करणार की नाही हा खरा प्रश्न नाही; पण संन्यास घेऊनही तुझ्या मनातील युद्ध संपणार आहे काय, हा खरा प्रश्न आहे.

आणि युद्ध मनात असो की प्रत्यक्षात, तेही कर्मच आहे. आणि कर्म म्हटले की त्याला फळ हे अटळपणे जाकटलेले असते. मग ते भरामक का होईना आणि भरमातच जगणार्‍या मानवास कर्मफलत्वे सुख मिळणे किंवा दु:ख होणे हेही अटळच आहे.

तेव्हा तुला मानसिक युद्ध करायचे की प्रत्यक्ष याचा निर्णय, हे पार्था घे. असा हताश आणि निराश होऊ नकोस.

कारण सत्य फार दूर आहे.

पण तुला जे सत्य वाटते, त्यासाठी का होईना शोक सोड.

एवढे बोलून श्रीकृष्ण स्वस्थ उभे राहिले. पदचरणांशी बसलेला अर्जुन अश्रू ढाळीत होता. आपला हा सखा आज एवढा परका का झाला हेच त्याला कळत नव्हते.

त्याने श्रीकृष्णाचा चरणस्पर्श केला आणि म्हणाला,

हे श्रीकृष्णा, दयाघना, तू आज केवळ बाजूललीस म्हणून माझ्या आत्म्याच्या एवढ्या चिंध्या केल्या आहेस. या जगात काहीही, अगदी तू सुद्धा स्थिर नाहीस याचा आता मला साक्षात्कार झाला आहे. असो, मी योग्य वाटेल तसे करेन.

आणि एवढे बोलून, पाठ वळवून, कौंतेय अर्जुन निघून गेला. परमात्मस्वरूप श्रीकृष्णाने मंद हास्य केले आणि आपल्या शिबिराच्या दिशेने चालायला सुरुवात केली.

2 comments:

  1. सर आज रात्री कृष्ण तुमच्या स्वप्नात येईल, तत्वज्ञान शिकायला.
    त्याची इब्रत काढण्याचा अफलातून मार्ग सोधलाय वो तुम्ही. कृष्णाचा अपमान झाल्याचा आव आणत एक विशीष्ट समाज पेटून उठेल बघा.

    ReplyDelete
  2. ह्या देशातील, कोणत्याही कोर्टात आलेल्या कोणत्याही कार्ट्याला प्रथम लव्ह ऑल अशीच सुरुवात करावी लागते...

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...