Tuesday, February 28, 2012

ओबीसींनो...बळीराजाचे फक्त अर्धे पावूल उचला! (लेख ६)

औद्योगिक क्रांतीमुळे निर्मानकर्त्यांच्या उद्योगव्यवसायांवर कशी भिषण अवकळा आली याचे ओझरते उल्लेख मी आधीच्या लेखांत केलेले आहेत. या अवकळेचे तसे तीन टप्पे पडतात. त्याबाबत येथे विचार करायचा आहे.
इ.स.च्या पहिल्या सहस्त्रकाच्या शेवटापर्यंत (सन १०००) भारतातील खरे सुवर्णयुग क्रमश: संपत आले. तत्पुर्वी भारतात देशांतर्गत व देशाबाहेर मोठ्या प्रमाणावर व्यापार चालु असे. या उत्पादकतेच्या व व्यापाराच्या कालाची सुरुवात इसपुर्व साडेतीन हजार वर्षांपुर्वी, म्हणजे सिंधु संस्क्रुतीच्या काळापासुन झालेली पुराव्यासह स्पष्ट दिसते. सिंधु संस्क्रुतीचे जे अवशेष आता जवळपास देशभर मिळाले आहेत त्यावरुन वस्त्रे, मातीची भांडी, मौलिक मण्यांचे अलंकार, रेशीम, हस्तीदंती वस्तु, धातुंच्या वस्तु/मुर्ती/प्रतिमा, सुवर्णाचे दागिणे, कातड्याच्या वस्तु ते लाकडाच्या ग्रुहोपयोगी वस्तुंची निर्यात होत असे. सिंधु संस्क्रुतीच्या आपल्याच पुर्वजांनी उत्पादनच नव्हे तर अन्य तंत्रद्न्यानांत एवआढी प्रगती केली होती कि त्यांनी लोथल येथे क्रुत्रीम गोदीही बांधली. आजही जगात क्रुत्रीम गोद्या अल्प आहेत...आणि ही जगातील पहिली क्रुत्रीम गोदी. तंत्रद्न्यानाची ती कमालच होती. हे लोक जशा वर सांगितलेल्या व धान्य-फळादि अन्य वस्तुही निर्यात करत असत तशीच आयातही होत असे. त्या सागर व्यापारासाठी लागणारी (शंभर ते हजार) वल्ह्यांची व शिडांची जहाजे बनवण्याची कला आपल्याच सुतार/लोहार/धातुकारांनी विकसीत केलेली होती. अन्यथा असा व्यापार असंभव होता. विदेश व्यापार ज्सा भरात होता तसाच देशांतर्गत व्यापारही तेजीत होता. भारतात प्रादेशिक विविधतेमुळे प्रत्त्येक प्रांताचे काहीनाकाही विशेष उत्पादन कौशल्य होते. आसमंतातील उपलब्ध नैसर्गिक साधनस्त्रोतांचा जीवनोपयोगी वस्तुंत बदल घडवण्याचे अथक कार्य त्यांनी केले. त्यामुळे केरळातील माल उत्तर भारतात तर बंगालमधील माल मध्य भारतात...दक्षिणेत सहज येत असे. त्यासाठी बैलगाड्यांचा शोध अर्थातच महत्वाचा ठरला. आजही अपल्या बैलगाड्या या सिंधु सम्स्क्रुतीत सापडलेल्या डिझाईननुसारच बनतात...तीच बाब नौकांची. ग्रुहबांधणीसाठी भजक्या वीटांचा शोधही तत्कालीन गवंड्यांनी लावला. आजही सिंधु संस्क्रुतीची (त्यात महाराष्ट्रातील जोर्वे, सावळदा इ. ते पार दाक्षिणात्य प्रदेशही आले.) नगररचना व ग्रुहरचना आदर्श मानली जाते.
