Saturday, October 20, 2012

इतिहासाचे विनम्र पाईक...गुलामच!


खरे तर आपले दैनंदिन जीवन गतकाळाकडे पहातच चाललेले असते. निरभ्र रात्री आपण अनंत अवकाशात पहात असतो तेंव्हा आपण गतकालातच पहात असतो. डोळ्यांनी दिसनारे, नयनरम्य वाटणारे तारे, तारकागुच्छ हे हजारो-लाखो प्रकाशवर्ष इतके दूर आहेत...म्हणजे ते हजार-लाखो वर्षांपुर्वी होते तसे आपल्याला आज दिसत आहेत. या क्षणीचा त्यांचा वर्तमान आपल्याला माहित नाही. माहित होण्याचे साधन नाही. आज कदाचित ते नष्टही झाले असतील...पण ते नष्ट झालेत हे समजायला आपल्याला ते जेवढे प्रकाशवर्षे दूर आहेत तेवढी वर्ष लागतील...म्हणजे थोडक्यात आपल्या हयातीत त्यांचा खरा वर्तमान समजण्याची आपल्याकडे सोयच नाही. म्हणजे आपण अवकाशात पहात असतो तेंव्हा गतकालाकडे वर्तमान म्हणुन पहात असतो. एकार्थाने एका भ्रमाकडे पहात असतो. या क्षणीचे सत्य आपल्याला माहित नसते. माहित होण्याची शक्यता नसते.

आपल्या दैनंदिन जीवनात तरी वेगळे काय घडत असते? आपण गतकाळाच्या असमंजस छायांच्या गडद धुक्यात नित्य वेढलेलो असतो. हा गतकाळ स्वत:चा असेल, समाजाचा असेल, नजीकचा असेल वा अतिदूरचा असेल...पण असतो गतकाळच. आपण वर्तमान समाजाकडे वा स्वत:कडे पाहतो तेंव्हाही आपण स्वत:च्या वा समाजाच्या गतकाळाकडेच पहात असतो. वर्तमानातील समाज पाहण्याचे सामर्थ्य आपल्याकडे नाही. वर्तमानात दिसणा-या जीवंत छायांभोवतीचा इतिहासच आपल्याला दिसत असतो. कारण कोनतेही "व्यक्तिमत्व" (मग ते व्य्कतीचे असेल अथवा व्यक्तिसमुहाचे) आपल्या मनात साकार असते ते गतकाळातील एकुणातील अनुभव/छाया/पडछाया/समज/गैरसमज ई. चे एक प्रकट मानसिक रुप असते. त्यावर आधारीत आपण वर्तमानाचे आडाखे बांधत असतो. निर्णय घेत असतो. कृती करायची अथवा न करायची कृती करत असतो.

पण जसे अवकाशात पाहतांना खस्थ वस्तुंचा वर्तमान आपल्याला माहित नसतो, तसेच जीवनात प्रत्यक्ष पाहतांना आपल्याला मानवी इतिहासाचा खरा वर्तमान माहित नसतो. जो इतिहास आपल्याला माहित असतो असे वाटते तो तसाच घडलेला असतो असे नाही. काही गोष्टी तर घडलेल्याही नसतात पण तरीही इतिहासात त्यांना आपण अनन्यसाधारण महत्व देवून बसलो असतो. कधी घडलेल्या घटना केवळ आपल्या लाडक्या चरित्रनायकाला वा स्वत:च्या एखाद्या पुर्वजाला अडचणीत आणतील या कल्पित भयापोटी त्या घटना असत्य म्हणुन पुसटल्याही जात असतात. कधी कधी तर पुरत्या नष्टही करुन टाकल्या गेलेल्या असतात. किंवा अशाही अनेक घटना असतील ज्यांनी कदाचित इतिहासाला कलाटण्या दिल्याही असतील...पण त्यावेळीस त्यांचे महत्व न समजल्याने त्या तशाच इतिहासाच्या कृष्णविवरात अडकुन पडल्या असतील.

पण आपल्याला तरीही इतिहासात पहावेच लागते. आपला वर्तमान म्हणजे गतकाळाची क्षणाक्षणाला बदलत जाणारी पडछाया. इतिहासाचे आकलन भ्रमात्मक/अज्ञानात्मक असल्याने वर्तमानही अर्थातच विकृत बनलेला असतो व त्याधारित आपण भविष्याकडे जात गतकाळ सम्रुद्ध (?) करत जात असतो. अजून भ्रमात्मक इतिहास बनवत जात असतो.

