Monday, October 22, 2012

जातिसंस्थेचा उगम कसा झाला? (३)

जातिसंस्था जन्माधारित अशी बनत गेली...



जातीसंस्था धर्मसंस्थेने बनवलेल्या नाहीत. धर्माचा जन्माधारीत जातीव्यवस्थेला पाठिंबा नाही. डा. बाबासाहेब आंबेडकरांनीही आपल्या CASTES IN INDIA: Their Mechanism, Genesis and Development या कोलंबिया विद्यापीठात १९१६ साली सादर केलेल्या प्रबंधातही मनु अथवा ब्राह्मण हे जातीव्यवस्थेचे निर्माते नव्हेत हे ठामपणे सिद्ध केले आहे. आपण जातींत पुरातन काळापासुन भर पडत कशी गेली, दहव्या शतकापर्यंत तरी जातीबदलही कसा घडत होता याबाबतही थोडक्यात चर्चा केलेली आहे. ब्राह्मणांची आधी बंदिस्त जात बनली म्हणुन अनुकरणातुन अन्य समाजानेही बंदिस्त जातीव्यवस्था स्वीकारली हेही मत मान्य करता येत नाही. ब्राह्मणांनी आपली जात बंदिस्त का केली याचे उत्तर त्यातुन मिळत नाही.

आपण आता जन्माधारित जातीव्यवस्था कशी अस्तित्वात आली यावर स्वतंत्रपणे विचार करणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय जातीसंस्थेच्या अपरिवर्तनीय रुपाची निर्मिती कशी झाली याचा उलगडा आपल्याला होणार नाही.

येथे आपल्याला खालील अंगांनी यासंदर्भात विचार करायचा आहे.

१. जातिव्यवस्था विवाहसंस्थाप्रणित?

२. जातिव्यवस्था कुलाचारप्रणित?

३. जातीव्यवस्था अर्थसंस्थाप्रणित?

४. जातिव्यवस्था समाज-मानसशास्त्र प्रणित?

५. जातिव्यवस्था राज्यशास्त्र प्रणित?

६. जातिव्यवस्था संरक्षणात्मक व्य़ुहरचनाप्रणित?

या मुद्द्यांवर व तदनुषंगिक निर्माण होना-या मुद्द्यांवर आता आपण चर्चा करुयात.

१. जातिव्यवस्था विवाहसंस्थाप्रणित?: मानवी जीवनात आदिम काळी विवाहसंस्थेचे अस्तित्व नव्हते. एका अर्थाने मनुष्य पशुधर्म पाळत होता. म्हणजे नाती-गोती अद्याप निर्माणच झालेली नव्हती. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या महत्वपुर्ण प्रबंधात वि.का. राजवाडेंनी आदि यज्ञधर्मही सामुदायिक शरीरसंबंधांना सोय पुरवण्यासाठी कसा निर्माण झाला याबाबत साधार विवेचन केले आहे. मानवी जीवन प्रजावृद्धीसाठी मुक्त लैंगिक संबंधांना महत्व देत होते. श्वेतकेतुने ही पशुधर्मीय चाल बंद पाडली व आद्य विवाहसंस्थेचा पुरस्कार केला असे आपल्याला महाभारतातील वनपर्वात समजते. "कुटुंबसमुहांची, नात्यांची एकुण गोळाबेरीज म्हणजे जात..." हे डा. इरावती कर्वेंचे विधान आपण मागे पाहिले आहेच. कुटुंबसमूह हा विवाहसंस्थेखेरीज अस्तित्वात येवू शकत नाही हे उघड आहे. प्रारंभिक विवाहसंस्थाही सैल होती. म्हनजे पती-पत्नी नात्यातील आज अभिप्रेत असनारे पावित्र्य व मांगल्य त्यात अभिप्रेत नव्हते. किंवा तशी कल्पनाही मानवाला अद्याप सुचले नव्हती. पतीच्या संमतीने पत्नी परपुरुषाकडे अथवा अतिथीकडे जावू शकत होती. बाह्य संबंधापासुन प्राप्त झालेली संतती पतीचीच समजली जात असल्याने समाजजीवनातही कोणती अडचण उपस्थित होत नव्हती.