विदेश व्यापारामुळे आर्थिक संम्रुद्धी तर आलेली होतीच परंतु बाह्य जगाशी नित्य संबंध येत गेल्याने सांस्क्रुतीक देवाण-घेवाणही होत होती. त्यामुळे येथील जनता नव्या द्न्यानाला पारखी नव्हती. अर्थातच त्यामुळे संकुचीतपणाला वावही नव्हता. सातवाहन काळातील माहिती मिळते ती अशी कि राज्या-राज्यांतले उत्पादक आपापला माल घेवुन देशांतरगतही मुख्य बाजारपेठांत जात असत. त्यांच्या व व्यापा-यांच्या सर्वच मुख्य श्रेण्याही असत. (आजच्या भाषेत आपण ब्यंका म्हणतो). या व्यापारासाठी जातांना चोर-लुटारुंचा उपद्रव होवु नये म्हणुन रक्षक दलेही असत. सातवाहन काळात त्यांना महारक्ख म्हटले जायचे. हाच समाज काही काळापुर्वीपर्यंत महार म्हणुन ओळखला जात होता.
यामुळे दोन बाबी साध्य झाल्या. एक तर निर्माणकर्त्यांची आपसुक आर्थिक भरभराट झाली. अधिकाधिक उत्पादने करण्याची, नवे शोध लावण्याची गरज निर्माण झाली. मोठमोठी नगरे, किल्ले, वाडे बांधण्याची व नवी गांवे वसवायची पद्धत आल्याने पार गवंडी ते सुतार/लोहार/चर्मकार/तांबट/वीणकर/साळी/कोष्टी/तेली असे जवळपास सारेच उत्पादक घटक मागणीच्या परिप्रेक्षात आर्थिक सत्तेचेही मोठे निर्माते झाले. या लाटेत कथित वैश्यही (व्यापारी वर्ग) मालामाल झाले.राजसत्तेला कर देणे आणि धर्मसत्तेला दान/दक्षिणा देणे यापलीकडे त्यांना आपल्या व्यवसायांशिवाय अन्यत्र पाहण्याची गरजही नव्हती. तत्कालीन स्थितीत शेत-जमीनींच्या मालक्या या राजे, सरदार, सरंजामदार वा जमीनदारांच्या ताब्यात असुन त्या कुळाने कसनारा क्रुषक वर्गसुद्धा खुप मोठा होता. त्यांना जमीनी गहाण ठेवण्याचा वा विक्रयाचाही अधिकार नव्हता. कारण त्यांची मुळात मालकीच नव्हती.मालकीची भावनाच नसल्याने शेतीउद्योगात नवी तंत्रे विकसीत करण्याची त्यांना भावनीक गरज भासणे अशक्यप्राय होते. तसेच झाले. त्यामुळे आज जरी कुळकायद्यामुळे सात-बा-यावर आपली नांवे लागली असली तरी मनोव्रुत्ती तीच राहिलेली आहे.
या काळात धनगर ते गोपाल हा पशुपालक समाज, जो सर्वात प्राचीन व मानवी संस्क्रुतीचा आरंभ बिंदू आहे, त्याचेही जीवन संम्रुद्ध होते. इतके कि आजही पुज्य असलेल्या बव्हंशी देवता या धनगर/गोपाल निर्मित वा त्यांच्याच पुर्वजांच्या स्म्रुती आहेत. अनेक राजघराणी आजच्या ओबीसींमधुन निर्माण झाली हाही एक इतिहास आहे. चंद्रगुप्त मौर्य, बिंबीसार, सातवाहन, भारनाग, पांड्य अशी शेकडो राजघराणी किमान सहाव्या शतकापर्यंत तरी होवुन गेली. ती घराणी हिंदु धर्माप्रमाने शुद्र (ओबीसी) मानली गेलेली आहेत. सम्राट अशोकाचा नातु ब्रुहद्रथ याचा खुन पुष्यमित्र श्रुंगाने केला त्यामागे ब्रुहद्रथ हा बौद्ध धर्मानुयायी होता हे मुळ कारण नसुन तो शुद्र असल्याने त्याला राज्यावर बसण्याचा अधिकार नाही अशी त्याची वैदिक भावना होती म्हणुन. इसच्या दुस-या शतकापासुन एका प्रदेशिक मर्यादेत वाढलेला वैदिक धर्म पुन्हा उचल खायला लागला त्याची ही परिणती होती.