फार क्वचित माणसं असतात जे इतिहासाच्या या अनिर्बंध सत्तेला आव्हान देत असतात. ऐतिहासिक सत्य म्हणुन सांगितल्या जाणा-या असत्यांना नाकारायची हिम्मत दाखवत असतात. सत्य कदाचित त्यांच्याच हाती लागते. तेच अणुगर्भाची पोकळी शोधू शकतात. तेच विश्व वस्तुमानातुन अवकाशभर एका स्फोटातुन पसरले हेही सत्य नाही सांगत अवकाशाचेच वस्तुमानात रुपांतर झाले हे सांगु शकतात. उद्या त्यांचेही ऐतिहासिक "असत्य" अजून कोणीतरी नव्या सत्यात बदलवू शकतो. इतिहास नाकारणा-यांनीच जग घडवले आहे. पुढेही घडत राहणार आहे ते अशाच लोकांमुळे.

इतिहासाचे विनम्र पाईक नेहमी गुलामच राहिले आहेत. त्यांना कधीही स्वच्छ वर्तमान नसतो कारण ते गतकाळाच्या चष्म्यातुनच वर्तमान जोखत असतात. इतिहास गिळत जगत जात असतात. इतिहासाला आव्हान देणारेच इतिहास घडवत असतात...प्रकाशवेगाने वाटचाल करुन अवकाश-सृष्टीचा वर्तमान पाहण्याचे स्वप्न भविष्यासाठी निर्माण करत असतात.


4 comments:

 1. संजय,
  तुमचे हे लिखाण अगदीच अर्थहीन -झोपेत लिहिल्यासारखे !
  झोपेत चालणारे आणि बोलणारे मी पाहिले होते,
  पण हे म्हणजे फारच !
  उगीचच साहित्याचा मांड मांडल्या सारखे काहीतरी.साहित्यिक लटांबर !
  स्टीफन हौकिन्स चे पुस्तक जर वाचले असेल एखाद्या हाजी अली पासल्या भिकाऱ्याने तर तो काहीतरी
  जुळवा जुळव करून जसे बिगबँग कृष्ण विवर वगैरे बडबड करेल तसे हे वाटते !
  हौकिंस यांनीच आगगाडीत क्यारम खेळले तर काय होईल , किंवा एखादी जड वस्तू इकडून तिकडे रेल डब्ब्यात दिली
  तर काय घडेल ,हे फार सुंदर दिले आहे,गाडीची दिशा आणि विरुद्ध दिशा अशा दोन्ही दिशांना समान न्याय का मिळेल,
  गाडीच्या वेगाच्या दिशेने मारलेली सोंगटी आणि विरुद्ध दिशेला मारलेली सोंगटी यांना मारण्यास सारखीच ताकद का लागते
  हे त्या महान शास्त्रज्ञाने अतिशय सोपे करून सांगितले आहे.

  आपण इतके फालतू अर्थहीन लिहित जाऊ नका.साहित्य हा आपला प्रांत नाही असे सांगावेसे वाटते.
  तुमच्या चीत्राकालेबाद्दल्पण असेच म्हणावेसे वाटते-फारच पोरकट वाटतात ती .

  त्यापेक्षा दुसरे विषय निवडा - चित्रकलेची आवड दिसत्ये तर त्यावर लिहा -
  सर्यालीझम ,एकस्प्रेशानिझम ,जर्मन एकस्प्रेशानिझाम ,क्युबिझम ,चित्र म्हणजे काय-
  घन आकार,त्यावर पडणारा प्रकाश सावली चा खेळ , मटेरीअल,त्याचा पोत वगैरे वर लिहा.
  संगीत आवडत असेल तर ताल लय यावर लिहा.मात्रा -आरोह अवरोह -राग त्याची बांधणी आणि मांडणी -घराणी-

  लेखक ,त्यांच्या लिखाणाला कालसापेक्षता कशी असते ते सांगा -
  महाकवी गुणाढ्य - पैशाची भाषा आणि बृहत्कथा यावर लिहा. ( ! )
  अगदीच काही नाही मिळाले तर रामायण महाभारत तर आहेच हक्काचे -
  ब्राह्मण पण आहेत तोंडी लावायला , महाराज तर आहेतच !
  भाषा आणि जाती हे तर आपल्या हक्काचे विषय ,
  कमी पडल्यास कुत्री मांजरे आहेतच .
  मी हे निराशेपोटी लिहितोय कारण
  आपल्याकडून आम्हा वाचकांच्या फार उच्च अपेक्षा आहेत.
  थोडेसे कडवट लिहिल्याबद्दल क्षमस्व म्हणणे रीतीला धरून होईल नाही का ?

  ReplyDelete
  Replies
  1. लाथ मारल्यावर सॉरी म्हणणे रीतीला धरूनच आहे.

   Delete
 2. Tumche khare ahe. itihasala avhan dile tar kranti ghadte. itihas japla tar magchya panavaran pudhe. apali pragati tyamule jhali nahi. avakashacha sandarbh nit samajala nahi pan ahe tepan kharech.

  ReplyDelete