म्हणजे याचाच एक अर्थ असा आहे कि आज आपण समजतो कि आपण कोणी शुद्ध रक्ताचे, वर्णाचे अथवा जातीचे आहोत, त्याला इतिहासाचा आधार नाही....कारण मुलात लैंगिक संबंध हे मुक्त व नंतर अर्धमुक्त झालेले दिसतात. वैवाहिक बंधने आली ती इसपु १५०० च्या आसपास. ही बंधने येण्याचे कारण म्हणजे मानसाने केलेली तत्वज्ञानात्मक प्रगती. आश्वलायन गूह्यसूत्र म्हनते "आपण विवाहबद्ध होवून प्रजा उत्पन्न करु. एकमेकांचे प्रेय प्राप्त करुन एकमेकांना आवडते होवूयात. एकमेकांविषयी शुद्ध मन ठेवून शंभर वर्ष जगुयात." (आश्व. गु.सू. १.७.३.२२) याचा अर्थ असा कि प्रजावृद्धी हे विवाहाचे मूख्य ध्येय कायम राहिले तरी प्रेम आणि कर्तव्याची भावना विवाहविधीमद्धे आनली गेली. या काळात विवाह वर्णनिहाय अथवा जातीनिहाय होत असल्याचे पुरावे नाहीत. याचे कारण म्हणजे दोन्ही विभिन्न धर्मधारांत वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था सैल अशीच होती.

पुढे धर्मशास्त्रांनी सपिंड व सगोत्र विवाहाचा निषेध सुरु केला. खरे तर ही परिवारबाह्य पण जाती/वर्णांतर्गतची विवाहपद्धती. परंतु प्रत्यक्षात भारतीय समाजात मोठ्या प्रमाणावर सगोत्र/सपिंड विवाह काही बंधने पाळत कायम राहिले. बहुतेक जातींत आते-मामे भावंडांच्या विवाहाची प्रथा प्रचलित आहे. सगोत्र विवाहही कायदेमान्य आहेत.

जातीसंस्थेचे मुख्य स्वरुप म्हनजे जातीअंतर्गत होणारे विवाह. जातीअंतर्गत विवाह झाल्याने जातीचा संख्यात्मक विस्तार होणे स्वाभाविकही आहे आणि अभिप्रेतही. परंतू  आधी जाती आल्या कि जातीअंतर्गत विवाह आले हा महत्वाचा प्रश्न आहे व त्यावर आपल्याला विचार करायचा आहे.

कोणतातरी व्यवसाय असने हे जातीचे प्रमुख लक्षण आहे, परंतु व्यवसाय बदलला अथवा नवीन व्यवसाय बनवला कि जातही बदलणार हे उघड आहे. अशा परिस्थितीत समव्यवसायी लोकांचे भावनिक अथवा स्पर्धात्मक संम्मिलिनीकरण होणे स्वाभाविक आहे. लहानपणापासुन एखाद्या विशिष्ट व्यवसाय वातावरणात वाढलेल्या मुलींना पैतृक व्यवसायाचे किमान प्राथमिक शिक्षण अथवा ज्ञान मिळणे हीसुद्धा स्वाभाविक बाब आहे. अशा स्थितीत लोहाराचे काम करणा-याची मुलगी समजा कुंभारकाम करना-याच्या घरी दिली तर कुंभारासाठी ती मुलगी वंशवृद्धीच्या कामाखेरीज अनुपयुक्त अशीच आहे. आपण आजही ग्रामीणभागातील श्रमविभागणीचे तत्व पाहिले तर मला काय म्हनायचे ते लक्षात येईल. स्त्री ही फक्त वंशवृद्धीसाठी नव्हे तर एक "मोफत श्रम पुरवणारी" व्यक्ति एवढे स्त्रीचे अवमुल्यन होत गेले होते. याला अर्थात आर्थिक कारणे आहेतच ज्यावर आपण नंतर विचार करणारच आहोत. लोहाराची स्त्री, लहानपणापासुन माहिती असल्याने, कोळसा जमा करणे, पेटवणे ते भाता चालवणे व फुटकळ लोहारकामही स्वत:च करणे इ. तरबेज असल्याने नवीन प्रशिक्षणाचीही आवश्यकता रहात नाही. हेच तेली-कोष्टीं-ब्राह्मणांबद्दल म्हणता येईल.