दहाव्या शतकापर्यंत क्रमश: ओबीसींची महत्ता संपुष्टात येवु लागली. त्याला मी अवनतीची पहिली पायरी म्हणतो. येथे महार/मातंग/रामोशी इ. घटक तेंव्हा फक्त शुद्रच गणले जात असत हे येथे लक्षात ठेवायला हवे.पाचवा वर्ण अस्तित्वात नव्हता. चांडाळ/डोंब/श्वपक या काही अंत्यज जाती सोडता कोणाला अस्प्रुष्य मानले जात नव्हते. महार समाज हा रक्षणकर्ता समाज होता व तो सम्म्रुद्ध खेड्यांचा व व्यापारी ते पार किल्ले/राजवाडे इ.चे रक्षण करण्याची जबाबदारी पेलत होता.
या अवनतीची कारणे थोडक्यात खालीलप्रमाणे सांगता येतील:
१. समुद्र बंदीची घोषणा पुराणकारांनी केली व मुस्लिम शासकांच्या मदतीने तिची अंम्मलबजावणीही केली. परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापार थांबला.
२. देशांतर्गत देशीय सत्ता एकापाठोपाठ नामोहरम होवू लागल्याने उत्पादक व व्यापा-यांचे संरक्षक छत्र नष्ट झाले. थोडक्यात देशांतर्गत व्यापार हा अत्यंत जोखमीचा/धोक्याचा बनला. स्वत:च प्रचंड प्रमानावर संरक्षणाची सोय केली नसेल तर दुरचा प्रवासही अशक्य झाला. ही अवस्था अशी बिकट होती कि काशी यात्रेला जाणारे आपले मरण ठरलेलेच आहे असे समजुन चक्क जीवंतपणी श्राद्ध करुनच यात्रेला जात.
३. या सर्वांचा एकत्रीत परिनाम म्हणजे निर्माणकर्त्याचे काम कमी झाले...कारण स्थानिक बाजारपेठा सोडल्या तर अन्यत्र मालाची मागणी अगदी अपवाद वगळता उरलीच नाही. पर्यायाने आर्थिक स्त्रोत आटत गेले. बाह्य जगाशी संपर्क तुटला. इतका कि तो फार फारतर पंचक्रोशीपुरताच सीमित होवू लागला.
४. त्याच वेळीस परकीय सत्तांचे अन्याय/अत्याचार, सातत्याने होणारी युद्धे व त्यात पराजित होत त्यांना सामील होणारे एतद्देशीय सत्ताधारी यांच्या कचाट्यात ज्यांच्याजवळ जे थोडेफारही धन उरले होते ते लुटले जात राहिले. परिणामी हा वर्ग कंगाल होत गेला.
५. राजसत्ता नेहमीच धर्मसत्तेच्या अनुषंगाने जात असल्याने काशी/कांची/पैठणच्या वैदिक धर्मसत्तेने नव्या मुस्लिम राजसत्तेशी जुळवुन घेतले, पण सर्वसामान्य ब्राह्मनांचेही अंतत: अहितच केले. या ब्राह्मणांनी आपला सुड शुद्रांवर (ओबीसींवर) उगवला तो असा कि त्यांनी निर्माणकर्त्यांतीलच समाज फोडला. महार/मांग/चांभार/रामोशी अशा अनेक जातींना अस्प्रुष्य ठरवुन टाकले. त्यासाठी त्यांना सन १००० ते १६६० पर्यंत सातत्याने पडलेल्या शेकडो भिषण दुष्काळात नुसती मढीच काय...पार नरमांसही खाण्याचे निमित्त पुरले. सत्य असे आहे कि या कालात ब्राह्मण काय कि क्षत्रीय काय यांनाही अन्नच उपलब्ध नव्हते. त्यांनी पोट भरण्याचा हाच मार्ग पत्करला. त्यांनीही नरमांस खाल्ले तसेच म्रुत जनावरांचेही मांस खाल्ले. पण ब्राह्मणांसाठी तो म्हणे आपद्धर्म होता...नाही काय? पुराणात विश्वामित्राने नाही का दुष्काळात म्रुत कुत्र्याची तंगडी खावुन प्रण वाचवले? ऋषि-मुनींना सामान्य मानसांचे नियम लागु होत नसतात...आणि हे सारेच ब्राह्मण लगोलग जणु ऋषि-महर्षि होत त्या पातकातुन सुटुनही गेले...ही कथा त्यांच्या कामी आली. त्यांचा तो आपद्धर्म होता...पण इतरांसाठी तो नियम ते कसा लावतील? त्यात महार/मांगांच्या परंपरागत सेवेची त्यांना गरजही उरलेली नव्हती. लोकच एवढे भिकारी झाले होते कि रक्षणाची गरजच केवढी होती? मातंगांच्या सेवा त्यांच्यासाठी कवडीमोल झाल्या कारण त्याचे दाम देण्याची ऐपतच समाज हरपुन बसला होता.