त्यामुळे समव्यावसायिकांत विवाह करणे हे फायद्याचे होते. सोयीचे होते. एक फुकटचा कामगार मिळत होता. वंशवृद्धीची सोयही लागत होती. मग अशा कुटुंबात मुलगी देणे व अशाच समव्यवसायी कुटुंबातील मुलगी करुन घेणे या देवानघेवाणीतून ती पुढे प्रथा बनत गेली असल्याचे आपल्याला दिसते. या प्रथेतून जन्माधारित जातीव्यवस्था निर्माण होण्यास, सर्वस्वी नसला तरी, हातभार लागला असेही आपल्याला म्हणता येते.

ब्राह्मणांनी आधी आपली जात बंदिस्त केल्याने अन्य समुहांनीही आपापल्या जाती बंदिस्त केल्या अथवा इतरांनी त्यांच्यात प्रवेशण्याचा दरवाजा बंद केल्याने जातेसंस्था बळकट बनली हे बाबासाहेबांचे उपरोल्लिखित प्रबंधातील मत विनम्रपूर्वक अमान्य करावे लागते. "व्यावहारिक सोय" हे समानव्यवसायींतर्गत विवाहाचे प्रमुख कारण आहे व ती पुढे जसजशी अधिक व्यवसायांची निर्मितीच थांबली तसतशी घट्ट होत गेली असे आपण ठामपणे म्हणु शकतो. भारतात दहाव्या शतकानंतर नवीन व्यवसायांची निर्मिती झाली नाही. म्हणजे कोनताही नवीन जीवनोपयोगी शोध लागला नाही. त्यामुळे नवीन जात निर्माण होण्याच्या शक्यता नव्हत्या. दहाव्या शतकानंतर महाराष्ट्रात दोनच जाती उदयाला आल्या व त्या म्हणजे मराठा व अक्करमाशे कुणबी/मराठा. त्यांच्या उदयाची कारणे सरंजामदारी व स्त्री-शोषण व्यवस्थेत आहेत. पण यावर आपण नंतर विवेचन करु.

२. जातिव्यवस्था कुलाचारप्रणित?: हिंदू धर्मातील प्रत्येक जात ही जवळपास एका स्वतंत्र धर्मासारखीच असते हे आपण जातीच्या बंदिस्त व्युहावरुन समजू शकतो. हिंदुधर्म म्हनजे विविध जातींचे एक फेडरेशन आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. प्रत्येक जातीचेच नव्हे तर पोटजातीचेही कुलाचार हे स्वतंत्र आहेत. कुलाचार ही पुरातन जमातींची उपज आहे. कुल म्हणजे जमात असेही म्हनता येते. पुरातन काळी मुलगी वराला नव्हे तर कुलाला दिली जात असे व कुलपती (जमातप्रमुख) हा वधुवर आपला पहिला हक्क गाजवत असे. "कुलवधु" हा शब्द या प्रथेचा निदर्शक आहे. प्रत्येक कुलाचे आचार भिन्न असतात. म्हणजे व्यापक परिप्रेक्षात मुख्य दैवते (कुलदैवते) अन्य जातींप्रमाणे समान असली तरीही स्वकुळाचे विशिष्ट अंश एका कुलाला दुस-या कुलापासुन विभक्त करतात.

पण जातिव्यवस्था जन्माधिष्ठित होण्याचा कुलाचाराशी संबंध दिसत नाही. परंतु प्राचेन काळी विभिन्न कुलांत विवाह होत होते, व कुल उच्च कि कनिष्ठ हे ठरवण्याच्या पद्धती सर्वस्वी धार्मिक आधारावर होत्या, व्यवसायांशी त्याचा संबंध नव्हता एवढे यावरुन आपण म्हणु शकतो. याचाच दुसरा अर्थ असा कि जमातींपासुन जाती बनल्या हे डा. इरावती कर्वे यांचे मत टिकत नाही हेही स्पष्ट होते. उलट जमातींतर्गत विवाह होत असल्याने एकही जमात शुद्ध स्वरुपाची राहिली असेही म्हणता येत नाही.

३. जातीव्यवस्था अर्थसंस्थाप्रणित?: कोणताही समाज असो अथवा राज्यसंस्था असो, अर्थव्यवस्था हा समाजाचा मुलभुत कणा असतो. अर्थव्यवस्थेमुळेच समाजात वर्गव्यवस्था अस्तित्वात येते. अर्थव्यवस्था कोणत्याही प्रकारची असो, वर्गहीण समाज निर्मण करणे हे मानवाचे स्वप्न अद्याप तरी साकार झालेले नाही व कदाचित होणारही नाही.

अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने उत्पादनावर आधारीत असते. उत्पादन सहाय्यक सेवांचाही अर्थव्यवस्थेला हातभार लागत असतो. शेती, खनीजे, वस्तु, वास्तु इ. उत्पादने तसेच रक्षण, व्यापार ई. सेवामिळुन अर्थव्यवस्थेची एक चौकट निर्माण होते. आपण भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्राचीन ते मध्ययुगीन स्वरुपावर एक ओझरती नजर टाकली कि आपल्या लक्षात येते कि सनपुर्व ५००० पासुन ते दहाव्या शतकापर्यंत अर्थव्यवस्थेचा चढता आलेख आहे. सिंधु संस्कृतीत मीठ, धान्य, अलंकार, लाकडी इ. वस्तुंचे प्रमाण मुबलक होत होते व निर्यातही होत होती. परंतु असे असले तरी व्यवसायांची संख्या मर्यादित असून शेती हाच मुख्य व्यवसाय होता. पुढे जसजसे नवे शोध लागले तसे वस्त्र, लोह-ताम्रजन्य वस्तुंचेही उत्पादन वाढु लागले. प्रारंभकाळी असे उत्पादक लोक अत्यल्प असनार हे उघड आहे. परंतु जसजशी मागणी वाढत जाते तसतशी त्या व्यवसायात अधिक व्यक्तींची आवश्यकता भासू लागते. आवड असनारे प्रशिक्षण घेवून त्या त्या व्यवसायांत पडु लागतात. गरजांची व्याप्ती मोठी असल्याने त्या व्यवसायांत प्रवेश करणारे स्वागतार्हच ठरत असतात, कारण त्यामुळे उत्पादन वाढ होत गरजांची आपुर्ती सुलभ होत असते. नवीन शोध लागला कि पुन्हा तसेच आवर्तन सुरु होते. अशा रितीने व्यवसायसंस्था विविधांगी वाढु लागतात. एकाच व्यवसायात वेगवेगळी कौशल्ये निर्माण झाली कि त्यांचेही स्वतंत्र समुह बनत जातात. हे एकाच वेळीस थोड्याफार अंतराने देशभर घडत जाते. फक्त मीठाची वाहतुक करणारे "लमाण" बनतात तर फक्त अन्नधान्याची वाहतुक करण्यात व व्यापार करण्यात कौशल्य मिळवतात ते "वंजारी, बंजारा" बनतात. परंतु निषिद्ध प्रवेशाची पाटी लागलेली नसते. ही प्रक्रिया जोवर मागणी आणि पुरवठा यात कोठेतरी समन्वय येत नाही तोवर सुरुच राहते.

परंतु नवे शोध थांबले आहेत, त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ विभागले जाण्याची शक्यता संपलेली आहे व नवीन अधिकच्या मनुष्यबळाची  आवश्यकता नाही तेंव्हा मुळातच त्या व्यवसायात कोणी पडण्याची शक्यता संपुष्टात येते. थोडक्यात त्या-त्या व्यवसायाला एक स्थितीस्थापकत्व येते.