काहीही झाले तरी त्यांना मात्र सुतार/लोहार/तेली/गवळी/धनगर इ. घटकांची त्यांच्याही जगण्यासाठी अनिवार्य गरज होती, त्यामुळे ते तेवढे अस्पुष्यतेतुन सुटले....पण हीनतेतुन सुटका मात्र केली नाही. ती त्यांचीही (सरंजामशाहीवाले आणि धर्मसत्तेवाले) जगण्याची गरज होती हेही येथे लक्षात घ्यायला पाहिजे. खरे ब्रोकन मेन तेच होते. सत्ताधारी एकामागुन एक पराजित होत आपापल्या घरांतील स्त्रीया जेत्यांकडे पाठवण्यात धन्य होत क्रुपाद्रुष्टी प्राप्त करण्यात तत्पर बनले होते. राजपुतांचे उदाहरण सर्वांनाच माहित आहे. ते तसे सर्वत्रच घडले. य ब्रोकन म्यन्सनी (आत्मसन्मान व नैतीक प्रतिष्ठा हरपुन बसलेल्यांनी) जेत्यांना खुष करण्यासाठी आपल्याच समाजबांधवांना लक्ष्य केले. गुलामीची महत्ता पुराणांतील भविष्यवाण्या सांगत हे कार्य जसे ब्राह्मणांनी केले तसेच उत्तरकाळात जन्माला आलेल्या, नवसरंजामदारीतील सौख्ये भोगु इच्छिणा-या स्वार्थासाठी लाचार अशा मुस्लिम सत्ताधा-यांचे हस्तक अशा समाजानेही केले. आपल्याच गांवांना, आपल्याच समाजांना लुटण्यात त्यांनी कसलीही कसर सोडली नाही.
याची परिणती म्हणजे निर्मानकर्ता आपली निर्मितीची उर्जा हरवु लागला. गांवगाड्यात, गांवातच मिळेल त्या उत्पन्नात/बलुत्यात आपला चरितार्थ चालवु लागला. प्रगतीचा, नवनवीन निर्मितीचा पहिला टप्पा संपुन हा नवा गुलामीचा टप्पा सुरु झाला तो जवळपास सन १००० पासुन. या टप्प्याने समाज हीनदीन झाला. त्याची उर्मी संपली. नवी संशोधने थांबली. (या निर्मानकर्त्यांनी लावलेले एकुणातील शोध हा एक स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे.) खरे तर हा टप्पा आला नसता तर कदाचित पहिली औद्योगिक क्रांती याच निर्मानकर्त्यांनी केली असती. जगाला देण्यासारखे खुप काही होत आपण आज रुढार्थाने द्न्यानसत्ता व अर्थसत्ता बनलो असतो. एके काळी होतोच. त्यामुळे ती परंपरा पुढे सुरु राहिली असती तर मी म्हणतो झालेच असते याबद्दल कोणाच्या मनात शंका असु नये.
पण ते तसे व्हायचे नव्हते. नाण्यांत आपल्या सर्जनाची किंमत वसुल करणारा बलुत्याच्या भिकेवर आला तर त्याच्या प्रेरणांची हत्या होनार नाही तर काय? ज्यांनी सर्वच समाजाची रातंदिस रक्षण केले त्यांनाच धर्मबाह्य करत अस्प्रुष्य ठरवले तर कोणते इमान मिळणार? नामदेव चोखा मेळ्याला समजावुन घेवू शकत होता. वेशीच्या पडल्या बांधकामाखाली दडपलेल्या त्याच्या अस्थी शोधु शकत होता...त्याची समाधी करु शकत होता...तेंव्हा हे तथाकथित उच्चवर्णीय कोठे होते? आपले हक्क आणि अधिकाराचे वाद आदिलशहा ते निजामाच्या दरबारात लढत होते. आपल्या जहागि-या कशा रक्षित राहतील यासाठी कोनत्याही थरावर उतरत होते, प्रसंगी भाऊबंदांच्या उरावर बसत त्यांच्याहे कत्तली करण्यात कसुर करत नव्हते.