पण अजुन विपरीत अवस्था आली. समजा एकुणातील मागणी झपाट्याने कमी होत गेली तर? असे कोणत्याही अर्थव्यवस्थेत कधीही घडु शकते हे आपण आधुनिक काळातही पाहतो. मध्य युगात भारतात अशा दोन महत्वाच्या घटना घडल्या. इस्लामी आक्रमणे व त्यामुळे निर्माण झालेली अराजकसदृष स्थिती व त्यामुळे थंडावलेला आंतर्देशीय व्यापार. ठप्प झालेला विदेशव्यापार. आणि अत्यंत महत्वाची बाब म्हनजे अकराव्या शतकाच्या पहिल्या भागात १०२२ पासुन पडलेले सततचे तीन भिषण राष्ट्रव्यापी दुष्काळ.

आता याचा जातीसंस्था जन्माधरित होण्याशी काय संबंध असा प्रश्न वाचकांना पडु शकेल. त्यावर आपण पुढील भागात विवेचन करुयात.

(क्रमश:)
To see previous articles in this series pls visit following links....


http://sanjaysonawani.blogspot.in/2012/10/blog-post.html
http://sanjaysonawani.blogspot.in/2012/10/2.html


2 comments:

  1. " आपल्याकडे वर्णसंकर हा अगदी शास्त्रोक्तपणे होत आलेला आहे.
    पितृसावर्ण्य , मातृसावर्ण्य ,अनुलोम आणि प्रतिलोम असे ते चार प्रकार !उद्दालक ऋषींचा काल - ज्या वेळेस विवाहसंस्थाच निर्माण झाली नव्हती
    ब्राह्मण इतर तीनही वर्णाच्या स्त्रियांशी लग्ने करत असत.आणि त्यांच्या पोटी झालेली संतती हि ब्राह्मणच मानली जात असे !
    त्रिषु वर्णेषु जातो हि ब्रह्मणो ब्राह्मणात भवेत - -
    आणि हे भिन्न्वर्ण ब्राह्मण संतान ब्राह्मणांच्या कन्येशी अभिन्नपणे विवाह करी !
    मातृ सावर्ण्य : आईची जात तीच मुलाची जात ठरू लागली
    " शुद्रैव भार्या शूद्रस्य सा च स्वा विशः स्मृते -ते चं स्वा चैव राज्ञश्च स्वा चाग्रजन्मनः -"
    अनुलोम प्रतिलोम प्रथांमुळेच संकारामुळेच पोटजाती उत्पन्न झाल्या
    खुद्द पाण्डवांचेच कुल पहा.
    ते कुल म्हणजे धर्म संरक्षक आर्योत्तम सम्राट भरताचे ! पांडवांचा काल म्हणजे " चातुर्वर्ण्यं मया सृष्टम "अशी घोषणा करून चातुर्वर्ण्याची
    हमी घेतलेल्या वासुदेव श्रीकृष्णाचा .
    प्रतीपाने शंतनूस सांगितले कि राजा ! हि स्त्री कोण कुठली - काय जात असे काहीही न बघता तिच्याशी लग्न कर त्यावरून शंतनुने
    गंगेशी लग्न केले.त्याचा मुलगा भीष्म ! पुढे शंतनुने कोळ्याच्या मुलीशी - सत्यवती शी - जात गोत माहित असून लग्न केले .
    शंतनुची जात गेली नाही .उलट सत्यावातीचे दोनही मुलगे चित्रांगद आणि विचित्रवीर्य -भारतीय ब्राह्मणांचे शास्त्रोक्त सम्राट झाले !
    पुढे त्या कोळ्याच्या मुलीच्या मुलाने - विचीत्रविर्याने अंबिका आणि अंबालिका या क्षत्रिय राजकन्यांशी विवाह केला
    विचित्रवीर्य अकाली मेल्याने त्या राण्यांपासून नियोग पद्धतीने व्यासांपासून पुत्रप्राप्ती केली.
    हा व्यास कोण ? तर ब्राह्मणश्रेष्ठ पराशर पुत्र ! आणि हा पराशर नेमका कोण तर " श्वपाकाच्च परशरः -एका अस्पृश्य श्वपाकाचा पुत्र !
    त्या अस्पृश्याचा हा पुत्र पराशर ब्राह्मण श्रेष्ठ ठरला त्यास कोळीण कुमारीकेपासून जो पुत्र झाला तोच महाज्ञानी महातपी महाभारतकार व्यास होय !
    व्यासानी नियोगाने पंडू आणि धृतराष्ट्राला जन्म दिला.दासीपासून नियोगाने विदुर जन्मला.पुढे पंडूच्या आज्ञेने
    कुंती आणि माद्रीने अज्ञात पाचजणांपासून पाच पांडवांना जन्म दिला ! भीमाने हिडीम्बेशी आणि कृष्णाने जम्बुवान्तिशी लग्ने केली होतीच !
    तात्पर्य , आजकाल स्वघोषित तथाकथित हिंदुराष्ट्र जसे बेटीबंदी , रोटीबंदी , लोटीबंदीच्या चीरेबंदीने चिणून टाकलेले आहे तसे ते त्याकाळी मुळीच नव्हते !
    राजकुळाची हि कथा तर प्रजेची काय ?
    अजून एक गोष्ट जाणवते ती म्हणजे
    कृष्णाचा एकही पुत्र प्रतीकृष्ण निघाला नाही.
    डोळस व्यासांचा पुत्र आंधळा तर नातू दुर्योधन दुःशासन !
    शुद्धोधनाचा पुत्र बुद्ध आणि बुद्धाचा राहुल !
    शिवाजीचा पुत्र संभाजी , आणि नातू शाहू .
    पहिल्या बाजीरावाचा पुत्र राघोबा आणि नातू पळपुटा बाजीराव ! कर्तृत्ववान आणि त्याच्या पुढच्या पाच पिढ्या यातच सगळे आटपते !