कुणब्यांची हालत त्याहुन कमी नव्हती. दुष्काळ पडो कि अन्य काही राजकीय आपत्ती येवो, या बिचा-यांना आपल्या पोरी/बायका बटकीनी ते कुणबीनी म्हणुन अक्षरशा विकाव्या लागत...पेशवाईत तर कुनबीनींचे बाजार भरवले जात कारण पोटाचा प्रश्नच तेवढा भयानक होता. म. फुलेंचे शेतक-यांचा आसुड अवश्य वाचा...हे पुस्तक त्यांनी जमीनदारांसाठी नव्हे तर या कसलीही मालकी नसलेल्या स्व-भुमीहीन नागवल्या गेलेल्या प्रजेसाठी लिहिलेले आहे. (अर्थात आज हेच कुणबी स्वत:ला उच्चवर्णीय मराठे समजतात हा भाग वेगळा!)
हा साराच इतिहास उद्विग्न व खिन्न करणारा आहे...तरीही अनेक लोक त्यातही सुवर्णपाने शोधतात त्यांच्या अक्कलेची कीव करावी तेवढी थोडीच आहे!
असो.
हे मध्ययुग एकंदरीत सर्वच निर्माणकर्त्यांना क्रमाक्रमाने संपवत नेणारे ठरले. इज्जत संपली. आत्मसन्मान संपला. हताशा आणि निराशेच्या भरात एक तर रक्तरंजित क्रांती तरी घडते किंवा लोक नियतीशरण होत जेही काही घडते आहे ती इश्वरेच्छा आहे असे मानत गुलामीलाच धर्मतर्क जोडत वांझ जीवन जगु लागतात. भारतात नेमके दुसरे घडले. तुकोबारायांना बायको-मुलगा मेल्याचे दु:ख नाही तर उलट आपल्या अध्यात्ममार्गातील धोंड दुर झाल्याचे सुख आहे. हीण जातीत जन्माला आलो म्हणुन ही रया आहे असा सुर बव्हंशी संतांच्या अभंगांत आहे. बव्हंशी सारेच संत एवढे त्यागमुर्ती आणि संसाराला तुच्छ मानणारे असुनही ते एवढे पराकोटीचे स्वकेंद्रितच का राहिले हा माझा नेहमीचा प्रश्न आहे आणि अद्याप तरी त्यावर कोणी उत्तर दिलेले नाही. खरे तर समाज व विचारक्रांती ते करु शकत होते...किमान तसे विचार तरी देवु शकत होते. वेदविरोध (तोही शक्यतो लटका) सोडला तर पुराणांत व अन्य हिंदु धर्मग्रंथांत सांगितले त्यापेक्षा अभिनव म्हनता येईल असे वेगळे तत्वद्न्यान एकाही संताने दिलेले नाही हे वास्तव आम्हाला समजावुन घ्यायला लागणार आहे. एका अर्थाने ते पौराणिक धर्मतत्वांचेच पाठीराखे होते. धर्मातील काही अश्लाघ्य बाबींबद्दल त्यांची तक्रार होती, पण तिचे निवारणही त्यांनी ईश्वरावरच सोपवले हेच काय ते सत्य आहे.
या सर्वांची अपरिहार्य परिणती म्हनजे समाज धार्मिक आखाड्यातील एक अविभाज्य खेळाडू बनला. त्यांत भर पडणे स्वाभाविक होते. कारण मुस्लिमांचे राज्य गेले आणि इंग्रजांचे आले. ते नुसते मुस्लिमांसारखे राज्य नव्हते. मुस्लिमांचे राज्य हे औरंगझेबानंतर येतद्देशीय हिंदु सुलतानांचे राज्य बनलेले होते. पण आर्थिक पाया हा जवळपास हजार वर्ष होता त्याहीपेक्षा ढासळलेला होता. औद्योगिक क्रांती जर युरोपात झाली नसती तर इंग्रज हा देश कधीच सोडुन गेले असते. पण औद्योगिक क्रांतीमुळे इंग्रजांना तीन गोष्टी समजल्या त्या अशा...एक तर विपुल कच्चा माल जो आज वापरात नाही...अत्यंत स्वस्त मजुर...आणि भारतियांची गुलामी व्रुत्ती...
तिसरी अवनती येथे सुरु झाली. जसे भारतात आधुनिक तंत्रद्न्यानाचे उद्योग सुरु झाले, तसे येथील निर्माणकर्त्यांचे होते ते उरले-सुरले व्यवसाय/उद्योगही क्रमश: बसु लागले. याचा फटका तेल्यापासुन ते वीणकरापर्यंत बसला. इतका की रेडीमेड स्वस्त आणि मस्त चपला बुट येवू लागल्यावर चांभारांनाही बसला. ज्या गोष्टी अद्याप नवीन तंत्रद्न्यानामुळे उपलब्ध नव्हत्या तेवढ्याच बाबतीत गांवगाडा जरा चौकस राहिला. बकी ज्यांनी गांवाचे सेवा केली त्यांचे उद्योग संपले म्हणुन लाड करण्याचे काय कारण होते? तसे ते कोणी केलेही नाहीत. हळु हळु हा उपसर्ग, सुपातले जात्यात या नियमाप्रमाणे, जवळपास सर्वांनाच बसला...व जे काम कधी केलेच नव्हते ते काम पोटासाठी करण्याचा प्रसंग गुदरला.
आणि हे काम म्हणजे शहरांकडे पळणे, हमाली ते कामगार ही बिरुदे मिरवणे. रात्री पुन्हा भजने म्हणणे किंवा कामानंतर दारु पिवून आणि घरी जावुन बायकोला/पोरांना निराशेपोटी झोडपणे. या सर्व वर वर्णिलेल्या इतिहासात पुरुषांपेक्षा मायमाउलींचा इतिहास अधिकच विदारक आहे.. इतका कि पाषाणालाही आसवे उगवतील!
असो. मी निर्माणकर्त्यांचा -हास कसा झाला हे येथे सांगितले. तीन टप्प्यांत त्याने तीन पावले जमीन चालली...जी त्याला पावलापावलाने क्रमशा पाताळात गाडण्यासाठीच होती...आता उरलेले अर्धे वामनावतारी पावुल त्याचे पुरेपुर पाताळात जाण्यासाठीच आहे. अशा घोर अंधकारमय पाताळात कि पुन्हा कोणता द्न्यानाचा, स्वातंत्र्याचा सुर्य कधीही त्याला दिसणारच नाही. वामनाचे व्रत घेतले तर असे होणारच याबाबत तीळमात्र शंका असण्याचे कारण नाही.
लोकशाही यांना समजलीच नाही हेच खरे. हेच लोक भारतीय स्वातंत्र्याचे आणि आजच्या लोकशाहीचे निर्माते होते. म. गांधींच्या मागे हाच समाज अवाढव्य प्रमाणात स्वातंत्र्यासाठी उभा होता. यांनी लाठ्या खाल्या...तुरुंगवास भोगले. पण स्वातंत्र्य खेचुन आनले. म. गांधींना कदाचित त्यांच्या सहस्त्रकातील क्रमाने झालेली पडझड माहित असावी. त्यांनी भारतीय बदललेल्या मानसिकतेला हवा तसा आपला "सांतिक" चेहरा बनवला. तो यशस्वी झाला. उलट रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न पाहणारे, पण जे गेली हजार वर्ष षंढ होवुन बसले होते, त्यांना एकाएकी रक्तरंजित क्रांती सुचु लागली. त्यांच्या रक्तरंजित क्रांतीचा मतितार्थ एवढाच कि त्यांनी गांधींना गोळी घालुन मारण्याचा विराट पराक्रम केला!