    तुकारामांच्या आज २० - २० पिढ्या होऊन गेल्या पण दुसरा तुकाराम निपजला नाही !
    किंवा पांडुरंगाने पुन्हा कधी त्यांच्या नातवंडांसाठी विमान पाठवले नाही !मला तरी माहित नाही !
    गेल्या सात पिद्ध्यात रामदासांच्या घरात दुसरा रामदास झाला नाही , न नेपोलियनच्या घरात दुसरा बोनापार्ट !
    हा लेख लिहिला आहे -विनायक दामोदर सावरकर यांनी.
    ते जातीभेदाची कशी खिल्ली उडवत त्याचे हा लेख उत्तम उदाहरण आहे.
    त्यांचा अजून एक लेख खुद्द डॉ .आंबेडकर यांच्या संदर्भात आहे.
    एक पत्र दिनांक १३ -११-१९३५ चे .आणि त्या संदर्भात इतर लेख .डॉ .आंबेडकर निमंत्रण वजा लेख आहे.
    सावरकर हे आजच्यासारखे वांझोटे राजकारण करणारे नव्हते.डॉ .आंबेडकर धर्मांतर करणार असे ऐकल्यावर त्यांनी लिहिलेले लेख आणि आजचा काळ
    हे सर्व अभ्यास करण्यासारखे आहे.
    सावरकरांनी जगत्गुरू बौद्ध पंडित अश्वघोष याचे वज्र सूची हे भाष्य आणि त्यावर केलेली मनमोकळी चर्चा अभ्यास करण्यासारखी आहे.

    भा.ज.प.आणि संघ यांना सावरकर कधी झेपलेच नाहीत.
    सावरकरांचे विचार लोकानुयायी नसल्यामुळे आणि ते स्वतः सवंग लोकप्रियतेच्या मागे जाणारे नसल्यामुळे
    कालौघात ते मागे पडले.हिंदू महासभा आणि संघ यांच्यात -त्यांच्या वैचारिक बांधणीत अतिशय फरक आहे.
    सध्या भा .ज.प.सावरकर आपलेच मानतो. तर डॉ हेडगेवारांनी १९१५ साली हिंदू महासभेची सावरकरांनी स्थापना केली असताना ,
    इसविसन १९२५ ला स्वतंत्र आर एस एस ची का स्थापना केली ?काय हेतू होता या वेगळेपणात ?

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...