मग लोकशाहीवर (त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही...भारतीय राज्यघटनेवर विश्वास नाही...त्यांचा राष्ट्रगीतावर विश्वास नाही...किती सांगु?) डल्ला मारण्याचा अविरत प्रयत्न केला आणि ज्या पिडीत समाजांनी गांधी व बाबासाहेबांना खरे बळ पुरवले त्यांचा धुव्वा उडवण्याचा चंग विविध पक्षांच्या मार्फत यांनीच स्वातंत्र्योत्तर काळात बांधला. बाबासाहेब हे फक्त महार समाजाचे तर फुले हे फक्त माळ्यांचे. गांधी बनिया...म्हणजे तेही ओबीसी...(हिंदु धर्मानुसार कलियुगात जसे क्षत्रिय नाहीत तसेच बैश्यही नाहीत...कधी विसरु नका हे...हिंदु धर्मशास्त्रांनुसार कलियुगात फक्त दोनच वर्ण असतात आणि ते म्हणजे ब्राह्मण आणि शुद्र...उरलेले अवर्ण...) शुद्र गांधींचे नेत्रुत्व वा त्यांच्या यशाला सलाम हे कसे करणार? त्यांची हत्या जशी अपरिहार्य होती...(ते कारणे काहीही देवुद्यात...!) तशीच ओबीसींची हत्या शिर्कान स्वातंत्र्योत्तर काळात होणारच याबाबतहे शंका असुच शकत नव्हती आणि ती चक्क त्यांनी करुन दाखवलीच आहे आणि याची लाज ओबीसींना नाही, त्याचे गांभिर्य नाही. आणि ज्यांनी आत्मघातच करुन घेत जागायचेच नाही असेच ठरवले असेल तर त्याला कोण वाचवणार बरे?
तेंव्हा फुकाचे अभिमान सोडा...हातानेच तुम्ही आपल्या गळ्याचे माप इतरांना दिले...त्यांनी बरोबर अगदी मापात गळफास बनवला...आता त्यांनी तुम्हालाच फासावर लटकवत गुदमरवुन टाकले असेल तर दोष तुमचाच आहे. कशाला गळे काढता मग? काय अधिकार आहे तुमचा? भिका-यांना निवडीचा अधिकार नसतो. जे थाळीत वाढले जाते ते निमुट घ्यावे हा नियम. अन्यथा जगावे तर उत्तम..काय झाले एक दोन पीढ्या सहनकर्त्या झाल्या तर? शेकडो पीढ्या दैन्यात गेल्या..झगडल्या...मेल्या...त्यांची नोंद कोणीही ठेवलेली नाही वा ठेवायची गरजही भासलेली नाही. कोनत्या भुषणाचे वांझ फुत्कार तुम्ही सोडता मग?
तीन पावलांबाबत मी आधीच लिहिले ज्यांनी अवनती आणली. त्याबाबत व्यवस्थेला/परिस्थितीला एकवेळ दोष देता येईल कदाचित...
पण आज?
पुढचे अर्धे पावुल हे खरे तुमचेच आहे...जागतिकीकरणाचे आहे. एक सहस्त्र वर्षांपुर्वी तुम्ही खरे जागतीकिकरणाचे खरे अध्वर्यु होता...अरबस्तानपासुन ते इजिप्तपर्यंत, ग्रीकांपासुन ते रोमपर्यंत, इंडोनेशियापासुन ते पार मेक्सिकोपर्यंत खरे तत्कालीन स्थितीतील जागतीकीकरण तुम्ही अनुभवले, जगले व लाभार्थीही झाले... प्रादेशिक संस्क्रुतीला जागतीक संस्क्रुती बनवलेत...
विसरु नका...उचला हे उरलेले अर्धे पावुल...ते खरे बळीराजाचे पावुल...
वामन हा खुजा...मग तो मनोव्रुत्तीने असो कि क्रुतीने...बळी हा नेहमीच आकाशव्यापी असतो...तो कोणाचा घात करत नाही...तो उदारच असतो...कनवाळुच असतो...क्षमाशीलच असतो...
मानवतेची सारी मुलतत्वे ध्यानी घेत हे उरलेले अर्धे पावुल उचला...आधीची तुमची तीन पावले तुम्हालाच विनाशापर्यंत घेवुन आलेलीच आहेत...पण तो तुमचा नव्हे तर एकंदरीत व्यवस्थेचा पराभव होता. ते खरे ब्रोकन मेन होते...पराजयांसाठीच ते जन्माला आलेले होते.
तीन पावले आजवर तुम्हीही पराभुतांपाठीच उचलली...
पण हे स्वत:चे...अगदी स्वत:चे...आत्माभिमानाचे...नि फार नव्हे...फक्त अर्धे पावूल....
बस...विजयासाठी उचला!
जग तुमचेच आहे!

No comments:

Post a Comment

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...